मोदींनी नौदलाचा ध्वज छत्रपतींना समर्पित केलाय; मराठा आरमाराचे हे १० फॅक्ट्स माहित असू द्या
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोच्चीमध्ये आयएनएस विक्रांत या पहिल्या स्वदेशी एअरक्राफ्ट युद्धनौकेचं आणि भारतीय नौसेनेच्या नवीन झेंड्याचं अनावरण केलंय. स्वातंत्र्यानंतरसुद्धा भारतीय नौदलाच्या ध्वजात सेंट जॉर्ज यांचा क्रॉस कायम ठेवण्यात आला होता. परंतु तो आता कायमचाच काढून टाकण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदलाचं नवीन ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित केलंय. भारतीय नौसेनेच्या नवीन ध्वजात शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा वापर करण्यात आलाय. नवीन ध्वजात नौसेनेच्या मुद्रेच्या सभोवती महाराजांच्या राजमुद्रेप्रमाणे अष्टकोनी कडा बनवल्या आहेत.
परंतु आज भारतीय नौसेनेच्या ध्वजाचे प्रेरणास्थान असलेले मराठा आरमार नक्की कसे होते. हे त्याबाबतच्या १० फॅक्ट्सवरून समजून घ्या.
१. मराठा आरमाराची सुरुवात
शिवाजी महाराजांनी देशावरचा भाग जिंकुन घेतल्यानंतर १६५६ मध्ये कोंकण जिंकण्यास सुरुवात केली. सर्वप्रथम जावळीचा प्रदेश जिंकून महाराजांनी कोकणात प्रवेश केला. जावळी जिंकल्यानंतर मुरुडच्या सिद्दींबरोबर मराठ्यांच्या झटापटी व्हायला लागल्या होत्या. त्यामुळे महाराजांनी संपूर्ण कोकणावर नियंत्रण मिळवायला सुरुवात केली.
कोंकण जिंकण्यासाठी १६५७ मध्ये मराठ्यांनीच पहिल्या आरमारी जहाजाची निर्मिती केली आणि २४ ऑक्टोबर १६५७ रोजी महाराजांनी कल्याण-भिवंडीच्या सागरकिनाऱ्यावरून कर्नाटकच्या बासूरपर्यंत मोहीम हाती घेतली. ही मराठा आरमाराची पहिली मोहीम होई त्यामुळेच २४ ऑक्टोबरला मराठा आरमार दिन साजरा केला जातो.
२. जलदुर्ग बांधण्यामागे सुद्धा सायन्टिफिक टेक्निक होती.
आरमार निव्वळ जहाजांमुळे उभं होत नाही तर त्यासाठी भक्क्म समुद्रीदुर्ग बांधणे सुद्धा गरजेचे असते. त्यामुळे महाराजांनी वेगवेगळ्या पद्धतीने अनेक समुद्री दुर्ग बांधले. त्यात सिंधुदुर्ग किल्ल्याचं बांधकाम करतांना किल्ल्याच्या मजबुतीसाठी पायाभरणीत शिसे ओतले होते. तर कुलाबा किल्ल्याच्या भिंतीमध्ये गाऱ्याचा वापर ना करता दगडी चिरे एकमेकांवर रचून बांधकाम केलंय. जेणेकरून पाणी त्यातून पास आउट व्हावं आणि दगडं झिजू नयेत.
विजयदुर्ग किल्याचं बांधकाम करतांना किनाऱ्यावर एक भक्कम भिंत बांधण्यात आली होती. त्या भिंतींचा वापर पोर्तुगीज आणि ब्रिटिशांच्या जहाजांना डुबवण्यासाठी केला जायचा. मराठ्यांचे जहाज लहान असायचे त्यामुळे त्यांना आवरणे सोपे जायचे परंतु ब्रिटीश आणि पोर्तुगीजांचे जहाज मोठे असल्यामुळे ते सरळ विजयदुर्ग किल्ल्याच्या भिंतीवर येऊन आपटायचे आणि फुटून जायचे. त्यामुळे युद्ध आणखी सोपे व्हायचे.
सिंधुदुर्ग, विजय दुर्ग, कुलाबा यासोबतच पद्मदुर्ग, दुर्गाडी तसेच इतर किल्ल्यांच्या बांधकामांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करण्यात आला होता.
३. मराठा आरमारात मोठ्या जहाजांऐवजी लहान जहाजांचा वापर केला जायचा.
मोठे जहाज बांधण्यासाठी भरपूर खर्च यायचा आणि त्यांना सांभाळणे सुद्धा कठीण असायचे. त्यामुळे मराठा आरमारात लहान जहाजांचा वापर केला जायचा. मराठ्यांच्या जहाजांबद्दल एका इंग्रज कॅप्टनने १ नोव्हेंबर १९५९ मध्ये मुंबईच्या गव्हर्नरला पत्र लिहिलं होतं. त्यात त्याने सांगितलंय की, मराठ्यांच्या छोट्या नौका आम्हाला सहज चकवतात आणि निघून जाता. आमचं त्यांच्यासमोर काहीच चालत नाही.
ही लहान जहाजं समुद्राच्या खोल आणि उथळ अशा दोन्ही पाण्यात वापरता येत होती. त्यामुळे किनाऱ्यापासून ते खोल समुद्रात युद्ध करतात येत होते. त्यात गुराब, तराडे आणि गलबत नावाच्या विशेष युद्धनौका बांधल्या जायच्या. गुराब हे दोन तोफा ठेवायचे जहाज होते. तर तराडे आणि गलबत हे जलद गतीने प्रवास करणारी जहाजं होती.
कल्याणमध्ये बांधण्यात येणाऱ्या जहाजांची जबाबदारी पोर्तुगीज खलाशी लुई व्हेगास यांच्याकडे देण्यात आली होती. त्यामुळे मराठा कारागिरांना नवीन तंत्रज्ञान शिकायला मिळत होते.
४.मादागास्करचा राजा मराठ्यांचा मांडलिक होता
जेव्हा मराठा साम्राज्यावर राजाराम महाराजांचे पुत्र शिवाजी महाराज दुसरे यांचं राज्य होतं तेव्हा मराठा आरमाराचा दबदबा आणखी बांधला होता. सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमामुळे मादागास्कर बेटाचा राजा सुद्धा मराठ्यांचा मंडलिक होता. जेव्हा मराठ्यांना युद्धासाठी जहाजांची गरज असायची तेव्हा कान्होजी आंग्रे यांच्या एका आदेशावर मादागास्करचा राजा आपल्या जहाजांची तुकडी मराठ्यांना वापरायला द्यायचा.
५. ‘पायरेट्स ऑफ दी कॅरेबिया’ या सिनेमाचा मराठा आरमाराशी संबंध आहे.
सरखेल कान्होजी आंग्रे यांनी आपल्या पराक्रमाने १३ समुद्री किल्ले, २७ जमिनीवरचे किल्ले आणि त्यातला ३६ लाख रुपयांचा मुलुख मराठा साम्राज्याला मिळवून दिला होता. कांहींजी आंग्रेंच्या समुद्रातील पराक्रमामुळे जगभरातील अनेक नामवंत खलाशी आणि समुद्री लुटारू हे सरखेल कान्होजी आंग्रे यांच्याकडे आश्रयासाठी येत होते.
सरखेल कान्होजी आंग्रे यांनी समुद्री लुटारूंना आश्रय दिल्यामुळे सर्वजण त्यांना पायरेट्स लॉर्ड म्हणायचे. हॉलीवूडचा पायरेट्स ऑफ दी कॅरेबिया या सिनेमातील प्रसंग आणि कॅरेक्टर हे कान्होजी आंग्रे यांच्याकडे आलेल्या पायरेट्सवरूनच घेतलेले आहेत.
६. जगातील टॉप २१ पायरेट्स मध्ये पहिल्या क्रमांकावर होते तुळाजी आंग्रे
कान्होजी आंग्रे यांच्यांनतर आंग्रे घराण्यातले सगळ्यात पराक्रमी सरखेल होते तुळाजी आंग्रे. अठराव्या शतकात लंडनमध्ये द जेंटलमन मॅगझीन निघायचं. त्या मॅगझिनमध्ये जगातील सगळ्यात महान पायरेट्सची यादी छापण्यात आली होती. त्या यादीत तब्बल २१ पायरेट्सची नावे होती. ज्यात इंग्लंडमधील १८ पायरेट्स, फ्रान्समधील ३ पायरेट्स आणि भारतातील १ पायरेटच्या नावाचा समावेश होता.
त्या मॅगझिनमध्ये छापण्यात आलेलं भारतातील एकमेव पायरेटचं नाव म्हणजेच सरखेल तुळाजी आंग्रे. विशेष गोष्ट अशी की त्या २१ पायरेट्समध्ये तुळाजी आंग्रे यांचं नाव सर्वात प्रथम क्रमांकावर छापण्यात आलं होतं.
७. किनारपट्टीच्या रक्षणासाठी थेट किल्ल्यांची साखळीच बांधली होती.
मराठा आरामासाठी समुद्रात आणि समुद्रकिनाऱ्यावर एक शृंखलाच बांधलेली होती. उत्तरेला कल्याणच्या किल्ल्यापासून दक्षिणेला वेंगुर्ल्याच्या किल्ल्यापर्यंत सरासरी २० किमीच्या अंतरावर समुद्री किल्ले बांधण्यात आले होते. एका किल्याच्या हद्दीतून गेलेला जहाज लवकरच दुसऱ्या किल्ल्याच्या टप्प्यात यायचा. त्यामुळे जहाजांवर लक्ष ठेवणे सोपे व्हायचे आणि धोका निर्माण झाल्यावर आक्रमण करणे सुद्धा सोपे असायचे.
८. मराठ्यांनी थेट अंदमान बेटावर नाविक तळ बनवला होता.
महारानी ताराराणी यांच्या काळात सरखेल कान्होजी आंग्रे यांनी कल्याण ते वेंगुर्ला या समुद्री सीमेच्या बाहेर सुद्धा पराक्रम गाजवला होता. कान्होजी आंग्रे यांचा अरबी समुद्रावर दबदबा होता त्यामुळे कान्होजी आंग्रे यांना रोखण्यासाठी युरोपियन देशांनी प्रयत्न सुरु केले होते. परंतु कान्होजी आंग्रे यांनी कोकणच्या किनाऱ्याबाहेर जाऊन थेट हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरात व्यूहरचना केली.
कान्होजी आंग्रे यांनी अंदमान बेटावरच आपला नाविक तळ निर्माण केला होता. या नाविक तळामुळे ब्रिटिश, फ्रेंच आणि पोर्तुगीजांच्या पूर्व किनारपट्टीवरच्या वसाहती सुद्धा मराठ्यांच्या टप्प्यात आल्या होत्या. त्यामुळे कान्होजी आंग्रे यांना पकडणे ब्रिटिशांना शक्य झाले नाही. उलट ब्रिटिशाचेच नुकसान व्हायला लागले होते.
९. खांदेरीच्या युद्धात मराठ्यांनी इंग्रजांचं डव्ह जहाजच आपल्या ताब्यात घेतले होते.
मराठ्यांचे जहाज लहान असल्यामुळे कायम मराठ्यांची थट्टा केली जायची. त्यामुळे शिवाजी महाराजांनी आपल्या पारंपरिक लहान जहाजांबरोबरच मोठी जहाजे सुद्धा आरमारात ठेवली होती. त्यात ३० ते १५० टन वजन असलेली आणि एका डौलकाठीची ८५ फ्रीग्रेट जहाजं, तीन डौल काठ्या असलेली ३ जहाजं तसेच ८६ लढाऊ गलबतं मराठा आरमारात होती.
तसेच खांदेरीच्या युद्धात मराठ्यांनी इंग्रजांना हरवलं आणि त्यांचं डव्ह नावाचं जहाज आपल्या ताब्यात घेतलं. ते डव्ह जहाज पिढ्यानपिढ्या मराठा आरमाराच्या शौर्याचं प्रतीक म्हणून ओळखली गेली.
१०. कान्होजी आंग्रे यांना रोखण्यासाठी इंग्रज दरवर्षी ५० हजार पाउंडचा खर्च करायचे.
मराठा आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांचा आरबी समुद्रावर प्रचंड दबदबा होता. त्यांच्या परवानगीशिवाय अरबी समुद्रात कोणताही लढाऊ आणि व्यापारी जहाज येऊ शकत नव्हता. कान्होजी आंग्रेंची चाचेगिरी थांबवण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी दरवर्षी तब्बल ५० हजार पाउंड खर्च करायची. इतकी कान्होजी आंग्रेंची दहशत होती.
या १० फॅक्ट्सवरून मराठा आरमार आणि त्याची ताकद लक्षात येते. जोपर्यंत मराठा आरमार आरबी समुद्रात होतं तोपर्यंत इंग्रजांना पश्चिम किनारपट्टी कधीच जिंकता अली नाही. परंतु जेव्हा मराठा आरमाराचा शेवट झाला तेव्हा संपूर्ण पश्चिम किनारपट्टी ब्रिटिशांच्या ताब्यात गेली.
हे ही वाच भिडू
- ‘पायरेट्स ऑफ दी कॅरेबियन’ सिनेमा आणि ‘मराठा आरमार’ यामध्ये “हे” कनेक्शन आहे..
- अंदमान निकोबार बेटे आज भारतात आहेत याचं श्रेय जातं मराठा आरमाराच्या पराक्रमाला !
- थोरल्या शाहू छत्रपतींच्या भीतीने मुंबईभोवती बांधण्यात आलं होतं ‘मराठा डीच’