नेहरू हे एकमेव नेते आहेत ज्यांनी स्वत:च स्वत:च्या विरोधात लिखाण केलं आहे.

फक्त भारतातच नाही तर सध्याच्या जगभरातल्या राजकारणाने टोक गाठलं आहे. टीका कोणालाच सहन होत नाही. प्रत्येकाला आपल्या विरोधकांच तोंड कस बंद करता येईल हेच हवं असतं पण स्वतःवर ते उलटलं की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आठवते.

अशावेळी एक नेता जगात असा होऊन गेला जो जिवंत असताना, लोकप्रियतेच्या शिखरावर असताना त्याच्यावर टीका करता येत होती, त्याच्या मृत्यूनंतरही टीकाकार त्यांच्या नावाने खडे फोडत असतात मात्र तो लोकशाही कशी जिवंत ठेवता येईल यासाठी आयुष्यभर झटला.

भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू. वाचू त्यांचे असेच न ऐकलेले किस्से.

१. कॉंग्रेसचे लोक आरडा ओरडा करत होते एका सभेत. कारण काय होतं तर त्यांना बसायला खुर्च्या नव्हत्या. ते जमिनीवर बसले होते. त्यांना शांत करण अवघड आहे याची जाणीव सगळ्या नेत्यांना होती. तेवढ्यात नेहरू उभे राहिले. थेट जाऊन जमिनीवर बसले. सगळ्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा आरडा ओरडा शांत झाला. नेहरू जमिनीवर बसलेत हे पाहून ते गुपचूप जमिनीवर बसले.

२. जॉन गुंथर यांनी नेहरूंच्या लेखन शैलीचे कौतुक करताना असे लिहिले,

‘ नेहरुंसारखं सुंदर इंग्रजी लिहिणारी हार्डली दहा इंग्लिश माणसं आज आपल्यात आहेत.’

३. नेहरू आणि गुलाब हे समीकरण प्रसिध्द आहे.

पण याबद्दल असं लिहिलेलं आहे की नेहरूंच्या घरासमोर एक म्हातारी बाई रोज उभी असायची. नेहरुंसाठी ती रोज गुलाब घेऊन यायची. हे खूप काळ चालू होतं. काळाच्या ओघात ती बाई येणं बंद झालं. पुढे ही प्रथा नेहरूंच्या बागेत काम करणाऱ्या माणसाने चालू ठेवली. तो रोज सकाळी नेहरुंना गुलाब द्यायचा.

४. जवाहरलाल नेहरू हे या देशातले सगळ्यात दुर्दैवी काश्मिरी पंडीत आहेत.

त्यांच्या वडलांपासून सगळ्यांची ओळख पंडीत अशी होती. त्यांच्या बहिणीचं लग्न झाल्यावर आडनाव पंडीत झालं. विजयालक्ष्मी पंडीत. पण नेहरुंना मात्र पंडीत म्हणून आजकाल मान्यता नाही. देशाच्या पहिल्या पंतप्रधानाच्या जातीवर आणि धर्मावर संशय घेण्याचं हे एकमेव उदाहरण असेल जगात. 

५. पंडीत नेहरुंचे वडील मोतीलाल नेहरुंना फाउंटन पेनची खूप आवड होती.

एकदा त्यांच्याकडे असलेला एक फाउंटन पेन गायब होता. त्यांनी तो अलाहाबादच्या बंगल्यात खूप शोधला. सापडत नव्हता. लहान असलेले जवाहरलाल नेहरू हे बघत होते. पण काहीच बोलले नाही. नंतर तो जवाहरलाल नेहरूंच्याजवळच सापडला. त्यावेळी मोतीलाल नेहरूंनी त्यांना एवढ मारलं होतं की नेहरुंना ते कायम लक्षात राहिलं. अगदी इंग्रजानी अटक केल्यावर खुपदा पोलिसांचा हिसका त्यांना सहन करावा लागला. पण वडलांनी मारलेलं त्यांना आयुष्यभर जास्त लक्षात राहिलं. 

६. नेहरूंची आणि मोदींची तुलना करण्याची लोकांना घाई आहे.

त्यात नेहरूंची विनाकारण बदनामी करण्याचे प्रकार सुरु असतात. पण नेहरूंची मोदींशी तुलना करायची तर ती एका बाबतीत नक्की होऊ शकते. देश स्वतंत्र झाला त्या सुरुवातीच्या काळात नेहरू प्रचंड भाषणं द्यायचे. अगदी दिवसाला तीन तीन सभा घ्यायचे. त्यांना गर्दीचं आकर्षण होतं असं इतिहासकरांनी लिहून ठेवलंय. फक्त नेहरूंनी भाषणात चुकीची आकडेवारी दिल्याचे फार उल्लेख सापडत नाहीत.

७. नेहरू या देशातले एकमेव नेते आहेत ज्यांनी स्वतःच स्वतःच्या विरोधात लिखाण केलंय. चाणक्य या नावाने त्यांनी स्वतःच्या कारकिर्दीविषयी लिहिलं. त्यात त्यांनी असं लिहिलंय की नेहरू हुकुमशहा होण्याची शक्यता आहे. त्यांचं कोडकौतुक बंद करा. आपल्या लोकशाहीविषयी ते जागृत असले तरी आपल्या देशातल्या लोकांची व्यक्तीपुजेची सवय त्यांना चांगली ठाऊक होती. म्हणून चाणक्य या टोपणनावाने त्यांनी स्वतःला चेतावणी देणारं आणि स्वतः विरोधी मत व्यक्त करणारं लिखाण केलं. 

८. मोतीलाल नेहरू जवाहरला नेहरूंच्या लग्नासाठी मुली शोधत होते. नेहरू त्याकाळी इंग्लंडला शिकायला होते. मोतीलाल नेहरू मुलींचे फोटो पाठवून द्यायचे. त्यावेळी नेहरूंनी अगदी प्रत्येक भारतीय मुलाला आजही आपलं वाटेल असं वाक्य पत्रात लिहून पाठवलं होतं.

‘माझं लग्न रोमॅंटीक सोहळा असावा असं तुम्हाला वाटतं. पण तुम्ही मला मुलींचे फोटो पाठवता आणि त्या फोटोसोबत मला प्रेम व्हावं असं वाटणं हेच खूप अनरोमॅंटीक आहे.’

९. नेहरुंना चाचा नेहरू म्हणणे आणि त्यांना मुलांविषयी खूप प्रेम होतं हे बळेच सिध्द करायचं हे अवघड आहे.

नेहरुंना तेवढा वेळ आयुष्यात कधीच मिळाला नाही. आणि मुलांना ते आवडत होते असं म्हणायचं हे सुद्धा प्रचारकी आहे. मुलांना देशातले सगळे नेते आवडतात. विनाकारण नेहरूंची चाचा नेहरू अशी इमेज करणे हा कॉंग्रेसचा पब्लिसिटी स्टंट वाटतो. त्याला फार ठोस पुरावे सापडत नाहीत. उगीच अंधभक्त असल्यासारखं नेहरूंच्या कुठल्याही गोष्टीला मोठेपण देण्यात अर्थ नाही.

ज्यांना नेहरूंची चीन आणि काश्मीर प्रकरणात फसगत झाली हे मान्य असतं ते नेहरूचे शत्रू असतात असं नाही. प्रत्येक नेत्यांच्या चुका आपल्याला माहित आणि मुख्य म्हणजे मान्य असल्याच पाहिजेत.

१०. नारायण सुर्वे यांची नेहरुंवरची अप्रतिम कविता.

नेहरू गेले त्यावेळची गोष्ट 

मी उदास खिन्न होऊन चाललो 

रस्ते कसे भयाण वाटले 

कागदी खोलीत उजेड घेऊन चाललेला हातगाडीवाला 

मी विचारले 

‘हा प्रकाश कशाला नेतोस बाबा?’

तो खिन्नपणे म्हणाला,

‘वा राव,

पुढे काळोख दात विचकित असेल’

नेहरू गेले त्यावेळची गोष्ट… 

हे ही वाचा –

Leave A Reply

Your email address will not be published.