भारत-पाकिस्तानच्या फाळणीवेळी या अवलियाने तब्ब्ल १५ हजार पुस्तकांची वाटणी केली होती…

आज आपला देश ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय. पण आपण ज्या स्वातंत्र्य दिनाचं आज सेलिब्रेशन करत आहोत ते आपल्याला प्रचंड संघर्ष आणि बलिदानानंतर मिळालं आहे. हे कायम लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

भारताचा स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्टला असतो. तर पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन १४ ऑगस्टला असतो. दोन्ही देशांना स्वातंत्र्य मिळून आज सात दशकं उलटली आहेत. पण १९४७ मध्ये जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशाची लोकसंख्या ही ४० कोटी एवढी होती. ज्यामध्ये त्या भागाचाही समावेश आहे जो आज पाकिस्तान आणि बांगलादेशच्या स्वरुपात दोन वेगवेगळ्या देशांच्या रुपाने अस्तित्वात आहे.

जेव्हा देशातील लोक हे ब्रिटिश सरकारपासून स्वातंत्र्य मिळेल याबाबत आश्वस्त होते त्याचवेळी फाळणीच्या एका ठिणगीने देशात वणव्याचं रुप धारण केलं आणि ज्यामध्ये लाखो लोकांचे जीव गेले. यावेळी कोट्यवधी लोकांना आपलं सारं काही सोडून भारतात यावं लागलं. या फाळणीने कोणालाही सोडलं नाही. अगदी पुस्तकांना ही नाही.

होय अगदी बरोबर वाचलंत.. जेव्हा फाळणी झाली तेव्हा अखंड भारतात असणाऱ्या दिल्लीच्या इंपिरियल लायब्ररीतली पुस्तक सुद्धा भारत आणि पाकिस्तान मध्ये वाटावी लागली होती. 

भारतात फाळणीच लोण पसरलं होत. या ऐतिहासिक घटनेचा उन्माद कव्हर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय वृत्त माध्यम भारतात दाखल झाली होती. आता भौगोलिक विभाजनाबरोबरच, देशाची मालमत्ता देखील भारत आणि पाकिस्तान या दोन स्वतंत्र देशांमध्ये विभागली जाणार होती.

फाळणीची ही निरर्थकता एका छायाचित्राने उत्तमरीत्या टिपली. त्या चित्रात एक त्रासलेला ग्रंथपाल आपल्या ग्रंथालयातील पुस्तके दोन देशांमध्ये वितरित करण्याचा प्रयत्न करतो आहे.

हे मध्यमवयीन ग्रंथपाल इतर कोणी नसून बेल्लारी शमन्ना केसावन होते.

ते दिल्ली येथील इंपिरियल ग्रंथालयचे प्रमुख ग्रंथपाल होते. यात असलेल्या ढीगभर पुस्तकांची विभागणी करण्याची जबाबदारी केसावन यांच्यावर येऊन पडली. आता कोणत्या देशाला कोणती पुस्तक द्यायची याचा सगळा उटारेटा या ग्रंथपालांना करायचा होता. आणि पुस्तक थोडीथोडकी का काय? तब्बल पंधरा हजार पुस्तकांची विभागणी त्यांना करायची होती.

जेव्हा डीडी डंकन या अमेरिकन फोटोग्राफरने हा त्यांचा फोटो काढला तेव्हा अमेरिकन मासिक लाइफच्या ऑगस्ट १९४७ च्या अंकात हा फोटो छापण्यात आला. तेव्हा भारताच्या फाळणीच वास्तव लोकांसमोर आलं. 

फाळणीनंतरही केसावन यांनी भारताचा इतिहास सुरक्षित ठेवण्याचं काम केलं. 

नव्याने स्वतंत्र झालेल्या देशाला नवीन संस्थांची गरज होती. अशीच एक संस्था होती कलकत्ता येथील इम्पीरियल लायब्ररी ऑफ इंडिया. जिची स्थापना १९०३ मध्ये व्हाईसराय, लॉर्ड कर्झन यांनी काही जुन्या कोलकाता लायब्ररींच्या संग्रहांना एकत्र करून केली होती.

जेव्हा कलकत्त्यातल्या इम्पीरियल लायब्ररीचे पूर्वीचे ग्रंथपाल पाकिस्तानात स्थलांतरित झाले, तेव्हा १९४८ च्या सुरुवातीला त्यांच्या जागी बी.एस. केसावन यांची नियुक्ती करण्यात आली. एका मित्राच्या म्हणण्यानुसार, त्यांना सूचना देण्यात आली होती की

“ग्रंथालय अत्यंत अराजक परिस्थिती आहे. फक्त हरक्यूलिसच हे ग्रंथालय स्वच्छ करू शकतो”

पण केसावन यांनी उत्साहाने भूमिका पार पाडली आणि दिल्लीहून कलकत्त्याला आपलं शिफ्टिंग केलं.

पाच वर्षांच्या कालावधीत केसावन यांनी ग्रंथालयाची नव्याने उभारणी केली. १९५३ पर्यंत, त्या लायब्ररीचे नॅशनल लायब्ररी ऑफ इंडिया असे नामकरण करण्यात आले होते. भारतासाठी कॉपीराइट लायब्ररी म्हणून घोषित करण्यात आली होती. तिथं प्रत्येक भारतीय प्रकाशनाची एक प्रत मिळाली होती.

एका भव्य इमारतीत त्या लायब्ररीचे पुनर्वसन करण्यात आले होते. एकेकाळी लेफ्टनंट-गव्हर्नर्सचे निवासस्थान होते तिथंच. केसावन यांनी खरं तर भारत आणि पाकिस्तान दरम्यान होणाऱ्या संग्रहांचे विभाजन रोखण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांच्यावर जी जबाबदारी पडली त्यांनी ती पार पाडली.

पुढे कलकत्याच्या ग्रंथालयाची पुनर्रचना करण्यात आली आणि प्रत्येक प्रमुख भारतीय भाषेसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात आला. केसावन यांनी राष्ट्रीय ग्रंथालयात एक प्रकाशन कार्यक्रमही सुरू केला आणि स्वतः संस्थेचा इतिहास लिहिला.

त्यांच्या कार्याची दखल म्हणून, केसावन यांना १९६० मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.