26/11 च्या हल्ल्याची दाहकता जगासमोर आणणारा फोटोग्राफर मात्र शेवटपर्यंत उपेक्षितच राहिला

२६ नोव्हेंबर २००८… 

मुंबईला हादरवणारा दिवस. आजही मागे वळून पाहिलं तर अंगावर काटा येईल. आज या हल्ल्याला तेरा वर्ष पूर्ण झाली पण तरी ही या हल्ल्याच्या आठवणी मात्र प्रत्येक मुंबईकराच्या मनात ताज्याच आहेत. दहशतवाद्यांनी मुंबई वेठीस धरली होती. २६/११ मुंबई हल्ल्याच्या थरारक, वेदनादायी, कटू आठवणी आजही प्रत्येक मुंबईकर आणि भारतीयांच्या मनात कायम आहेत.

हा हल्ला झाला तेव्हा इंडियन एक्स्प्रेसचे फोटोग्राफर वसंत प्रभू तिथंच होते. त्या रात्री नक्की काय काय घडलं हे जाणून घेण्यासाठी बोल भिडूने त्यांच्याशी संपर्क केला. आणि तो प्रसंग असा होता की……

२६ तारखेच्या दिलेल्या सर्व असाइनमेंट पूर्ण करून प्रभू एक्सप्रेस टॉवरच्या त्यांच्या कार्यालयात आवराआवरी करत बसलेले. तेवढ्यात त्यांच्या पुढ्यातला फोन खणाणला. कुलाब्याच्या लिओपोल्ड हॉटेलमध्ये फायरिंग चाललंय अशी माहिती होती. प्रभुंना वाटलं दोन उग्रवादी गटांमध्ये चकमक घडत असतील. बघुया काय आहे विषय म्हणत त्यांनी एक्सप्रेसचा वार्ताहर आदित्य याला ही बातमी सांगितली.

आदित्यला लगोलग पाठीमागं बसवून मोटरसायकलला त्यांनी किक मारली आणि ते कुलाब्याला निघाले. भरधाव गाडी मारत ते निघाले होते. वाटेत मात्र रस्त्यावरच्या लोकांची पळापळ चालू होती. पोलीस मुख्यालयाच्या बाहेर तर प्रचंड धावपळ, गाड्यांच्या सुसाट हालचाली बघायला मिळाल्या. गोळीबाराचे आवाज तर सतत कानावर आदळत होते. पोलीस आणि वाटेतल्या लोकांनी त्यांना अडवलं आणि पुढे जाऊ नका म्हणून सांगत राहिली.

हे अडवण्याच सत्र सुरू असतानाच प्रभूंना तिथे पोहोचण्याची घाई झाली होती. त्यांनी आदित्यला वाटेतच लिओपोल्डच्या गल्लीचा तोंडापाशी उतरायला सांगितलं. मोटर सायकल मागच्या गल्लीत घालून मग पुढच्या गल्लीत घुसायचं असा विचार त्यांनी केला.

मागच्या गल्लीत ते गेले खरे पण मागोमाग फायरिंगचा आवाज आणखीन जोरात यायला लागला. तो आवाज एकदम कानठळ्या बसवत होता. लोकांची हे पळापळ सुरू होती. मोटर सायकल पुढं रेटण एकदम अशक्य कोटीतली गोष्ट होती.

शेवटी नाईलाजाने प्रभूंनी ताज हॉटेलच्या मागच्या बाजूला एका कोपर्‍यात गाडी उभी केली आणि ते बाजूला झाले. कारण एक अतिरेकी त्यांच्यासमोर सुसाट वेगाने धावत येत होता. त्याच्या हातातल्या बंदुकीच्या फैरी हवेत झाडून तो ताजच्या मागच्या दाराने आत घुसला. मागोमाग एका मारुती एस्टीम मधून एक पोलीस अधिकारी त्याच्या बॉडीगार्ड बरोबर उतरला आणि त्या अतिरेक्यांच्या मागोमाग धावला. त्यांच्या हातात पिस्तूल होतं आणि बॉडीगार्ड कडे वॉकी-टॉकी.

त्यांना बघून प्रभूंच्या अंगात पण दहा हत्तींचे बळ संचारलं. तेही त्यांच्या मागोमाग ताजमध्ये घुसले. अगदी धावत पळत ते मागच्या दारातून आत घुसले. तिथं ताजचा गेट किपर उभा होता. पण निशस्त्र.

आत शिरताच प्रभू ही या थरारनाट्यात सहभागी झाले. त्या पोलिसांच्या मागोमाग त्यांनी श्वास रोखून पायाचा आवाज न करता दबकत चालायला सुरुवात केली. पुढे पोलीस अधिकारी, माग प्रभू आणि त्यांच्या मागं तो गेट कीपर असे सगळे एका ओळीत चालू लागले.

पहिल्या मजल्यावर गेले तिथं होता डायनिंग एरिया. तिथलं दृश्य भयाण होतं. प्रभूंच्या हातातल्या कॅमेरातन ते सगळे दृश्य टिपत होते. रक्ताची थारोळी, डायनिंग टेबलवरच्या प्लेटमध्ये उरलेलं अन्न आणि त्यात रक्त. सगळीकडे तुटलेल्या काचा, क्रॉकरीचे तुकडे, चारी बाजूने गोळीबाराचा आवाज.

आवाज एवढा घुमत होता की प्रभुंना वाटलं तिथे सर्वत्र गोळ्या झाडल्या जात आहेत. त्या मजल्यावर बरोबर मधोमध पोलीस अधिकारी प्रभू आणि ते गेटकीपर होते. तरीपण प्रभूंनी ठरवलेलं की ही पोझिशन सोडायची नाही. पोलिस अधिकार्‍याच्या पाठोपाठ चालतच रहायचं. त्यानंतर ते दुसऱ्या मजल्यावर गेले. जिना चढून जीना चढून गेल्यावर प्रभूंना थोडं असुरक्षित वाटायला लागलं. कारण तिथून पहिला आणि तिसरा मजला सहज दिसायचा. या दोन्ही मजल्यावरच्या गोळ्या दुसऱ्या मजल्यावर येऊन शकत होत्या. त्यात परिस्थितीची भीषणता फारच वाढली होती. प्रभूंच्या मनात भीती वाढतच होती.

अशातच त्या पोलीस अधिकाऱ्याच्या एका गोळीने त्या अतिरेक्याला जखमी केलं. त्या अतिरेक्याने एक शिवी हासडत त्या पोलिसाच्या दिशेने गोळीबार सुरू केला. पुढच्या दिशेने जाताना धोका अजूनच वाढत होता. अशा सेन्सिटिव्ह असलेल्या सिच्युएशनमध्ये पुढे जाणं धोकादायक असल्याने प्रभूंनी माघारी फिरण्याचा विचार केला.

कारण त्यांच्या कोणत्याही गोष्टीमुळे पोलिसांच्या कामात अडथळा येऊ नये अशी प्रभूंची इच्छा होती. ज्या मजल्यावर ती मृतदेह पडले होते तिथले फोटो काढताना तिथल्या स्टाफने प्रभुंना रिक्वेस्ट केली की फोटो काढू नका. प्रभूंनी आपला कॅमेरा बंद केला. त्या क्षणापासून ते पोलिसांनी पासून सेपरेट झाले. त्यांनी बेसमेंट मधून बाहेर निघण्याचा निर्णय घेतला. तिथं जी बुलेट-प्रुफ व्हॅन आली होती त्या रेस्क्यू टीम बरोबर प्रभू निघाले.

प्रभु ऑफिसमध्ये गेले आणि शांत बसले. त्यावेळेस त्यांच्या मनात विचार आला. ते एकदा जेम्स नावाच्या एका फोटोग्राफरला भेटले होते. वॉर फोटोग्राफर होता तो. आणि प्रभूंना त्याच्यासारखं बनायचं होतं. त्या एका क्षणासाठी त्यांना असं वाटलं की त्यांनी ते स्वप्न पूर्ण केले. पुढं १८ दिवसांनी प्रभूंना समजलं की ते ज्या पोलीस अधिकाऱ्याबरोबर आत गेले होते ते विश्वास नांगरे पाटील होते.

आज जेव्हा बोल भिडूने त्यांच्याशी संपर्क केला तेव्हा त्यांनी त्यावेळेस घडलेल्या आणि जवळपास तेरा वर्ष लोटलेल्या दुःखद आठवणींना उजाळा तर दिलाच पण सोबत स्वतःची व्यथा सुद्धा मांडली. ते म्हटले,

जीवावर उदार होऊन त्यांनी त्या हल्ल्याचे फोटो काढून घेतले ज्यामुळे अतिरेक्यांविरोधात स्ट्रॉंग केस उभी राहिली. खटले चालवले गेले आणि फाशी झाली. पण आज त्या फोटोग्राफरची जगानं किंबहुना सरकार दरबारी सुद्धा योग्य दखल घेतली गेलीच नाही.

त्यांची व्यथा ऐकून मग एकच डोक्यात येत ते म्हणजे, 26/11 च्या हल्ल्याची दाहकता जगासमोर आणणारा फोटोग्राफर मात्र शेवटपर्यंत उपेक्षितच राहिला. 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.