1400 Vs 3000 बस : दसरा मेळाव्यासाठी या नेत्यांचं सुद्धा भविष्य पणाला लागलय..

येत्या ५ ऑक्टोबरला दसरा मेळावा होणार. शिवतीर्थवर उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार तर बीकेसी मैदानावर एकनाथ शिंदेंचा आव्वाज घुमणार…

शिवतीर्थावर दीड लाखांची गर्दी जमवण्याचं शिवसेनेचं टार्गेट आहे. तर शिंदे गटाच्या मेळाव्याला ३ लाखांची गर्दी जमवण्याचे टार्गेट आहे. सेनेने चौदाशे बसेस बुक केल्यात तर शिंदे गटाने साडेतीन हजार बसेस बुक केल्यात. मेळाव्याच्या व्यासपीठावर उद्धव ठाकरे शिंदे गटाला गद्दार, पन्नास खोके म्हणत लक्ष्य करणार तर शिंदे गट जशास तसे त्यांना उत्तर देणार..

यात कोण वरचढ ठरणार? कुणाचा दसरा मेळावा जास्त गाजणार?

हे त्याच दिवशी कळेल पण दसरा मेळाव्याच्या आधी एक गोष्ट तुमच्या लक्षात आणून द्यायची आहे कि, हा दसरा मेळावा गाजनं जितकं ठाकरे आणि शिंदेसाठी महत्वाचं आहे त्याही पेक्षा स्थानिक नेत्यांसाठी महत्वाचं आहे…

दसरा मेळावा यशस्वी होण्यावर राज्यभरातील स्थानिक नेत्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे म्हणून दोन्ही गटातील नेते शक्तिप्रदर्शनाची जोरदार तयारी करतायेत, त्यांना दसरा मेळाव्याच्या जबाबदाऱ्या वाटून दिल्या आहेत…

या स्थानिक नेत्यांमध्ये कोण कोण येतं आणि त्यांच्या राजकीय भविष्यासाठी हा दसरा मेळावा कसा काय महत्वाचा आहे…?

ठाकरे आणि शिंदे दोन्ही गटांकडून राज्यभरातून शिवसैनिक मुंबईत येण्यासाठी दोन्ही गटाकडून साडेतीन हजारच्या जवळपास खाजगी बसेस बुक करण्यात आले आहेत. शिवाय एसटी बसचा हा आकडा सुद्धा हजारांच्या जवळपास असल्याचं कळतंय. शिवसेनेची तयारी बघायची तर, स्वतःचं अतित्व टिकवून ठेवण्यासाठी दसरा मेळावा गाजावा म्हणून उद्धव ठाकरेंनी स्वत: पुढाकार घेतलाय.

तर शिंदे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ‘स्वबळ’ दाखवता येण्यासाठी दसरा मेळाव्याची तयारी सुरुये. शिंदे गटाकडून मंत्री, आमदारांवर दसरा मेळाव्याची जबाबदारी देण्यात आली. तर प्रत्येक जिल्ह्यातून युवा सेनेला चार हजार लोक आणण्याचे टार्गेट दिलंय. तर उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांची गर्दी जमवण्याची जबाबदारी राज्यातील जिल्हाप्रमुखांवर सोपवण्यात आली आहे.

शिवाजी पार्कासाठी २० हजार अनामत रक्कमही मनपात जमा केली आहे. दसरा मेळाव्यासाठी जे कार्यकर्ते येतील त्यांच्या जेवणाची, पाण्याची आणि वॉशरूमची व्यवस्था नीट झाली पाहिजे अशा सूचना उद्धव ठाकरेंनी दिल्या आहेत.

पण हा दसरा मेळावा ज्यांच्या भविष्यासाठी महत्वाचा ठरतोय ते नेते कोणते ते पाहूया….

नाव येतं ते ठाकरे गटातल्या,

माजी महापौर किशोरी पेडणेकर

दसरा मेळावा सुरुवातीपासूनच हा मुंबईत होत आलाय. शिवसेनेचा आणि दसरा मेळाव्याचा इतिहास पाहता या मेळाव्यात काय घडतं ज्याचा परिणाम मुंबईच्या राजकारणावर होत असतो. त्यात गेली २५ वर्षांपासून मुंबईवर शिवसेनेची सत्ता आहे. शिंदे गटाच्या बंडानंतर आणि भाजपच्या मिशन मुंबईमुळे शिवसेनेला मुंबईची सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी कसोटी लागणार आहे. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा मुंबईची सत्ता मिळवण्यासाठी महत्वाचा आहे. थोडक्यात हा मेळावा मुंबई महानगरपालिका निवडणुकीची रंगीत तालीमच म्हणला जातोय, महापालिकेच्या सत्तेसाठी चढाओढ पाहता हा मेळावा माजी महापौर किशोरी पेडणेकरांची भविष्यातील कारकीर्द ठरवेल. जर पुन्हा इथे ठाकरेंची शिवसेना निवडून आलीच तर महापौरपदाचा चेहरा म्हणून किशोरी पेडणेकरच पुढे असतील.

अनिल परब

माजी मंत्री अनिल परब हे शिवसेनेच्या मेळाव्याचे व्यवस्थापक आहेत. शिवसेना फुटीनंतरचा सेनेचा दसरा मेळावा हिट करणं अनिल परबांची जबादारी असल्यामुळे हा मेळावा त्यांच्या राजकीय कारकीर्दीतला मैलाचा दगड ठरणार आहे.

चंद्रकांत खैरे

अनेक वर्षे लोकसभेत खासदारकी असूनही २०१९ च्या निवडणुकीत चंद्रकांत खैरेंचा MIM चे नेते इम्तियाज जलील यांनी पराभव केला. तेव्हापासून खैरे यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आल्याची चर्चा आहे. कारण खैरेंकडे शिवसेनेत सद्या कोणतंही पद नाहीये. त्यांना येत्या लोकसभेत पुन्हा एकदा उतरायचं आहे. त्यामुळे त्यांना दसरा मेळाव्याद्वारे औरंगाबादवरील वर्चस्व सिद्ध करावे लागणार आहे.

अंबादास दानवे

खैरेंची राजकीय कारकीर्द संपुष्ठात येण्यासाठी जबाबदार ठरवण्यात येत असलेले शिवसेनेचे अंबादास दानवे यांच्यासाठी देखील हा दसरा मेळावा महत्वाचा आहे. कारण सेनेतील बंडांनंतर ठाकरेंनीविधानपरिषदेचं विरोधी पक्षनेते पद हे अंबादास दानवेंना दिलं. त्यात सेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या औरंगाबादमधून २० हजार लोकं आणण्याचं ठाकरेंचं टार्गेट आहे, ते टार्गेट पूर्ण करण्यासाठी आणि विधानपरिषदेतल्या विरोधी पक्षनेतेपदाची ताकद दाखवून देण्यासाठी दानवे प्रयत्न करतायेत.

श्रीकांत शिंदे

एकनाथ शिंदेंचे खासदार चिरंजीव श्रीकांत शिंदे यांचा मतदार संघ कल्याण आहे. आणि कल्याणमधून अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व, डोंबिवली, कल्याण ग्रामीण, मुंब्रा कळवा असे ६ विधानसभा मतदारसंघ येतात. या सगळ्या मतदार संघामधून शिंदे गटाच्या बीकेसीच्या मेळाव्यासाठी किती गर्दी जमते यावरून श्रीकांत शिंदेंचा प्रभाव त्यांच्या मतसंघात दिसून येईल त्यामुळे त्यांच्या राजकारणाची पुढील दिशा ठरेल.

प्रदीप जैस्वाल

शिंदे गटातील आमदार प्रदीप जैस्वाल हे असं नाव आहे जे शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी जास्तीत जास्त गर्दी करण्याचं टार्गेट ठेवतात. जैस्वाल यांनी औरंगाबादमधून तब्बल ५ हजार खासगी चारचाकी गाड्यांची सोय केल्याचं त्यांनी स्वतः सांगितलं आहे..जिल्ह्यातून तब्बल १० हजार वाहनांतून २५ हजार जणांना नेण्याचे नियोजन केले असल्याचं सांगितलं जातंय.

अब्दुल सत्तार

एकट्या अब्दुल सत्तार यांनी ३०० एसटी बस बुक केल्याची घोषणा केलीय. औरंगाबादहून ४ तारखेला रात्रीला या बसेस निघणार आणि ५ तारखेला सकाळी या बसेस मुंबईला पोहचणार आहेत. अब्दुल सत्तर माध्यमांना बोलतांना सांगितलं कि, भगव्या झेंडयामुळे मेळाव्यासाठी दोन्ही गटाचे कार्यकर्ते कन्फ्युज होऊ नये म्हणून शिंदे गटाच्या भगवा झेंड्यावर बाळासाहेब, आनंद दिघे आणि एकनाथ शिंदेंचा फोटो लावायचा प्रस्ताव त्यांनी मुख्यमंत्र्यांकडॆ दिला आहे. थोडक्यात शिंदे सरकारमधील मंत्रिपद टिकवून ठेवण्यासाठी अब्दुल सत्तार यांना सगळे प्रयत्न करून गर्दी जमवावी लागेल.

संजय शिरसाट

शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळाच्या पहिल्या विस्तारात संधी न मिळालेले संजय शिरसाट पुढच्या विस्तारात मंत्रिपदासाठी शर्यतीत आहेत. मंत्रिपद न मिळाल्याबाबद्दल त्यांनी अनेकदा जाहीर नाराजी व्यक्त केल्याचं दिसून आलेलं. त्यात ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबईनंतर औरंगाबादवर खास लक्ष दिलं त्यात संजय शिरसाट औरंगाबाद पश्चिमचे आमदार आहेत. त्यामुळे त्यांना मेळाव्याच्या संधीचा उपयोग करून त्यांच्या मतदार संघावरील पकड मजबूत असल्याचं दाखवून द्यावं लागणार आहे.

संजय राठोड

आपण पाहत आलोय कि पोहरादेवी संस्थान व धर्मपरिषद ही राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या पाठीमागे ठाम उभी राहलेली दिसून आली होती मात्र आता पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी एक्झॅक्ट पलटी मारत संजय राठोड यांच्या विरोधात जात शिवसेनेत प्रवेश केला आहे.

महंत सुनील महाराज यांचा शिवसेना प्रवेश संजय राठोड यांच्या व्होट बँकवर मोठा परिणाम घडवणारा आहे कारण महाराष्ट्राच्या राजकारणात तसेच संजय राठोड यांच्या मतदारसंघात बंजारा समाजाची मतं ही निर्णयक ठरतात. त्यामुळे बंजारा समाजाला डावलून या मतदारसंघात सत्ता मिळवता येत नाही. म्हणूनच या दसरा मेळाव्यात संजय राठोड आपल्या मतदासंघातून गर्दी जमवत आपलं स्थान बळकट करण्याचा प्रयत्न करतील.

दादा भुसे

शिंदे सरकारमधील बंदरे व खजिनकर्म मंत्र तसेच नाशिकचे पालकमंत्री दादा भुसें यांनी दसऱ्याच्या नियोजनाबद्दल सांगितलं कि, नाशिक मधील प्रत्येक तालुक्यातील शिवसैनिक कसे येणार याबाबत नियोजन आधीच करून ठेवले, त्याबाबत अनेक बैठक पार पडल्यात अशी माहिती त्यांनी दिली. दादा भुसेंपुढे नाशिक जिल्ह्यात शिंदे गटाचे संघटन वाढवण्याचे मोठे आव्हान आहे, तसेच जास्तीत जास्त नाशिककरांना मेळाव्याला नेण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे त्यामुळे त्यांनाही हा मेळावा महत्वाचा ठरतो.

या नेत्यांशिवाय संदिपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांनाही आप-आपली मंत्रिपद टिकवून ठेवण्यासाठी साम, दाम वापरून गर्दी जमवावी लागणार आहे. सुहास कांदे, जे बंडानंतर विशेष चर्चेत आले होते. ते देखील मंत्रिपद मिळवण्यासाठी प्रयत्न करतायेत. आजपर्यंत शिवसेनेचं व्यासपीठ गाजवत आलेले गुलाबराव पाटील यंदाच्या मेळाव्यात शिंदेंच्या दसरा मेळाव्याचं व्यासपीठ गाजवतील…

या सर्व नेत्यांची तयारी पाहता आणि लाखोंच्या गर्दीचं टार्गेट पाहता शिंदे गटाच्या आमदारांकडून आणि शिवसेनेच्या आमदारांकडून किती गाड्या भरून कार्यकर्ते येणार याची स्पर्धाच लागली आहे.भले यात शिवसेना आणि शिंदे गट थेट आमने-सामने येणार असले तरीही शिंदे गटाचा मेळाव्यात गर्दी व्हावी म्हणून भाजप कार्यकर्त्यांची रसद पुरवणार तर शिवसेनेचा मेळावा गाजावा म्हणून राष्ट्रवादीकडून प्रयत्न केले जाणार असल्याची चर्चा आहे…

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.