जेव्हा १० व्या क्रमांकावरील विश्वविक्रमी शतकानंतरही त्याला संघातून वगळण्यात आलं.
कसोटी क्रिकेटमधील ९ व्या विकेटसाठीची सर्वोत्तम पार्टनरशीप.
१५ फेब्रुवारी १९९८.
द. आफ्रिकेतील जोहान्सबर्गचं मैदान. द.आफ्रिका आणि पाकिस्तान दरम्यानच्या ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस. मॅचच्या पहिल्या दिवशी तो बॅटिंगसाठी आला त्यावेळी, टॉस गमावून प्रथम बॅटिंग करणारा यजमान द.आफ्रिकेची टीम मैदानावर संघर्ष करत होती.
१६६ रन्सवर ८ विकेट्स. पण मधल्या फळीतील विकेटकिपर बॅटसमन मार्क बाउचरला हाताशी धरत त्याने संघाचा डाव सावरला. दुसऱ्या दिवशी तो मैदानावर उतरला त्यावेळी त्याने पहिल्या दिवशीच्या नॉट ७७ रन्सवरून इनिंग सुरु केली आणि दणदणीत शतक झळकावलं. अशा प्रकारे दहाव्या स्थानी बॅटिंगला येऊन शतक ठोकणारा कसोटी क्रिकेटच्या गेल्या ९६ वर्षाच्या इतिहासातील तो पहिलाच बॅटसमन ठरला. सोबतच मार्क बाउचर बरोबर कसोटीत ९ व्या विकेटसाठी सर्वाधिक रन्स जोडण्याचा विक्रमही आपल्या नावे केला. त्या दोघांनी मिळून ९ व्या विकेटसाठी १९५ रन्स जोडले आणि संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. पॅट सिमकॉक्स त्याचं नाव.
सिमकॉक्स-बाउचर जोडीचा नवव्या विकेटसाठीच्या सर्वोत्कृष्ट पार्टनरशिपचा विश्वविक्रम अजूनही अबाधित
आहे. हा विक्रम आपल्या नावे करताना या जोडीने पाकिस्तानच्या असिफ इक्बाल आणि इंतीखाब आलम यांचा १९० रन्सच्या पार्टनरशिपचा विक्रम मोडीत काढला. इक्बाल-आलम जोडीने १९६७ साली इंग्लंडविरुद्ध खेळताना ओव्हलच्या मैदानावर हा विक्रम आपल्या नावे केला होता.
सिमकॉक्स नव्वदच्या दशकात आफ्रिकेसाठी २० कसोटी आणि ८० एकदिवसीय सामने खेळला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये ओपनर बॅटसमन म्हणून त्याच्या कारकिर्दीची सुरुवात झाली आणि पुढे आघाडीचा फिरकीपटू म्हणून तो द. आफ्रिकेच्या राष्ट्रीय संघासाठी खेळला. तळाशी बॅटिंगला येऊन फटकेबाजी करण्यासाठी तो ओळखला जायचा. विशेष म्हणजे १० व्या क्रमांकावर बॅटिंगला येऊन शतक झळकाविण्याचा रेकॉर्ड जरी त्याच्या नावे असला तरी तो कायम आठवणीत ठेवला जाईल तो यासाठी की पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यासाठी त्याला ‘प्लेयिंग इलेव्हन’मधून वगळण्यात आलं होतं.