२०२२ सालातले ‘हे’ मोठे राजकीय भूकंप ज्यामुळे देशातील राजकीय समीकरणेच बदलून गेली
यंदाचे २०२२ वर्ष संपून नवीन वर्ष सुरु होण्यामध्ये फक्त एक शेवटचा आठवडा उरलेला आहे. या शेवटच्या आठवड्यामध्ये वर्षातील सगळ्या महत्वाच्या घटनांचा आढावा घेतला जात आहे, वर्षभर कोणत्या मुद्दयांची चर्चा झालीय, वैयक्तिक आयुष्यात कोणत्या चांगल्या वाईट घटना घडल्या या सगळ्यांची चर्चा सुरु आहे.
आता चर्चा होणार आणि त्यात राजकारणाचा विषय नसेल तर अनेकांना, जग सुना सुना लागे.. जग सुना सुना लागे.. असं वाटतं.
तर २०२२ मध्ये घडलेल्या सर्वात महत्वाच्या १० राजकीय घटना या आहेत.
१) नरेंद्र मोदींच्या सुरक्षेमध्ये चूक
५ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंजाबच्या एका मोठ्या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी जात होते. परंतु अचानक फिरोजपूर जिल्ह्यात काही शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवून धरला होता. त्या वेळेस पंतप्रधानांचा ताफा एका पुलावर १५-२० मिनिटांसाठी अडला होता. हे ठिकाण पाकिस्तानच्या सीमेपासून फक्त २० किमी अंतरावर असल्यामुळे पंतप्रधानांच्या सुरक्षेत झालेली ही सर्वात मोठी चूक मानण्यात आली होती.
या प्रकरणाची माजी न्यायाधीश इंदू मल्होत्रा यांच्या समितीने चौकशी केली, ज्यात फिरोजपूर जिल्ह्याच्या एसएसपीला दोषी ठरवण्यात आलं होतं.
२) हिजाब विवाद
५ फेब्रुवारी रोजी कर्नाटक सरकारने शाळा, महाविद्यालयांमध्ये सर्वासाठी ड्रेस कोड सामान असावा यासाठी राज्यातील शैक्षणिक संस्थानमध्ये हिजाब आणि बुरखा घालण्यावर बंदी घातली होती. या निर्णयानंतर हिजाब घालणाऱ्या मुलींना शैक्षणिक संकुलांमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. याचा विरोध करण्यासाठी ८ फेब्रुवारी रोजी मुस्लिम विद्यार्थिनींनी हिजाब घालून विरोध केला.
त्यानंतर हा वाद वाढायला लागला, काही युवकांनी भगवे उपरणे घालून त्या मुलींचा विरोध केल्याचे व्हिडीओ समोर आले होते. त्यानंतर कर्नाटक सरकारने ३ दिवस राज्यातील शैक्षणिक संकुल बंद ठेवले होते. त्यानंतर हा वाद वाढतच गेला, सध्या हा वाद सुप्रीम कोर्टात आहे.
३) ५ राज्यातील निवडणुकांचे निकाल
१० मार्च रोजी उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर राज्याच्या विधानसभांचे निकाल लागले होते. यात देशातील सगळ्यात मातब्बर राज्यात म्हणजेच उत्तर प्रदेशामध्ये भाजपाची पुन्हा एकदा स्पष्ट बहुमताने सत्ता आली आणि योगी आदित्यनाथ हे यूपीचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. यासोबतच गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमध्ये देखील भाजपाची सत्ता आली.
तर काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पंजाबला आपने हिसकावून घेतलं आणि निव्वळ दिल्लीच्या शहरी भागातील आप पंजाबच्या ग्रामीण भागात देखील यशस्वी ठरली. या निवडणुकीत सगळ्यात जास्त धक्का काँग्रेसला बसला होता. हा निकाल २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी महत्वाचा मानला जातो.
४) महाराष्ट्र, बिहारमधील सत्तांतर
आता देशभरात राडा होईल अन् त्यात महाराष्ट्रातलं प्रकरण नसेल असं कसं. यंदाच्याच जून महिन्यात एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या ४० आमदारांच्या गटासह शिवसेनेत बंडखोरी केली आणि सगळे गुवाहाटीला पोहोचले. त्यानंतर राज्यातली महाविकास आघाडीची सरकार कोसळली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.
उद्धव ठाकरे यांच्यानंतर भाजप आणि शिंदे गटाच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटत होतं तेव्हा फडणवीसांनी सत्तेत सहभागी होत नसल्याचं सांगितलं. मात्र अचानक देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हा सगळं घटनाक्रम राज्याच्या राजकीय इतिहासात सगळ्यात वादळी होता असं सांगितलं जातं.
आता महाराष्ट्रातला राजकीय राडा कमी होता की काय, तिकडे बिहारमध्ये देखील सत्ताबदल झालं.
भाजप आणि जनता दल युनायटेडच्या युतीमध्ये मुख्यमंत्री असलेल्या नितीश कुमारांनी अचानक एनडीएतून बाहेर पडून काँग्रेस प्रणित आघाडीत प्रवेश केला आणि परत एकदा मुख्यमंत्री झाले. नितीश कुमार यांच्या या पालटीमुळे ते केव्हा कुणासोबत जातील हे वाक्य चर्चेत आलं.
५) नुपूर शर्मा वाद
भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी एका न्यूज डिबेटमध्ये प्रेषित मुहम्मद पैगंबरांवर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. नुपूर शर्माच्या विधानानंतर देशातील मुस्लिम समाजाने विरोध सुरु केला. हा वाद भारताबाहेर खाडीच्या देशनपर्यंत पोहोचला. खाडीच्या देशांनी यावर आक्षेप घेतला आणि त्यानंतर भाजपने नुपूर शर्मा यांना भाजपमधून निलंबित केलं होतं.
६) पीएफआयवर बंदी
नुपूर शर्मा प्रकरणानंतर राजस्थानमध्ये एका टेलरची काही मुस्लिम युवकांनी गळा कापून हत्या केली होती. यानंतर अमरावतीमध्ये देखील उमेश कोल्हे यांच्या हत्येचं प्रकरण घडलं होतं. यात पीएफआयचा सहभाग असल्याचं समोर आलं आणि केंद्र सरकारने पीएफआयवर दहशतवादी आणि देशद्रोही कारवाया करण्याचा ठपका ठेवला. यानंतर पीएफआयवर ५ वर्षांसाठी बंदी घालण्यात आली.
बंदी घातल्यानंतर २७ सप्टेंबर पर्यंत पीएफआयच्या २४७ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर पीएफआयवर बंदी घालण्यावरून बरीच राजकीय खडाजंगी झाली. मुस्लिम संघटना आणि विरोधी पक्षांनी सरकारच्या निर्णयाचा विरोध केला होता मात्र काही मुस्लिम संघटनांनी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत देखील केलं होतं.
७) काश्मीर फाईल्स वाद
विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केलेला काश्मीर फाईल्स हा सिनेमा रिलीजपासूनच वादात सापडला होता. हिंदुत्ववादी संघटनांची या सिनेमाला सत्य दाखवणारा आणि लोकांचे डोळे उघडणारा सिनेमा म्हटलं होतं. तर विरोधी पक्षांनी या सिनेमात चुकीची तत्थ्य दाखवण्यात आल्याचा दावा केला आणि या सिनेमाचा विरोध केला होता. त्यानंतर हा सिनेमा बघण्यासाठी काहींनी मोफत तिकिटे वाटली तर काही भाजप शासित राज्यांमध्ये या सिनेमाला करमुक्त करण्यात आलं होतं.
त्यानंतर हा वाद निवळला होता, मात्र इफ्फिच्या चित्रपट महोत्सवात हा सिनेमा दाखवल्यानंतर स्पर्धेचे प्रमुख परीक्षक नदाव लॅपिड यांनी काश्मीर फाईल्सवर टीका केली आणि पुन्हा एकदा या सिनेमावरून वाद सुरु झाला होता.
८) काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक
भारतातील महत्वाच्या राजकीय घडामोडींपैकी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक देखील या वर्षी पार पडली. सीताराम केसरी यांच्यानंतर तब्बल २२ वर्षांनी गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्ती या निवडणुकीत उतरले होते. यात गांधी कुटुंबाची पसंती असलेले अशोक गेहलोत यात आघाडीवर होते परंतु राजस्थानच्या मुख्यमंत्री पदावरून गेहलोत-पायलट असा वाद सुरु झाला आणि रेसमध्ये मल्लिकार्जुन खर्गे यांची एंट्री झाली.
गांधी कुटुंबाचे विश्वासू मानले जाणाऱ्या मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विरोधात शशी थरूर यांनी शड्डू ठोकला होता. परंतु निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे यांचा दणदणीत विजय झाला. असं असलं तरी शशी थरूर यांनी खर्गेंना टक्कर देऊन आजवरच्या इतिहासात ११.८० टक्के इतकी भरगोस मतं प्रतिस्पर्धी म्हणून मिळवली.
९) महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद
महाराष्ट्र सरकारने सीमावादावर तोडगा काढण्यासाठी शंभूराज देसाई आणि चंद्रकां पाटील यांच्या सदस्यतेखाली एका समितीची स्थापन केली. समितीच्या स्थापनेनंतर कर्नाटकच्या कन्नड रक्षण वेदिकेने सीमावादावर कुरघोड्या सुरु केल्या आणि सीमावादाचा मुद्दा पुन्हा एकदा ढवळून निघाला. यात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या ट्विटर अकाऊंटवरून अनेक वादग्रस्त वक्तव्य करण्यात आली. कर्नाटक सरकारचे पोस्टर्स महाराष्ट्रात झळकले आणि हा वाद आणखीनच चिघळला.
त्यानंतर पाणी आणि मूलभूत सेवा सुविधांच्या मुद्यावरून महाराष्ट्रातील काही गावांनी महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात जाण्याची घोषणा केली आणि या वादाला मिळालं. त्यानंतर याचे पडसाद दोन्ही राज्यांच्या हिवाळी अधिवेशनात उमटले आणि हा वाद अजूनही सुरूच आहे.
१०) भारत जोडो यात्रा
७ सप्टेंबरला २०२२ रोजी तामिळनाडूच्या कन्याकुमारीमधून भारत जोडो यात्रेला सुरुवात झाली. मजल दरमजल करत कन्याकुमारीहून काश्मीरकडे पायदळ निघालेली ही यात्रा आत्तापर्यंत तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांना ओलांडून हरियाणामध्ये पोहोचली आहे. लवकरच ही यात्रा दिल्लीमध्ये दाखल होणार आहे.
या यात्रेमध्ये अनेक बॉलीवुड सेलिब्रिटी, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांनी सहभाग घेतला आहे. आतापर्यंत या यात्रेने देशातील ४६ जिल्ह्यांमधील तब्बल ३ हजार किलोमीटर अंतर पायदळ चालून पूर्ण केलं आहे. या यात्रेला सर्व राज्यांमधून प्रतिसाद मिळत आहे.
११) बिलकिस बानो प्रकरण
२००२ च्या गोध्रा दंगलीमध्ये बिलकीस बानो या मुस्लिम महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. त्यावेळेस २१ वर्षीय बिल्किस बानो ५ महिन्यांची गर्भवती होती, दंगलीमध्ये तिच्या परिवारातील ७ सदस्यांची हत्या करण्यात आली आणि ११ जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. हे प्रकरण तब्बल २० वर्ष गुजरात हायकोर्टामध्ये चाललं. यादरम्यान आरोपींनी १४ वर्ष जेलमध्ये काढली होती.
ऑक्टोबर २०२२ च्या सुनावणीत गुजरात हायकोर्टाने या सर्व आरोपींना मुक्त केलं. आरोपींना मुक्त सोडल्यानंतर भारतात या निर्णयाचा विरोध करण्यात आला सोबतच या प्रकरणाची दखल आंतराष्ट्रीय माध्यमांनी घेतली होती.
१२) गुजरात निवडणूक
डिसेंबर २०२२ मध्ये पार पडलेली गुजरात आणि हिमाचल प्रदेश राज्याची निवडणूक अनेक कारणांनी महत्वाची ठरली. नेहमीच्या नियमाप्रमाणे हिमाचल प्रदेशात सरकार बदलली आणि काँग्रेसची सत्ता आली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गृहराज्यात भाजपने १५६ जागांवर ऐतिहासिक विजय मिळवला. तर काँग्रेसला ऐतिहासिक पराभवाचा सामना करावा लागला.
काँग्रेस ७७ वरून १८ जागांवर पोहोचली तर मोठा गाजावाजा करण्यात आलेल्या आपने गुजरात मध्ये १२ टक्के मत मिळवून ५ जागा जिंकल्या. या विजयासह आप प्रादेशिक पक्षावरून राष्ट्रीय पक्ष म्हणून उदयाला आली.
या होत्या २०२२ मध्ये घडलेल्या १२ महत्वाच्या राजकीय घटना ज्यांची वर्षभरात सगळ्यात जास्त चर्चा झाली होती.
हे ही वाच भिडू
- राहूल गांधींच्या भारत जोडो यात्रेबद्दलच्या या 10 गोष्टी तुम्हाला माहित आहेत का..?
- काँग्रेस १४९ वरुन १८ वर आणि भाजप ११ वरुन १५६ वर : असं आहे गुजरातचं ‘मोदी मॅजिक’
- बंडखोरी 2.0 : शिवसेना आमदारांनंतर खासदारही वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत