एकही रुपया खर्च न करता अहमदाबादमध्ये ६०० एकरावर अक्खं शहर वसवण्यात आलंय

स्वामीनारायण संप्रदाय आणि या संप्रदायाकडून बांधली जाणारी अक्षरधाम मंदिरे जगभरात प्रसिद्ध आहेत. स्वामीनारायण संप्रदायाचे अनुयायी जगभरात पसरलेले आहेत, देश विदेशातील या अक्षरधाम मंदिरांना स्वामीनारायण संप्रदायाच्या अनुयायांसोबतच दरवर्षी लाखो लोक भेट देतात. 

याच स्वामीनारायण संप्रदायाला जगभर पोहोचवणारे आणि या संप्रदायाचे १५ वे गुरु प्रमुख स्वामी महाराज यांच्या १०० व्या जयंतीवर्षाचा कार्यक्रम अहमदाबादमध्ये साजरा होणार आहे. 

पण हा जयंती समारोह काही साधासुधा नाहीय, हा कार्यक्रम तब्बल एक महिना चालणार आहे आणि या कार्यक्रमाला जगभरातुन लाखो अनुयायी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमासाठी तब्बल ६०० एकर जागेवर एका वेगळ्या स्वामी महाराज नगराची निर्मिती करण्यात आली आहे. ज्याचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत.   

एक महिन्याच्या समारंभासाठी ६०० एकरावर वसवण्यात आलेलं हे नगर झिरो कॉस्टिंग कन्सेप्टवर आधारलेलं आहे त्यामुळे या नगराची चर्चा होत आहे. 

प्रमुख स्वामी यांच्या जयंती कार्यक्रमाला ३ लाख एनआरआय आणि ५५-६० लाख भाविक उपस्थित राहणार आहेत.

इतक्या मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांसाठी स्वामी महाराज नगरासोबतच अहमदाबाद आणि गांधीनगरच्या हॉटेल्समध्ये मोठया संख्येने बुकिंग करण्यात आली आहे. यात फाईव्ह स्टार हॉटेल्समधील ९० टक्के आणि इतर हॉटेल्समधील ७० टक्के रूम्स बुक करण्यात आलेल्या आहेत. यात जवळपास २०० हजार रूम्स बुक केल्याचा अंदाज आहे.

एवढ्या मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार असल्यामुळे ६०० एकर जमिनीवर या नगराची निर्मिती करण्यात आली आहे. 

या नगराच्या सुरुवातीला ३८० फूट रुंद आणि ५१ फूट उंच प्रवेशद्वार बनवलं आहे. यात स्वामी विवेकानंद, तुलसीदास, आदी शंकराचार्य यांसारख्या २८ हिंदू संतांच्या प्रतिमा लावण्यात आलेल्या आहेत. या दरवाज्यासोबतच ११६ फूट रुंद आणि ३८ फूट उंचीचे आणखी ६ दरवाजे देखील बनवण्यात आलेले आहेत. ज्यावर प्रमुख स्वामींच्या जीवनातील चित्रे रेखाटली आहेत.

मुख्य दरवाज्यातून प्रवेश केल्यानंतर १५ फूट उंच सर्कल दिसतो ज्यात प्रमुख स्वामींची ३० फूट उंच सोनेरी प्रतिमा ठेवण्यात आलीय.

हा पुतळा इतका उंच असल्यामुळे दूरवरून देखील दिसणार आहे. या पुतळ्याच्या चहूबाजूला असलेल्या सर्कलमध्ये प्रमुख स्वामी यांनी त्यांच्या आयुष्यात लोकांसाठी केलेल्या परोपकारी कामांचे चित्रण करण्यात आलंय. यात त्यांच्या वेगवगेळ्या कामांचे म्युरल्स बनवण्यात आलेले आहेत. 

हा पुतळा ओलांडल्यानंतर दिल्लीतील अक्षरधाम मंदिरासारखं असलेलं गुलाबी दगडात बांधलेलं मंदिर दिसतं.मंदिरात स्वामी नारायण आणि प्रमुख स्वामी यांच्या मुर्त्या आहेत. ६०० एकरावरच्या या नगरात भाविकांना गरजेच्या असलेल्या सर्व वस्तू लवकर उपलब्ध होतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. 

सर्वात महत्वाचं म्हणजे या नगराला झिरो कॉस्टिंग कन्सेप्टवर बनवण्यात आलंय.

आता प्रश्न पडला असेल की, असलं शहर बसवायचं असेल तर करोडो रुपये खर्च होतो मग हे नगर झिरो कॉस्टिंग कसं? तर या मागे स्वामीनारायण पंथाच्या अनुयायांची मदत आणि देणग्यांचा हात आहे. या नगरासाठी जवळपास ३०० शेतकऱ्यांनी स्वतःची जमीन दिलीय. त्यानंतर या जागेचं सपाटीकरण करून त्यावर बांधकाम करण्याच्या वस्तू बिल्डर्सनी  दिलेल्या आहेत.

तर हे सगळं बांधकाम करण्यासाठी ५० हजाराहून अधिक भाविकांनी २ महिने श्रमदान केलंय. या कामासाठी अनेकांनी स्वतःच्या नोकरीचे राजीनामे देखील दिले आहेत. या स्वयंसेवकांमध्ये करोडोची संपत्ती असलेल्या उद्योगपतींचा देखील समावेश आहे.

कार्यक्रम संपल्यानंतर या नगराची रचना करतांना वापरलेल्या वस्तू काढून दान देणाऱ्यांना परत करण्यात येतील आणि जमीन देखील शेतकऱ्यांना परत दिली जाईल. त्यामुळे कोणतीही वस्तू वाया जाणार नाही आणि कोणाचं नुकसानही होणार नाही. फक्त

आश्चर्याची बाब म्हणजे या नगराची रचना कोणत्या इंजिनीयरने नाही तर सहावी पास व्यक्तीने केलीय.

स्वामीनारायण पंथातील संन्यासी असलेले श्री स्वरूप दास स्वामी यांचं शिक्षण फक्त सहावीपर्यंत झालं आहे. त्यांना कंप्युटरचं देखील ज्ञान नाही, फक्त एका सध्या कागदावर पेन्सिलचा वापर करून त्यांनी शहराची डिजाईन तयार केलीय. एवढंच नाही तर दिल्लीमधील अक्षरधाम मंदिराची डिजाईन देखील त्यांनीच केली होती.

या नगरात आज १४ डिसेंबर पासून प्रमुख स्वामींच्या १०० व्य जयंती कार्यक्रमाला सुरुवात होईल. तर एका महिन्यांनी म्हणजेच १५ जानेवारी रोजी कार्यक्रमाचं समापन होणार आहे. परंतु या नगराच्या भव्यतेसोबतच हे नगर वसवतांना एकही रुपया खर्च न केल्याची चर्चा होत आहे. 

हे ही वाच भिडू

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.