अजित पवारांना छळणाऱ्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची सुरवात १८५७ च्या उठावामुळे झाली होती…

कधी ईडी, कधी सीबीआय तर कधी एनसीबी. सध्या ही नवे प्रचंड चर्चेत आहेत. रोज कोणी ना कोणी कारवाई करत असतं. कधी राजकारणी तर कधी फिल्मस्टार अडकत असतात. देशातील शक्तिशाली समजले जाणारे सेलिब्रिटी नेते यांना घाम फोडणाऱ्या डिपार्टमेंट मध्ये आणखी एक नाव गाजत असते.

इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. सध्या अजित पवारांच्या नातेवाईकांवर धाडी टाकून त्यांना अडचणीत आणणारे आयटी डिपार्टमेंट प्रचंड चर्चेत आहे.

इन्कम टॅक्स हे नाव ऐकलं की फक्त राजकारणी सेलिब्रिटीच नाही तर सर्व सामान्य माणसाला सुद्धा धडकी भरते. काळा पैसे वाल्यांच्या घरावर मारली जाणारी धाड असो की मिडलक्लास माणसाला ३१ मार्चच्या आत आयटी रिटर्न भरण्याचं टेन्शन, इन्कम टॅक्स वाल्यांचा दरारा सगळीकडे सारखाच आहे.

पण तुम्हाला हा प्रश्न कधी पडलाय का हे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट सुरु कधी झालं आणि कस झालं?

तर गोष्ट आहे १८५७ सालची. काळ होता भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य युद्धाचा.

तेव्हा भारतात ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता होती. त्यांच्या लॉर्ड डलहौसी या गव्हर्नर जनरलने आक्रमकपणे साम्राज्यविस्ताराचे धोरण स्वीकारले. दत्तक विधान, अव्यवस्थित कारभार अशा कारणांचा वापर करून त्याने देशातील अनेक संस्थाने खालसा केली. त्यामुळे सर्वत्र असंतोष निर्माण झाला होता.

अशातच भारतीय लष्करात सरकारविरुद्ध बंड पेटलं. कारण होते बंदुकीची काडतुसे. हिंदूंना पवित्र असलेल्या गायीची किंवा मुसलमानांना निषिद्ध असलेल्या डुकराची चरबी काडतुसांना लावलेली असल्यामुळे हिंदू व मुसलमान यांच्या भावना दुखावल्या गेल्या. याचा निषेध करणाऱ्या मंगल पांडेसारख्या सैनिकाला फाशी देण्यात आली.

तिथूनच स्वातंत्र्यसमर सुरु झाला.या काळात बराकपूर, लखनौ, मीरत, दिल्ली, लाहोर, फिरोझपूर, अलीगढ, पेशावर, मथुरा, झाशी, आग्रा, बेरली, कानपूर, अलाहाबाद इ. ठिकाणी लहान-मोठ्या प्रमाणात गडबडी झाल्या. या उठावाचे महाराष्ट्रातही पडसाद उठले. या लढाईत झाशीची राणी लक्ष्मीबाई मरण पावली. तात्या टोपे याना इंग्रजांनी फाशी दिले. नानासाहेब पेशवे परागंदा झाले.

हा उठाव यशस्वी होऊ शकला नाही पण या स्वातंत्र्यलढ्याने भारतीय इतिहासाला कलाटणी मिळाली.

या उठावामुळे इंग्लडच्या राणीने हिंदुस्थानचा राज्यकारभार ईस्ट इंडिया कंपनीकडून इंग्लंडच्या संसदेकडे सोपविण्यात आला. इंग्लंडचा राजा हिंदुस्थानचा बादशहा झाला. कंपनीचे ‘बोर्ड ऑफ कंट्रोल’ रद्द करून ‘इंडिया कौन्सिल’ नेमण्यात आले. सैन्याची पुनर्रचना करण्यात आली. संस्थानिक व सरकार ह्यांच्यातील संबंध सुधारण्याचे प्रयत्न झाले. उठाव शमल्यानंतर कॅनिंगने शांतता प्रस्थापित केली. 

गव्हर्नर जनरल कॅनिंग हा पहिला व्हाइसरॉय झाला. तर जेम्स विल्सन भारताचा पहिला अर्थमंत्री बनला.

जेम्स विल्सनला खुद्द व्हिक्टोरिया राणीने भारतात पाठवलं होतं. तो एक बिझनेसमन होता. त्यांची परंपरागत हॅट बनवण्याची कंपनी होती. जेम्स विल्सनचा हा बिझनेसचा एक्सपीरियन्स त्याला राजकारणात उपयोगी पडला. व्यापारी डोक्यामुळे त्याला फायनांशियल नॉलेज होतं. इंग्लडचा फायनान्स सेक्रेटरी, पेमास्टर जनरल अशी अनेक मोठमोठी पदे त्याने भूषवली.

भारतात इंग्लंडच्या राणीचा अंमल सुरु झाल्यावर इथली टॅक्स सिस्टीम दुरुस्त करण्यासाठी विल्सनला भारतात पाठवण्यात आलं. १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामात ब्रिटिशांनी विजय मिळवला पण यात त्यांचं प्रचंड नुकसान झालं होतं. सरकारी खजिना अगदी रिकामा झाला होता. तो सरकारी खजिना पुन्हा भरण्याचं काम विल्सनला देण्यात आलं होतं.

विल्सन जवळपास वर्षभर कोलकत्यात होता. त्याने भारताचा पहिला अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पावेळी फेब्रुवारी १८६० मध्ये त्याने इन्कम टॅक्स डिपार्टमेंट स्थापन करण्याची घोषणा केली. गव्हर्नर जनरलने त्याला हिरवा झेंडा दाखवला. 

२४ जुलै १८६० रोजी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट अस्तित्वात आलं.

विल्सन यांनी बनवलेल्या इन्कम टॅक्स ऍक्ट २१ भागात तयार झाला होता. त्यात २५९ सेक्शन होते. शिवाय ४ शेड्युल बनवण्यात आले होते. पहिला होता जमिनीतून गोळा होणारे उत्पन्न, दुसरा प्रोफेशनल आणि व्यापारमधून येणारे उत्पन्न, तिसरा सिक्युरिटी आणि डिव्हीडंट मधून होणारे उतप्पान आणि शेवटचे चौथे म्हणजे सॅलरी, पेन्शन, शेतीतून येणारे उत्प्प्न. हे सर्व उत्पन्न टॅक्समध्ये धरले जाणार होते.

या घटनेला जवळपास १५० वर्षे झाली. अनेक बदल झाले पण आजही हे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तसेच कार्यक्षमतेने कार्यरत आहे. त्याचा धाक आजही कायम आहे.

इन्कम टॅक्सची संकल्पना मांडणारा विल्सन मात्र फार काळ जगला नाही. अवघ्या एका वर्षातलं उष्ण हवामान सहन न झाल्यामुळे तो आजारी पडला. सरकारने त्याला परत इंग्लंडला पाठवण्याची तयारी केली होती पण विल्सनने त्यास नकार दिला. याच भारतातल्या उष्माघातामुळे विल्सनची प्रकृती हलाखीची बनली. आणि त्यातच तो मृत्यू पावला.

हे हि वाच भिडू 

   

 

Leave A Reply

Your email address will not be published.