पोलीस इंटरव्ह्यू साठी निघालेले रमेश देव त्या जॅकपॉटनंतर सिनेमाचे हिरो बनले

रमेश देव म्हणजे मराठी सिनेमाचा ग्रेगरी पेक. गेली सत्तर वर्षे त्यांचा हिंदी मराठी सिनेमाच्या पडद्यावर ताजातवाना वावर होता. त्यांची एवढी मोठी कारकीर्द म्हणजे एखाद्या विक्रमापेक्षा कमी नव्हती. या त्यांच्या स्वप्नवत कारकिर्दीची सुरवात मात्र एका अपघातानेचे झाली होती,

या अपघातामागे होतं एक जॅकपॉट.

कोल्हापूरच्या रमेश देवना आधीपासून अभिनयाची आवड होती. पन्नासच्या दशकात कोल्हापूर हे एका अर्थे मराठी सिनेमासृष्टीचे मुख्य केंद्र होते. रमेश देवना राम राम पाव्हन या सिनेमामध्ये छोटीशी भूमिका मिळाली. तिथून पुढे पाटलाची पोर, छत्रपती शिवाजी, येरे माझ्या मागल्या अशा सिनेमामध्ये छोटे मोठे रोल करत होते. पण म्हणावा तसा मोठा ब्रेक मिळत नव्हता.

किती दिवस स्ट्रगल करायचा? रमेश देव यांचा संयम सुटत चालला होता. या बेभरवश्याच्या करीयर पेक्षा एखादी सरकारी नोकरी कधी पण चांगली असा विचार त्यांच्या डोक्यात घोळत होता. पोलीस भरतीसाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते.

नशिबान रमेश देवना इंटरव्ह्यूचा कॉल आला. त्यांच्या जीवात जीव आला. पण मुंबईमध्ये इंटरव्हूला जायचं तर खर्चाला जास्त पैसे नव्हते. त्यांचा भाऊ उमेश देव पुण्यामध्ये राहायचा. मुलाखतीला जाताना रमेश देव भावाकडून खर्चाला पैसे घ्याचे म्हणून पुण्यात उतरले.  उमेश देव यांना घोड्यांच्या रेसची आवड होती. ते रेसकोर्सवरच असणार असा अंदाज करून रमेश थेट तिकडे गेले.

मराठीमधले मोठे निर्माता दिग्दर्शक अभिनेते राजा परांजपे हे उमेश देव यांचे खास दोस्त होते. दोघेही घोड्यांच्या शर्यतीची शौकीन होते. जेव्हा रमेश तिथे आले त्यावेळी राजा परांजपे आणि उमेश देव शर्यतीवर पैसे लावत होते. राजा परांजपे याचं लक त्या दिवशी काही साथ देत नव्हत. 

उमेश देवच्या या लहान भावाशी ओळख झाल्यावर त्यांना काय वाटल काय माहित, त्या दिवशीच्या रेसमध्ये धावणाऱ्या घोड्यांच्या नावाच्या यादीचा कागद त्यांनी रमेश देव समोर धरला आणि त्यांना विचारल,

“यापैकी कोणत्या घोड्यावर पैसे लावू सांग?”

रमेश देव ना आश्चर्य वाटले. त्यांना घोड्यांच्या रेसमधल काहीही कळत नव्हत. आता खुद्द राजा परांजपे विचारतायत म्हणून त्यांनी अंदाजपंचे एका घोड्याच्या नावापुढे बोट ठेवल. राजा परांजपेनी त्याच घोड्यावर पैसे लावले.

त्या दिवशी तो घोडा जिंकावा म्हणून सगळ्यात जास्त प्रार्थना रमेश देवनी केली असेलं. योगायोग म्हणावा की आणखी काय पण तोच घोडा रेस मध्ये पहिला आला. राजा परांजपेनी त्यांना मिठी मारली.

त्यांनी आणखी दोनदा रमेश देवना घोड्याच नाव सांगायला लावल. प्रत्येक वेळी त्यांनी सांगितलेला घोडा जिंकला. रमेश देवना पण कळत नव्हत नेमक काय घडतंय पण त्यांच लक जोरात होत. राजाभाऊना त्या दिवशी जकपॉटच लागला होता. त्यांच्यासाठी स्वर्ग दोन बोटे दूर होता.

राजा परांजपेनी त्या दिवशी पुण्याच्या रेसकोर्सवर अठरा हजार रुपये कमवले. हा आकडा त्याकाळच्या मानाने खूप मोठा होता. रमेश देव राजा परांजपेंच्यासाठी लकी ठरला. त्यांनी त्याला तू काय करतोस विचारल. रमेश देव म्हणाले,

“पोलीस भरतीच्या इंटरव्हूसाठी मुंबईला चाललोय.”

परांजपेना माहित होत तो पूर्वी सिनेमासाठी प्रयत्न करत होतं. त्यांनी तिथल्या तिथ त्यांना आपल्या एका सिनेमामध्ये मेन व्हिलनचा रोल देऊ केला. सिनेमाच नाव होत,

“आंधळा मागतो एक डोळा.”

रमेश देव काही त्या पोलीस भरतीच्या इंटरव्ह्यूला गेले नाहीत. ते परत राजा परांजपेसाठी लकी ठरले. सिनेमा तुफान गाजला. रमेश देवची खरोखरची अवस्था “आंधळा  मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे अशी झाली.”

पुढे रमेश देव याच इंडस्ट्रीमध्ये राहिले. पुढे सुपरस्टार अमिताभ बरोबर त्यांना काम करायची संधी मिळाली. त्यांनीच नाही तर त्यांची पत्नी, त्यांची दोन्ही मूले अजिंक्य देव अभिनय देव नाव कमवल. पूर्ण सिनेमासृष्टी गाजवली. त्या दिवशी राजा परांजपेना लागलेला जॅकपॉट रमेश देवच आयुष्य बदलून गेला.

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.