मोदींची “पीएम श्री योजना” आपच्या एज्युकेशन पॉलिसीला टक्कर देणार..!!!

५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या औचित्यावर राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षकांशी बोलत असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम श्री योजनेची घोषणा केली.

या योजनेअंतर्गत देशभरातील तब्बल १४ हजार ५०० शाळांना ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०’ प्रमाणे अपग्रेड केलं जाणार आहे.

केंद्रीय विद्यालय आणि जवाहर नवोदय विद्यालयाच्या नंतर केंद्र सरकारकडून शाळांसाठी राबवण्यात येणारी ही तिसरी योजना आहे. या योजनेची अंमलबजावणी २०२२ ते २०२७ या पाच वर्षांमध्ये केली जाणार असून, या योजनेअंतर्गत राष्ट्रीय शिक्षण धोरणाला रुजवण्यास सुरुवात केली जाणार आहे.

या योजनेची घोषणा झालीय पण ही योजना नेमकी कशी असणार आहे? याबाबत अनेकांना प्रश्न पडला आहे.  

नवीन शैक्षणिक धोरणानुसार राबवल्या जाणाऱ्या या योजनेचं नाव प्रधान मंत्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया आहे. 

या योजनेअंतर्गत प्रत्येक तालुक्यातील दोन शाळांना अपग्रेड करून त्यांना मॉडेल स्कूल बनवण्यात येणार आहे. युनायटेड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टीमच्या आकडेवारीनुसार संपूर्ण देशात एकूण १० लाख ३२ हजार सरकारी शाळा आहेत. या शाळांमध्ये केंद्र सरकारच्या शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळा, महानगरपालिकेच्या शाळा आणि राज्य सरकार किंवा वेगवेगळ्या संस्थांच्या शासकीय शाळांचा समावेश होतो. 

यातीलच १४५०० शाळांना नवीन धोरणानुसार अपग्रेड केलं जाणार आहे. मात्र अपग्रेड करण्यासाठी निश्चितपणे कोणत्या शाळांची निवड करण्यात येईल, याबाबत अजून काहीच स्पष्ट करण्यात आलेले नाहीय. 

मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावर शाळांना अपग्रेड करण्यासाठी एकूण २७ हजार ३६० करोड रुपये खर्च येणार आहे. 

या शाळांपुर्वी सुद्धा केंद्र सरकारने केंद्रीय विद्यालय आणि जवाहर नवोदय विद्यालय या दोन प्रकारच्या माध्यमिक शाळा सुरु केलेल्या आहेत. या शाळा पूर्णपाणे केंद्र सरकारच्या अनुदानावर चालवल्या जातात. परंतु नवीन योजनेमध्ये थोडे बदल करण्यात आलेले आहेत. नवीन शाळांसाठी ६० टक्के रक्कम केंद्र सरकार कडून देण्यात येणार आहे. तर ४० टक्के रक्कम राज्य सरकारांना द्यावी लागणार आहे. 

हीच पद्धत देशभर लागू केली जाणार असली तरी हिमालयीन प्रदेशातील राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांसाठी विशेष सवलत देण्यात येणार आहे. त्या राज्यांना आणि केंद्रशाहीत प्रदेशांना केवळ १० टक्के रक्कम खर्च करावी लागणार आहे. बाकी ९० टक्के खर्च केंद्र सरकारकडून दिले जाणार आहे. 

पीएम श्री अंतर्गत शाळांना अपग्रेड करतांना त्यात मोठे आणि महत्वपूर्ण बदल करण्यात येणार आहेत. 

निवडल्या जाणाऱ्या शाळांमध्ये ग्रीन स्कूल म्हणून बदलण्यात येणार आहे. त्यात सौर पॅनल आणि एलईडी लाईट, नैसर्गिक शेती आणि पोषण उद्यान, लायब्ररी, स्मार्ट स्कूल्स आणि उत्तम पायाभूत सुविधांची उभारणी केली जाणार आहे. त्यासोबतच जलसंवर्धन, प्लास्टिक मुक्ती आणि पर्यावरण संवर्धन यांची निर्मिती सुद्धा केली जाणार आहे. 

नवीन मॉडेल शाळांमध्ये शैक्षणिक धोरण २०२० च्या पद्धतीने शिक्षण प्रणाली राबवण्यात येणार आहे.

या नवीन धोरणानुसार २ वर्षांची फाऊंडेशनल, तिसरी ते पाचवी पर्यंत प्राथमिक, सहावी ते आठवी पर्यंत मिडल स्कूल तर नववी ते बारावी पर्यंत माध्यमिक शिक्षण दिले जाणार आहे.

यात फाऊंडेशनला काळात कोणत्याही प्रकारचे पुस्तकी शिक्षण दिले जाणार नाही. या दोन वर्षात  केवळ खेळ आणि सामान्य शिक्षण दिले जाणार आहेत. यातून केवळ मुलांच्या प्राथमिक माहितीचा बेस मजबूत केला जाणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील प्राथमिक शिक्षणाच्या ३ वर्षाच्या काळात सामान्य पुस्तकी शिक्षण दिले जाणार आहे. या काळात क्लासरुमध्ये दिले जाणारे शिक्षण थोड्या फार प्रमाणात फॉर्मल प्रकारचे केले जाणार आहे.

तिसऱ्या टप्प्यातील तीन वर्षाच्या काळात वेगवेगळे विषय शिकवले जाणार आहेत. तसेच विषयानुरूप विविध शिक्षक हे विषय शिकवतील. तर शेवटच्या टप्प्यात असलेले ३ वर्षाचे शिक्षण हे मल्टी डीसीप्लिनरी असेल. त्यात वेगवेगळ्या ब्रॅंचेसचे शिक्षण दिले जाईल. मात्र त्या ब्रॅंचेसचे नियम सध्याच्या नियमाप्रमाणे कडक असणार नाहीत. 

उदाहरणार्थ आर्ट मधून शिकणाऱ्या मुलाला सायन्स किंवा कॉमर्सचं सुद्धा शिक्षण घेता येणार आहे. तर बाकी दोन ब्रॅंचेसमधील विद्यार्थ्यांना सुद्धा अशाच प्रकारे दुसऱ्या ब्रांचमधील विषय शिकता येतील. 

पीएम श्री अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या शाळा या इतर शाळांसाठी मार्गदर्शक असतील.

या शाळांमध्ये दिले जाणाऱ्या शिक्षणात जास्त गुणवत्ता असेल तसेच पायाभूत सुविधा सुद्धा उत्तम दर्जाच्या असणार आहेत त्यामुळे या शाळांना इतर शाळांसाठी मॉडेल स्कूल्स म्हणून बघण्यात येईल. या शाळांच्या आधारावर इतर शाळांमध्ये शिक्षणात बदल करण्याचे काम केले जाईल. यातील नवनवीन संकल्पना, शिकवण्याचे कौशल्य, तंत्रज्ञान दुसऱ्या शाळांमध्ये सुद्धा सुरु करण्याचे काम केले जाईल.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.