आजकाल नाही तर भारतातील मॉब लिंचींगचा इतिहास दोनशे वर्षे जुना आहे .

तसं तर जगभरात नेहमीच मॉब लिंचींग म्हणजेच जमाव हिंसेच्या घटना घडत असतात. पण सध्या मॉब लिंचींगच्या एका घटनेनं भारत पुरता हादरून गेला आहे. घटना घडली आहे ती झारखंडमध्ये सिमडेगा इथं. ३४ वर्षाच्या एका तरुणाला जमावाने आधी काठ्यांनी मारहाण केली आणि नंतर घरात पडलेल्या लाकडाच्या ढिगाऱ्याला आग लावून जिवंत जाळण्यात आलं. संजू प्रधान असं या तरुणाचं नाव. आणि त्याला मारण्याचं कारण म्हणजे त्यानं झाडं तोडली.

या गावाच्या परिसरात आदिवासी परंपरेनुसार झाड न कापण्याचा नियम आहे. जर कुणाला लाकडाची गरज पडली आणि त्यासाठी झाड कापायचं असेल तर आधी ग्रामपंचायतीची परवानगी घेणं बंधनकारक आहे. पण गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार संजू अवैधरित्या झाडं कपात होता. वारंवार सांगूनसुद्धा तो थांबला नाही म्हणून गावकऱ्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी ही कृती केली, असं सांगितलं जातंय.

तर संजूच्या बायकोच्या म्हणण्यानुसार, त्यांना घर बांधण्यासाठी लाकडाची गरज होती. त्यानुसार संजूने पंचायतीकडून परवानगी घेत झाडं विकत घेतली आणि मग ती कापली. तरीही गावकऱ्यांनी त्याचं काहीही न ऐकता संजूला मारून टाकल. संजू आणि त्याची बायको कळवळत होते, पण कुणीही त्यांच्या ‘हाकेला ओ’ दिला नाही. या घटनेमागचं खर कारण काय आहे, याचा तपास पोलीस लावत आहेत.

पण या अनुषंगाने हा प्रश्न पडतो की, भारतात अशा सामुहिक हिंसाचाराच्या घटनांची सुरुवात नेमकं कधी झाली असावी? आणि त्यांची कारण काय होती?

भारतात १७१४ मध्ये गुजरातमध्ये झालेल्या ‘होळी दंगली’मुळे जमाव-हिंसेची पहिली नोंद झाली. गायीच्या संरक्षणासाठी हा प्रकार घडला असं सांगितलं जातं. हिंसक जमावानं बाजारपेठा आणि घरे जाळली. या  घटनेत अनेक हिंदू आणि मुस्लिमांचा मृत्यू झाला. हिंसाचाराचं चक्र काही दिवस अव्याहतपणे सुरूच राहिलं, परिणामी अहमदाबादमधील परिसर उद्ध्वस्त झाला.

यानंतरही  १८८० आणि १८९० च्या दशकात ब्रिटीश भारतात सातत्याने गोरक्षणाच्या दंगली झाल्या. पंजाब, बिहार, बंगाल, बॉम्बे या प्रदेशात त्या घडल्या. १८९३ मध्ये पंजाबमध्ये झालेल्या गोहत्या विरोधी दंगलीत जवळपास १०० लोक मारले गेले. या प्रकरणात एकट्या मुंबईत शेकडो लोक मारले गेले किंवा जखमी झाले.

पूर्व उत्तर प्रदेशातील मऊ गावात, १८०६ मध्ये दंगली झाल्या. हे सर्व सुरू झाले जेव्हा स्थानिक जमीनदार मुस्लिम असल्यामुळे त्याच्या मुलीच्या लग्नात जनावराचा बळी देण्यास स्वारस्य दाखवले. लगेचच, हिंदूंचा एक गट त्याला विरोध करण्यासाठी स्थानिक पातळीवर जमला. 

१८९३ मध्ये बलिया जिल्ह्यातील सुमारे चार हजार आणि गाझीपूर जिल्ह्यातील दोन हजार हिंदू पुरुष गायीची हत्या थांबवण्याच्या उद्देशाने मऊ इथं जमले. गायीच्या रक्षणासाठी इच्छुक असलेल्या हिंदूंनी मुस्लिमांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. या मॉब लिंचींगमध्ये सुमारे सात मुस्लिमांचा मृत्यू झाल्याचा अंदाज ब्रिटिश अधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता, तर स्थानिकांनी २०० जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला होता.

२० व्या शतकाची सुरुवात गंभीर गोरक्षण आंदोलन आणि दंगलीनी झाली. मुस्लिमांनी सार्वजनिकरित्या गायीचा बळी दिल्यावर १९०९ मध्ये कलकत्ता तर १९१२ मध्ये एका मौलवीने हिंदूंच्या एका गटाला गायीबद्दल टोमणा मारला तेव्हा फैजाबादमध्ये अशा घटना घडल्या. १९१६ आणि १९१७ मध्ये, ईदच्या वेळी, पाटणा इथं सलग दोन दंगली उसळल्या ज्यामुळे बिहारच्या प्रमुख शहरांमध्ये लूटमार, दंगली आणि खून झाला.

पण सगळ्यात मोठ्या प्रमाणात सामुहिक हिंसा झाली ती १९२० च्या दशकात. यावेळी बंगालमध्ये १०० हून अधिक दंगली झाल्या, ज्यात ४५० लोकांचा मृत्यू झाला आणि ५००० जखमी झाले. दुर्गापूजेच्या मिरवणुकांमध्ये हिंदूंनी संगीत वाजवले जे मशिदींमधून गेले आणि ईद-उल-अधाच्या वेळी उघड्यावर मुस्लिमांकडून गायींची हत्या ही जमाव-हिंसेची प्रमुख दोन कारणं होती.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर तर हा मुद्दा जास्तच ज्वलंत झाला. १९४८ ते १९५१ या चार वर्षांच्या कालावधीत केवळ गोहत्येमुळे आझमगढ, अकोला, पिलभित, कटनी, नागपूर, अलीगढ, धुबरी, दिल्ली आणि कलकत्ता इथं दंगली घडल्या.

जानेवारी २०११ आणि जून २०१७ मधील बहुतेक निरपराध लोकांचा मॉब लिंचिंगमुळे होणारा मृत्यू दर्शविते की, गायींशी संबंधित हिंसाचार अलीकडच्या काळात अधिक प्रमाणात वाढला आहे. इतिहासात मॉब लिंचिंग सुरु होण्याला गोहत्या हे जरी कारण असल तरी आता जातीय आधारावर, जादूटोणा, ऑनर किलिंग, मांस प्रकरणे, कोणत्यातरी संशयावरून, चोरी प्रकरणे अशी वेगवेगळी मॉब लिंचिंग कारण आहेत.  

अलीकडच्या काळात भारतभर प्रदर्शित झालेल्या लिंचिंगच्या लाटेत, राजकीय, सामाजिक-आर्थिक आणि मानसिक घटकांच्या एकत्रित परिणामामुळे या घटना जास्त घडताना दिसत आहेत. लोकांना भडकवणाऱ्या या घटकांमध्ये शेतीच्या बिकट संकटाचा आणि रोजगाराच्या कमी संधींमुळे तीव्र असंतोष आणि संताप यांचा समावेश होतो. सोशल मीडियाद्वारे त्यांचा आक्रमकपणे प्रचार केला जात आहे. 

एक मात्र नक्की की मॉब लिंचिंग म्हणजे कमकुवत लोकांवर जमावाने मिळून दबाव जमवण. मॉब लिंचिंग हे सर्वायव्हल ऑफ द फिटेस्ट (Survival of the fittest) चं सगळ्यात वाईट उदाहरण म्हणून आपण बघू शकतो. 

हे ही वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.