आठव्या शतकात स्थापन झालेले आखाडे उत्तर भारतात आजही आपलं वजन टिकवून आहेत

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष आणि निरंजनी आखाड्याचे सचिव महंत नरेंद्र गिरी यांचे सोमवारी संशयास्पद निधन झाले. प्रयागराजमधील बाघंब्री मठात लटकलेल्या अवस्थेमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. मात्र तेव्हापासूनच त्यांच्या मृत्युविषयी वेगवेगळे दावे केले जातायत. सध्या नरेंद्र गिरी यांच्या निधनाचा संशय त्यांचे शिष्य आनंद गिरी यांच्यावर व्यक्त केला जात आहे.

मात्र या सगळ्या पलीकडे जाऊन नरेंद्र गिरी यांच्यामुळे सध्या हे आखाडे देखील चर्चेत आले आहेत. हे आखाडे म्हणजे काय असतं? असा प्रश्न विचारला जात आहे. सोबतच या आखाड्यांची परंपरा आणि इतिहास काय असतो? यात प्रवेश कसा मिळतो? याबाबत देखील माहिती विचारली जात आहे. तर हीच सगळी माहिती आपण तर ‘बोल भिडू’वर समजून घेणार आहोत.

आखाडे म्हणजे काय?

आखाडा किंवा आखाडा परिषद काय आहे? हे अगदी सोप्या आणि सुटसुटीत भाषेत सांगायचं झालं तर आखाडा म्हणजे अनेक साधू-संतांचा एखादा मान्यताप्राप्त गट किंवा संस्था. सध्या भारतात असे एकूण मान्यताप्राप्त १३ आखाडे आहेत. यात ७ शैव, ३ वैष्णव आणि ३ उदासीन (सिक्ख) आखाडे अशी रचना आहे. याच १३ आखाड्यांची मिळून एक आखाडा परिषद असते.

आखाडे कधी आणि कसे बनले? यांचा इतिहास काय?

अशा आख्यायिका सांगितल्या जातात कि, आदि शंकराचार्य यांनी ८ व्या शतकात आखाड्यांची स्थापना केली होती. हिंदू धर्म आणि वैदिक संस्कृतीच्या रक्षणासाठी या आखाड्यांची स्थापना केली होती. असं म्हंटलं जायचं कि त्या काळात यज्ञ आणि वैदिक परंपरा निषिद्ध असणारे धर्म वाढत असल्याने वैदिक संस्कृती आणि यज्ञ परंपरा संकटात आली होती.

त्यामुळे मूळ धर्माच्या रक्षणासाठी नागा साधूंच्या पार्श्वभूमीवर या आखाड्यांना तयार करण्यात आलं. त्यानंतर आखाड्यांमध्ये योग आणि अध्यात्मातील शास्त्रांच शिक्षण दिले गेले जाऊ लागले. सुरुवातीला ४ आखाडे होते. मात्र कालांतराने वैचारिक मतभेदांमुळे ते वेगवेगळे झाले आणि त्यांची संख्या आज १३ पर्यंत पोहोचली आहे. आज हे सर्वच्या सर्व आखाडे उत्तर भारतात आपलं वजन टिकवून आहेत.

१३ आखाड्यांची रचना कशी आहे?

वर सांगितल्याप्रमाणे १३ आखाड्यांमध्ये ७ शैव, ३ वैष्णव आणि ३ उदासीन (सिक्ख) अखाडे अशी रचना आहे.

७ शैव आखाड्यांमध्ये : जूना आखाडा, निरंजनी आखाडा, महानिर्वाणी आखाडा, आवाहन आखाडा, अटल आखाडा, आनंद आखाडा आणि पंचाग्नि आखाडा. यातील जुना आखाड्यामध्ये किन्नर आखाड्याचा समावेश होतो.

तर ३ वैष्णव आखाड्यांमध्ये : दिगंबर आखाडा, निर्वाणी आखाडा, निर्मोही आखाडा यांचा समावेश आहे.

३ उदासीन (सिक्ख) आखाड्यांमध्ये : निर्मोही आखाडा, मोठा उदासीन आखाडा, नवीन उदासीन आखाडा यांचा समावेश आहे.

केवळ नाशिकच्या कुंभमेळ्यात सोडून बाकीच्या सगळ्या आखाड्यांमध्ये हे १३ आखाडे एकत्र स्नान करत असतात. पण नाशिकच्या कुंभमेळ्यात वैष्णव आखडे नाशिकमध्ये तर शैव आखाडे त्र्यंबकेश्वरमध्ये स्नान करतात. पेशव्यांच्या काळापासून हि प्रथा अस्तित्वात आली आहे.

या आखाड्यांची व्यवस्था आणि कामकाज कसे चालते?

यातील प्रत्येक आखाड्याची आपली स्वतःची वेगळी व्यवस्था असते. आदि शंकराचार्य यांनी यातील १० (७ शैव आणि ३ उदासीन) आखाड्यांची व्यवस्था चार शंकराचार्य पीठांच्या अधीन करून ठेवली आहे. तर या आखाड्यांची सूत्र शंकराचार्यांजवळ असतात. आखाड्यांच्या व्यवस्थेसाठी कमिटीच्या निवडणुका होतात.

पण या सगळ्यात आखाडा प्रमुख जे आखाड्यांचे नेतृत्व करतात त्यांचं पद स्वतंत्र असते. या १० आखाड्यांमध्ये आचार्य महामंडलेश्वर हे पद सर्वात मोठे असते. हेच आखाड्याचे प्रमुख आचार्य देखील असतात. यांच्या मार्गदर्शनात आखाड्याचे कामकाज चालत असते. महंत आणि महामंडलेश्वर स्तरावरील संतांना आखाड्यात प्रवेश द्यायचा असल्यास यांची परवानगी गरजेची असते. 

तर वैष्णव आखाड्यांमध्ये अणि महंत हे पद सर्वात मोठे असते. यात महामंडलेश्वर या पदाशी समतुल्य असे एक श्रीमहंत पद असते. या सर्व श्रीमहंतांच्या आचार्यांना ‘अणि महंत’ म्हंटले जाते. हेच आखाड्याचे सर्व संचालन करत असतात.

शाही सवारी, हत्ती-घोड्यांची सजावट, घंटा-नाद, नागा-आखाड्यांचे विविध पराक्रम, तलवार आणि बंदुकांचे खुले प्रदर्शन ही या आखाड्यांची प्रमुख ओळख आहे. सोबतच साधूंच्या या गटाला शस्त्रास्त्रांमध्ये पारंगत गट म्हणून देखील ओळखलं जातं. आखाड्यांशी संबंधित संतांच्या मते,

जे शास्त्रावर विश्वास ठेवत नाहीत त्यांना मनवण्यासाठी आखाड्यांचा उदय झाला. या आखाड्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. स्वातंत्र्यानंतर मात्र या आखाड्यांनी आपली लष्करी ओळख सोडून दिली होती.

कुंभमेळ्यात सहभागी होणारे सगळे आखाडे आपल्या वेगवेगळ्या नियम आणि कायद्यांनी चालत असतात. इथं गुन्हा करणाऱ्या साधूंना आखाडा परिषद शिक्षा देत असते.

किरकोळ गुन्ह्यांमधील दोषी साधूंसाठी आखाड्यामधील कोतवालसह गंगा नदीत ५ ते १०८ वेळा डुबकी मारण्यासाठी पाठवले जाते. स्नानानंतर संबंधित साधूला ओल्या कपड्यात मंदिरात येऊन आपल्या चुकीबद्दल माफी मागावी लागते. त्यानंतर पुजारी पूजास्थळी ठेवलेला प्रसाद देऊन त्यांची गुन्ह्यातून मुक्तता करतात.

तर लग्न करणारे, खून किंवा बलात्कार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी सापडल्यास संबंधित साधूंना आखाड्यांतून बाहेर काढले जाते. आखाड्यातून बाहेर काढल्यानंतर या साधूंना भारतीय राज्यघटनेत नमूद केलेले कायदे लागू होतात.

यासोबतच आखाड्यामध्ये भांडण करणे, आखाड्यात चोरी करणे, देवस्थानाला अपवित्र करणे, यात्रेकरू-यजमान यांच्याशी गैरव्यवहार करणे अशा सगळ्या गुन्ह्यांसाठी आखाड्याचे स्वतंत्र न्यायालय संबंधित दोषी साधूंना शिक्षा सुनावत असते. आखाड्याच्या कायद्यांना मानण्याची शपथ नागा साधू बनण्याची प्रक्रिया सुरु असतानाच देण्यात येत असते. जो सदस्य हे कायदे पाळत नाही त्यांना आखाड्यामधून बाहेर काढण्यात येते.

या आखाड्यांमध्ये साधूंची एंट्री कशी होते?

या आखाड्यांमध्ये साधूंना एंट्री मिळणे हि सोपी प्रक्रिया नाही. शैव परंपरेमध्ये साधू बनण्यासाठी आखाड्यामध्ये बराच वेळ आणि सेवा द्यावी लागती. हि सेवा देताना त्यांना एक गुरु निवडावा लागतो. हा सेवेचा वेळ ६ महिन्यांपासून अगदी ६ वर्षापर्यंत असू शकतो. या काळात आखाडा संबंधित व्यक्तीचा इतिहास आणि कुटुंबिक पार्श्वभूमी समजून घेतो. त्यांचं चारित्र्य तपासून घेतो.

या सगळ्या प्रक्रियेतून गेल्यानंतर संबंधित व्यक्तीला कुंभमेळ्यात दिक्षा देण्यात येते. या दरम्यान संबंधित व्यक्तीला आपल्या संसारिक आयुष्याचा त्याग करावा लागतो. स्वतःचे पिंडदान करावे लागते. जवळपास ३६ ते ४८ तास दीक्षा घेण्याच्या प्रकियेतुन गेल्यानंतर त्या व्यक्तीच्या नव्या नावासह आखाड्यामध्ये प्रवेश दिला जातो.

आखाड्यांमधील निवडणूक प्रक्रिया कशी असते?

आखाड्यातील साधू संतांच्या मते, आखाडे लोकशाही पद्धतीमधूनच चालतो. जुना आखाड्यात दर ६ वर्षांनी निवडणुका होतात. समिती बदलली जाते. प्रत्येक वेळी नवीन समिती निवडण्यात येते. या मागे प्रत्येकाला नेतृत्व करण्याची संधी मिळावी, सर्व संतांमध्ये उत्तम नेतृत्व क्षमता तयार व्हावी हा उद्देश असतो. काही आखाड्यांमध्ये गरज पडल्यास मतदान देखील घेतले जाते. जे चांगले काम करतात त्यांना पुन्हा निवडून दिले जाते.

तर काही आखाडे असे देखील आहेत ज्यांच्यामध्ये निवडणूक होतं नाही. एकदा निवड झाल्यानंतर संबंधित साधूच्या मृत्यूपर्यंत तेच पदावर कायम असतात.

अशा पद्धतीने आखाडा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांच्यासह १६ जणांची समिती निवडली जाते. त्याला कॅबिनेट म्हंटले जाते. समितीची वेळोवेळी बैठक होते. आपत्कालीन बैठक ही बोलावली जात असते.

जेव्हा सिंहस्थ किंवा कुंभमध्ये धर्मध्वजाची स्थापन होती, तेव्हा हि समिती विसर्जित होते. सर्व अधिकार दोन प्रमुखांना देण्यात येतात, जे एकत्रितपणे संपूर्ण सिंहस्थ किंवा कुंभचे व्यवस्थापन करतात. पुढे कुंभ-सिंहस्थानंतर समिती पुन्हा अस्तित्वात येते.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.