अवघे १४ वर्षांचे शंभूराजे गुजरात मोहिमेवर गेले आणि मोहीम फत्ते केली…

छत्रपती संभाजी महाराज. अवघ्या १५ व्या वर्षी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या नरकेसरीचा हा छावा. शिवरायांचे पराक्रमी रक्त त्यांच्याही धमन्यांमध्ये वाहत होतं. याच पराक्रमी संभाजी महाराजांचा समूळ नाश करण्यासाठी खुद्द हिंदुस्थानचा बादशाह औरंगजेब दक्षिणेत उतरला. मुघलच नाही तर पोर्तुगीज, इंग्रज यांच्यातही छत्रपती संभाजी महाराज या नावाचा दरारा होता.

संभाजी महाराजांच्या शौर्याचं, त्यांच्या धर्माभिमानाचं, त्यांच्या कर्तृत्वाचं  रहस्य त्यांच्यावर झालेल्या संस्कारामध्ये होतं…

संभाजीमहाराजांच्या जन्मानंतर लवकरच त्यांच्या आई म्हणजेच महाराणी सईबाईं यांना बाळंतविकारामुळे आजारपण सुरु झाले. मांसाहेब जिजाऊंनी शानभूमहाराजांच्या पालनपोषणाची सगळी जबाबदारी उचलली. कापूरहोळ येथील धाराऊ गाडे या संभाजी महाराजांच्या दूधआई बनल्या. पुरंदरहून त्यांना प्रतापगडावर पाठवण्यात आलं.

धाराऊंच्या दुधावर संभाजी महाराजांचे पालनपोषण चांगल्या रीतीने होऊ लागले. इकडे  राजगडावर सईबाई आपल्या आजारपणातून उठल्याच नाहीच व त्यांना “भाद्रपद, वद्य १४, शके १५८१, म्हणजेच ५ सप्टेंबर १६५९’ ” रोजी राजगडावर देवाज्ञा झाली.

पितापुत्राच्या आयुष्यातील या दुःखद घटनेनंतर छत्रपती शिवाजी महाराज अफजलखान भेटीचा मराठ्यांच्या इतिहासातील रोमहर्षक प्रसंग घडला. अफजलखान भेटीला जायचा निर्णय करताना महाराजांनी आपल्या मंत्रिमंडळाला माझ्या जीवास बरे वाईट झाले तर संभाजीराजेंना गादीवर बसवून मातोश्री जिजाबाई यांच्या आज्ञेनुसार राज्य चालवावे असे सांगितले. 

छत्रपती शिवाजी महाराज अफझलखान प्रकरणातून सहीसलामत सुटले. खानाचा वध करून त्यांनी अद्वितीय असा पराक्रम केला आणि विजापूरकरांना आपल्या शौर्याची दाखविली. त्यानंतर त्यांनी आदिलशाही अमलाखाली असलेल्या मराठी मुलुखात धडक देण्यास सुरवात केली. 

महाराजांच्या तुफानी जीवनात त्यांना आपल्या लहान मुलाकडे लक्ष देणे कठीणच होते. त्यातूनच जिजाबाई संभाजीराजांचे पालनपोषण करण्यास समर्थ असल्यामुळे त्यांना या गोष्टीकडे लक्ष देण्याची विशेष जरुरीही वाटली नाही. 

आई वेगळया आपल्या एकुलत्या एक नातवाकडे जिजाईंचा ओढा आणि प्रेम असणे साहजिकच होते.  बाल संभाजीराजांचे शिक्षण आजी जिजाबाई यांच्या नजरेखाली व देखरेखीत झाले. मातोश्री जिजाबाईंनी छत्रपती शिवाजीमहाराजांना लहान वयातच आवश्यक ते शिक्षण दिले. यातूनच स्फूर्ती घेऊन शिवाजीमहाराजांनी स्वराज्यस्थापनेचा संकल्प सोडला होता. 

बाल संभाजी महाराजांचे शिक्षण करण्यास मातोश्री समर्थ आहेत, हे छत्रपती शिवाजीराजे जाणून होते आणि जिजाबाईंनी ते समर्थपणे पेलले देखील. 

जिजाऊंनी आपल्या नातवाला रामायण आणि महाभारतातल्या तर गोष्टी सांगितल्याच, पण आपल्या लाडक्या आणि पराक्रमी मुलाच्या जीवनातील अनेक रोमहर्षक प्रसंगांचा जिवंत इतिहासही त्यांनी संभाजीराजांना अधिकारवाणीने सांगितला. संभाजी महाराजांच्या इतर शिक्षणासाठी ‘केशवभट’ व ‘उमाजी पंडित’ नावाचे दोन शिक्षक नेमले.

भावी छत्रपतींना राज्यकारभार आणि प्रत्यक्ष रणांगणाचा अनुभव मिळावा म्हणून शिवाजी महाराज आग्रही होते. शिवाजीमहाराजांनी संभाजीराजांना त्या काळातील सर्व लष्करी विद्या अवगत करून दिल्या होत्या. ते नेहमी त्यांना स्वारीवेळी बरोबर नेत असत. यावरून छत्रपती संभाजीराजांच्या व्यक्तिमत्त्वाच्या परिपूर्ण विकासावर त्यांनी भर दिला होता, असे म्हणता येईल. 

वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी निर्भिडपणे शत्रूच्या गोटात जाणारे इतिहासातले एकमेव उदाहरण म्हणजे संभाजी महाराज. पुरंदरच्या पायथ्याशी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा व मुघल सरदार मिर्झा राजे जयसिंग यांच्यात तह होत होता तेव्हा संभाजी महाराज छावणीत हजर होते. या तहा नंतर मिर्झा राजेंकडे त्यांना मनसबदार म्हणून राहावे लागले. 

त्याचसाठी त्यांनी फक्त सात आठ वर्षाच्या संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या भेटीवेळी सोबतीला म्हणून आग्र्याला नेलं.  

लहान वयातच संभाजीराजांना शिवाजीमहाराजांचा प्रतिनिधी म्हणून मुघलांकडे मनसबदार व्हावे लागले. आग्र्याच्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमानीपणा त्यांना अनुभवता आला. महाराजांचे चातुर्य आणि त्यांचे जबरदस्त नियोजन यामुळे झालेली आग्ऱ्यातून सुटका हे सगळे प्रसंग संभाजी महाराजांच्या डोळ्यासमोर घडत होते. त्यामुळे त्यांना कळतनकळत या सर्व गोष्टीचे ज्ञान प्राप्त झालेले होते.

रियासतकार गो. स. सरदेसाई यांनी आपल्या पुस्तकात लिहिलेलं आहे ,

 “इ. स. १६६८ ते १६७0 या काळात संभाजीराजे सात हजारी मनसबदार या नात्याने बुऱ्हाणपूर नजीक मागल छावणीत राहत असतं, या काळात शिकारीची आवड संभाजी महाराजांना लागली. वऱ्हाड व खान्देशचा मोकास संभाजी महाराजांना देण्यात आला होता. “

वयाच्या चौदाव्या वर्षी संभाजीराजांनी स्वतंत्ररीत्या मोठी स्वारी केल्याची दिसते.

इ.स. १६७२ मध्ये शिवाजीमहाराजांनी गुजरात मोहीम हाती घेतली होती. तेव्हा त्यांनी आपल्या सैन्याच्या दोन तुकड्या केल्या होत्या. या पैकी एका तुकडीचे नेतृत्व सेनापतीकडे सोपवून त्यांना चौल ते सुरत यांमधील प्रदेश जिंकण्यास पाठविले तर दुस-या तुकडीचे नेतृत्व दिलं युवराज संभाजीराजांकडे.

संभाजी महाराजांना अहमदाबाद पलीकडे सौराष्ट्र व खंबायतवर स्वारीस पाठविले. फक्त चौदा वर्षाच्या संभाजी महाराजांनी या मोहिमेमध्ये नेत्रदीपक आणि आश्चर्यकारक विजय मिळविले. येथूनच पुढे ‘संभाजीराजे’ या नावाचा स्वतंत्ररीत्या दरारा सुरू झाल्याचे दिसते.

शिवाजीमहाराजांनी जसे मोगल, विजापूरकर, गोवळकोंडेकर यांच्या बाबतचे शिक्षण संभाजीराजांना लहानपणी दिले होते, तसेच युरोपियन व्यापारी कंपन्या, भारतामध्ये सत्ताधिश होऊ पाहणारी राष्ट्रे व त्यांच्या दूतांशी तथा वकिलांशी चर्चा करून संभाजीराजांना त्याबाबतचे शिक्षणही दिलेले दिसून येते. 

दि. २१ मे १६७३ रोजीच्या रात्री इंग्रज वकील थॉमस निकोल्स हा कंपनीच्या कामासाठी रायगडच्या पायथ्याशी असलेल्या रायगडवाडी येथे पोहोचला होता. त्याला महाराजांना भेटायचे होते. परंतु शिवाजीमहाराज त्या वेळी रायगडावर नव्हते. म्हणून संभाजीराजांच्या परवानगीने त्याने दि. २३ मे १६७३ रोजी रायगडावर पाऊल ठेवले व दि. २४ में १६७३ रोजी तो संभाजीराजांना भेटला.

शिवाजीमहाराजांच्या गैरहजेरीत थॉमस निकोल्सने आपली कैफियत तरुण संभाजीराजांसमोर मांडली होती. 

या वेळी संभाजीराजे केवळ पंधरा वर्षांचे होते त्यांनी थॉमस निकोल्सचे म्हणणे ऐकून घेतले व त्याच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. युरोपियन लोकांशीही व्यापारीदृष्ट्या व राजकीयदृष्टया संभाजीराजांचा संबंध येऊन पुढे पुढे तो वाढतच गेलेला दिसून येतो. राजकीय व्यवहारात युरोपियन लोकांबदद्ल बाळगावयाची सावधानता व घ्यावयाची काळजी यांचे शिक्षण खुद्द शिवाजीमहाराजांनीच दिलेले दिसून येते. याचे प्रतिबिंब संभाजीमहाराजांच्या पुढील राजकीय जीवनावर पडलेले दिसून येते.

हे ही वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.