भवतालच्या पर्यावरण समस्यांना भिडणारा पत्रकार अभिजित घोरपडे.
भिडूलोग १२ तारीख लक्षात आहे ना? आपल्या लाडक्या बोल भिडू चा पहिला वाढदिवस! बड्डेच्या या कार्यक्रमाला आपल्याला शुभेच्छा द्यायला, आपल्याशी गप्पा मारायला काही भन्नाट माणसं येणार आहेत. तर ही भन्नाट माणसं आहेत तरी कोण? असे प्रश्न आपल्या पैकी काही जणांना पडले असतील.
सर्वप्रथम जाणून घेऊ अभिजित घोरपडे यांच्याबद्दल.
निसर्गाविषयी अभिरुची असणारे पत्रकार, पर्यावरणतज्ञ, आपल्या सोप्या व थेट भिडणाऱ्या शब्दात पर्यावरणविषयी प्रश्नाची जाणीव करून देणारे लेखक. पाणी-पर्यावरण-हवामान या विषयांना वाहिलेल्या ‘भवताल’ या मासिकाचे संपादक.
अभिजित घोरपडे मुळचे साताऱ्याचे. त्यांचे शिक्षण पुण्यामध्ये झाले. त्यानंतर फर्ग्युसन कॉलेजमधून जीओलॉजी या विषयात पदवी मिळवली. भारतातल्या सुप्रतिष्ठित अशा आय.आय.टी. (मुंबई) मध्ये त्यांना एम.एस्सी.साठी प्रवेश मिळाला होता. पण काही दिवसातच त्यांना ही वाट आपल्या आवडीची नाही हे जाणवले.
आपले ध्येय हे नाही त्यांना कळाले. तो कोर्स सोडून करीयरच्या योग्य दिशेच्या शोधात परत पुणे गाठले. स्पर्धापरीक्षेचा अभ्यास केला. सोबतच पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचा कोर्स केला. हा कोर्स करताना त्यांना जाणवले आपल्याला आपली खरी वाट सापडली. १९९६ सालच्या गणेशोत्सवात विद्यार्थी वार्ताहर म्हणून त्यांनी लोकसत्ताबरोबर काम केले. तेव्हा लोकसत्ता बरोबर सुरु झालेला त्यांचा प्रवास पुढे १८-१९ वर्षे सलग चालला.
लहानपणापासून निसर्गात रमणारा स्वभाव असल्यामुळे डोंगरदऱ्यामध्ये भटकणे आपल्या परीने पर्यावरणसंवर्धनाचे काम करणे याची त्यांना आवड होती. लोकसत्ता मध्ये काम करत असताना त्यांना जाणवल की मराठी वृत्तपत्रामध्ये हवामान,पर्यावरण,पाणी या विषयांवर विशेष असे लिखाण होत नाही. जीओलॉजी म्हणजेच भूशास्त्र या विषयाची पार्श्वभूमी आणि त्या विषयांची आवड असल्यामुळे अभिजित यांनी लोकसत्ताच्या माध्यमातून पहिल्यांदा या विषयावर लिखाण सुरु केलं.
गेल्या काही वर्षात बदलत चाललेले हवामान त्यामुळे निर्माण झालेल्या समस्या मांडणारे त्यांचे लेख अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले. अतिशय क्लिष्ट आणि गुंतागुंतीचे हे विषय सोप्या शब्दात हाताळल्यामुळे सर्वसामान्य वाचकांना त्यांची ओळख झाली. पर्यावरण समस्यांचे गाव पातळीवर, स्थानिक पातळीवर कोणते परिणाम होतात याचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ते जाऊन पोहचले.
आटपाडीच्या दुर्मिळ होत असलेल्या आडांपासून ते सुप्याच्या चिंकारापर्यंत, हिरवे बाजारच्या तात्याबाच्या बोरी पासून हरिपूरच्या हळदीच्या पेवापर्यंत अनेक कथा त्यांनी आपल्यासमोर आणल्या. आपल्या आसपास घडणारे आपल्या जीवनमरणाशी जोडले गेलेले हे विषय वस्तुनिष्ठपणे मांडल्यामुळे लोकांच्यात प्रचंड आवडले गेले.
महाराष्ट्रातल्या नद्यांच्या सद्यस्थिती बद्दल ‘मरणासन्न नद्या’ या विषयाची लेखमालिका त्यांनी ‘लोकसत्ता’ दैनिकात लिहिली. एक महिनाभर चाललेल्या अभिजित घोरपडे यांच्या लेखमालिकेची देशपातळीवर निवड करण्यात येऊन त्यांना मानाच्या रामनाथ गोएंका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
ढासळत पर्यावरण हाच विषय मध्यवर्ती ठेवून त्यांनी लहरी हवा, ग्लोबल वार्मिंग, गाथा पर्यावरणाची, संथ वाहते आणि पाणी रे पाणी अशी पाच पुस्तके लिहिली. या पुस्तकांना अनेक पुरस्कार मिळाले. यापुस्तकामधून जलसाक्षरता, हवामान बदलाचा इतिहास विज्ञान भूगोल या विषयांचा रोचक प्रवास पहिल्यांदाच मराठीमध्ये रसाळ भाषेत समजावून सांगण्यात आला. मानवाने उच्च तंत्रज्ञानाच्या जोरावर ज्या पशुपक्ष्यांचा आवाज दाबून ठेवला होता त्यांना अभिजीत याने विवीध कार्यक्रमांमधून व पुस्तकांमधून बोलतं केलं आहे
लोकसत्तामध्ये त्यांचे भवताल हे सदर जोरदार सुरु होते. तिथे वरिष्ठ उपसंपादक ही जबाबदारी ही होती. मात्र अभिजित घोरपडे यांना राहून राहून एक गोष्ट सलत होती. ‘कित्येक वर्ष आपण हे निसर्गाचे प्रश्न मांडतोय पण याच्यावर सकारात्मक काही तरी काम केले पाहिजे.’ याच विचाराने त्यांनी सुखाची नोकरी सोडली आणि भवताल या उपक्रमाची सुरवात केली.
गेल्या काही वर्षात भवताल हे पर्यावरणाविषयी काम करणाऱ्या प्रत्येकाला आवाज मिळवून देणारं, गावोगावचा वारसा , प्राचीन इतिहासखुणा उलगडून सांगणारं व्यासपीठ बनल आहे. त्यांच्या दिवाळी अंकाची वाट राज्यभर पाहिली जाते. मराठीत माध्यमांमधील लिखाणामध्ये पर्यावरण विषयाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम भवतालने केलं आहे असं म्हटल तर चुकीच ठरणार नाही.
केवळ काठावरून कौतुक करणं नव्हे, तर प्रत्यक्ष सहभाग.
फक्त प्रश्न मांडणे, त्याच्याविरुद्ध सरकारदरबारी आवाज उठवणे एवढ्या पुरते मर्यादित न राहता लोकसहभागातून हे प्रश्न कसे सोडवता येतील असा सकारात्मक दृष्टीकोन भवतालने ठेवला आहे.
पाणी हवामान याच्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी भवतालचे अनेक उपक्रम चालतात. राज्यभर चालणाऱ्या व्याख्यानमाला, पेपर प्रेझेन्टेशन सेमिनार असोत अथवा भवतालच्या फेसबुक पेजच्या माध्यमातून चालणारे कॅम्पेनस असतील अभिजित घोरपडे यांच्या या वेगवेगळ्या उपक्रमांनां लोक वेगवेगळ्या पातळीवर जोडले जात आहेत.
आज सर्वसामान्य माणूस भवतालच्या फेसबुक पेजच्या माध्यमातून आपल्या गावातल्या समस्या, तिथलं वेगळेपण त्याबद्दलचे उपाय याबद्दलच्या चर्चा आणि प्रतिसाद यामधून व्यक्त होतोय. भवतालची टीम अशा गावात जाऊन त्याचे व्हिडीओ चित्रीकरण करून यासगळ्या समस्यांना आपल्या पुढे आणत आहे. त्यांचे डॉक्युमेंटेशन करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
झाडाझुडपांचा नद्यानाल्यांचा प्राणीपक्ष्याचा असा हा दोस्त अभिजित घोरपडे. येत आहेत हाच भवताल घेवून आपल्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारायला. तर यायला विसरु नका. दिनांक 12 मार्च रोजी. पत्रकार भवन पुणे येथे. संध्याकाळी ठिक 5 वाजता.
हे ही वाच भिडू.
- गंगा नदी वाचविण्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिलेला संत !
- महाराष्ट्राचा मांझी: ज्यांनी एकट्याच्या जीवावर अभयारण्य निर्माण केलं !
- काटेसावर.