कॉंग्रेस नेत्यांमुळे क्रांतिसिंह नाना पाटलांनां अंगावर पोतं घालून फिरण्याची वेळ आली होती.

 

क्रांतिसिंह नाना पाटील, कृष्णा खोऱ्यात ब्रिटीश सत्तेला सळो की पळो करुन सोडणारा वाघ. आजही सांगली सातारा भागात क्रांतिसिंह नाना पाटलांच्या शौर्याचे किस्से सांगितले जातात. याच क्रांतिसिंह नाना पाटलांवर पैसे नाहीत म्हणून शर्टाऐवजी पोतं घालून फिरण्याची वेळ आली होती. सन १९३१ च्या दरम्यान घडलेल्या या घटनेचं वर्णन विलास पाटील यांच्या क्रांतिसिंह नाना पाटील या पुस्तकात करण्यात आलं आहे.

सरकारने नाना पाटलांवर इस्लामपूरच्या पोलिस स्टेशनमध्ये दररोज हजरी देण्याच फर्मान काढलं होतं.

त्या काळात रोज इस्लामपूरला येणं अशक्य असल्यानं क्रांतिसिंह नाना पाटलांनी काही दिवस इस्लामपूरात मुक्काम करायचं ठरवलं होतं पण सरकारच्या विरोधातला माणूस म्हणून नाना पाटलांना उघडपणे मदत करायला कोणीच धजावत नव्हतं. अशातच नाना पाटलांची आर्थिक परस्थिती देखील ढासळली होती.

त्या काळात नाना पाटलांच्या अंगावरचे कपडे देखील फाटले होते. दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न नाना पाटलांपुढे निर्माण झाला होता तर कपड्यासाठी कोठुन पैसे आणणार. आलेल्या परिस्थितीतून मार्ग काढायचा म्हणून क्रांतिसिंह थेट इस्लामपूरच्या कॉंग्रेस कमिटीच्या कार्यालयात गेले.

तिथून काहीतरी मदत मिळेल या अपेक्षनं ते कॉंग्रेस कमिटील्या पदाधिकाऱ्यांसमोर उभा राहिले. त्यांना आपली संपुर्ण परिस्थिती सांगितली.

यावर कॉंग्रेस कमिटीमधील पदाधिकाऱ्यांनी उत्तर दिलं,

“तुमची आर्थिक ऐपत नाही तर तुम्ही या फंदात का पडलात ? चळवळीत सामिल व्हा असे आमंत्रण द्यायला आम्ही आलो नव्हतो. आमच्याकडून मदतीची अपेक्षा मुळीच बाळगू नका.”

कॉंग्रेस कमिटीमधील या पदाअधिकाऱ्यांच्या अशा बोलण्याने नाना पाटील प्रचंड दूखी होवून तिथून बाहेर पडले. त्यांनी थेट इस्लामपूरची बाजारपेठ गाठली. हमाली करुन काम करावं आणि चार पैसे मिळवावेत असा विचार त्यांनी केला. नाना पोते उचलण्यासाठी पुढं झाले पण काही हमालांना क्रांन्तीसिंह नाना पाटलांना लगेच ओळखलं.

नाना पाटलांना पाहताच इस्लामपूरच्या बाजारपेठेतले सारे हमाल लगेच गोळा झाले. त्यांनी नाना पाटलांना पोती उचलण्यास नकार दिला. लगोलगं वर्गणी गोळा केली.

तुमच्यासारख्या देव माणसाला आम्ही पोती उचलू देणार नाही असा पवित्रा हमालांनी घेतला.

नाना पाटील ते पाहून भारावले पण वर्गणी घेण्यास त्यांनी नकार दिला. तुमच्या दिवसभराच्या कष्टाचे पैसे मी कसा काय घेवू म्हणून नाना पाटील तिथून बाहेर पडले. अंगावरचे फाटलेले कपडे कसे बदलायचे याचा विचार चालू असताना नाना पाटलांना तिथच गोणपाटाचं कापड दिसलं. नाना पाटलांनी लागलीच ते घेतलं आणि त्याचा शर्ट केला.

देशासाठी लढणारे नाना पाटील पोतेबुवा झाले खरे मात्र एका पदाधिकाऱ्याने दिलेल्या या वागणुकीमुळे नाना पाटलांचा कॉंग्रेसवर असणारा विश्वास डळमळीत झाला नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.