अनं तेव्हापासून केरळ राज्य पूर्णपणे साक्षर बनलं..

देशात साक्षरतेचा विषय निघाला कि, सगळ्यात आधी नाव येत ते केरळचं. जिथं साक्षरतेचं  प्रमाण ९६.२ टक्के आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या राज्यानं आपला नंबर कायम राखलाय. आणि  लवकरच १०० चा आकडा गाठण्याच टार्गेट केरळन ठेवलंय. मात्र केरळ  आत्ताच नाही तर दोन दशकांपुर्वीच साक्षर राज्य म्हणून  घोषित करण्यात आलंय.

४ फेब्रुवारी १९९० रोजी केरळमधील एर्नाकुलम हा पहिला १०० टक्के साक्षर जिल्हा ठरला आणि पुढच्याच वर्षी १८ एप्रिल १९९१ ला केरळ हे पूर्णतः साक्षर राज्य ठरलं. इतर राज्यांत ५०- ६० टक्के साक्षरता असताना १९८१ मध्ये केरळात साक्षरतेचा दर ७० टक्के होता.  जनगणनेनुसार १९८१-९१ या कालावधीत केरळ राज्याने प्रगती करून  साक्षरतेच प्रमाण वाढवत ९० टक्क्यांपर्यंत. 

संपूर्ण साक्षरता अभियानांर्तगत १९८९ मध्ये  एर्नाकुलम  या जिल्ह्याची निवड झालेली होती.  १९९० हे आंतरराष्ट्रीय साक्षरता वर्ष म्हणून जाहीर झाल्याच्या निम्मिताने या वर्षात देशभरात एखादा जिल्हा तरी संपूर्ण साक्षर असावा, यासाठी हा निर्णय घेतला गेला होता. केरळातील केरळ शास्त्र साहित्य परिषद आणि केरळ असोसिएशन ऑफ नॉन फॉर्मल एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट या दोन बिगर सहकारी संघटनांनी हे आव्हान स्वीकारलं. ज्यानुसार ठराविक काळात ठराविक भाग साक्ष बनवण्याचं धोरण स्वीकारलं आणि संपूर्ण  प्रकल्पाची काटेकोर आखणी केली.  सरकारी अधिकारी,  संघटनांचे प्रतिनिधी, आणि स्थानिक  पुढारी यांची एक समिती बनवण्यात आली.  या समितीने संपूर्ण साक्षरतेचा हा प्रकल्प राबवला.

वाचनं, लिहीनं  आणि गणितातलं कौशल्य आत्मसात करणं याबरोबरीने लोकांना महत्वाच्या प्रश्नांविषयी जागृत  करणं,   यासाठी शिक्षण तज्ज्ञांकडून एक स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करून  घेतला. या अभ्यासक्रमात स्वच्छतेचं महत्व, बालकांचं लसीकरण,  सहकारी तत्त्वावरील शेती आणि बचतीच महत्व यांसारख्या छोट्या छोट्या गोष्टींचा समावेश केला गेला.

सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे लोकसहभाग 

या संपूर्ण प्रकल्पाची सुरूवात अशिक्षितांची संख्या निश्चित करण्यापासून झाली.  त्यासाठी घरोघरी जाऊन मोठ्या स्तरावर  सर्वेक्षण आयोजित  केलं गेलं. या सर्वेक्षणात १ लाख ८५ हजार लोक अशिक्षित असल्याचं समोर आलं. त्यामुळे  दहा- दहा अशिक्षितांचा गट बनवून त्यांना साक्षर बनवण्याचं धोरण  ठरवण्यात आलं. त्यानुसार साडेअठरा हजार गट आणि सुमारे वीस हजार प्रशिक्षक उभे करण्याचं ठरवलं गेलं. सर्वसामान्य सुशिक्षित लोकांनी या प्रकल्पात सहभागी व्हावं,  असं आवाहन केल्यानंतर त्याला चांगलाच प्रतिसाद मिळाला आणि सुमारे ६० हजार लोकांनी या प्रकल्पाला वेळ देण्याचं ठरवलं. त्यांना प्रशिक्षण देण्यात आलं. आणि प्रकल्पाचा पहिला टप्पा गाठला गेला.  

दुसऱ्या टप्प्यात जिल्हाभर सगळ्या  लोकांमध्ये साक्षरतेविषयी जागृती निर्माण व्हावी, यासाठी लोकनृत्य, पथनाट्य आणि कठपुतळीच्या प्रयोगांमार्फत त्याचप्रमाणे मिरवणुका, कला – जथ्थ्ये आणि इतर मार्गांनी कानाकोपऱ्यातपर्यंत साक्षरतेचा संदेश पोहोचवण्यात आला. शाळेतली मूलं गाणी म्हणत आणि घोषणा देत मिरवणुकीत सहभागी झाली.  वर्तमानपत्रात लेख लिहिले गेले, जाहिराती छापल्या  गेल्या. ठिकठिकाणी साक्षरतेचा संदेश देणारी पोस्टर्स झळकवण्यात आली.  चित्रपटगृहात स्लाईड्स दाखवल्या गेल्या. या साऱ्या प्रयत्नांमुळं एर्नाकुलम जिल्ह्यात अभूतपूर्व वातावरण निर्माण झालं.

त्यानंतर  सुरुवात झाली ती प्रत्यक्ष शिक्षणाला.  साक्षर होऊ इच्छिणाऱ्यांमध्ये केंद्रांमध्ये समूहगानी,  एकपात्री प्रयोग,  प्रश्नमंजुषा या मार्गांनी त्यांच्यात स्पर्धा घेतल्या गेल्या. त्यातले काही कार्यक्रम रेडिओ आणि टीव्हीवरून दाखवले गेले.  त्यामुळे लोकांमध्ये आणखीनच उत्साह संचारला आणि प्रकल्पाला आणखी वेग आला. 

मात्र प्रकल्पाला सुरुवात करत असताना आणि त्याची आखणी करत असताना ज्या आव्हानांचा  अंदाजही नव्हता, असे प्रश्न निर्माण झाले. जस कि, साक्षर होऊ इच्छिणाऱ्या अनेक वयस्कर लोकांना दिसायचा अडचणी होत्या, काही कामगारांना  डोळे तपासणी आणि चष्मा घालनं परवडणार नव्हतं. त्यावर उपाय म्हणून राज्याच्या आरोग्य विभागाच्या मगतीनं डोळे तपासणीची मोफत शिबीर आयोजित करण्यात आली. लोकांना आवाहन करून निधी उभारण्यात आला. आणि त्यातून चष्म्यांचं वाटप करण्यात आलं.  मोफत डोळे तपासणी होते आणि चष्मेही मिळतात यामुळे साक्षरता वर्गाकडे येण्याचं प्रमाणही वाढलं.

या साऱ्या प्रयत्नातून ४ फेब्रुवारी १९९० ला एर्नाकुलम देशातला पहिला साक्षर जिल्हा बनला. पाहता पाहता एर्नाकुलमचं नाव देशांबरोबरच जगभरात गाजलं. पुढे या यशापासून प्रेरणा घेत. संपूर्ण केरळ राज्य साक्षर बनलं.  संपूर्ण साक्षरतेच्या या प्रयोगमुळं केरळात बरेच बदल झाले.  केरळमध्ये राजकीय आणि सामाजिक जागृती  घडून आली.  पारंपारीक सामाजिक रूढी गळून पडू लागल्या. खेड्यापाड्यातला गरिबातील गरीब माणूस वाचू – लिहू लागला.  त्यातून फसवणुकीच्या प्रकरणाला आळा  बसला.  वर्तमानपत्र  आणि पुस्तक वाचण्याचं प्रमाण कमालीचं वाढलं.   आणि या साऱ्यातून केरळच्या प्रगतीला मोठा हातभार लागला.  

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.