न्यूड – पण काही गोष्टी दाखवायच्या राहिल्या…

तुम्ही कधी स्वतःला नागडं पाहिलंय का? खूप बाळबोध प्रश्न आहे. पण हाच प्रश्न अवघड बनतो जेव्हा विचारल्या जातं तुम्ही दुसऱ्याच्या नजरेतून स्वतःला कधी नागडं पाहिलंय का? आपले सामाजिक हितसंबंध मोडीत काढणारं उत्तर असलेला हा प्रश्न आहे. पण या प्रश्नाची गरज आहे का? असा प्रतिप्रश्न हे आपल्याकडे त्याचं मध्यममार्गी चलाखीनं थोपवलेलं उत्तर. 14 व्या शतकात युरोपात रेनेसन्स मुळे कला माणूसकेंद्री झाली. आणि माणूस म्हणजे पहिलं त्याचं शरीर या अधोरेखित तत्त्वाने कलेचं सौंदर्यशास्त्र शरीरकेंद्री झालं. आता या जाणिवेला 600 वर्षं उलटून गेली तरीही मुख्य प्रश्न काही सुटलेला नाही.

रवी जाधव यांचा “न्यूड” हा या प्रश्नाभोवती फिरतो. कर्नाटक निपाणी भागातली यमुना (कल्याणी मुळे) नवऱ्याच्या बाहेरख्याली जाचाला त्रासून आपल्या मुलासह (मदन देवधर) मुंबईत आपल्या अक्काकडे (छाया कदम) येते. तिथे काही काम मिळावं या अपेक्षेने ती दारोदार फिरते. एक दिवस आपल्या अक्काचा पाठलाग करून तिला दिसतं की ती एका जागी नग्नावस्थेत बसलेली आहे आणि काही मुलं तिच्या सभोवती काहीतरी रंगरंगोटी करत आहेत. ही ‘अश्लील’ भानगड काय आहे याचा ती पिच्छा पुरवते. पैशाच्या गरजेपोटी पुढे यमुनाच एक न्यूड पोजिंग करणारी मॉडेल बनते अशी चित्रपटाची कथा आहे. पटकथा बऱ्याच अंशी पठडीबाज आहे. पुढच्या घटनांची चाहूल प्रेक्षकांना आधीच लागलेली असते. कथेच्या पातळीवर न्यूड कुठेच चकित करत नाही धक्के देत नाही.

न्यूड चे खरे बलस्थान त्याच्या छायाचित्रणात आहे. रवी जाधव हे स्वतः J J school of arts चे विद्यार्थी राहिलेले आहेत. त्यामुळे तिथे घडणारे प्रसंग कधीच वाढीव किंवा खोटे वाटत नाहीत. त्याहीपेक्षा ते एखाद्या शिल्पासारखे वाटतात. त्यांच्याच आठवणीतून त्यांनी पुन्हा आपल्या कॉलेज ला पडद्यावर घडवलेलं आहे असं वाटतं. अक्काच्या घरात असलेला झिरोचा लाल लाईटबल्ब, यमुना न्यूड पोजिंग ला बसते तेव्हा तिच्या चेहऱ्यावरची सोनेरी प्रकाशछटा, अक्काच्या वस्तीचा वाईड शॉट अशी अनेक नितांत सुंदर स्थिरचित्र आणि प्रकाशयोजना चित्रपटामध्ये जागोजागी आहे. अक्खी फिल्म एक पेंटिंग वाटावी इतकी गहिरी आणि सुखद आहे. पण हाच अनुभव पटकथेच्या प्रवासातून येत नाही. काही गोष्टी ओढून ताणून आणल्या आहेत असं वाटत राहतं. मुख्य म्हणजे छाया कदम आणि ओम भूतकर यांचा अपवाद वगळता सर्वच कलाकारांनी जीव ओतून केलेला रटाळ आणि मेलोड्रामॅटिक अभिनय ही फिल्मची लंगडी बाजू आहे. दृश्यात्मकता कितीही सुंदर असली तरी सिनेमामध्ये व्यक्तिरेखेला जे वाटतं त्यातलं थोडंफार तरी प्रेक्षकांना वाटलं पाहिजे असा विरेचनाचा साधा सिद्धांत आहे. या सहवेदनेच्या देवाणघेवणीवर सिनेमाचं यश अवलंबून असतं. आणि तिथेच नेमका “न्यूड” फसतो आणि कपडे घालून आपल्या समोर येतो.

चित्रपटाचं संगीत हा एक स्वतंत्र अनुभव आहे. अतिशय तरल, वाद्यमेळ्याचा कमीतकमी वापर करून घडवलेलं न्यूडचं संगीत आतमध्ये झिरपत जातं. यमुना न्यूड पोजिंगला बसलेली असते तेव्हा लागलेलं निर्गुणी भजन हे प्रत्यक्ष एका मैफिलीतल्या गाण्याचं रेकॉर्डिंग आहे. तेव्हा गाताना गायिका आपल्या तबल्याच्या साथीदाराला वाह करून दाद देते तेसुद्धा आपल्याला ऐकू येतं. भोवतीचे चित्रकार आणि न्यूड यमुना यांचे शब्दांच्या दाद पलीकडचे रंगाचे नाते आणि मागे लागलेलं हे गाणं अंगावर शहारे आणून सोडतं.

“न्यूड” माणसाच्या लिंगभावनेवर कुठलेही मूलभूत भाष्य करत नाही. त्यावरच्या राजकारणाचे थोडेबहुत पैलू चित्रपटामध्ये आहेत पण ते अगदीच वर्तमानपत्रीय वाटतात. तरीपण संगीत आणि अफलातून छायाचित्रण यामुळे तो एक चांगला चित्रपट झालेला आहे. आणि सुन्न करणारा शेवट वगैरे सगळ्या भूलथापा आहेत. चित्रपटाचा शेवट कुणीतरी मरतो यावर करण्याचा सध्या बाजारात ट्रेंड आहे. एखादि व्यक्तिरेखा पडद्यावर मरते आणि यालापान सुन्नबिन्न म्हणतो तेव्हा आपण आपल्या भावना किती बाजारू झाल्या आहेत हे तपासले पाहिजे. बाकी स्वतःला दुसऱ्याच्या नजरेतून नागडं पाहणं किती आणि का महत्त्वाचं आहे हा प्रश्न इथेही अनुत्तरित राहतो. “न्यूड”चा शेवट एखाद्या बोधकथेसारखा आहे. अगदी सरळ आणि सहज. कदाचित हेच “न्यूड” चे मोठे अपयश असावं.