याच उठावानंतर ब्रिटीशांना कळाल की भारतातून गाशा गुंडाळण्याची वेळ आली आहे.

भारताला इंग्लंडच्या राणीच्या मुकुटातला कोहिनूर हिरा म्हटल जायचं. या हिऱ्यावरची पकड ढिली करणे इंग्रजांना परवडणारे नव्हते. मात्र एक घटना घडली की ज्यामुळे त्यांना कळाले की आता हा देश सोडण्यावाचून आपल्याला पर्याय नाही.

नुकतच दुसरं महायुद्ध संपल होतं. या युद्धात अख्खे युरोप हिटलरने पादाक्रांत केले होते मात्र छोट्याशा इंग्लंडवर त्याला संपूर्ण विजय मिळवता आला नव्हता. पुढे याच इंग्लंडने आपल्या दोस्त राष्ट्रांना घेऊन जर्मनी, इटली, जपान यांच्या आक्रमक हुकुमशाहीवर विजय मिळवला. इंग्लंडच्या विजयाला अनेक कांरणे होती मात्र यात आणखी एक प्रमुख कारण होते, इंग्रजाच्या बाजूने लढलेली पराक्रमी भारतीय सेना.

भारतीय ब्युरोक्रसी आणि भारतीय आर्मी या दोन्हीच्या जीवावर मुठभर इंग्रज १५० वर्ष राज्य करू शकले होते.

पण याच सेनेत ब्रिटीश सत्तेविरुद्ध नाराजी सुरु झाली होती. चले जाव आंदोलनानंतर पेटलेल्या आगीचा वणवा रॉयल इंडियन नेव्ही पर्यंत पोहचला होता,

१ डिसेंबर १९४५ हा दिवस नौसेना दिन म्हणून साजरा करायचं ठरल होतं. त्यादिवशी युद्धनौका नागरिकांना पाहण्यासाठी खुल्या केल्या जाणार होत्या. यात सर्वात प्रमुख होती तलवार युद्ध नौका. पण नौसेना दिनाच्या सकाळी ब्रिटीश अधिकाऱ्यांना दिसल की तलवार नौकेवर काही घोषणा लिहून ठेवल्या आहेत.

“चले जाव, इन्कलाब जिंदाबाद, किल ब्रिटीश, साम्राज्यवादाचा धिक्कार असो”

खूप तपास करूनही इंग्रजांना शोध लागला नाही की या घोषणा कोणी रंगवल्या आहेत. पुढे काही दिवसांनी ब्रिटनचे सरसेनापती तलवार युद्ध नौकेच्या भेटीसाठी आले. तेव्हा सुद्धा अशाच घोषणा लिहिलेल्या आढळल्या. या वेळी मात्र या घोषणा कोणी रंगवल्यात याचा शोध लागला.

ते होते बलाईचंद दत्त उर्फ बीसी दत्त. 

बीसी दत्त हे ब्रिटीश रॉयल नेव्ही मध्ये वायरलेस टेलीग्राफिस्ट होते. याच काळात ब्रिटीशांनी भारतीय नौदलाची २० पट वाढ केली होती. अनेक पराक्रमी तरुण दुसऱ्या महायुद्धात इंग्रजांच्या बाजूने मोठा पराक्रम गाजवत होते.

मात्र जेव्हा सुभाषबाबूंच्या आझाद हिंद सेनेच्या कथा पडायला सुरवात झाली तेव्हा बीसी दत्त यांच्या सारख्या अनेकांना  जाणवू लागल की  युद्धाच्या अखेरीस विजयी झालेल्या ब्रिटिश नौदलात, आपणास कसलेच स्थान नाही. भारतातील ब्रिटिश राजसत्ता टिकविण्यासाठीच केवळ एक प्यादे म्हणून आपला उपयोग करून घेण्यात आला.

दत्त यांनी आपल्या तलवार नौकेवरील नौसैनिकांना एकत्र करून बंडाची तयारी सुरु केली होती. 

पण घोषणा रंगवण्याच्या प्रकरणात बीसी दत्त यांनाच अटक झाल्यामुळे हे बंड सुरु होण्याआधीच संपण्याची शक्यता निर्माण झाली. मात्र त्यांच्या साथीदारांना आपला धैर्य गमावला नाही. उलट दत्त यांच्या  अटकेमुळे भारतीय नौसैनिकांमधील असंतोष वाढीसच लागला. त्यांनी उठावाला मूर्त स्वरूप दिले.

१८ फेब्रुवारी १९४६ रोजी मुंबईत  तलवार नौकेवर सकाळच्या नाश्त्याला सगळे नौसैनिक गोळा झाले होते. मात्र त्यांनी नाश्ता करण्यास नकार दिला.

हमें अच्छा नाश्ता और अच्छा भोजन चाहिये । हमें पूरा राशन चाहिये । गाली देनेवाले कमांडर किंग को सजा मिलनी चाहिये । हमारे साथ वैसा ही व्यवहार किया जाय जैसा गोरों के साथ होता है,’

त्यांचा हा पवित्रा पाहून इंग्रज अधिकाऱ्यांना धक्का बसला. या नौसैनिकांच्या मागण्या छोट्या होत्या मात्र त्याचे पडसाद लांबवर उमटणार होते. मुंबईमध्ये असलेल्या रॉयल इंडियन नेव्हीच्या तळावर या बंडाचा वणवा वेगाने पसरला. इतर जहाजावरील नौसैनिकांनी देखील हरताळ सुरु केला.

दुसऱ्या दिवसांपर्यंत तब्बल वीस हजार नौसैनिक ब्रिटीशांच्या विरुद्ध उभे ठाकले होते.

मुंबई, कलकत्ता, कराची आणि अन्य ठिकाणच्या एकूण अठ्ठ्याहत्तर युद्धनौकांवर तिरंगा झेंडा फडकू लागला होता.

या उठाव केलेल्या नौसैनिकांनी एक केंद्रिय समिती स्थापन केली व त्याचे नेते म्हणून सिग्नलमॅन लेफ़्टनंट मोहम्मद शरिफ़ आणि पॅटी ऑफ़िसर टेलिग्राफिस्ट मदन सिंग यांची प्रधान आणि उपप्रधान म्हणून एकमताने नेमणूक करण्यात आली. स्ट्राइक कमिटीने रॉयल इंडियन नेव्हीचे नाव बदलून इंडियन नॅशनल नेव्ही केले.

उठावात सहभागी नसलेले नौसैनिक देखील आपल्या अधिकाऱ्यांना डाव्या हाताने सलाम करून निषेध व्यक्त करत होते. पहारा करणारे सैनिकही नागरिकांना सामील होऊन बंडखोर नाविकांना रसद पोचवू लागले.

त्यावेळी मात्र ब्रिटिश अधिकारी व सैनिक हताशपणे बाजूला उभे राहून हे आक्रीत पाहात राहिले.

तलवार ही युद्धनौका नाविकांनी ताब्यात घेतल्याची वार्ता अख्ख्या भारतात पसरली. कराची, मद्रास, कलकत्ता येथील नौसैनिकानीही बंडात भाग घेतला. नागरिक सुद्धा या उठावात सैनिकांच्या बाजूने उतरले. मुंबई आणि कराचीत तर रस्त्यावर दंगली पेटल्या.

या बंडाचे पडसाद पार इंग्लंडपर्यंत उमटले. बळाचा वापर करून उठाव चिरडून टाकायचे आदेश देण्यात आले.

आंदोलकांवर गोळीबार सुरु झाला. नौसैनिक व सामान्य जनता यांनी मिळून केलेल्या या आंदोलनात फक्त सात दिवसांच्या कालावधीत ३०० जण मृत्युमुखी पडले व जवळपास १५०० जण जखमी झाले. मुंबईच्या जनतेला नौसैनिकांच्या उठावात सहभागी होण्याची किंमत २५० स्त्री-पुरुष, मुले, कामगार व विद्यार्थी यांच्या बलिदानाने द्यावी लागली.

हे सुरु असताना मात्र राजकीय पातळीवर या उठावाला पाठींबा मिळाला नाही. स्वातंत्र्यलढ्याचे सर्वोच्च नेते असणाऱ्या महात्मा गांधीनी या उठावापासून हात झटकले. यामुळे अरुणा असफ अली वगळता कॉंग्रेस पक्ष या आंदोलनापासून दूर राहिला. मुस्लीम लीग, हिंदू महासभा अशा इतर कोणत्याही पक्षाने आंदोलनकर्त्यांची बाजू घेतली नाही. उलट त्यांचा निषेध केला. 

फक्त कम्युनिस्ट पक्ष या उठावात सहभागी झाला. 

पुढे परिस्थिती चिघळणार याची शक्यता निमण झाली. इंग्लंडने अत्याधुनिक युद्ध नौका गेट वे ऑफ इंडिया जवळ आणून उभ्या केल्या. युद्धाची स्थिती निर्माण झाल्यावर  सरदार वल्लभभाई पटेलांना आंदोलनकर्त्यांशी चर्चेला पाठवण्यात आले. त्यांनी केलेल्या मध्यस्तीनंतर हा उठाव मागे घेण्यात आला.

उठाव करणाऱ्या नौसैनिकांना कायमच नौदलातून बाहेर काढण्यात आलं. या पैकी अनेक जन भारत व पाकिस्तानमध्ये कम्युनिस्ट पक्षाचे काम पाहू लागले.

वरवर पाहता हा भारतीय नौसैनिकांचा उठाव अयशस्वी ठरला. मात्र त्याचे परिणाम दुरोगामी ठरले. .

१८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्य संग्रामानंतर भारतीय सैन्यदलात इंग्रजांविरुद्ध झालेले हे सर्वात मोठे बंड होते.  याच उठावामुळे भारतातील ब्रिटीश राजसत्तेच्या कबरीवर शेवटचा खिळा ठोकला गेला.

पुढे अनेक इंग्रज अधिकाऱ्यांनी व इतिहासकारांनी मान्य केलं आहे की भारतीय नौदलाच्या या उठावामुळे ब्रिटिशाना भारताला स्वातंत्र्य देणे भाग पडले.

हे ही वाच भिडू.