या १२ कारणांमुळे तुकाराम मुंढेंसारखा कणखर माणूस पचवणं राजकारण्यांना जड जातं
पुणे गुलाबी थंडीने गारठले, मुंबई मुसळधार पावसामुळे ठप्प, नागपुर उष्माघाताने हैराण याच धर्तीवर आत्ता पत्रकारांना देखील मुंढेंची बदली हा शब्द परवलीचा झाला आहे. आत्ता कुठे? इतकचं काय ते बातमीमुल्य.
तुकाराम मुंढे यांची पून्हा बदली झाल्याची बातमी आज आली.
साधारण तेरा ते चौदा वर्षाच्या कारकिर्दीत तितक्याच बदल्या अनुभवणारे तुकाराम मुंढे. साधारणं माणसं स्वत:ची हूशारी सांगताना म्हणतात मी बारा गावचं पाणी पिलेला माणूस आहे. पण मुंडे त्यांच्याही वरचढ ठरू शकतात.
दरवेळी त्यांच्या बदल्यांमागे वेगवेगळी कारणे सांगितली जातात. पण त्यांच्या व्यक्तिमत्वात नक्की काय असाधारण आहे ज्यामुळे कोणत्याही पक्षाच्या नेत्यांना त्यांच्याशी पटवून घेणं अशक्य वाटतं हे सांगणारा हा लेख.
कुठलही राजकारण नाही की बदलीसाठी तत्कालीन कारणं नाहीत. फक्त आणि फक्त त्यांचा स्वभाव, कदाचित याच गोष्टी वाचल्यानंतर तुम्ही पण म्हणालं असा माणूस अधिकारी म्हणून पचवणं खरच जड आहे.
१) तुकाराम मुंढे शाकाहारी आहेत.
आत्ता तुम्ही म्हणाल यात काय विशेष. तर विशेष अस की, त्यांनी मांसाहार सोडण्याच कारणं. तसे ते पट्टीचे खवय्ये. पण अधिकारी झाल्यानंतर त्यांनी बाहेर जेवण न करण्याचा निर्णय घेतला. एखाद्या हॉटेलमध्ये किंवा आमंत्रणावरुन संबधीताच्या घरी जेवण्यासाठी गेल्यानंतर त्याच्याबरोबर आपोआप ऋणानुबंध वाढतात. त्यातून पुढे “काम करण्याविषयी” गळ टाकण्याचा देखील धोका असतो.
अशा वेळी बाहेरचं जेवण बंद हा नियम त्यांनी स्वत:साठी आखला. त्यातून त्यांनी मांसाहार सोडून दिला. तुम्ही आमचं मीठ खाल्ल आहे अस चुकून कोणाच्या तोंडून येवू नये म्हणून दूसऱ्याचं मीठच कधीही न खाल्लेला हा माणूस.
२) बार्शीचं अतिक्रमण काढताना झालेले किस्से अजूनही बार्शीकर सांगतात.
मुंढेंनी या कारवाईचा श्रीगणेशाच तहसील ऑफिसची भिंत काढून केला होता. सरकारी ऑफिस आहे म्हणून त्यांनी कोणतिही हयगय केली नव्हती. थेट सरकारचेच अतिक्रमण काढणारे तुकाराम मुंडे हे बहुतेक एकमेव अधिकारी असावेत.
तुकाराम मुंढेना ओळखणारे माणसं सांगतात त्यांना फक्त दोनच कामे कळतात. एक नियमात बसत नाही, व दूसरं नियमात बसतं. या पलिकडे ते काम करत नाहीत. नियमात बसत असेल तर काम होणारच असत. त्यामुळे विक्रमी वेळेत फाईल क्लियर करणारे अधिकारी म्हणून ते ओळखले जातात.
३) एकदा तुकाराम मुंढे यांना भेटण्यासाठी दोन जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक आले होते.
ते म्हणाले,
“साहेब आम्हाला आपल्या समाजामार्फत तुमचा सत्कार करायचा आहे”?
मुंढेनी शांतपणे त्यांच म्हणणं ऐकून घेतलं. ते कोणत्या शाळेत शिकवतात. कोणत्या जिल्ह्यात नियुक्त आहेत याची चौकशी केली..
तुम्ही आज शाळेत शिकवण्यासाठी गेला नाहीत का? अस मुंढेंनी विचारताच ते शिक्षक म्हणाले नाही. आम्ही रजा काढून आलोय. आजारी असल्याची कारणं दिलीत.
मुंढेनी तात्काळ संबधीत अधिकाऱ्यांना फोन करुन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. तुकाराम मुंढेचं म्हणणं अस की, मी कोणत्याच समाजाचा नाही तर प्रशासकिय अधिकारी आहे. आणि माझ्यासमोरचं काम मी करतो.
४) मुंढे घोडेस्वारीमध्ये देशात पहिले आले होते हे फार कमीजणांना माहित आहे.
UPSC मार्फत देशात ते २० वे आले होते. मसुरी येथे प्रशिक्षण कालावधीत घोडेस्वारींच्या स्पर्धा असतात अशा स्पर्धेत देशभरातून नव्याने नियुक्त झालेल्या IAS प्रशिक्षणार्थींमध्ये ते पहिल्या क्रमांकावर आले. याबद्दल त्यांना त्यांच्या मित्राने विचारलं होतं, “तुम्ही घोडेस्वारी कधी शिकलात?
मुढें म्हणाले होते,
“लहानपणापासून आपणाला म्हैशीवर बसायची सवयचं. रानात हिंडताना म्हैशीवरच तर बसायचो. घोड्यावर बसणं काय अवघड आहे.”
५) लग्नासाठी वेगळीच अट टाकणारा माणूस
मुंढे देशभरातून २० व्या क्रमांकाने उतीर्ण होतच. राज्यभरातून त्यांच्यासाठी “स्थळ” येवू लागले. आमदार, खासदारांपासून अधिकाऱ्यांची मुलगी ते बिझनेसमॅनची मुलगी अस एकंदरीत स्वरुप होतं. साहजिकच होतं ते. पण मुंढेची लग्नासाठी एकमेव अट होती ती म्हणजे मुलीला प्रसंगी बसमधून सुद्धा प्रवास करायला लागेल. प्रसंगी भाड्याने घेतलेल्या घरामध्ये देखील रहायला लागेल. साहजिक मोठ्या घराचं सुख भोगलेल्या अनेकांनी IAS अधिकाऱ्याला नकार देणच पसंत केलं. अशा वेळी वारकरी परंपरेच घर असणाऱ्या सर्वसामान्य घरातून स्थळ त्यांना आलं. तुकाराम मुंढे या नाकापुढे चालणाऱ्या माणसाचा स्वभाव समजताच वारकरी घरातून तात्काळ होकार आला व लग्न जमलं.
६) प्रलोभनांना उत्तर देणारा अधिकारी
हा अधिकारी तयार कसा होत नाही म्हणून अनेकांनी वेगवेगळी प्रलोभने दाखवली. अशाच एका प्रसंगी त्यांना एक व्यक्ती म्हणाली होती, तुमच्या गरजा कमी असतीलही पण तुमची मुलं चांगल्या इंग्लीश माध्यमा शिकावीत. मोठ्या शाळेतून ती मोठ्ठी व्हावीत अस वाटत नाही का ?
तेव्हा मुंढे म्हणाले होते,
“मी जिल्हा परिषदेच्या शाळेमधून शिकूनच अधिकारी झालो. माझी मुलं देखील सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेवून त्यांच्या आयुष्यातील ध्येय गाठू शकतात”
७) मुंढें कोणाला भितात ?
याचं उत्तर त्यांनीच काही दिवसांपुर्वी एका मुलाखतीत दिलं होतं. तुकाराम मुंढे म्हणतात माझे मोठ्ठे बंधु यांना मी भितो. तुकाराम मुंढे यांचे बंधु अशोक मुढें. लहानपणापासून वडिलबंधु म्हणून त्यांना आपल्या मोठ्या भावाची आदरपुर्वक भिती आहेच. आणि ती हि गोष्ट जाहिरपणे मान्य देखील करतात.
८) स्वत:च ध्येय पूर्ण करण्याची इच्छाशक्ती
मुंडे लोकसेवा आयोगाची तयार करत होते. याच कालावधीत राज्य सेवा आयोगाच्या परिक्षा देखील झाल्या. त्यांनी राज्य लोकसेवा आयोगाची परिक्षा दिली व त्यांची क्लास टू ऑफिसर म्हणून निवड झाली. मधल्या काळात त्यांनी दिल्लीत जावून पुन्हा केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या तयारीस सुरवात केली. मुलाखत देवून आल्यानंतर ते आपल्या जवळच्या लोकांना सांगू लागले की, मी देशात २० मध्ये तरी येवू शकतो.
क्लास टू ऑफिसर म्हणून ते प्रशिक्षण घेण्यास सुरवात झाली. पुण्यातील यशदामध्येच त्यांना बातमी समजली की ते UPSC पास झाले आहेत. त्यांची रॅंक होती २०.
९) मुंढे सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर असतानाची हि गोष्ट.
राज्यभर दुष्काळ होता व अशा काळात टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी प्रशासनावर आली होती. या काळात एका गावात दौरा करत असताना रस्त्याच्या एका बाजूला हिरवीगार शेती व त्याचसोबत पाण्याचा होणारा अपव्यय तुकाराम मुंढेंच्या नजरेत भरला. गावात जाताच त्यांनी त्या गावच्या संबधीत व्यक्तीकडे चौकशी केली. तो परिसर कोणाचा आहे. संबधीत व्यक्ती म्हणाली, माझाच !
मुंढेंनी त्यांना शेतीसाठी लागणारी विहीर सोडून बाकीच्या विहरी तात्काळ सरकारच्या ताब्यात घेतल्या व परिसरात टॅंकरने पाणीपुरवठा सुरू केला.
१०) प्रसंगी नियमांना बगल दिल्याचा किस्सा
आपल्या अधिकार क्षेत्रात असेल तेच माझं काम असे मुंढे मात्र त्यांनी देखील एकदा नियमांना बगल दिली आहे असच म्हणावं लागेल. तुकाराम मुंढे सोलापूरचे कलेक्टर होते. पुण्यातील प्रशासकिय बैठकीसाठी येत असताना भिगवण परिसरात रस्त्यांवर उभा असणारे वाळूचे ट्रक त्यांना दिसले. त्यांनी चौकशी करताच अधिकारी न ओळखल्याने ? एकाने त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. तात्काळ त्यांनी पुणे कलेक्टरांना फोन करुन कारवाई करण्याची सुचना केली. पुणे कलेक्टरांनी देखील तत्काळ संबधीत जागेवर फौजफाटा पोहचवला होता. कारवाई झाल्यानंतरच मुंढे पुण्याच्या दिशेने रवाना झाले.
११) नास्तिकपणाची व्याख्या
काही दिवसांपुर्वी तुकाराम मुंढेंच्या घरी बसवण्यात आलेल्या गणरायाचे दर्शन मिडीयाद्वारे दाखवण्यात आले होते. ते पाहून एखाद्याला सांगितल की मुंढे नास्तिक आहेत तर कोणालाही सहसा पटणार नाही. पण गंम्मत अशी की मुंडे हे नास्तिकच आहेत. पण नास्तिकपणाच्या त्यांच्या व्याख्या वेगळ्या आहेत. त्यांच्यासोबत अभ्यास करणारे त्यांचे सहकारी सांगतात. मुंढे जेव्हा UPSC ची तयारी करण्यासाठी पुण्यात असायचे तेव्हा त्यांच्या आईंचा फोन त्यांना यायचा. आज एकादशी आहे. बाहेरचं काही खावू नको. आणि मुंढे चक्क एकादशीला मांसाहार करण्याचे टाळायचे.
माझं नास्तिक असणं हे दूसऱ्यांच्या श्रद्धा जपणार हवं असा त्यांचा स्वभाव.
१२) गिफ्ट न घेणारा माणूस
जवळच्या मित्राचा भाऊ दिवाळीसाठी त्यांना भेटायला आला होता. तेव्हा दिवाळीभेट म्हणून त्याने जाताना मुंढेंसाठी एक अक्रोडच पाकीट घेतलं होतं. मुंढेनी त्या भेटीस सपशेल नकार दिला. तेव्हा त्या मुलाने किमान एक अक्रोड तरी खा म्हणून त्यांना गळ घातली.
मुंढेंनी गिफ्ट घेण्यास नकार दिलाच पण एक अक्रोड खाण्यास देखील नकार दिला. त्यांच तत्व एकच कधीच कोणतं गिफ्ट स्वीकारायचं नाही. त्यांनी त्यास आपल्या डब्यातलं जेवू घातलं पण गिफ्ट नाहीच…!
आत्ता, असा हा साधा, सरळ, आणि आपल्या तत्वांवर जगणाऱ्या माणसांचा स्वभाव, एखाद्याच्या आडवा येत असेल तर त्याला कोणीच काही करु शकत नाहीत. जास्तीत जास्त काय होवू शकतं, तर थोड स्वत:ला बदलावं लागतं पण ते चांगलच असत की.
हे ही वाचा.
- पोलीस न वाटणारा पोलीस अधिकारी !
- अशोक कामटे का डंडा, सोलापूर ठंडा..
- शिवरायांच्या आरमाराचे खरे वारसदार व्हाईस अॅडमिरल मनोहर प्रल्हाद आवटी.
- देशद्रोहाचा खोटा आरोप झाला नसता, तर मंगळयान २० वर्षांपुर्वीच यशस्वी झालं असतं !
An excellent story.