रागारागात लष्करात भरती झालेल्या सॅम माणेकशॉ यांच्या आयुष्यात शेवटपर्यंत राष्ट्रप्रथम होतं !

सॅम माणेकशॉ हे नाव प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद आहे. त्यांचं नाव आलं की, सर्वात आधी डोक्यात येतं ते १९७१ चं भारत पाकिस्तान युद्ध. १९७१ च्या युद्धामध्ये भारताच्या विजयाचे ते शिल्पकार होते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.युद्धाच्या काळात सॅम हेच भारतीय सैन्याचे प्रमुख होते.

१ डिसेंबर २०२३ रोजी सॅम माणेकशॉ यांच्या आयुष्यावर आधारित हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अभिनेता विकी कौशल हा या चित्रपटात प्रमुख भुमिका साकारणार असुन हा चित्रपट मेघना गुलजार दिग्दर्शित असणार आहे. या चित्रपटाच्या चर्चांमुळे सॅम माणेकशॉ यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय. आता चित्रपटात त्यांचं आयुष्य कसं दाखवलं जाईल हे आता सांगणं शक्य नसलं तरी, त्यांचं वास्तविक त्यांचं आयुष्य प्रचंड प्रेरणादायी होतं.

सॅम माणेकशॉ यांच्या आयुष्यातील काही महत्वाच्या आणि प्रेरणादायक गोष्टी पाहूया…

१) वडिलांच्या विरोधाचा राग म्हणून सैन्यात भरती झाले होते

सॅम होर्मुसजी फ्रामजी जमशेदजी माणेकशॉ म्हणजेच सॅम माणेकशॉ यांचे वडील डॉक्टर होते. आपल्या वडिलांप्रमाणेच डॉक्टर बनून भारतीयांची सेवा करण्याची सॅम यांची इच्छा होती. डॉक्टरकीचं शिक्षण घेण्यासाठी आपल्याला लंडनला पाठवण्याची इच्छा त्यांनी वडिलांकडे व्यक्त केली. पण, त्यावेळी त्यांचं वय फक्त १७ वर्षे असल्यानं सॅम यांचं वय अजून लहान आहे असं कारण देत त्यांच्या वडिलांनी त्यांना लंडनला पाठवणं टाळलं. त्यानंतर १९३२ साली वडिलांनी लंडनला न पाठवल्याचा राग डोक्यात ठेऊन त्यांनी इंडियन मिलीटरी अकादमीमध्ये भरती होण्यासाठी फॉर्म भरला आणि निवड झालेल्या १५ जणांमध्ये त्यांचंही नाव होतं.

२) इंडियन मिलीटरी अकॅडमीच्या पहिल्याच बॅचमध्ये घेतलं ट्रेनिंग:

इंडियन मिलिटरी अकादमी (IMA) ही भारतातील सर्वात जुन्या लष्करी अकादमींपैकी एक आहे आणि भारतीय सैन्यासाठी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचं काम ही अकादमी करते. उत्तराखंड मधील डेहराडूनमध्ये ही अकादमी आहे. १९३२ साली अकादमीची स्थापना झाली असून सॅम माणेकशॉ हे अकादमीच्या पहिल्या बॅचमध्ये ट्रेनिंगसाठी सिलेक्ट झालेल्या १५ जणांपैकी एक होते. १५ जणांमध्ये ते सहाव्या क्रमांकावर होते.

३)पाकिस्तान आणि म्यानमारच्या आर्मी चीफसोबत घेतलं ट्रेनिंग:

लेफ्टनंट जनरल स्मिथ डन हे ४ जानेवारी १९४८ ते १ फेब्रुवारी १९४९ पर्यंत बर्मी (म्यानमार) सैन्याचे कमांडर-इन-चीफ होते. तर, जनरल मुहम्मद मुसा खान हे पाकिस्तानी लष्कराचे वरिष्ठ जनरल होते ज्यांनी १९५८ ते १९६६ पर्यंत पाकिस्तानी लष्कराचे चौथे कमांडर-इन-चीफ म्हणून काम केलं. यात महत्त्वाचा भाग हा की, इंडियन मिलिटरी अकादमी ज्या १९३२च्या बॅचमध्ये सॅम यांनी ट्रेनिंग घेतलं त्याच बॅचमध्ये या दोघांनीही ट्रेनिंग घेतलं.

४) प्रचंड घायाळ झाल्यानंतरही इच्छाशक्ती प्रचंड होती:

दुसऱ्या महायुद्धादरम्यान जखमी झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी त्यांना “काय झालंय?” असं विचारल्यावर, “काही नाही फक्त एका गाढवानं मला लाथ मारली…” असं विनोदी उत्तर त्यांनी दिलं. यानंतर डॉक्टरांनी त्यांच्या फुफ्फुस, यकृत आणि किडनीमधून तब्बस सात गोळ्या काढल्या. ७ गोळ्या शरीरावर झेलल्यानंतरही ते वाचले ते केवळ आत्मविश्वास आणि इच्छाशक्तीच्या बळावर.

५) फाळणीच्या काळात प्रशासकीय कौशल्य दाखवलं:

१९४७मध्ये ज्यावेळी भारत पाकिस्तान फाळणी झाली त्यावेळी, सॅम माणेकशॉ यांच्यावर प्रशासकीय जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या. त्यांच्याकडे बरेचसे निर्णय घेण्याची परवानगीसुद्धा देण्यात आली होती. त्याकाळात त्यांनी स्वत:चं प्रशासकीय कौशल्य सिद्ध केलं.

६) युद्धातून अंग काढणाऱ्या सैनिकांना पाठवल्या बांगड्या:

१९६२ च्या भारत-चीन युद्धावेळी मिझोराममध्ये तैनात असलेल्या एका बटालियनवर चीनी सैन्य भारी पडतंय असं दिसत असल्यानं भारतीय सैनिकांची ती बटालियन युद्धातून अंग काढू पाहत होती. ही बाब समजताच त्या बटालियनमधील सैनिकांना सॅम यांनी बांगड्या पाठवल्या. त्यासोबतच एक पत्रही पाठवलं, ‘जर तुम्हाला लढायचं होत नसेल तर ह्या बांगड्या हातात घाला.’ यामुळे बटालियनमधील सैनिक चवताळून उठले आणि मग त्यांनी उत्तम कामगिरी केली.

७) प्रचंड आत्मविश्वास आणि हजरजबाबीपणा:

एकदा कुणीतरी सॅम यांना प्रश्न विचारला, “भारत पाकिस्तान फाळणीच्या वेळी तुम्ही आणि चुमचा परिवार पाकिस्तानात गेला असता तर काय झालं असतं?” या इतक्या गंभीर अन् मोठ्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी अगदी सहजपणे आणि पटकन दिलं. ते म्हणाले, “फाळणीवेळी मी पाकिस्तानात गेलो असतो तर, भारत-पाकिस्तान युद्धात पाकिस्तानचा विजय झाला असता.” त्यांच्या या उत्तरातून त्यांचा स्वत:वर असलेला विश्वास आणि हजरजबाबीपणा दोनही गोष्टी दिसून येतात.

८) इंदिरा गांधी यांच्यासोबत जपलेले संबंध:

इंडिया टाईम्सच्या वृत्तानुसार, १९७१ च्या भारत-पाक युद्धापुर्वी इंदिरा गांधी यांनी सॅम यांना भारतीय सैन्याच्या तयारीविषयी विचारताना “आर वी रेडी फॉर द वॉर?” असं विचारल्यावर “आय अ‍ॅम ऑलवेज रेडी स्वीटी” असं उत्तर दिलं हेत. इंदिरा गांधी यांचे पती फिरोज गांधी हे पारसी असल्यामुळे व सॅमसुद्धा पारसी असल्यामुळे सॅम यांनी आपले संबंध जपून ठेवले होते. त्यामुळेच, ते इंदिरा गांधींना ‘स्वीटी’ अशी हाक मारायचे.

९) आपल्या बटालियनबद्दल असलेलं प्रेम आणि विश्वास:

सॅम माणेकशॉ यांचं एक वाक्य होतं… ते वाक्य असं, “जर एखादा सैनिक तुम्हाला सांगतोय कि, मी मृत्यूला घाबरत नाही तर, तो एकतर खोटं बोलत असेल किंवा मग तो गुरखा असेल.” मुळात सॅम हे सुद्धा गोरखा बटालियनमध्येच होते त्यामुळं, गुरखा बटालियनवर त्यांचं प्रेम आणि विश्वासही प्रचंड होता.

१०) राष्ट्रप्रथम:

सॅम यांचा भारतीय सैन्यातील सेवाकाळ संपून निवृत्त होतेवेळी १९७२ मध्ये त्यांचा कार्यकाळ राष्ट्रपतींनी विशेष अधिकार वापरून ६ महिन्यांसाठी वाढवला. त्यावेळी, इच्छा नसतानाही राष्ट्रप्रथम ही भावना लक्षात घेऊन व राष्ट्रपतींच्या आदेशाचा मान राखायचा म्हणून त्यांनी अधिक ६ महिने काम केलं.

जवळपास ४० वर्षे भारतीय सैन्यात काम करताना त्यांनी ५ युद्धांत सहभागी होते. दुसरं महायुद्ध, १९४७ चं भारत-पाकिस्तान युद्ध, १९६२ चं चीन-भारत युद्ध, १९६५ चं भारत-पाकिस्तान युद्ध आणि १९७१ चं बांगलादेश मुक्ती युद्ध ही ती युद्ध होती.

२००८ मध्ये न्यूमोनियानं त्यांचा मृत्यू झाला. आता भारतीय सैन्यातील इतक्या वीर, धाडसी आणि मुत्सद्दी अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित चित्रपट येणार आहे ही बाब नक्कीच चांगली आहे. पुढल्या पिढीलाही इतिहासातील थोरा मोठ्यांची माहिती असावी यासाठी त्यांच्या आयुष्यावर आधारित असलेले चित्रपट हे एक प्रभावी माध्यम ठरू शकतं

हे ही वाच भिडू:

आणि सॅम माणेकशॉ यांनी भारतातली सर्वात मोठी दंगल रोखून दाखवली.

फिल्डमार्शल माणेकशॉ कलामांना म्हणाले, “राष्ट्रपतीजी माझी एक तक्रार आहे “

Leave A Reply

Your email address will not be published.