भारताचं बजेट मांडणारे पुढे पाकिस्तानचे पंतप्रधान झाले : बजेटच्या दहा भन्नाट गोष्टी.

आज बजेट सादर होतय, त्यानंतर त्या बजेटवर चर्चा होणार. सर्वसामान्य रस्त्यांवरचा नागरिक किमान एक दिवस का होईना अर्थव्यवस्थेवर बोलणार आणि जाताना वीस रुपयेची मेथीची भाजी तीस रुपयेला घेवून जाणार. गेल्यावर बायकोच्या शिव्या खाणार आणि पुन्हा एकदा देशाच्या अर्थशास्त्रावर आपल मत सांगणार.

आत्ता संविधानानेच प्रत्येकाला बोलण्याचा, व्यक्त होण्याचा अधिकार दिला आहे म्हणल्यानंतर आपण काय बोलणार. त्याच संविधानच्या कलम ११२ अनुच्छेदानुसार संविधान मांडण्याबद्दल येतं. ते देशाचे अर्थमंत्री मांडतात. वर्तमानपत्रात काम करणारे त्यावर रुपया कसा आला आणि कसा गेला यावर एक सुंदर चित्र काढतात. तरिही महिन्याच्या शेवटी रुपाया कसा होता हे आपणास आठवावं लागतं.

असो, बजेट असच गुढ असत. त्याच्यातल्या आकडेवारीकडे जास्त लक्ष द्यायचं नसतं. गप्प सगळा पगार बायकोकडे देवून निवांत रहायचं असतं. हिच सुखी संसाराची किल्ली.

आत्ता बजेटबद्दल वाचून डोक्यावरुन गेलेल्या लोकांनी खास हे किस्से वाचावेत. 

१) बजेटच्या सादर करण्याच्या अगोदर हलवा पार्टी आयोजित केली जाते. म्हणजे सगळीकडून आलेल्या माहितीवर एक ड्राफ्ट तयार झाला की तो टायपिंगसाठी, छपाईसाठी घेतला जातो. बजेट लिक झालं तर लय मोठ्ठा राडा होवू शकतो. म्हणून या सगळ्या कार्यकर्त्यांना नॉर्थ ब्लॉकच्या तळमजल्यात कामाला लावलं जातं. इथे हलवा खात खात कार्यकर्ते टायपिंग, ड्राफ्टिंग आणि प्रिंन्टींगच काम करतात. या दरम्यान कार्यकर्ते आपल्या घरातल्यांसोबत देखील बोलू शकत नाही.

२) बजेटचे दोन प्रकार असतात. सर्वसाधारण बजेट आणि अंतरीम बजेट. देशात जेव्हा निवडणुका येणार असतात तेव्हा अंतरीम बजेट सादर करण्यात येत. म्हणजे आत्ता दोनच,चार,सहा महिन्यानंतर इलेक्शन आहेत अशा वेळी अंतरीम बजेट मांडल जात. इलेक्शन झालं की नव्याने आलेल्या सरकारला अंतरीम बजेटमध्ये काय वाढवायचं असेल ते वाढवून बजेट मांडता याव असा स्वच्छ प्रामाणिक लोकशाहीवादी हेतू या अंतरीम संकल्पामध्ये असतो.

३) भारताचं पहिले बजेट कधी आणि केव्हा मांडण्यात आले. तर त्यांची तारीख मिळते 7 एप्रिल 1860 अशी आहे. तत्कालीन व्हाईसरॉय परिषदेत जेम्स विल्सन यांनी बजेट मांडल होतं.

४) भारताचं पहिलं बजेट विचारलं तर त्याची तारिख आहे, 2 फेब्रुवारी 1946. त्यावेळी अंतरीम सरकार होतं. या सरकारवर भारतासाठी बजेट मांडण्याची जबाबदारी होती. कॉंग्रेस आणि मुस्लीम लीन यांच संयुक्त सरकार होतं. मुस्लीम लीगचे लियाकत अली खां हे भारताचे वित्तमंत्री म्हणून कार्यरत होते. 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर स्वतंत्र भारताचे बजेट मांडण्याचा मान मिळाला तो आर.के. शन्मुखम शेट्टी यांना. 26 नोव्हेंबर 1947 रोजी त्यांनी स्वतंत्र भारतासाठी बजेट मांडल.

५) सर्वाधिक वेळा बजेट मांडण्याचा मान जातो तो मोरारजी देसाई यांना.

मोरारजी देसाई तीन टप्यांमध्ये देशाचे अर्थमंत्री राहिले. सर्वात जास्त १० वेळा त्यांना बजेट सादर करण्याचा मान मिळाला तर सात वेळा प्रणब मुखर्जी यांना अर्थसंकल्प सादरण करण्याचा मान मिळाला आहे. मोरारजी देसाई यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच दोन्ही बजेट सादर केले. देसाईंनी 1964 ते 68 सालच्या लीप ईयर अर्थात 29 फेब्रुवारी रोजी बजेट मांडला. आर. वेंकटरमन हे एकमेव अर्थमंत्री होते, ज्यांना भारताचे राष्ट्रपती होण्याचा मान मिळाला.

६) देशाच्या पंतप्रधानपदाची धूरा संभाळत असताना बजेट मांडणाऱ्या व्यक्ती म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच नाव घेतलं जात.

७) ९० च्या दशकात तीन अंतरिम बजेट मांडण्यात आले. यशवंत सिंह यांनी 1991-92 आणि 1998-99 साठीचा अर्थसंकल्प मांडला. तर मनमोहन सिंह यांनी 1996-97 साठीचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. देशात सर्व्हिस टॅक्स सुर करण्याच श्रेय देण्यात येत ते मनमोहन सिंग यांना. मनमोहन सिंग यांनी  बजेट मांडताना देशात सर्वात प्रथम सर्व्हिस टॅक्स सुरू केला होता.

८) देशाचा अर्थसंकल्प 2000 सालापर्यन्त संध्याकाळी पाच वाजता सादर करण्याची प्रथा होती. ब्रिटीश व्यवस्थेत इंग्रजांनी इंग्लडमध्ये असणारी सकाळच्या वेळेनुसार हे टायमिंग ठरवण्यात आल्याच सांगण्यात येत. यशवंतसिन्हा यांनी मात्र या प्रथेला फाटा देवून सकाळच्या वेळेत बजेट मांडण्यास सुरवात केली.

९) आजतागायत रेल्वेचं बजेट वेगळं मांडण्यात येत असे. रेल्वेमंत्र्यांमार्फत रेल्वेचं बजेट सादर केल जायचं. मात्र 2017-2018 साली संयुक्त अर्थसंकल्प सादर करण्यास सुरवात करण्यात आली.

१०) 1982 साली अर्थमंत्री प्रणब मुखर्जी यांनी एक तास, पस्तीस मिनीट अर्थसंकल्पीय भाषण केलं होतं. तिथून अर्थसंकल्प तासभर सांगण्याचा ट्रेन्ड निर्माण झाला. त्यावेळी इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या,

सबसे छोटे कद कें वित्तमंत्रीने सबसे लंबा भाषण दियां.

  •  ताऱखांमध्ये घोळ झाला असल्यास संभाळून घ्या, इतकी आकडेमोड येत असती तर आज आम्हीच अर्थसंकल्प सादर करत असतो. 

हे ही वाचा.