RHTDM : तो पाहताना आजही स्टॉलच्या लोखंडी खुर्चीवर बसल्याचा फिल येतो.

नव्वदच्या दशकातला हिंदी सिनेमा हा सिनेमॅटिकली चांगला की वाईट, हा तसा मोठ्या चर्चेचा मुद्दा. कारण, २००० सालानंतर चित्रपटात संहितेच्या आणि विषयाच्या बाबतीत झालेला अमूलाग्र बदल गृहीत धरता, नव्वदच्या दशकाला तुलनेने नेहमीच थोडे कमी लेखले जाते.

पण, बरेच लोक नाईन्टीजच्या अनेक चित्रपटाने आजही नॉस्टॅलजीक होतात.

अर्थात, हेही मानायला हवे की नव्वदचे दशक संपल्यानंतर हिंदी सिनेमाने एका वेगळ्या अर्थाने कात टाकली. आशयपूर्ण विषय, वेगळे प्रयोग आणि तरुणाईला अपील होतील असे प्रयोग येऊ घातले होते. हे होईपर्यंत, तोवर खान मंडळी चांगलेच बस्तान मांडून बसली होती. दशक संपत आलं होतं तरी ‘कुछ कुछ होता हैं’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘सरफरोश’ अश्या सुपरहिट चित्रपटांद्वारे खान त्रयीने आपण अजूनही स्पर्धेत असल्याचे सिद्ध केले होते.

सन २००० चा जानेवारी उजाडला तोच मुळात एका नव्या प्रॉमिसिंग सिताऱ्यासहीत.

अजूनही आठवतंय, शाहरुखचा ‘फिर भी दिल हैं हिंदुस्थानी’ आणि ‘कहो ना प्यार हैं’ एका आठवड्याच्या फरकाने प्रदर्शित झाले होते. कहो ना प्यार हैं ने, दुसऱ्या आठवड्यात प्रदर्शित होऊनही ‘फिर भी दिल हैं हिंदुस्थानी’ चं मार्केट खाल्लेलं. नाही म्हटलं तरी हृतिकमुळे बदलाचे वारे वाहत होते आणि याचा फटका ‘फिर भी दिल हैं हिंदुस्थानी’ला बसला होता. अर्थात, तिन्ही खान मंडळी याला तग धरून सर्वाईव्ह करून हिट सिनेमे देत राहिली, हा पुढचा भाग.

त्याच दरम्यान, पुसटसं आठवतंय, टिव्हीवर एका कुठल्याश्या म्युझिक चॅनलवर ट्रेलरमध्ये एक गाणं लागलेलं आणि ते पाहून घरातले आम्ही सगळे आश्चर्यचकित होऊन म्हणत होतो,

‘अरे हा तर सिरीयलमध्ये असतो ना? काय नाव बरं याचं? माधवन बहुतेक’,

वगैरे चर्चा झाल्या होत्या. छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यावर जाऊन सुपरहिट होण्याचा काळ नव्हता तो, म्हणून तेव्हा माधवनला, त्या ट्रेलरला आणि त्या सिनेमाला अजिबात सिरीयसली घेतलं नव्हतं.

मध्ये काही दिवस सरले. मी हे सगळं पाहून विसरूनही गेलो होतो.

माधवनने सिरियल्समधून तामिळ/हिंदी सिनेमात येण्याच्या काळात मीही अशाच ट्रान्झिशन फेजमधून बारावी संपवून (लिटरली) इंजिनियरिंगला कोल्हापूरला ऍडमिशन घेतलं होतं. योगायोग असा की त्याच कोल्हापुरात माधवननेही इंजिनियरिंग केलं होतं. कोल्हापुरात हॉस्टेलला जम बसवत तीन चार महिने गेले, तोवर रिदम (हो, RTHDM ला रिदम म्हणायची प्रथा होती तेव्हा, जी काही मंडळी आजवर पाळून आहेत) थिएटरात लागणार होता आणि फर्स्ट डेला एका मित्राने ‘खूप भारी सिनेमा आहे, चल’ म्हणत जवळपास जबरदस्तीनेच नेले. सिरीयल वगैरे मध्ये काम करणाऱ्या हिरोचा सिनेमा पाहण्यात मला काडीचाही इंटरेस्ट नव्हता.

पण माधवनने मागच्या फक्त दीडेक वर्षात तामिळ सिनेमात धुमाकूळ घालून ठेवला होता, याची मला त्यावेळी पुसटशी कल्पनादेखील नव्हती. माझ्या मित्राने ओरिजिनल तामिळ व्हर्जन, ‘मिन्नले’ पाहिला असल्याने त्याला खात्री होती. इतकी जास्त की त्याने पिक्चर संपल्यावर गाण्यांची कैसेट कुठून घ्यायची हेही हेरून ठेवलं होतं. मी त्याला तेव्हाही वेड्यात काढत होतो, हे वेगळं सांगायला नको.

पिक्चर अप्सराला लागला होता.

कोल्हापुरात आल्या आल्या बाकी काही नाही पण महालक्ष्मी आणि रंकाळा नंतर जर कुठल्या जागा माहीत झाल्या (आवर्जून करून घेतल्या) तर त्या थिएटरच्या आसपासच्या एरियातल्या. कोल्हापुरात आल्या आल्या ‘उषा’मध्ये ‘अजनबी’ पाहून खातं उघडलं होतंच, आता अप्सराची बारी होती. व्हीनस कॉर्नरच्या जवळ असलेल्या कॅसेट स्टॉलच्या रॅकमध्ये दिमाखात बसलेल्या कॅसेटकडे नजर टाकत, कदाचित ‘मैं वापस आऊंगा’ म्हणत, आम्ही तिकीट खिडकीला गेलो, (माझ्या) अनपेक्षितपणे हाऊसफुल्लचा बोर्ड झळकत होता. मी आनंदात त्याला, ‘ठीक आहे, दुसरा कुठलातरी पाहू’ म्हणत निघायला लागलो.

पण प्रत्येक सिनेमाप्रेमींचा एक अलिखित नियम असतो, एकदा एखादा सिनेमा पहायचा ठरवून बाहेर पडलो तर तो कुठल्याही परिस्थितीत पहायचाच आणि अभिमानाने सांगतो की मी आजवर हा नियम मोडलेला नाहीये.

मग आम्ही २०-२५ च्या स्टॉलच्या तिकिटाला १०० रुपये मोजून धक्काबुक्की करत आत पोचलेलो. पण त्यानंतर ज्या वेडाने आम्हाला पछाडले त्याला आजपर्यंत उतारा मिळाला नाही. चित्रपटात मॅडीच्या इन्ट्रोच्या सीनमध्ये एका प्रोफेसरच्या तोंडी एक डायलॉग आहे.

“मेकॅनिकल इंजिनिअर स्टुडंट में एक फायर होना चाहीये”

माझ्या मित्राने आम्ही हॉस्टेलला परतल्यानंतर त्याच्या स्टडी डेस्कवर ‘फायर इज रिक्वायर्ड इन लाईफ’ हे कोरून ठेवलं होतं.

इतकंच नाही, त्याने किमान शंभरेक रिटेकनंतर मॅडी पेटवतो तशी माचीसही पेटवून टाळ्या कमावल्या होत्या (त्याच्या ओठांत सिगरेट होती की नाही, हा सेन्सर्ड विषय). पण, तिथपासून रोज किस पडेपर्यंत नॉन स्टॉप कॅसेट ऐकायचा रतीब सुरू झाला होता तो बरेच दिवस चालू होता.

सिनेमा अर्थातच प्रचंड आवडला. लव्हस्टोरी, परफेक्ट रॉमकॉम, इमोशनल कंटेंट, लव ट्रँगल, जीवाला जीव देणारे मित्र, अनुपम खेरचा मॉडर्न बाप हे सगळं कसं जमून आलं होतं. मॅडीने तर अक्षरशः वेड लावलं होतं. बऱ्याच लोकांना तो शाहरुखला कॉपी करतोय असं वाटलं, काहींनी तर त्याला ओव्हरऍक्टिंग करत असल्याची टीकाही केली. पण, ‘मॅडी’ एक ब्रँड होता आणि त्याच्या चाहत्यांसाठी तो सदैव राहील. रिदम इंजिनियरिंग केलेल्या प्रत्येकाच्या अगदी जवळचा चित्रपट असण्याचं कारण म्हणजे, मॅडीचं बेफिकीर, कॉलेजात धमाल मस्ती आणि किडे करणारं, टॉपर लोकांना उंगली करणारं, कॉलेज बंक करणारं आणि एकंदरीत कशीबशी डिग्री पूर्ण करणारं पात्र. त्याच्या तोंडी एक संवाद आहे..

‘मुझे अच्छी तरह पता है, मैने अपनी इंजिनियरिंग कैसे कम्प्लिट की है’

ही खरे तर प्रत्येक इंजिनियरची स्वतःची कहानी आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यामुळे ही पात्रं, या घटना जास्त जवळच्या वाटतात, रिलेट करतात.

त्याशिवाय, मुलीचा पाठलाग करणारा, तिच्यासाठी स्वतःचा धरम भ्रष्ट करणारा, मनापासून प्रेम करणारा, तिला इम्प्रेस करण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या करणारा इमोशनल, रोमँटिक आणि बेस्ट सेन्स ऑफ ह्युमर असणारा मॅडी अजूनही स्त्रीवर्गात तितकाच फेमस आहे. हृतिकइतकाच बऱ्याच जणींचा मिलेनियम क्रश आहे. जसं ‘एक लडकी देखी, बिजली की तरह..’ म्हणत पहिल्या नजरेत प्रेमात पडणारा मॅडी त्या काळातल्या मुलांना स्वतःचा रोल मॉडेल वाटला, तसेच ‘माय काइंड अ गर्ल’ शोधणारा मॅडी बऱ्याच जणींसाठी परफेक्ट ‘माय काइंड अ बॉय’ होता.

दिया मिर्झानेही आपसूक बऱ्याच पुरुषवर्गांच्या क्रशच्या यादीत आपलं नाव नोंदवून घेतलं होतं, अर्थात तिच्या डायलॉग डिलिव्हरी आणि एक्सप्रेशन्सकडे थोडंसं दुर्लक्ष करावं लागलं, इतकंच.

खरं प्रेम ते आणखी काय असतं? तुम्ही अभिनयशून्य असूनही लोक तुमचा वॉलपेपर कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर ठेवत असतील, तर त्याला निरपेक्ष प्रेम म्हणावेच लागेल. हो, कॉम्प्युटर स्क्रीनच, कारण त्यावेळी ‘हर हात मोबाईल’ ही संकल्पना अजून फोफावली नव्हती. सुखी दिवस होते ते आमचे.

Screen Shot 2018 10 21 at 3.05.45 PM
twitter dia mirza

सैफ अली खानचे पात्रही जमून आले होते. खरे तर २००१ हे वर्ष त्याचे पुनर्जन्म म्हणून नोंदले जाईल. याच वर्षी आलेल्या ‘दिल चाहता हैं’ ने त्याच्या करियरची बुडती नाव केवळ वाचवलीच नाहीतर अगदी पार लावली. दिल चाहता हैं च्या विनोदी भूमिकेनंतर RHTDM मध्ये मॅडीला तेवढ्याच तत्परतेने टशन देताना तो दिसला.

आपल्या प्रत्येकाचा एक ग्रुप असतो, जो एकमेकांची खेचतोही आणि गरज पडल्यावर एकमेकांना मदतही करतो, शिवाय एका हाकेवर समोरच्याची कॉलर पकडायलाही तयार होतो.

पण सर्वात महत्वाचे म्हणजे मित्राच्या एकतर्फी प्रेमात निःसंकोचपणे सल्ले देतो आणि ते पार पाडण्यासाठी सोबत उभाही राहतो. मित्राला त्याचे प्रेम (मग ते लॉजिकल आणि नैतिक असो किंवा नसो) मिळविण्यासाठी धडपड करणाऱ्या ‘दिपक तिजोरी मित्रमंडळाचा’ अध्यक्ष म्हणून व्रजेश हिरजी कमाल करतो. त्याचे माधवनसोबतचे सीन कमालीचे विनोदी आणि फ्लॉलेस आहेत. त्यात तो अगदी माधवनपेक्षाही सरस वाटतो. ‘राहू बन के बैठा हैं कुंडली पें मेरे वगैरे संवाद तर अजूनही लक्षात आहेत.

हॅरिस जयराजच्या संगीताने तर चित्रपटाला चार चाँद लावलेत, सोबत समीरच्या शब्दांची साथ होतीच. सर्व गाण्यांनी पछाडून टाकलेलं. पूर्ण संगीतासहीत गाणी म्हणण्याची जी एक असामान्य कला आपल्याला अवगत असते, ती फारच कमी अल्बम्सच्या नशिबात येते, RHTDM हा त्यापैकी एक होता. यात अगदी कोणत्या प्रसंगाला बॅकग्राउंडमध्ये कोणती धून वाजणार या जागादेखील पाठ झालेल्या.

टायटल ट्रॅक असो की ‘मुंबईया’, प्रत्येक गाण्याची आपली एक मजा होती. बॉम्बे जयश्रीच्या आवाजातील मादक दिया मिर्झावर चित्रित झालेलं ‘जरा जरा’ आणि सैफचं ‘दिल को तुमसे प्यार हुवा’ ही गाणी देखील स्लो पोईजन होती, हळू हळू नशा आणणारी. केके ने जीव तोडून गायलेलं ‘सच कह रहा हैं दिवाना’ तर त्या वेळी प्रेमात झुरणाऱ्या आणि ब्रेकअप झालेल्या लोकांचे ‘नॅशनल हार्टब्रेक अँथम’ म्हणून घोषित करायचंच फक्त बाकी राहिलं होतं. यावेळी एक वेगळा प्रयोगही करण्यात आलेला. हॅरीस जयराजच्या ‘मुझे कहना कहना’ या टायटल ट्रॅकसोबत इतर चार संगीतकारांकडून चार वेगवेगळे टायटल ट्रॅक बनवून घेतलेले, जे फक्त कॅसेटमध्ये होते, चित्रपटात मूळ हॅरीस जयराजचं गाणंच वापरण्यात आलं.

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कलेक्शनच्या हिशोबाने फ्लॉप ठरवला गेला असला तरी, शिवाय बऱ्याच समीक्षकांनी दुर्लक्षित केला असला तरी, तरुणाईत त्याची आजची तितकीच नॉस्टॅलजीक व्हॅल्यू आणि क्रेझ कायम आहे. टीव्ही आणि इतर ठिकाणी रिपीटेडली पाहून आता तो एक पॉप्युलर एंटरटेनर, २००० नंतरच्या अनेक चित्रपटांपैकी एक उत्तम रोमँटिक कॉमेडी आणि कल्ट फिल्म म्हणून गणला जातो. अजूनही टीव्हीवर लागला असेल तर चॅनल न बदलता आपण काही वेळ तिथेच गोठून जातो.

चित्रपट म्हणजे तरी दुसरं काय? आपण ज्या घटना, जी पात्रं स्वतःशी रिलेट करतो, ज्यांना प्रत्यक्षात भूतकाळात जाऊन भेटू शकत नाही अश्यांना छोट्या किंवा मोठ्या पडद्याच्या माध्यमांतून पुन्हा भेटणं आणि नॉस्टॅलजीक होणं. तो आनंद रिदमने आम्हाला दिलाय, देत राहील.

बऱ्याच जणांना आता हा चित्रपट, साधारण दर्जाचा, हास्यास्पद किंवा अतार्किक वाटू शकेल, पण हेही तितकेच खरे की आपण तो सतरा वर्षांपूर्वी एन्जॉय केला. आत्ता कुठे तो वयात येत आहे, अठराव्या वर्षात पदार्पण करतोय, पहील्यापेक्षा अजून मुरत जाईल.

काळाप्रमाणे जुना होत गेला तरी मी त्यात तथ्य शोधत बसत नाही. आजही तो सिनेमा टिव्हीवर किंवा इतर कुठेही पाहण्याचा योग आला तर मी, लॉजिक्सच्या फंद्यात पडत नाही किंवा मी खूपच प्रगल्भ सिनेमाप्रेमी असल्याचे स्वतःच्या कोंशन्सला सांगत नाही, कारण तो पाहताना मी आजही अप्सराच्या स्टॉलच्या लोखंडी खुर्चीवर बसल्याचा फिल येतो, जो जास्त महत्वाचा आहे. अश्या वेळी लॉजिकल विचार न करता आपल्या नॉस्टॅलजीक भावनांचे पारडे थोडे जड होऊ द्यावे. कारण, भावनांचे मूल्यांकन होत नसते, रादर करूच नये.

  • राज जाधव.

हे ही वाचा – 

2 Comments
  1. Raj says

    Waah , gelo mi paar 15-20 varsh maage , mechanical engineer me ek fire hona chahiye , mujhe acchi tarah pata Hain Maine apni eng kaise complete ki h , Delhi wali photo wali Rina Malhotra , Rajiv from America ????????????, are aathavla ek ek
    Thanks a lot ????

  2. Gaurav says

    फुल्ल to nostolgic झालो यार…. सगळ्यात महत्वाच त्याच बॅकग्राऊंड music जे पुर्ण सिनेमाभर आहे ते वेड लावतं… अजुनही RHTDM चि PLAYLIST TOP ला असते…
    by the way मधेच कंसात लिहताना ते RTHDM झालंय… बाकी तुमचा लिहण्याचा रिदम कुठे तुटला नाही…

Leave A Reply

Your email address will not be published.