मुंबई आणि पुण्यातील आकर्षणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या विसर्जन मिरवणूका याच जागांवरून बघा

रोज सकाळ-संध्याकाळ कानावर पडणारा गाण्यांचा आवाज, गर्दीनं तुडुंब भरलेले रस्ते आणि गणरायाचा जयघोष, जवळपास दोन वर्षांनंतर आपण सगळ्यांनीच हे वातावरण अनुभवलं. उत्साहात पार पडलेल्या गणेशोत्सवाची सांगताही तितक्याच उत्साहात होते, ती विसर्जन मिरवणुकीच्या रुपानं. पुणे असो किंवा मुंबई विसर्जन मिरवणवूक बघायला फक्त महाराष्ट्रातलेच नाही तर परदेशी नागरिकही आवर्जून हजेरी लावतात.

पण सगळीकडे चर्चेत असणाऱ्या, आकर्षणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या या विसर्जन मिरवणूका बघाव्यात असं आपल्याला फिक्स वाटत असतं. 

पण नेमकं कुठं थांबायचं ? विसर्जनासाठी गणपती कुठल्या मार्गाने जातात हे माहीत नसतं आणि आपण उगाच गर्दीचा भाग बनून राहतो. त्यामुळे गणेशोत्सवासाठी प्रसिद्ध असणाऱ्या या दोन शहरांमधल्या विसर्जन मिरवणुकीचा नेमका आनंद कसा घ्यायचा याचीच माहिती घेउया.

सगळ्यात आधी बोलूयात मुंबईबद्दल

मुंबईच्या गणेशोत्सवाचं विशेष आकर्षण असतं, ते म्हणजे भव्यदिव्य गणेश मुर्त्या. २२ फूट उंचीचा मुंबईचा राजा, यंदा ३८ फुटी मूर्ती असलेला खेतवाडीचा राजा आणि असंख्य भाविकांचं श्रद्धास्थान असलेले चिंचपोकळीचा चिंतामणी आणि लालबागचा राजा या गणपतींची विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी मुंबईच्या रस्त्यांवर प्रचंड गर्दी असते. 

लालबाग भागातले गणपती जवळपास एकाच मार्गाने जातात, लालबागमधून निघाल्यावर श्रॉफ बिल्डिंग, चिंचपोकळी ब्रिज, बद्री अड्डा, आग्रीपाडा, कुंभारवाडा आणि मग गिरगाव चौपाटीला विसर्जनासाठी गणपती पोहोचतात. 

मुंबईच्या विसर्जन मिरवणुकीचं आणखी एक आकर्षण असतं, ते म्हणजे पुष्पवृष्टी.

 गणपतीची मूर्ती इथे आली की, दहीहंडीसारख्या बांधलेल्या परडीतून फुलं आणि गुलालाचा वर्षाव गणपतीवर होतो, श्रॉफ बिल्डिंग आणि सेवासाधना बिल्डिंग इथली पुष्पवृष्टी तर बघण्यासारखी असते. श्रॉफ बिल्डिंग, कुंभारवाडा, आग्रीपाडा आणि गिरगाव चौपाटी या स्पॉटवर थांबलं की आपल्याला बहुतांश गणपतींचं दर्शन होतंच.

मुंबईच्या राजाची मिरवणूक सकाळी ७.३०-८ च्या सुमारास गणेशगल्लीतून सुरू होते.

 त्यानंतर ९-१० वाजेपर्यंत लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी या मंडळांच्या मिरवणुकींनाही सुरुवात होते. सगळ्या विसर्जन मिरवणुकीचं आकर्षण एकच असतं, लालबागचा राजा. गुलालाच्या रंगात रंगलेले कार्यकर्ते आणि अलोट गर्दीत उठून दिसणारी लालबागच्या राजाची मूर्ती अशी ही मिरवणूक जवळपास १८ ते २० तास चालते. लालबागचा राजा विसर्जनासाठी मंडपातून निघाला की सगळ्या लालबागला फेरी मारतो. त्यानंतर भारतमाता, श्रॉफ बिल्डिंग, चिंचपोकळी ब्रिज या मार्गानं लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर येतो. 

महत्त्वाचं म्हणजे आग्रीपाडा इथे लालबागचा राजा आला की, हिंदू आणि मुस्लिम बांधव एकत्रितपणे गणपतीचं स्वागत आणि आरती करतात.

आणखी एक चर्चेचा विषय असतो तो म्हणजे लालबागच्या राजाची आणि चिंचपोकळीच्या चिंतामणीची भेट. हे दोन्ही गणपती चिंचपोकळी ब्रिजच्या अलीकडे किंवा गिरगाव चौपाटीला भेटतात. मुंबईच्या भाविकांकडून सांगण्यात येतं की, विसर्जनावेळी एक प्रथा पाळली जाते ती म्हणजे चिंचपोकळीचा चिंतामणी चौपाटीवर आल्याशिवाय लालबागचा राजा विसर्जन होत नाही. भव्य गणेशमूर्ती, फुलांची-गुलालाची उधळण, पारंपारिक वाद्यांचा, आरतीचा गजर आणि भाविकांच्या प्रचंड गर्दीत मुंबईची विसर्जन मिरवणूक पार पडते.

आता येऊयात पुण्याकडे. 

सकाळी दहाला सुरू होणारी पुण्याची विसर्जन मिरवणूक किमान २६ ते २८ तास चालते. या विसर्जन मिरवणुकीचे चार मुख्य मार्ग असतात. लक्ष्मी रोड, केळकर रोड, कुमठेकर रोड आणि टिळक रोड, या चार मार्गांवरुन जवळपास २५० मंडळं मार्गस्थ होतात. विसर्जन मिरवणूकीची सुरुवात होते मंडईतल्या लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून. सगळ्या रस्त्यांवर रांगोळीच्या पायघड्या घातलेल्या असतात. 

त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात सकाळी दहाच्या सुमारास मानाचा पहिला कसबा गणपती बेलबाग चौकाकडे निघतो आणि मिरवणुकीला सुरुवात होते. 

त्यानंतर तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा हे मानाचे इतर गणपती लक्ष्मीरोडनं मार्गस्थ होतात. कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी आणि केसरीवाडा हे तिन्ही गणपती पालखीमध्ये विराजमान असतात. तर गुरुजी तालीम मंडळाचा गणपती फुलांच्या रथात विराजमान असतो. तुळशीबाग गणपतीची भव्य मूर्ती डोळ्यांचं पारणं फेडणारी असते. फायबरची ही मूर्ती पावसात भिजतानाही सुंदर दिसते. 

मानाच्या पाचही गणपतींची विसर्जन मिरवणूक लक्ष्मी रोडनेच जाते. या मिरवणुकीत वेगवेगळी ढोल ताशा पथकं, मल्लखांब आणि शिवकालीन मर्दानी खेळांचं प्रात्यक्षिक या मिरवणुकीचं विशेष आकर्षण असतं. कसबा, तांबडी जोगेश्वरी आणि केसरीवाडा हे तीन मानाचे गणपती सोडले, तर पुण्यातल्या इतर मोठ्या मंडळांच्या मूर्तीचं विसर्जन होत नाही. 

जर तुम्हाला पुण्यात ढोल ताशा पथकांचं सादरीकरण पाहायचं असेल, तर लक्ष्मी रोड हा बेस्ट पर्याय ठरतो. समाधान चौक, गणपती चौक, लिंबराज महाराज चौक, शगुन चौक, विजय टॉकीजचा चौक आणि अलका चौकात थांबून तुम्हाला मिरवणुकीचा आनंद घेता येईल. 

मिरवणुकीवेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्दी असते, त्यामुळं जर लक्ष्मी रोडवर एखाद्या नातेवाईकाचं घर किंवा मित्राची रुम असली, तर २१ मोदकांचा बॉक्स घेऊन आधी तिकडं जा, हे नातेवाईक आणि मित्र पावले तर बाप्पाचं निवांत दर्शन घेता येईल.

पुण्याच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये जसं ढोल ताशांचं आकर्षण असतं तसंच साऊंडचंही. 

कुठला लावलाय ? किती बेस किती टॉप ? हे शब्द मिरवणुकीच्या एक दोन दिवस आधीच ऐकायला मिळतात. मानाचे गणपती विसर्जन व्हायला साधारण ५-६ वाजतात, त्यानंतर साउंडचा आवाज घुमू लागतो. जर तुम्हाला या साऊंडच्या तालावर नाचायचं असेल, तर टिळक रोड, कुमठेकर रोड आणि केळकर रोडवरची विसर्जन मिरवणूक हा सगळ्यात बेस्ट विषय. 

सिलाई आणि स्वारगेटच्या चौकात दोन मंडळांच्या साऊंडची कॉम्पिटिशन ऐकायला मिळते. तसे सकाळीच सुरू होणारे हे साऊंड, रात्री बाराच्या ठोक्याला थांबतात. त्यानंतर १२ ते ६ पुण्यात फक्त ढोल ताशांचा आवाज सुरू असतो. त्यामुळे सकाळी ६ पर्यंत लक्ष्मी रोड सोडून इतर मार्गांची मिरवणूक रेंगाळते. जर सगळ्या मार्गांवरुन येणारे गणपती बघायचे असतील, तर अलका चौकात थांबायचं. तिथं पुणे महापालिकेकडून प्रत्येक मंडळाचा सत्कार करण्याची परंपरा आजही कायम आहे.

यावेळी सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं लक्ष्मी रोडकडे.

 भाऊसाहेब रंगारी, जिलब्या मारुती आणि बाबू गेनू या मंडळांच्या गणपतींचं लक्ष्मी रोडला साधारण ८-९ वाजल्यापासून आगमन व्हायला सुरुवात होते. पारंपारिक लाकडी रथात भाऊसाहेब रंगारी मंडळाची क्रांतिकारी गणेशाची मूर्ती विराजमान असते, तर जिलब्या मारुतीचा हटके रथ सुद्धा चर्चेत असतो. 

शनिपार मित्र मंडळवाले भव्य दिव्य रथ करतात आणि या रथाच्या वरती गणपतीची मूर्ती असते. पण रात्रीच्या विसर्जन मिरवणुकीत मुख्य आकर्षण असतं, ते अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती. मंडईचा गणपती उत्सवमंडपातून निघाला की सगळ्या महात्मा फुले मंडईला प्रदक्षिणा घालतो, तेव्हा मंडईतले छोटे-मोठे व्यापारी त्याच्यावर फुलांचा वर्षाव करतात. 

जर विसर्जनाच्या दिवशी पुण्यात असलात, तर मंडईच्या गणपतीची ही प्रदक्षिणा काही चुकवू नका.

दगडूशेठचा गणपती साधारण मध्यरात्रीच्या सुमारास समाधान चौकात येतो, पारंपारिक वाद्यांचा गजर, छोट्या मुलांचं टाळ पथक आणि सोबतीला असंख्य दिव्यांच्या झगमगाटात दिसणारी दगडूशेठची मूर्ती, हे चित्र डोळ्यात साठवायला लक्ष्मी रोडवर अगदी सकाळपर्यंत गर्दी असते. दिवस उजाडल्यावर दगडूशेठचं विसर्जन झालं की काही तासांतच इतर गणपतींचंही विसर्जन पूर्ण होतं आणि पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात पुण्याची गणपती विसर्जन मिरवून पार पडते आणि रस्त्यांवर उरते ती शांतता.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.