कोणताही अंगविक्षेप न करता फक्त मिश्यांच्या बळावर नत्थुलालने ओळख निर्माण केली

भारतीय सिनेसृष्टीला विनोदाचं नाणं खणखणीत असलेल्या दिग्गज कलाकारांचं वरदान आहे. मेहमूद, परेश रावल पासून ते जॉनी लिव्हर यांच्यापर्यंत अनेक विनोदी कलाकारांनी भारतीय सिनेसृष्टी बहरली आहे. आजही डोक्याला त्रास न देता निखळ हसवणूक करणाऱ्या या कलाकारांचे व्हिडिओ पाहून मनामधल्या ताणतणावाचा काही क्षण का होईना विसर पडतो.

याच विनोदी कलाकारांच्या रांगेतला एक महान अभिनेता म्हणजे मोहम्मद उमर मुक्री. 

भिडूंनो, मोहम्मद उमर मुक्री यांची ओळख एका वाक्यात सांगायची झाली तर… ‘शराबी’ सिनेमात अमिताभ बच्चनच्या तोंडी एक डायलॉग आहे. ‘मुछे हो तो नत्थुलाल जैसी हो वरना ना हो’ हा डायलॉग मधला जो नत्थुलाल आहे तो अभिनेता म्हणजे मुक्री.

मुक्री यांची उंची कमी होती परंतु त्यांच्या अभिनयाचे असंख्य चाहते होते. दिलीप कुमार, सुनील दत्त, राज कपूर, देवानंद, प्राण, संजीव कुमार तसेच अमिताभ बच्चन सारख्या अनेक कलाकारांसोबत मुक्री यांची जिगरी दोस्ती होती. 

गोलमटोल शरीरयष्टी, कमी उंची असलेले मुक्री साब त्यांच्या या अनोख्या व्यक्तिमत्त्वामुळेच सिनेमांमध्ये मोठमोठ्या कलाकारांसोबत सुद्धा उठून दिसायचे. जवळपास ६०० सिनेमांमध्ये मुक्री यांनी स्वतःच्या अभिनयाचं दर्शन आपल्या सर्वांना घडवलं. 

हिंदी सिनेमांमध्ये येण्याआधी मुक्रींचा जीवन प्रवास काहीसा वेगळा होता.

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे ५ जानेवारी १९२२ रोजी त्यांचा जन्म झाला. मुक्रींच्या घरचं वातावरण कट्टर धार्मिक होतं. सुरुवातीच्या आयुष्यात मुक्री मदरसा मध्ये मुलांना कुराण शिकवण्याचं काम करायचे. परंतु या कामातून त्यांना फार थोडे पैसे मिळायचे.

या पैशांतून कुटुंब चालवणे त्यांच्यासाठी फार कठीण होतं. त्यामुळे कुटुंबाचा डोलारा सांभाळण्यासाठी मुक्री यांनी ‘बॉम्बे टॉकीज’ या फिल्म स्टुडिओमध्ये नोकरी करायला सुरुवात केली. या स्टुडिओची स्थापना देविका राणी यांनी केली होती. 

देविका राणी ही बॉलिवूडमधली प्रसिद्ध अभिनेत्री सुद्धा होती. त्या येता-जाता मुक्री यांना बघायच्या. मुक्रींचं निखळ हसणं त्यांच्या नजरेत भरायचं. ‘हा माणूस कॅमेऱ्यासमोर आला की इतके संवाद न बोलताही या माणसाकडे लोकांना हसवायची ताकद आहे’, असा विश्वास देविका राणी यांना होता. त्यामुळे १९४५ साली बॉम्बे टॉकीजची निर्मिती असलेल्या ‘प्रतिमा’ या सिनेमात मुक्री सर्वप्रथम झळकले.

दिलीप कुमार यांची या सिनेमात प्रमुख भूमिका होती. दिलीप कुमार सारखा मोठा नट समोर असून सुद्धा मुक्रींचा अभिनय सर्वांना पसंत पडला. या सिनेमानंतर हिंदी सिनेसृष्टीतील एकापेक्षा एक उत्तम सिनेमांमध्ये मुक्रींनी भूमिका केल्या. 

मुक्रींच्या सिनेमांकडे नजर टाकल्यास ‘मिर्झा गालिब’, ‘मदर इंडिया’, ‘अनुराधा’, ‘मेरा साया’, ‘मिलन’, ‘राजा और रंक’, ‘पिया का घर’, ‘लावारीस’, ‘बॉम्बे टू गोवा’, ‘अर्जुन पंडित’, ‘द बर्निंग ट्रेन’, ‘राम लखन’ यांसारख्या अनेक गाजलेल्या सिनेमांमधल्या मुक्रींच्या भूमिका सर्वांच्या लक्षात राहिला. ‘अमर अकबर अँथनी’ या सिनेमातील तय्यब अली या भूमिकेद्वारे त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली. या सिनेमात तय्यब अली व्यक्तिरेखेवर एक गाणं सुद्धा आहे. 

मुक्री ज्या काळात अभिनय करत होते त्याकाळात मेहमूद, जॉनी वॉकर यांसारखे विनोदी कलाकार प्रसिद्ध होते. या दिग्गज कलाकारांच्या समोर मुक्रींनी स्वतःचं अस्तित्व टिकवलं. केवळ टिकवलंच तर जवळपास ६० वर्ष ते हिंदी सिनेसृष्टीत सक्रिय होते. 

४ सप्टेंबर २००० रोजी हा दिग्गज अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला. स्वतःच्या साठ वर्षांच्या बॉलिवुड कारकिर्दीत त्यांनी कधीही प्रमुख भूमिका साकारली नाही. परंतु त्या काळच्या प्रत्येक सिनेमामध्ये मुक्रींची छोटीशी का होईना भूमिका असायची. इतकी या कलाकाराला सिनेमांमध्ये मागणी होती.

कोणतेही अंगविक्षेप न करता उत्तम अभिनयातून आपली निखळ हसवणूक करणाऱ्या मोहम्मद उमर मुक्री यांना सलाम!

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.