अमृतांजनच्या जाहिरातीमुळे नाव मिळालेला म्हातारा काल गेला..!

जगातल्या सर्वात रोमँटिक रस्त्यामध्ये मुंबई पुणे या प्रवासाचा समावेश होतो हे नक्की. यातही सगळ्यात विशेष आकर्षण म्हणजे खंडाळ्याचा बोर घाट.

पश्चिम महाराष्ट्राचे प्रवेशद्वार. पावसाळ्यात तर इथले दृश्य अविस्मरणीय असे असते. चहो बाजूनी धबधबे वाहत असतात. विविध बोगदे पूल यांना ओलांडून कोकणाचे सौंदर्य आणि सह्याद्रीचा राकटपणा यातून वाट काढत मुंबई-पुणे हा महामार्ग जातो.

“हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट सांग गो चेडवा दिसता कसो खंडाळ्याचो घाट”

या प्रवासात लागायचा तो अमृतांजन पूल.

सुमारे १८९ वर्षापूर्वी ब्रिटिशांनी बांधलेला हा पूल. मुंबईला दख्खन भारताशी जोडायचं असं ठाण इंग्रजांनी मांडल होतं. स्थानिक कातकरी धनगर तरुणांना हाताशी धरून हा प्रचंड पर्वत फोडायचा प्रयत्न त्यांनी सुरु केला. या बांधकामाच्या वेळी हजारो कामगारांवर ब्रिटीश अधिकाऱ्यांनी अत्याचार केले. उन्ह पावसाची पर्वा न करता मुंबई पुण्याला जोडणारा हा घाट बनवला जात होता.

रस्ता, लोहमार्ग, बोगदे, पूल बांधले जात होते. या सगळ्यात महत्वाचा हा पूल होता. या पुलाची जबाबदारी कॅप्टन ह्युजेस यांच्यावर होती. 

सर जॉन माल्कम हा तेव्हा मुंबईचा गव्हर्नर होता. त्याच्या मार्गदर्शनाखाली हे काम एका वर्षात पूर्ण झालं. १० नोव्हेंबर १८३० साली या पूलाच उद्घाटन करण्यात आलं. तेव्हा पासून कोकणाला दक्खन बरोबर जोडण्याचं काम हा पूल करतोय.

त्यानंतर हजारो उन्हाळे पावसाळे येऊन गेले. जग पटापट बदलत गेलं. हा प्राचीन पूल एखाद्या तपश्चर्या करणाऱ्या साधूप्रमाणे घट्ट उभा राहिला.  देश स्वतंत्र झाला. मुंबई पुणे महामार्ग बनला. एकेकाळी जिथून बैलगाड्या जात होत्या मग तिथे मोठमोठ्या कार ट्रक जाऊ लागले. या सगळ्यांना अंगाखांद्यावर खेळवत पूल तसाच स्थितप्रज्ञ राहिला.

d5c11e821d77d5b8f7957d3cbf27f3c1

या पूलाच नाव अमृतांजन पूल कसे पडले याचीही एक गमतीशीर कथा आहे.

नव्या जमान्यात जाहिरातीचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे पुलावर जाहिरात चिकटवणे. तर या महाप्रचंड पुलावर कधीतरी कोणी अमृतांजन बामची जाहिरात रंगवली. ती पुढे अनेक वर्ष तशीच राहिली.

ती जाहिरात आयकोनिक अशी होती. बसने येताना जाताना लहानमुळे खिडकीतून या जाहिरातीकडे अपूर्वाईने बघायची. मुंबईपुणे हायवेवर प्रवास करणाऱ्या वाटसरूंनी त्या पुलाचं नावच अमृतांजन पूल असं पाडलं.

पुढे अनेक वर्षांनी शासनाने देशातला पहिला एक्सप्रेस वे बनवायचं ठरवलं. परत रौद्ररुपी खंडाळा घाटाच आव्हान समोर होतंच. त्यातून अनेक मार्ग काढत हा द्रुतगती मार्ग उभारला.

आता हा म्हातारा झालेला अमृतांजन पूल तिथे कामाचा नव्हता. त्याच्याशेजारी उंच उंच पिलर्स वर उभा राहिलेला नवा पूल आला. नव्या नव्या मॉडेल्सवाल्या कुल गाड्या वेगाने या पुलावरून येजा करू लागल्या. अमृतांजन पुलाला रिटायर करण्यात आलं.

अमृतांजन पुलाचा नवा वापर सुरु झाला. खंडाळा घाट बघायला येणाऱ्या पर्यटकांनी याचा वापर फोटो काढायचं ठिकाण म्हणून केला जाऊ लागला. एकीकडे प्रचंड दरी, एकी कडे खडा पर्वत आणि त्याच्या खाली वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या गाड्या, ड्युक्स नोज, नागफणीचा सूळका, बोगद्यांतून बाहेर पडणारी रेल्वे गाडी यामुळे आजही अनेक जण सेल्फी पोईंट म्हणून या पुलाला पाहतात.

पण हा अमृतांजन पूल वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरला होता.

झालं काय होत की खंडाळा घाटात तिशय चिंचोळी जागा असल्यामुळे एक्स्प्रेसवे आणि जुना महामार्ग एकत्र येतात. इथे नवा पूल उभारला पण जुना ऐतिहासिक पूल पाडण्याच धाडस केलं गेलं नव्हत. अमृतांजन पुलाचे पिलर्स ब्रिटीश कालीन बांधकामाप्रमाणे मोठे मोठे आहेत.

शिवाय तिथे तीव्र चढण आहे. यामुळे तिथे सहापदरी एक्सप्रेस वे अचानक चिंचोळा होतो. गाड्या वळवताना अंदाज न आल्यामुळे हा हमखास अपघाताचा पॉइंट बनला. वाहतूक कोंडी तर नेहमीचा विषय झाला.

अखेर सरकारला कारवाई करण्याशिवाय पर्याय नव्हता. दोनतीन वर्षापूर्वी हा पूल पाडण्याच्या चर्चा सुरु झाल्या. पण लगेच तेव्हा बऱ्याच जणांनी त्याचा विरोध केला. हा पूल एक ऐतिहासिक वारसा तर आहेच पण या पुलाशी अनेकांच्या चांगल्या वाईट आठवणी जोडल्या गेल्या होत्या. कोणी पर्यायी मार्गाबद्दल सुचवलं, तर कोणी म्हणाले  की हा पूल पाडून तरी प्रश्न सुटेल का?

शेवटी अनेक वचर्चा वादविवाद यांनतर राज्यशासनाने काळजावर दगड ठेवून हा पूल पाडायचं ठरवलं. व त्याप्रमाणे पुल पाडण्यात आला. अखेर अमृतांजन पुल इतिहासजमा झाला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.