दस का दम : बाळासाहेबांचे असेही दहा किस्से !

१) बाळासाहेबांचा जन्म पुण्याचा, कदाचित याच कारणामुळे त्यांना पाट्या लावण्याची देखील सवय होती.

जुन्या मातोश्री बंगल्यावर असणाऱ्या पाट्यांचा उल्लेख आजही कट्टर शिवसैनिक करत असतो. 

  • आपपसांतली भांडणं घेवून शिवसैनिकांनी शिवसेनाप्रमुखाना भेटू नये. 
  • मराठी माणसांनी आपल्या खोल्या मराठी माणसांनाच विकाव्यात. 
  • समाधानी स्त्री हीच घराची शोभा. 

तर जुन्या शिवसेना भवनाच्या जिन्याच्या प्रवेशद्वारावर लिहिलं होतं, 

“जो कुणी दारू पिऊन आलेला असेल किंवा ज्याच्या तोंडाला दारू प्यायल्याचा वास येत असेल त्याने शिवसेना भवनाची पायरीदेखील चढू नये.”

२) राजकारणात येण्याचा बाळासाहेबांचा निर्णय हा अपघातानेच ठरला अस सांगितलं जात.

प्रबोधनकार ठाकरेंची जशास तस सुनावण्याची खास ठाकरे शैली बाळासाहेबांच्याकडे ओघाने आलीच होती. मात्र क्रिकेट, सिनेमा अशा विषयांवर गप्पा मारणं आणि व्यंगचित्र काढणे इतक्याच गोष्टींपुरते बाळासाहेब मर्यादित जगत होते.

याच काळात “फ्रि प्रेस जर्नल” मध्ये नोकरी करत असताना संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने चित्र काढण्यास बाळासाहेबांना मज्जाव करण्यात आला. बाळासाहेबांनी तात्काळ नोकरीचा राजीनामा दिला आणि १९६० मध्ये “मार्मिक” स्थापना केली. मार्मिक मधून पुढे काय झालं तो इतिहास तुम्ही जाणताच. 

३) विजय तेंडूलकरांच्या नाटकांना बाळासाहेबांनी केलेला विरोध हा जगजाहिर.

कदाचित यामुळेच बाळासाहेब आणि विजय तेंडुलकरांचे संबध तितके चांगले नसतील असा अनेकांचा गैरसमज. पण प्रत्यक्षात चित्र मात्र उलट होतं. विजय तेंडूलकरांच्या निधनानंतर बाळासाहेबांनी सामना मध्ये लिहलं होतं, “विजय माझा जानी दोस्त. मी मार्मिक सुरू केलं तेव्हा विजयची मला खूप मदत झाली. 

मार्मिक मधल्या चित्रपट परिक्षणासाठी सिनेप्रक्षान. वाचकांच्या पत्रांच्या सदरासाठी दोन्ही कर जोडोन अशी नावे विजय तेंडुलकरांनीच दिली होती. 

४) कॅसेल अॅण्ड कंपनीने जगभरातील प्रसिद्ध व्यंगचित्रकारांचा एक संग्रह प्रसिद्ध केला होता.

बाळासाहेब ठाकरे हे व्यंगचित्रांमध्ये डेव्हिड लो यांना गुरू मानायचे. त्यांचा समावेश या यादीत होताच पण सोबत भारतातून एकमेव व्यंगचित्रकार म्हणून खुद्द बाळासाहेब ठाकरे यांचा समावेश देखील या यादित करण्यात आला होता. 

५) बाळासाहेबांच्या निधनानंतर दै.सामना मध्ये हि आठवण सुप्रिया सुळे यांनी सांगितली होती, 

त्या म्हणतात, “ शिवसेनाप्रमुखांच्या कधीही घरी गेलं की चेष्टा मस्करीत कसे दोन तीन तास जायचे, समजायचंच नाही. एकदा आम्ही त्यांना रुग्णालयात बघायला गेलो तेव्हा ते माझ्या वडलांना म्हणाले,

“ आज माझी मैत्रीण माझ्यासोबत नाही,”

आणि दोघे हसायला लागले. तेव्हा मला कळलं, की मैत्रीण म्हणजे त्यांची सिगार.  

६) बाळासाहेब कलाकार होते पण त्याहूनही अधिक कलाकारांची किंमत ठेवणारे होते.

२६ जुलै रोजी आलेल्या महापुरात जेव्हा शेजारच्या घरात राहणारे ज्येष्ठ चित्रकार माधवराव सातवळेकर यांच्या घरातील चित्र भिजली तेव्हा प्रथम माणसे पाठवणारे बाळासाहेब होते.

असाच किस्सा जेष्ठ कलावंत वासुदेव कामत यांच्याबाबतीत घडला होता. बाळासाहेबांनी त्यांना विचारलं तूला काय देवू..? क्षणभरात बाळासाहेबांचे फोटोग्राफर बाळ मुणगेकर यांना बोलावून वासुदेव कामत यांच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढला. बाहेर पडताना बाळ मुणगेकर बासुदेव कामत यांना म्हणाले, आजपर्यन्त खांद्यावर हात टाकून साहेबांनी दोनच वेळा फोटो काढले. एक मायकल जॅक्सन आणि दूसरे तुम्ही. 

७) ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर बाळासाहेबांची एक आठवण सांगतात

ते म्हणतात,  मी एकदा त्यांना भेटायला गेलो होतो तेव्हा खूप गर्दी होती. त्यांच्यासमोर एक भाजी विक्रेता महिला होती. बिचकत, दबल्या आवाजात बोलत होती. बाळासाहेब तिला म्हणाले, चांगल्या चढ्या आवाजात बोल. मला दमात घेवून बोल. माझाच नगरसेवक आहे ना तुझ्या वार्डात, मग घाबरून कशाला बोलतेस? मी काय घाबरायला शिकवले का मराठी माणसाला?

८) समीरण वाळवेकर यांनी १८ नोव्हेंबर २०१२ साली बाळासाहेब गेल्यानंतर महाराष्ट्र टाईम्सला सांगितलेला एक किस्सा, 

समीरण वाळवेकरांना पुण्याहून मुंबईला जायचे होते. सकाळी लवकर विधिमंडळाच्या अधिवेशन कव्हर करायचे होते. पण तेव्हा पुण्यामध्ये बाळासाहेब आणि इतर सहकाऱ्यांबरोबर रात्री एक दिड पर्यन्त त्यांच्या गप्पा रंगल्या. समीरण वाळवेकर मध्येच उठून जात असताना बाळासाहेब म्हणाले उद्या मी विमानाने जातोय. माझ्याबरोबरच सकाळी चला. 

दुसऱ्या दिवशी विमानात बाळासाहेबांना हवं ते विचारण्याची संधी वाळवेकरांना मिळाली. तेव्हा वाळवेकर म्हणाले, 

“साहेब सेनेतून भुजबळ कॉंग्रेसमध्ये गेल्याला आठ-दहा वर्ष झाली. आज काय वाटतं भुजबळांबद्दल? सॉरी तुमचे लखोबा लोखंडे.. ? 

तेव्हा बाळासाहेब म्हणाले,

“खरच सांगतो. वाघ होता लोकांचा. उगाच डोक्यात राख घालून घेतली. पण तू पाहिलंस त्याला विधान परिषदेत! एकटा असायचा, पण पंचवीस कॉंग्रेसवाल्यांना भारी पडायचां !” तू पाहतोस ना कसा जातिवंत अॅक्टर आहे तो ? तिकडे बेळगावात तर असा मेकअप करुन गेला की पोलिसांनासुद्धा कळले नाही हा कधी आला ते ! मोठा इरसाल माणूस. 

आज वाटते, सेनेत हवे होते म्हणून, तेव्हा बाळासाहेब म्हणाले, 

मला वाटून काय उपयोग ? पाणी वाहून गेलयं बरेच ! 

९) किल्लारीचा भूकंप झाला. संपुर्ण भारतातून मदतीचा ओघ चालू झालेला.

त्या वेळी सर्व राजकिय पक्षाचे प्रमुख नेते किल्लारीला भेट देत होते. अशातच सोनिया गांधी देखील किल्लारीला आल्या. त्यावेळी त्यांच्या सोबत शिवराज पाटील देखील होते. बेघर झालेल्या छावण्यामधून सोनिया गांधी यांनी एका लहान मुलाला उचलून कडेवर घेतलं.

लहान मुलांशी खेळताना त्यांच लक्ष मुलाच्या गळ्यात असणाऱ्या लॉकेटकडे गेलं. मुलाच्या गळ्यात बाळासाहेबांचा फोटो होता. तो पाहून सोनिया गांधींनी लगेच शिवराज पाटील यांना विचारणा केली,

तुमच्या भागात बाहेरचे नेते लोकप्रिय कसे ? 

१०) अंबरीश मिश्र यांनी बाळासाहेबांविषयी सांगितलेली एक आठवण.

अंबरीश मिश्र आणि बाळासाहेब एकाच व्यासपीठावर होते. अंबरीश मिश्र यांनी सुरेश भटांचा एक शेर उध्दृत केला. तात्काळ बाळासाहेबांनी अंबरीश मिश्र यांना तो विचारला. तो श्रीकांतला ऐकवं अस आग्रहाने सांगितलं. कदाचित तो शेर बाळासाहेबांसाठी रचला असावा असा होता, 

भेटलेली माणसे घनदाट होती

थेट पोचायास कोठे वाट होती…

हे ही वाचा – 

Leave A Reply

Your email address will not be published.