पेडणकरांची 10 वक्तव्यं जी डोक्याला झिणझिण्या आणल्याशिवाय राहणार नाहीत…

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर या सतत चर्चेत असणाऱ्या व्यक्ती. लॉकडाऊनमध्ये नर्स म्हणून काम करत पार पाडलेली जबाबदारी असेल किंवा बंडाआधी आणि बंडानंतरही शिवसेनेची बाजू लाऊन धरत विरोधकांवर टीकास्त्र सोडणं असेल, किशोरी पेडणेकर कुठंच मागे राहिल्या नाहीत. पण पेडणेकर यांचं चर्चेत येण्याचं मुख्य कारण असतं ते म्हणजे, त्यांची वक्तव्य.

विरोधकांवर टीका करताना किंवा शिवसेनेची बाजू मांडताना किशोरी पेडणेकर यांनी केलेली १० भन्नाट वक्तव्यं बघुयात…

जेव्हा एकनाथ शिंदे यांनी बंड केलं होतं, तेव्हा किशोरी पेडणेकर यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला भेट दिली होती. तेव्हा त्यांनी बंडखोर आमदारांना परत येण्याबद्दल भावनिक साद घातली आणि सोबतच त्या म्हणाल्या,

“बाळासाहेबांच्या समाधीजवळचा दिवा धुगधुगत आहे, याचा अर्थ त्यांनाही वेदना होत असाव्यात.”

नुकतीच खासदार नवनीत राणा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्याबद्दल पेडणेकर यांना विचारलं असता, त्यांनी वक्तव्य केलं,

“मी काहीही बोलणार नाही. १३ व्या वर्षी घाणेरड्या पिक्चरमध्ये काम केलेल्या मुलीवर आम्ही घरंदाज बायका बोलणार नाही.”

तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका करताना, त्या म्हणाल्या…

“नुसतं बावनकुळे आडनाव असून चालत नाही, तर डोक्यात पण काहीतरी असावं लागतं.”

भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना यांच्यातला वाद तसा सर्वश्रुत आहे. एकदा सोमय्या यांच्यावर टीका करताना किशोरी पेडणेकर यांनी केलेलं वक्तव्य चांगलंच गाजलं होतं…

“किरीट सोमय्या म्हणजे तमाशातला गांजाडिया”

नवनीत राणा आणि रवी राणा या दाम्पत्यावर त्यांनी आधीही टीका केली होती. तेव्हा लीलावती रुग्णालयात दाखल असलेल्या नवनीत राणा यांची रवी राणांनी भेट घेतली होती. तेव्हा पेडणेकर म्हणाल्या होत्या…

“राणा बाई ही रुग्ण नाही तर मनोरुग्ण आहे. लीलावती सारख्या रुग्णालयाला काळिमा फासण्याचे काम केले. आपल्या पतीशी गळाभेट केली. जो काय लव्ह सीन केला त्याला देखील आम्ही आक्षेप घेतला नाही. हे सी ग्रेड कपल फारच वाह्यातपणा करत आहेत. सी ग्रेड तर आहातच पण अजून किती खाली जाणार. मुख्यमंत्र्यांना हे ललकारत आहेत. हे ललकारणे नाही तर ही खाज आहे.”

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एका कार्यक्रमात ‘कशी नशिबानं थट्टा आज मांडली’ हे गाणं ऐकल्यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आठवण येते, अशी टिपण्णी केली होती. याला प्रत्युत्तर म्हणून किशोरी पेडणेकर यांनी चारोळी गायली होती. ती अशी…

”अशी कशी नशिबानं थट्टा मांडली. एक होता निर्मळ माणूस,
देवेंद्र त्याचे नाव, मुख्यमंत्रीपदासाठी कटकारस्थान केले हो,
एका ‘अमृताची’ दृष्ट त्यांना लागली, त्यांच्या नशिबी उपमुख्यमंत्रीपद आले
अशी कशी नशिबानं थट्टा मांडली…”

किशोरी पेडणेकर यांनी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावरही टीकास्त्र सोडलं होतं. राणेंनी मुंबई महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करणारं पत्र आयुक्तांना लिहिलं होतं. त्यावरुन नितेश राणेंना लक्ष्य करत पेडणेकर म्हणाल्या होत्या…

“नितेश राणे यांच्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाहीये कारण ते स्वतःच्या बापाचे ऐकत नाही ते दुसऱ्याचं काय ऐकणार.”

इतर विरोधकांसोबतच पेडणेकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही टीका केली होती, जेव्हा राज्यात भोंगा-हनुमान चालीसा यावरुन रण पेटलं होतं तेव्हा त्या म्हणाल्या

 ”घंटानाद करा, नायतर आणखी कसला नाद करा आमचा नाद करु नका.”

राज ठाकरे यांच्या भाषणावरुन पेडणेकर यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळंही वादाची ठिणगी पडली होती. त्या म्हणाल्या होत्या…

”राज ठाकरेंचे काल भाषण भाजपने लिहून दिले होतं. कालच्या त्यांच्या भाषणाबाबत बऱ्याच मनसैनिकांनी आम्हाला सांगितलं की मोरी तुंबली आहे वाटलं, काही तरी निघेल पण भाजपचं गांडूळ निघालं.”

शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह ठाकरे गटाचं की शिंदे गटाचं ? हा वाद सुप्रीम कोर्टापर्यंत गेला आहे. या वादावर प्रतिक्रिया देताना, किशोरी पेडणेकर म्हणाल्या होत्या…

“पुढच्या आठवड्यात पितृपक्ष सुरु होत आहे, शिवसेना हा खऱ्या अर्थाने पितृपक्ष आहे, पितृपक्षात सगळी पितरं खाली येतात, बाळासाहेबही नक्की खाली असतील आणि आम्ही जिंकू.”

तुम्हाला किशोरी पेडणेकर यांच्या या वक्तव्यांबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.