गेल्या दशकाचं महाराष्ट्राचं राजकारण गाजवणाऱ्या १० महिला राजकारणी : दस का दम

दक्षिणेला जयललिता, उत्तरेला मायावती, तिकडच्या कोपऱ्यात ममता बॅनर्जी तर इकडच्या कोपऱ्यात वसुंधराराजे तर देशात सोनिया. गेल्या दहा वर्षात म्हणजे २०१० ते २०२० च्या कालखंडात भारतीय राजकारणात स्त्री शक्ती होती आणि आहे.

मात्र स्त्री नेतृत्वात महाराष्ट्र तसा मागेच राहिला आहे, एकहाती एखाद्या महिलेच्या हाती सत्ता यावी असा प्रकार महाराष्ट्राच्या ६० वर्षाच्या काळात कधीच घडला नाही. नाही म्हणायला मुख्यमंत्री पदाच्या जवळ महिला गेल्या पण या पदाला गवसणी घालू शकल्या नाहीत. दूसरीकडे घराणेशाहीच्या जोरावर राजकारणात महिला स्थिरस्थावर झाल्या पण स्वत:च्या हिंम्मतीवर राजकारणाचा गड सर करणारी उदाहरणे तशी कमीच..

त्यातूनही निवडक १० महिलांची नावे तुम्हाला सांगता येतील, ज्यांनी राजकारणात स्वत:च अस्तित्व सिद्ध केलं. बरीच नावे राहतील देखील, राहिलेली नावे तुम्ही कमेंट करुन सांगू शकता. 

१) प्रतिभा पाटील 

महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री होता आलं नाही पण पहिला मराठी राष्ट्रपती होण्याचा मान मात्र एका महिलेला मिळाला. २००७ साली त्या राष्ट्रपती झाल्या. त्यापूर्वी त्या राजस्थानच्या राज्यपाल होत्या. तिथेही राजस्थानच्या पहिल्या महिला राज्यपाल होण्याचा बहुमान त्यांना मिळाला.

त्यापूर्वी राज्यसभेचे उप-सभापतीपद देखील त्यांच्याकडे राहिलं आहे. त्यांची राष्ट्रपतीपदाची कारकिर्द गाजली ती सर्वांधिक दयेचा अर्ज मंजूर करणाऱ्या राष्ट्रपती म्हणून. त्यांनी ३५ फाशीच्या कैद्यांचा दयेचा अर्ज मंजूर केला.

२०१० ते २०२० च्या कालावधीचा विचार करता याच कालखंडातील दोन वर्षाच्या काळात राष्ट्रपती पदावर असणाऱ्या प्रतिभाताईंच नाव अग्रक्रमाने घ्यावं लागतं.

२) सुप्रिया सुळे 

महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपद बदलाच्या हालचाली सुरू झाल्या की जे नाव समोर येत त्यामध्ये सुप्रिया सुळे यांच नाव नेहमीच अग्रकमावर असतं. सुप्रिया सुळे या शरद पवारांच्या कन्या. त्यामुळे त्यांच्या राजकारणाच्या त्या वारसदार.

२००६ साली त्यांची राज्यसभा सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली. २००९ मध्ये त्यांनी बारामतीतून ३.३६ लाख मतांनी विक्रमी विजय मिळवला. २००९ ते २०२० या काळात सुप्रिया सुळेंच राजकारण हे राज्याच्या राजकारणात दखल घेण्यासारखं ठरलं. म्हणून या यादीत सुप्रिया सुळेंच नाव असायला हवं.

३) पंकजा मुंडे

ज्याप्रमाणे शरद पवारांच्या राजकारणाचा वारसा सुप्रिया सुळे यांच्याकडे आहे त्याचप्रमाणे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या राजकारणाचा वारसा पंकजा मुंडे यांच्याकडे आहे. पंकजा मुंडे सध्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आहे. सोबतच मध्यप्रदेशच्या सह प्रभारी म्हणून काम पहात आहेत.

भाजपच्या महिला नेतृत्वात पंकजा मुंडेच स्थान वरच राहिलेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत ग्रामीण व महिला, बालविकास मंत्री अशी खाती त्यांनी संभाळली आहेत.

२०१० ते २०२० या काळखंडाचा विचार करता त्या २०१२ साली भाजपच्या युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पहात होत्या. २००९ व २०१४ च्या निवडणूकीत त्या विजयी झाल्या. महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार म्हणून त्यांचे नाव नेहमीच समोर येत राहिले आहे. २०१९ च्या निवडणूकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला असला तरी गेल्या दहा वर्षातील त्यांच्या राजकारणाची दिशा पहाता त्यांचे नाव या यादीत असायलाच हवे.

४) पूनम महाजन

२०१० ते २०२० या काळाचा विचार करायचा झाल्यास पूनम महाजन यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली होती ती २००९ साली. घाटकोपर पश्चिममधून लढलेल्या या विधानसभेच्या निवडणूकीत त्यांचा पराभव झाला होता.

२०१४ साली मात्र त्यांनी कॉंग्रेसच्या खासदार प्रिया दत्त यांचा पराभव करून राजकारणाचा श्रीगणेशा केला. प्रिया दत्त यांचा पराभव करुन राजकारणातील त्यांची एन्ट्रीच त्यांची दखल घ्यायला लावणारी आहे. पुढे भाजपच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षा म्हणून त्यांची निवड करण्यात आली.

एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणात त्या सातत्याने चर्चेत नसल्या, दखल घेण्याइतक त्यांच राजकारण नसलं तरीही कुठेतरी प्रमोद महाजन यांच्या राजकारणाचा फायदा घेवून ते कर्तृत्व सिद्ध करतील असे वाटते. म्हणूनच त्यांचा समावेश या यादीत करण्यात आलेला आहे.

५) निलम गोऱ्हे

२००२,२००८,२०१४,२०२० अशा चार वेळा आमदार होणाऱ्या शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे या सध्या विधानपरिषदेच्या उपसभापती आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्या शिवसेना उपनेत्या राहिलेल्या आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणात महिलांचे प्रश्न हाताळणाऱ्या नेत्या म्हणून त्यांची विशेष वेगळी ओळख आहे. १९९८ साली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.

६) नवनीत राणा 

पुरूषप्रधान राजकारणाच्या संस्कृतीत स्वत:ची ओळख निर्माण करण्यात तेही महाराष्ट्राच मुळ नसताना अशी ओळख निर्माण करणाऱ्या महिला म्हणून नवनीत राणा यांच नाव घ्यायला हवं. २०१४ साली त्या अमरावती लोकसभेतून मैदानात उतरल्या होत्या. राष्ट्रवादीच्या तिकीटावर उभा असणाऱ्या नवनीत राणा यांचा पराभव आनंदराव अडसूळ यांनी केला होता.

मात्र २०१९ साली २० वर्ष खासदार राहिलेल्या आनंदाराव अडसूळ यांचा पराभव त्यांनी केला. मोदी लाटेत देखील शिवसेना नेत्याचा पराभव करण्याची किमया त्यांनी केली आहे. सातत्याने त्या चर्चेत असतात.

७) वर्षा गायकवाड 

वर्षा गायकवाड महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री म्हणून काम पाहतात.

राज्याच्या पहिला महिला शिक्षण मंत्री म्हणून त्यांच्याकडे पहिल जात.

त्यांनी सुरुवातीला प्राध्यापिका म्हणून काम केल आहे. धारावी मतदारसंघाचं २००४ सालापासून त्या प्रतिनिधित्व करत आहेत. २०१० ते २०१४ या काळात राज्याच्या महिला व बालकल्याण विकास खात्याच्या मंत्री म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं आहे. २०१९ मध्ये वर्षा गायकवाड या चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत.

८) यशोमती ठाकूर 

यशोमती ठाकूर यांच्याकडे सध्या महिला व बालविकास मंत्रिपदाचा कार्यभार आहे. यशोमती ठाकूर या अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील गुरूकुंज मोजरीच्या. २००९ पासून त्या सातत्याने तिवसा मतदारसंघाच प्रतिनिधित्व करत आहेत.

कॉंग्रेसच्या युवा नेत्या म्हणून त्या राजकारणात आल्या. २००४ साली त्यांचा विधानसभा निवडणूकीत पराभव झाला. २००४ ते २००९ या काळात त्या महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसच्या महासचिव राहिलेल्या आहेत. राज्य महिला आयोगाच्या त्या सदस्या देखील होत्या.

९) प्रणिती शिंदे 

महाराष्ट्रातील सर्वात तरुण महिला आमदार म्हणून प्रणिती शिंदेना ओळखल जात. त्या सोलापूर शहर मध्य या विधानसभा मतदार संघच प्रतिनिधित्व करतात.

२००९ साली त्यांनी पहिली विधानसभा निवडणूक लढवली होती. तेंव्हापासून आजतागायत त्या आमदार म्हणून कार्यरत आहेत. २००१ मध्ये मुंबईच्या सेंट झेव्हिअर कॉलेजमधून कला शाखेत पदवी घेतली. त्यानंतर २००४ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या शासकीय विधी महाविद्यालयातून त्यांनी एलएलबीची पदवी मिळवली. ‘जाई जुई विचार मंच’ माध्‍यमातून त्यांना महिलांच पाठबळ मिळवलं आहे.

 

१०) प्रीतम मुंडे

प्रीतम मुंडे सध्या बीड लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. त्याचे वडील गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर त्या राजकारणात आल्या.

२०१४ साली झालेल्या पोट निवडणुकीत त्यांचा विक्रमी मतांनी विजय झाला होता. तब्बल सात लाख मतांच्या फरकाने त्या विजयी झाल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेल्या मतांपेक्षा जास्त मते त्यांना मिळालेली, त्यामुळे त्यांचा उल्लेख या दहा जणींच्या यादीत करावा लागेल.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.