ब्रिटिश व्हाइसरॉयला प्रश्न पडला की कुंभमेळ्यावर बंदी घालूनही लाखो साधू कुठून हजर झाले?

उत्तराखंडमधील हरिद्वार येथे सध्या कुंभमेळा सुरु आहे. अनेक आखाड्यांतील साधू- संत या शाही स्नानासाठी गंगा नदीच्या किनाऱ्यावर जमा झालेत. एका ठराविक काळानंतर पवित्र नद्यांच्या  तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी हा हिंदू भाविकांचा मेळा आयोजित केला जातो, ज्यात देशभरातील लाखो  भाविकांबरोबर विदेशातील नागरिक देखील सहभागी होतात.

प्रयागराज, उज्जेन, नाशिक आणि हरिद्वार या चार वेगवेगळ्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी दर तीन वर्षातून एकदा अश्या पद्धतीने बारा वर्षात पूर्ण कुंभमेळे भरतात. तर दर ६ वर्षांनी हरिद्वार आणि प्रयागराज येथे अर्धकुंभमेळा भरतो, आणि यानंतर तब्बल १४४ वर्षांनंतर अलाहाबाद येथे महाकुंभमेळा आयोजित केला जातो .

यामागील ज्योतिषीय संबंधाविषयी बोलायचे झाल्यास सूर्याभोवती फिरणारे ९ ग्रह जेव्हा एका सरळ रेषेत येतात, त्यावेळी सूर्याची किरण ज्या ठिकाणी पडतात, तिथ कुंभमेळ्याच औचित्य मानल जात. गेल्या कित्येक वर्षापासून या कुंभमेळ्याच आयोजन केलं जातंय. या कुंभमेळ्याच्या उत्सवाचा  संदर्भ मुगलकालीन कागदपत्रांमध्ये देखील आढळतो.  मात्र, १९४२ च्या कुंभमेळ्याचा संदर्भ कुठेच आढळत नाही.

१९४२ च्या कुंभमेळ्यावर दुसऱ्या महायुद्धाच सावट होत. 

असं म्हंटल जात कि, या पूर्वीच्या प्रत्येक कुंभमेळ्याच्या तयारी साठी ब्रिटिश सरकार प्रयत्न करत असे. त्यासाठी पैसे वेगळे काढले जात, रोगराई पसरू नये म्हणून लसीकरण, औषध फवारणी अशा अनेक गोष्टी कुंभमेळ्याच्या आधीपासून सुरु होत्या.

१९४२ सालच्या मेळ्यात मात्र ब्रिटीश सरकारने याकडे लक्षच दिल नाही.  ब्रिटिश सरकारने मेळाव्यासाठी कोणतीही तयारी केली नव्हती. त्याऐवजी, पैसे युद्धाच्या लढाईसाठी वळवले. त्यामुळे या कुंभमेळ्याचा, त्याच्या खर्चाचा कुठेही संदर्भ नाही. 

तर इथल्या प्रादेशिक अभिलेखागार कार्यालयाच्या म्हणण्यानुसार जपानी लोकं अकबराच्या किल्ल्यावर बॉम्बस्फोट करतील जे  यमुनेच्या काठावर मेळ्याच्या परिसरात आहे आणि याचा मोठा प्राणघातक परिणाम होईल,  या भीतीने ब्रिटिश सरकारने या धार्मिक मेळ्यावर  बंदी घातली होती. तर त्याच काळात ब्रिटीशांनी अलाहाबादला रेल्वे तिकिटांच्या विक्रीवर देखील बंदी घातली होती, जेणेकरून कुंभमेळ्याला येणाऱ्या लोकांची संख्या कमी होईल आणि बॉम्बस्फोट झाला तरी  मोठी दुर्घटना टाळता येईल.

प्रादेशिक अभिलेखागार अधिकारी (आरएओ) अमित अग्निहोत्री यांनी सांगितल्याप्रमाणे अलाहाबादचे  प्रादेशिक संग्रहालय, लखनऊचे सरकारी संग्राहलय आणि अगदी शहरी विभाग यांच्याकडे देखील या मेळाव्यासाठीची तयारी, शाही स्नान आणि खर्चासंबंधी कोणत्याही कागदपत्रांची माहिती नाही.

ते  म्हणतात,

“जपान कोणत्याही दिवशी पूर्वेकडून जपान आक्रमण करू शकेल, या बहाण्याने ब्रिटीशांनी भाविकांना या मेळ्याच्या  क्षेत्रापासून दूर ठेवण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी प्रत्येक इतर पद्धतीचा प्रयत्न केला.”

पण याचा अर्थ त्यावर्षीचा कुंभ मेळा कॅन्सल झाला नाही. ब्रिटिशांनी अनेक प्रयत्न केले मात्र त्या वर्षीच्या कुंभ मेळ्याला साधू लोक येऊन पोहचले. फक्त त्या वर्षीची गर्दी नेहमी पेक्षा कमी होती. तेव्हाचे भारताचे व्हाइसरॉय लिनलिथगो कुंभ मेळा पाहण्यासाठी प्रयागला आले.

त्यांनी पं. मदनमोहन मालवीय यांच्यासमवेत प्रयाग येथील कुंभमेळा विमानातून पाहिला. इतके कठोर नियम करूनही लक्षावधी श्रद्धाळूंच्या जनसागर गोळा झालेला पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांनी उत्सुकतेने पं. मालवीय यांना प्रश्न विचारला,

‘‘या कुंभमेळ्यात लोकांना सहभागी करण्यासाठी आयोजकांना भरपूर परिश्रम करावे लागले असतील ना ? आयोजकांना या कामासाठी किती खर्च आला असेल ?’’

पं. मालवीय यांनी उत्तर दिले,

‘‘केवळ दोन पैसे !’’

हे उत्तर ऐकून लॉर्ड लिनलिथगो यांनी पं. मालवीय यांना विचारलं,

‘‘पंडितजी, आपण चेष्टा करत आहात ?’’

पं. मालवीय यांनी खिशातून पंचांग काढले आणि ते लॉर्ड लिनलिथगो यांच्या हातात देत म्हणाले,

‘‘याचे मूल्य केवळ दोन पैसे आहे. यातून जनसामान्यांना समजते की, कुंभपर्वाच्या पवित्र कालखंडाची वेळ कोणती आहे ? त्यानुसार सर्व जण त्या वेळी स्नानासाठी स्वतःहून उपस्थित रहातात. कोणाही व्यक्तीस व्यक्तीशः निमंत्रण दिले जात नाही.”

कोणतेही आमंत्रण नसताना, कितीही ब्रिटिश सरकारने विरोध केला असला तरी कुंभाच्या शाही स्नानासाठी देशभरातून वीस लाख साधू लोक गोळा झाले.

ब्रिटिशांनी मागील सर्व मेळ्याच्या  गाड्यांमधून तिकिट विक्रीसंदर्भातील, मंजूर बजेट, खर्च,  यात्रेकरूंची संख्या व त्यासंबंधीच्या पूर्वीच्या आणि नंतरच्या सर्व नोंदी ठेवल्या आहेत, पत्रव्यवहार आहेत. मात्र, १९४२  मध्ये असा कोणताही पत्रव्यवहार झाला नाही,  खर्च झालेल्या निधीसंदर्भात कोणतेही कागदपत्र नाहीत तर संग्रहात त्यापूर्वीच्या आणि नंतरच्या सर्व माघच्या खर्चाची व व्यवस्थापनांची माहिती आहे. पण १९४२ च्या मेळ्याची माहिती नाही.

दरम्यान, यंदाच्या कोरोनाच्या सावटात देखील या कुंभमेळ्याच आयोजन एक धाडसी पाउलच म्हणता येईल.

कुंभमेळ्याच्या आयोजनाबाबत अनेक विरोध प्रश्न उपस्थित होऊनही उत्तराखंड सरकारने यासाठी कंबर कसली. कोरोनाच्या कहरात होणाऱ्या या मेळाव्यासाठी प्रशासनाने नियमावली तयार केली आहे. आणि ऐतिहासिक निर्णय घेत हरिद्वारच्या या कुंभमेळ्याचा कालावधी १ महिना करण्यात आला, जो साधारणतः तीन ते साडे तीन महिन्यांचा असतो. तसेच मेळ्यात सहभागी होण्यासाठी ७२ तासांच्या दरम्यानची कोरोना निगेटिव्ह अहवाल असलेली RT-PCR चाचणी अनिवार्य केली. यासोबतच मास्क, सामाजिक अंतर यांसारखे नियम तर आहेतच.

मात्र, या नियमाची ऐशीतेशी होताना पाहायला मिळत आहे. दररोज करण्यात येणाऱ्या चाचणीत अनेक साधू, भाविक कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहेत.

सोमवारी कलेल्या चाचणीत देखील ४०१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात राज्यातील संक्रमितांचा आकडाही वाढत आहे. त्यामुळे नियमांची अंबलबजावणी करण्यात स्थानिक प्रशासन अक्षम ठरताना दिसत आहे. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांना लागू करणं खूप अवघड काम असल्याच एका पोलीस अधिकाऱ्यानं म्हंटल आहे.

त्यात, १ ते ३० एप्रिल या कालावधीत होणाऱ्या या कुंभमेळ्यात १३, १४ आणि २७ एप्रिलला शाही स्नान असणार आहे. आणि १३ एप्रिलला चैत्र प्रतिपदा आणि २१ एप्रिलला राम नवमी असल्यान भाविकांची गर्दी आणखीच वाढणार आहे. अश्या परिस्थितीत सरकारची डोकेदुखी वाढणार  हे नक्कीच.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.