दस का दम : 10 वर्षात 7 पंतप्रधान, 3 जणांची हत्या, पाकच्या पंतप्रधानपदाच्या 10 गोष्टी
जवळपास महिनाभर चाललेल्या राड्यानंतर पाकिस्तानच्या संसदेत अविश्वास ठराव पास झाला आणि अखेर इम्रान खानला पंतप्रधानपदाची खुर्ची खाली करावी लागली. संसदेत काल मध्यरात्री पर्यंत चालेल्या राड्यानंतर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. प्रस्तावाच्या बाजूने १७४ मतं पडली आणि इम्रान खानचं सरकार कोसळलं.
२०१८ मध्ये ‘नया पाकिस्तान’चं स्वप्न दाखवत इम्रान खानच्या तहरीक- ए- इन्साफ या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. अनेक छोट्या पक्षांच्या मदतीनं इम्रान खान पंतप्रधानपदावर बसला होता. आता अवघ्या साडेतीन वर्षात त्याला सत्तेतून पायउतार व्हावे लागले आहे.
पण ही खुर्ची नेहमीच शापित राहिले आहे. कशी ते या १० पॉईंट्स मधून जाणून घेऊ.
१)भारताबरोबरच स्वतंत्र झालेल्या पाकिस्ताननं आतापर्यंत २९ पंतप्रधान पहिले आहेत.
यामध्ये आतापर्यंत बेनझीर भुट्टो आणि नवाझ शरीफ यांनी एकपेक्षा जास्त वेळा पंतप्रधानपदाच्या खुर्चीत बसले आहेत. पाकिस्तान सरकारच्या ऑफिशियल वेबसाइट नुसार इम्रान खानचा पंतप्रधान पदाच्या यादीत इम्रान खान यांचा नंबर ३०वा येतो.
याच काळात भारतात आतापर्यंत १५च पंतप्रधान झाले आहेत. लियाकत आली खान हे पाकिस्तानचे पाहिले पंतप्रधान राहिले आहेत. आणि तिथूनच ह्या पंतप्रधानपदाच्या खुर्चीला शाप लागला.
तो म्हणजे
२) पाकीस्तानच्या एकाही पंतप्रधानाला त्याचा कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाहीये.
एवढे पंतप्रधान झालेच यामुळं की पाकिस्तानला राजकीय स्थौर्य कधी लाभलेच नाही. प्रत्येकवेळी एकतर आर्मी किंवा पंतप्रधान पदासाठीचे इच्छुक पंतप्रधानपदी बसलेल्या व्यक्तीला खाली खेचायचे. त्यामुळे सगळ्यात जास्त वेळ पंतप्रधानपदाच्या खुर्चीत बसण्याचा पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांचा रेकॉर्ड अजूनही कायम आहे. ते ४ वर्षे २महिने आणि २ दिवस पंतप्रधानपदावर होते. त्यानंतर मात्र जी घसरगुंडी चालू झाली ती कायमचीच.
३)१९४७-१९५८ या दहा -अकरा वर्षाच्या काळात पाकिस्तानने तब्बल ८ पंतप्रधान पहिले.
स्वातंत्र्यानंतर वर्षभरातच पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांचे निधन झाले. त्यांनतर अजून एक मोठे नेते आणि पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची हत्या झाली. त्यामुळे पाकिस्तानच्या राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेची घडी कधी बसलीच नाही त्याचा हा परिणाम होता.
४)नूरल अमीन हे तर पाकिस्तानचे पंतप्रधान तर केवळ १३ दिवसच पंतप्रधान पदी होते.
७ डिसेंबर १९७१ ते २० डिसेंबर १९७१ एवढाच या पंतप्रधान महाशयांचा कार्यकाळ होता. पाकिस्तान मुस्लिम लिगचेच ते सदस्य होते.
५) पाकिस्तानमध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुका या स्वतंत्र्याच्या तब्बल २३ वर्षांनी झाल्या होत्या.
घ्या ! इथनं यांची सुरवात होती. याच काळात भारतात नेहरू लोकशाही पद्धतीने ४ वेळा निवडणुका घेऊन निवडून आले होते. आणि याही निवडणुकीत मोठ्या प्रमाणात धांदली झाल्याचा आरोप झाला होता.
६) बरं त्यातही पाकिस्तानात ३२ वर्षे तर लष्करशहांचीच सत्ता होती.
पाकिस्तानमध्ये लष्कर पहिल्यापासूनच पावरफुल राहिले आहे. पाकिस्तानी लष्कर कधी लोकशाहीचा घोट घेईल हे सांगता येत नाही. जनरल अयुब खान, जनरल झिया-उल-हक आणि जनरल परवेझ मुशर्रफ या लष्करशहांनी पाकिस्तानवर ३२ वर्षे राज्य केले.
७) सत्ता आपल्या ताब्यात घेताना पाकिस्तानच्या लष्कराने तीनवेळा लोकशाही सरकारे उलथून टाकली होती.
राष्ट्राध्यक्ष इस्कंदर मिर्झा यांनी लष्करप्रमुख (सीओएएस) म्हणून नियुक्ती केल्यानंतर जनरल अयुब खान यांनी ७ ऑक्टोबर १९५८ रोजी पाकिस्तानात पहिला लष्करी उठाव घडवून आणला. त्यानंतर पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर केवळ सात वर्षांनी, तत्कालीन लष्करप्रमुख झिया-उल-हक यांनी १९७७ मध्ये झुल्फिकार अली भुट्टो यांची राजवट उलथवून टाकली आणि पाकिस्तानमध्ये लष्करी कायदा लागू केला. पुन्हा १९९९ मध्ये जनरल परवेझ मुशर्रफ यांनी हाच कित्ता गिरवला.
८) पाकिस्तानमध्ये आतापर्यंत ३ आजी -माजी पंतप्रधानांच्या हत्या झाल्यात.
पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची पंतप्रधानपदी असतानाच हत्या झाली होती. तर झुल्फिकार अली भुट्टो यांना तिथल्या न्यायालयाने विवादास्पद निर्णय देत फाशीवर लटकवलं होतं. तर त्यांची मुलगी आणि पाकिस्तानच्या पहिल्या आणि एकमेव पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांची २७ डिसेंबर २००७ साली यांची एका इलेक्शन रॅली दरम्यान आत्मघातकी हल्यात हत्या झाली होती.
९) पाकिस्तानमध्ये अविश्वास ठराव आणून सत्तेत पायउतार व्हावा लागलेला इम्रान खान हा पहिलाच पंतप्रधान आहे.
याआधी माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो आणि शौकत अझीझ यांनाही पाकिस्तानात अशाच प्रकारच्या अविश्वास प्रस्तावाचा सामना करावा लागला होता, पण ते त्यातून सहीसलामत बाहेर पडले. पण इम्रान खानचा मात्र विरोधी पक्षांनी टप्यात आल्यावर बरोबर कार्यक्रम केला.
१०) पाकिस्तानचे जे नवीन पंतप्रधान होणार आहेत त्यांच्या भावाने आधी तीनवेळा पंतप्रधानपद भूषवले आहे.
नवाझ शरीफ हे पाकिस्तानचे तीन वेळा पंतप्रधान झाले आहेत. पण त्यांना एकदाही आपला कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. नवाज शरीफ यांचे भाऊ असलेले शहबाझ शरीफ आता पंतप्रधान पदी बसतील अशी दाट शक्यता आहे.
हे ही वाच भिडू :
- पाकिस्तानामध्ये इम्रान खानला जेरीस आणण्यामध्ये हे विरोधी पक्षनेते पुढे आहेत
- इकबाल बानो यांनी ‘हम देखेंगे’ गात पाकिस्तानी लष्करशहाच्या आदेशांना पायाखाली तुडवलं होतं…
- भारत पाकिस्तान मॅचमुळं महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाची चर्चा क्रिकेटच्या भाषेत झाली होती…
- पाकिस्तानात नेहमीच लष्कर लोकशाही सरकारचा गेम करण्याच्या तयारीत असतं