१ जूनला निम्म्या गावाचा वाढदिवस असतोय, पण का ?

आज १ जून. आज फेसबुक उघडलं तर ढीगभर लोकांचे हॅप्पी बड्डे. तुमच्या पण लिस्ट मध्ये डझनभर तर असतील. विशेष म्हणजे यात असतात सगळे फिफ्टीज किड्स. म्हणजे आपले मम्मी पप्पा, काका काकू, मावश्या वगैरे वगैरे. असं का बर असाव?? आमच्या एका भिडूने आम्हाला हा प्रश्न विचारला.

मध्यंतरी आम्हाला एक बुवा भेटले होते. त्यांनी सांगितलं या मागं ग्रहांचा खेळ आहे. शनी कुठून कुठे घुसला, चंद्रांची गती कशी वाढली वगैरे वगैरे आकडेमोड आम्हाला मांडून दाखवली. असल्या अंधश्रद्धा वर आमचा विश्वास नव्हता. मग आम्ही आमच्या मास्तरांना फोन केला, त्यांनी त्यांच्या मास्तरांना फोन केला, मग हे गणित सुटल.

त्या पोरांना मास्तरलोकांनी १ जूनला जन्माला घातल होतं.

झालं असं की त्याकाळात म्हणजे इंग्रज देश सोडून गेल्यानंतर भारतात शिक्षण क्रांती की काय म्हणतात ती झाली. स्वंतत्र भारताच्या सरकारने गावाकडच्या प्राथमिक शाळापासून ते आयआयटी इंजिनियरिंग कॉलेज सुरु केले. गावकडची पोरबाळ शिकू लागली. कोल्हापूरचे शाहू महाराज, महात्मा फुले यांनी लावलेली विद्याप्रसाराची रोपे वाढून त्याचा वटवृक्ष बनला होता. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सारखे ज्ञानयोगी खेडोपाड्यात फिरून पोरांना उचलून आणून शाळेत बसवू लागले होते.

“जो शिकेल तो टिकेल”

अशा घोषणा फेमस झाल्या होत्या. गेली कित्येक पिढ्या अक्षराची ओळख नसलेला बहुजन समाज पोरांना शिकवून साहेब करण्याची स्वप्नं बघू लागला.

साधारण जून महिन्यात शाळा सुरु होई. पावसाचे दिवस तोंडावर आहेत, शेतात बरीच काम वाट बघत असतात. त्यातून वेळ काढून गल्लीत खेळण्यात रमलेल्या पोराच्या हातात पाटी पेन्सिल घेऊन शाळेत आणून सोडलं जाई. शाळेत येताच तिथला मास्तर पहिला प्रश्न विचारी, पोराच नाव ?? “खंड्या,राम्या, अण्ण्या ” असं सांगितलं की मास्तर त्याचं “खंडेराव, रामचंद्र, अण्णासाहेब” असं त्या नावाला एलॅबोरेट करी.

ते सांगितलं की पुढचा प्रश्न येई, जन्मतारीख?? हे कोणाच्या बाला ठाऊक आहे?

खंडीभर पोराबाळ होणायचा तो काळ. सगळ्यांचा जन्म कधी झाला हे लक्षात ठेवण्यात कोण वेळ वाया घालवत नव्हत. आणि तसही इंग्लिश महिने कोणाला माहित? चैतर, आखाड असली काल गणना चालू असायची, हाताच्या बोटावर कॅलक्यूलेटर चालायचं. मग जन्मनोंदणी वगैरे मॅटर त्यांच्या साठी आउट ऑफ सिलॅबस होते. अशा वेळी नाव नोंदवून घेणारा शाळा मास्तर पोराची जन्म तारीख अंदाजे १ जून टाकायचा. अख्खा वर्गच्या वर्ग १ जूनला जन्माला आलेला असायचा. या सगळ्यामुलांची जन्मतारीख आणि त्यांच बारस त्याकाळच्या मास्तर लोकांनी घातल होतं असं म्हटल तर चुकीच ठरणार नाही.

म्हणून आज भारतात वर्ल्ड रेकॉर्ड होईल अशांचा वाढदिवस आहे. उदाहरण घ्यायचं झालं तर सुप्रसिध्द अभिनेत्री नर्गिस दत्त, समाजसेवक बाबा आढाव, शेतकरी नेते राजू शेट्टी, मंत्री दिलीप कांबळे, सिनेअभिनेता आर. माधवन, कवी बी, आमदार दत्ता भरणे असे लई जण आहेत. आम्ही म्हणत नाही की या सगळ्यांचा वाढदिवस मास्तर लोकांनीच ठरवला असेल पण तीच शक्यता जास्त आहे.

यांच्या जोडीला हॉलीवूडची स्वप्नसुंदरी मर्लिन मन्रो, तिथला अमिताभ बच्चन मोर्गन फ्रीमन यांचा देखील आजचं वाढदिवस असतो.

या पेक्षा अजून महत्वाच आजच्याच दिवशी अख्ख्या महाराष्ट्राची रक्तवाहिनी म्हणून ओळखली जाणारी लाल परी एसटी सुद्धा आजच्याच दिवशी १९४८ साली धावली होती. याशिवाय मुंबईपुणे मुंबई प्रवास करणाऱ्यांची जीवनदायनी दख्खनची राणी डेक्कन क्वीन एक्स्प्रेस ही सुद्धा आजच नव्वद वर्षांची झाली आहे.

असं आहे हे आजच्या दिवसाच महत्व. म्हणूनचं १ जूनला सरकारी वाढदिवस असतेत. आपल्याला काय केक खाण्याशी मतलब. 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.