१८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाचं श्रेय नेमकं कोणाचं हे आता मोदींनीच सांगावं..

काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरणासंदर्भातील सर्वात मोठा निर्णय जाहीर केला. यात १ मेपासून १८ वर्षांच्या वरील सर्वांच्या लसीकरणासाठी सुरुवात होणार आहे. तशी परवानगी सरकारनं देऊ केली आहे. सगळ्या देशातून या निर्णयाचं स्वागत झालं. अगदी सर्व विरोधी पक्षांनी पण या निर्णयाचं स्वागत केलं.

पण या नंतर सुरुवात झाली ती या निर्णयाच्या श्रेयवादाला. म्हणजे राष्ट्रीय पातळीवर राहुल गांधींपासून पासून महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय पक्षानं आणि राजकीय नेत्यांनी नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय आपल्याच विनंतीवरून आणि मागणीवरून घेतला असल्याचं सांगितलं आहे.

नक्की कोणी काय दावा केला आहे?

काँग्रेस म्हणते अहंकार बाजूला ठेऊन राहुल गांधींचा सल्ला ऐकल्या बद्दल आभार – 

काँग्रेसनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडेलवर म्हटले आहे की १८ वर्षांपुढील सर्वांचं लसीकरण करावं अशी सूचना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिली होती. तसचं लस उत्पादकांचा आर्थिक भार कमी होण्याच्या दृष्टिकोनातून विचार करावा असा सल्ला देखील त्यांनी दिला होता. हे दोन सल्ले मोदी सरकारनं आपला अहंकार बाजूला ठेवून मान्य केले त्याबद्दल त्यांचे आभार.

शिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांना या निर्णयाचं श्रेय देण्यात आलं आहे.

उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री कार्यालय म्हणते, 

आज केंद्र शासनाने १८ वर्षे वयापुढील सर्वांना लस देण्याचा निर्णय जाहीर करून आपल्या मागणीचा विचार केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पंतप्रधान आणि आरोग्यमंत्री यांचे आभार मानले आहेत. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी देशातील २५ वर्षांपुढील सर्वांना लस देण्याची गरज असून तसा निर्णय घेण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली होती.

 

शिवसेनेचे नेते आणि मंत्री सुभाष देसाई यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मागणी केंद्राकडून मान्य, असं म्हणत या निर्णयाचं श्रेय उद्धव ठाकरे यांना दिल आहे.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील उद्धव ठाकरेंची मागणी मान्य केल्याबद्दल आनंद व्यक्त करत हे श्रेय मुख्यमंत्र्यांना दिल आहे.

तर राष्ट्रवादीकडून हे संपूर्ण श्रेय सुप्रिया सुळेंच असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

१८ वर्षांवरील सर्वांनाच लस मिळायला हवी ही मागणी खा. सुप्रिया सुळे यांनी संसदेत लावून धरली होती. या मागणीला मान्यता दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचे आभार. 

महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी देखील या निर्णयाचं श्रेय सुप्रिया सुळे यांना दिलं आहे.

ते म्हणतात, १ मे पासून लसीकरण मोहीम व्यापक करत १८ वर्षांवरील प्रत्येकाला कोरोना लस देण्याचा निर्णय केंद्राने घेतला. संसदेत खा. सुप्रियाताई सुळे यांनी ही मागणी लावून धरली होती. त्यामुळे हा निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे.

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणतात माझ्या मागणीची दखल घेतली आहे. 

ते म्हणतात,

देशभरात १ मेपासून १८ वर्षांवरील नागरीकांच लसीकरण करण्याचा महत्वपूर्ण निर्णय केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयाचे राज्य शासनाच्या वतीने मन:पूर्वक स्वागत करतो. मी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांसमवेत झालेल्या विविध बैठकांमध्ये सातत्याने मागणी करत होतो त्याची दखल घेऊन हा निर्णय घेतल्याबद्दल आभार व्यक्त करतो

तर महाराष्ट्र काँग्रेसकडून या निर्णयाचं श्रेय राहुल गांधी यांना दिलं आहे.

काँग्रेस नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात आणि मंत्री अशोक चव्हाण म्हणाले, काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी केलेल्या मागणीची पंतप्रधानांची दखल घेत सर्वाना लस देण्याच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करत आहे.

या सगळ्यांनी केलेल्या दाव्यानुसार १८ वर्षावरील नागरिकांचं लसीकरण करण्याच्या निर्णयाचं श्रेय नक्की कोणाचं हे एक कोडंच आहे. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच सांगावं कि त्यांनी नक्की कोणाचं ऐकून हा निर्णय घेतला आहे. म्हणजे हे कोडं सुटण्यास मदत होईल.

हे हि वाच भिडू. 

 

Leave A Reply

Your email address will not be published.