सौ साल पहले, यही जग का हाल था…

जगभरात पसरलेल्या त्या महाभयंकर साथीने लाखो लोकांना लागण झाली. तिच्यापासून वाचण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंग आणि टाळेबंदी हेच मार्ग होते, तेच अवलंबले गेले. 

जगभरात बहुतेक ठिकाणची शाळा, रेस्तराँ, मौजमजेची ठिकाणं, दुकानं बंद होती, सार्वजनिक ठिकाणी लोकांना गोळा व्हायला बंदी होती. संसर्ग होऊ नये म्हणून आणि आपल्याकडून इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून शक्य त्या सगळ्यांनी स्वत:ला आयसोलेट आणि क्वारंटाइन करून घ्यावं, अशा सूचना होत्या. 

लोकांनी बाहेर पडताना मास्क वापरावा, अशा सूचना होत्या. 

काही ठिकाणी अनेक महिने टाळेबंदी सुरू राहिली. काही ठिकाणी अतिआत्मविश्वासाच्या भरात ती लवकर उठवण्यात आली. अशा ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाला. अशा ठिकाणी साथीची पहिल्या लाटेपेक्षा मोठी आणि अधिक प्राणघातक लाट उसळली. 

एका ठिकाणी राजकीय लाभ देणारा महासोहळा साथीच्या प्रकोपातही रद्द करण्यात आला नाही. त्याचा फटका त्या शहरातल्या हजारोजणांना बसला.

या रोगावर कसलाही उपचार नव्हता. ज्याची प्रतिकारशक्ती उत्तम तो वाचणार, एवढंच सांगता येत होतं. त्यातही बाधिताच्या शरीरात कधीकधी सायटोकाइन स्टाॅर्म उसळून म्हणजे त्याचीच प्रतिकारशक्ती त्याच्याच निरोगी पेशीवर उलटून त्यात पेशंटचा मृत्यू ओढवायचा.

या काळात रामबाण उपचार म्हणून जडीबुटी किंवा असंच काही देणाऱ्या अनेक भोंदूबुवांनी हात धुवून घेतले…


काय वाटलं हे सगळं वाचल्यावर? 

त्यात काय वाटायचंय, जगाला वेठीला धरलेल्या कोरोनाच्या साथीचं हे वर्णन आहे, असंच वाटलं ना तुम्हाला?

पण हे वर्णन कोरोनाच्या साथीचं नाही. १०२ वर्षांपूर्वी म्हणजे १९१८ साली अमेरिका आणि युरोपात सुरू झालेल्या आणि जगभर पसरलेल्या एचवनएनवन ए या विषाणूच्या साथीचं हे वर्णन आहे… आजच्या परिस्थितीशी तंतोतंत जुळणारं… ही साथ जगाच्या इतिहासात स्पॅनिश फ्लू या नावाने ओळखली जाते.

तिच्या या नावाची आणखी वेगळीच गंमत आहे.

आताच्या कोरोना विषाणूच्या साथीचं अधिकृत शास्त्रीय नाव आहे कोविड-१९. या विषाणूला चिनी विषाणू म्हणा, असा आग्रह अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी धरला होता, कारण ही साथ चीनमध्ये उद्भवली आणि तिथून जगभर पसरली. स्पॅनिश फ्लू या नावामुळे त्या साथीबद्दलही हाच समज होतो की ती स्पेनमध्ये उद्भवली असणार…

प्रत्यक्षात स्पेनचा आणि या साथीचा असा काहीच संबंध नाही.

तो काळ होता पहिल्या महायुद्धाचा. सगळा युरोप त्यात होरपळत होता. अमेरिकेचे सैनिकही या युद्धात लढत होते. या काळात स्पेन तटस्थ होता. युद्धात गुंतलेल्या अमेरिकेत आणि ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी या देशांसह युरोपभरात एचवनएनवन एच्या म्हणजे एक प्रकारच्या इन्फ्लूएंझाच्या (साध्या भाषेत फ्लू) साथीचा महाउद्रेक झाला होता. पहिला रुग्ण अमेरिकेत कन्सासमध्ये आढळला होता, पण साथ कुठून कशी सुरू झाली हे गुलदस्तातच राहिलं आहे आजवर. अमेरिकेत आणि युरोपात या साथीने हाहाकार माजवला होता.

पण, युद्धाच्या काळात वृत्तपत्रांवर निर्बंध होते, सेन्साॅरशिप होती. जिथे आपले लाखो जवान धाराशायी पडले आहेत, हेही नागरिकांपासून लपवलं जात होतं तिथे साथीच्या आजाराने किती लोक मरतायत, हे सांगून लोकांचं मनोधैर्य आणखी खच्ची करण्याची या देशांची तयारी नव्हती. त्यामुळे बातम्या येत राहिल्या त्या तटस्थ स्पेनमधल्या फ्लूच्या साथीच्या. तिथे कसा हाहाकार माजला आहे, किती लोक बळी पडतायत, तिथले राजे किंग अल्फान्सो तेरावे यांनाही या आजाराचा संसर्ग कसा झाला आहे, अशाच बातम्या जगभर पसरत राहिल्या आणि ज्या देशांमध्ये स्पेनपेक्षाही अधिक माणसं या फ्लूने मरत होती, त्या देशांमध्येही हा ‘स्पॅनिश फ्लू’ आहे आणि त्याने तिथेच माणसं मरतायत, असा गैरसमज खूप काळ टिकून होता.

प्रत्यक्षात पहिल्या महायुद्धात अमेरिकेचे जेवढे सैनिक युद्धभूमीवर मेले नाहीत, तेवढे या फ्लूने मारले. अमेरिकेचे ४० टक्के नौसैनिक आणि ३६ टक्के लष्करी जवान यांना या रोगाचा प्रसाद मिळाला. युद्ध संपल्यावर हे थकले भागलेले सैनिक जहाजांतून, ट्रेनमधून गर्दी करून अमेरिकेत परत गेले. त्यांनी अमेरिकेत हा रोग पसरवला. या महायुद्धात ब्रिटिशांकडून आशियाई सैनिकही लढले. त्यांनीही तो त्यांच्या देशांत नेला.  

भारतात त्या काळात या रोगाने सव्वा कोटी लोकांचा बळी घेतला होता आणि मुंबई ही या रोगाची राजधानी बनली होती. 

या आजाराचा प्राणघाताचा दर भयंकर होता. १० ते २० टक्के रोगी त्याने मारले. जगभरात त्या काळात साथीचे रोग काही नवीन नव्हते. दोन वर्षांपूर्वीच म्हणजे १९१६ साली पोलिओची महामारी येऊन गेली होती. घटसर्प, डांग्या खोकला, गोवर, कांजिण्या, देवी अशा वेगवेगळ्या संसर्गजन्य आजारांच्या साथी आलटून पालटून येत होत्या. पण, स्पॅनिश फ्लूने निरोगी भासणाऱ्या तरूण माणसांचे बळी फार मोठ्या प्रमाणात घेतले. ब्रेकफास्टला नाॅर्मल असणारा माणूस दिवस संपेसंपेपर्यंत मरूनच जायचा, इतका हा मृत्यू धक्कादायक असायचा. थकवा, ताप, डोकेदुखी या लक्षणांच्या पाठोपाठ लगेच न्युमोनिया होऊन ऑक्सिजनच्या अभावामुळे काळानिळा पडून माणूस तडफडून मरण पावायचा. 

फेब्रुवारी १९१८ ते एप्रिल १९२० या काळात या संसर्गाच्या चार लाटा उसळल्या आणि त्यांनी जगभरात मिळून एक कोटी ७० लाख ते पाच कोटी लोकांचा जीव घेतला.

जगभरात पाच अब्ज लोकांना या रोगाचा संसर्ग झाला होता. ही तेव्हाच्या जगाची जवळपास एक तृतियांश लोकसंख्या होती. इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड लाॅइड जाॅर्ज, ॲनिमेशनपटांचा जनक वाॅल्ट डिस्ने, अमेरिकेचे अध्यक्ष वुड्रो विल्सन, भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे नेते महात्मा गांधी, जर्मनीचा सम्राट कैसर विल्यम दुसरा या महानुभावांनाही या रोगाची लागण झाली होती.

या काळात भारतीय जडीबुटीची औषधं इंग्लंडमध्ये जाहिरात करून विकली गेली.

युरोपभर कापराचं माहात्म्य पसरलं. लोक कापडात कापूर गुंडाळलेल्या माळा गळ्यात घालायचे. त्याने विषाणू दूर राहतो, अशी त्यांची समजूत होती. काही डाॅक्टरांनी इंजेक्शनही दिली कापराची. मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करणे, संत्री खाणे, हे आज सांगितले जाणारे उपाय तेव्हाही सांगितले जायचे. 

शंभर वर्षांपूर्वी आपण असेच होतो आणि शंभर वर्षांनंतरही आपण काहीही शिकलेलो नाही, हे दोन्ही साथींच्या काळातल्या माणसांच्या वर्तनातून दिसून येतं. नागरिकही तसेच आणि राज्यकर्तेही. सोयीने बातम्या दाबायच्या, विजयसोहळे होऊ द्यायचे, रोग समूळ संपलेला नसताना टाळेबंदी उठवणे हे सगळे प्रकार तेव्हाही झाले, आताही झाले. उलट तेव्हा लोकसंख्या आटोक्यात होती आणि सतत साथीचे रोग येत असल्याने किमान काही गोष्टी पाळण्याची सवय किमान विकसित देशांमधल्या नागरिकांना तरी लागली होती.

शंभर वर्षांत आणखी एक गोष्ट बदललेली नाही… 

स्पॅनिश फ्लू आणि कोविड-१९ यांच्यातलं सगळ्यात धक्कादायक साम्य हेच आहे. मोकळ्या हवेत राहणारे, उत्तम पोषणमूल्यांचे आहार घेऊ शकणारे आणि व्यक्तिगत आरोग्याच्या सवयींसाठी आवश्यक सुखसुविधा असलेल्या सुखवस्तूंना या रोगांनी फार मोठा फटका दिला नाही. दोन्ही रोगांनी सर्वाधिक बळी घेतले ते झोपड्यांमध्ये, दाटीवाटीने राहणाऱ्या, व्यक्तिगत आरोग्य राखण्याची शक्यताच नसलेल्या, कुपोषित गरिबांना.

गरिबी हा सगळ्यात मोठा विषाणू आहे, हेच या दोन्ही रोगांनी सिद्ध केलं. 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.