खऱ्याखुऱ्या आयुष्यातला खराखुरा,’मोगली’.
एका जंगलात दोन राजा होते. एकाच नाव चंदरू आणि दूसऱ्याचं टेम्बू. टेम्बू खरा राजा होता. चंदरू पण राजाच होता पण त्याला एक शाप होता. तो शाप होता माणूस असण्याचा. टेम्बू जन्मजात वाघ होता पण चंदरू माणूस होता. त्यामुळ तो माणसात होता. याच माणूसपणातून एक गोष्ट झाली.
खरीखुरी गोष्ट. लोकांनी त्याला मोगली नाव दिलं. मिडीयाने मोगली म्हणूनच डोक्यावर घेतलं. काळ संपला. चंदरू संपला पण ती गोष्ट तशीच राहिली.
हि गोष्ट आहे खऱ्याखुऱ्या मोगलीची…!
बस्तरचं जंगल. खोल आणि घनदाट. आजही तिथे सहसा माणूस सापडत नाही. तो काळ तर १९५० नंतरचा होता. बाहेरचा माणूस अशा जंगलात जाण्यासाठी घाबरायचां. याच जंगलातली आदिम जमात म्हणजे मुरीया. या जमातीत चंदरूचा जन्म झाला होता. जंगलात असणारा एक पाडा. आदिम जमातीचे सण, दिवसभराचा खेळ अस त्याचं आयुष्य होतं.
चंदरूचे वडिल आणि आजोबा शिकारीला जायचे. एका बाणात भल्लामोठ्ठ प्राणी पाडायचे. अजगराचं मांस खाणारी माणसं. रोजची शिकार ठरलेली असायची. एक दिवस चंदरुचे वडिल येताना टोपली घेवून आले. टोपलीतलं कोवळं मांस खायला मिळणार म्हणून पाच सहा वर्षाचा चंदरू खूष झाला.
चंदरूने टोपली उघडली तर आत वाघाचा बच्चा होता.
जंगलाच्या आत कुठेतरी वाट चुकलेला जंगलाचा राजा आत्ता चंदरु सोबत होता. चंदरुने वाघाचा बच्चा जवळ घेतला. त्याचं नाव ठेवलं टेम्बू. टेम्बू आणि चंदरू जिगरी दोस्त. दिवसभर एकत्र खेळायचे. नदिवर जायचे. टेम्बूला विसरुन गेलेला आपण वाघ आहोत ते. टेम्बू त्या पोरांसोबतच खेळायचा. नदिवर मासे पकडायला हे दोघे एकत्र जायचे. चंदरु आपल्या बाणाने मासे पकडायचा आणि टेम्बू फडशा पाडायचा.
या दोघांची दोस्ती हळुहळु जंगलातून बाहेर पडली. या गावातून त्या गावात करत हि माहीत सातासमुद्रापार गेली. अशाच एका दिवशी चंदरु आणि टेम्बू खेळत होते. त्याच्या झोपडीसमोर मोठमोठ्या गाड्या उभ्या राहिल्या. त्या गाड्या होत्या एका सिनेमाच्या डायरेक्टरच्या.
स्वीडनचा डायरेक्टर आर्ने सॉक्सडार्फ चंदरूच्या घरासमोर उभा होता.
सोबत आपल्या सहकाऱ्यांचा ताफा. दिवसाला दोन रुपये हाजरी हे चंदरू गुंतवलेली रक्कम होती. त्या काळात आदिवासी भागात हि रक्कम देखील प्रचंड अशीच होती. सिनेमाच शुटिंग सुरू झालं. स्वीडनच्या डायरेक्टरने जंगलातच शुटिंग चालू केलं. चंदरू त्याचा मित्र टेम्बू या दोघांना घेवून कथा रचण्यात आली. पिक्चरचं नाव ठरलं “द जंगल सागा”.
शुट झालं आणि गाड्या आपआपल्या देशात गेल्या. द जंगल सागा स्वीडनमध्ये १९५७ साली रिलीज झाला. लोक हैराण झाले. असाही मुलगा असू शकतो हिच अशक्य गोष्ट होती. स्वीडनच्या लोकांनी त्याला डोक्यावर घेतला. जगभरात त्याच्याबद्दल बोललं जावू लागलं.
हिकडं मात्र शुटिंग संपल्यानंतर चंदरू आणि टेम्बू तशेच सख्या दोस्तासारखे होते. टेम्बूला आपला दोस्त आत्ता मोठ्ठा माणूस झाला आहे हे समजण्याचा प्रश्नच नव्हता. कारण टेम्बू वाघ होता, त्याला माणसं अजून कळाली नव्हती. एकदिवस पुन्हा जंगलात गाड्या आल्या. डायरेक्टर म्हणाले, तुमचा चंदरू मोठ्ठा हिरो झाला. त्याला घेवून आम्ही स्वीडनला जातो.
चंदरू स्वीडनला गेला. हिकडे टेम्बू एकटाच राहिला. अगदी एकटा.
तिकडे चंदरू स्वीडनमध्ये रेड कार्पेटवर फिरू लागला. वर्षाभरात खूप प्रेम चंदरूला मिळालं. चंदरू रहायला देखील डायरेक्टरच्या घरी असायचा. डायरेक्टरच्या बायकोने त्याच्यावर मुलासारखं प्रेम केलं. चंदरु वर्षभर जगाच्या कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात फिरला. वर्ष झालं. सिनेमाची हवा संपली आणि चंदरूची पण.
चंदरू भारतात आला. तो समुद्रमार्ग मुंबईत उतरला. तिथे पंडित जवाहरलाल नेहरू त्याला भेटले. नेहरुंनी त्याला पहिला शिक नंतर काम करु म्हणून आश्वासन दिलं. जंगलात वाढलेला चंदरू शिकण्याचा प्रश्नच नव्हता. चंदरू पुन्हा जंगलात आला. टेम्बूने त्याचं स्वागत केलं. टेम्बू खूष झालेला…
पुन्हा ते दोघे एकत्र झाले.. एक दिवस टेम्बू गेला. वाघच तो. किती दिवस जगणार होता. आत्ता चंदरूकडे जगण्यासारखं दूसरं काहीच नव्हतं. जवळचा दोस्त गेला. स्वीडनच्या फक्त आठवणी. काही दिवसांनी चंदरूने लग्न केलं. घोटुल सारख्या आदिम प्रथेत मुलगा आणि मुलगी एकमेकांना निवडतात. अशाच एका प्रथेत चंदुरने आपल्या बायकोची निवड केली. त्याच्या बायकोनेही त्याला निवडलं. दोघांच लग्न झालं.
वेळ गेला……
पन्नास वर्ष होवून गेली….
चंदरु गेला १८ सप्टेंबर २०१३ ला. तेव्हा लोकांना समजलं अरे हा तर मोठ्ठा हिरो होता. त्याच वेळी त्याच्या बायकोला देखील समजलं आपला नवरा इतका मोठ्ठा होता. मुलांनाही तेव्हाचं समजलं. तर अशी हि खरीखुरी गोष्ट होती खऱ्याखुऱ्या मोगलीची…
हे ही वाचा.
- अस होत माणूस आणि वाघाचं नातं.
- जंगल सफारी वाघ.
- अंदमानच्या सेंन्टिनली लोकांना एकटं सोडणं का गरजेचं आहे.