नऊवारी लुगडं नेसून विधानसभेत जाणारी मराठवाड्याची पहिली आमदार, “अंजनाबाई पाटील”

महाराष्ट्राने एक अशीही महिला आमदार पाहिलीय जी नऊवारी लुगडं अन् चोळी घालून विधानसभेत जायची…

आम्ही बोलतोय मराठवाड्यातील हदगाव मतदार संघाच्या माजी आमदार अंजनाबाई पाटील वायपनकर यांच्याबद्दल. हे नाव तसं तुमच्या ओळखीचं नसेल.. कारण महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात असे अनेक महिला नेतृत्व घडून गेलेत ज्यांची इतिहासाने फारशी दखल घेतली नाही.

मात्र मराठवाड्याचा इतिहास अंजनाबाई पाटील यांना दुर्लक्षून लिहिला जाणारच नाही 

असो तर आमदार अंजनाबाई पाटील वायपनकर यांची आणखी ओळख सांगायची झाल्यास त्यांच्या  कन्या म्हणजे माजी केंद्रीय ग्रामविकास तथा संसदीय कार्य राज्यमंत्री श्रीमती सुर्यकांता पाटील. 

ज्येष्ठ नेत्या सुर्यकांता पाटील आणि त्यांच्या आई दोघीही आमदार झाल्या होत्या.. त्यांचा मतदार संघही एकच होता आणि तो म्हणजे नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुका.

राजकारणात पिता-पुत्र आमदार-खासदार झाल्याची उदाहरणे अनेक आहेत मात्र, माय-लेकी आमदार झाल्याची उदाहरणे मात्र दुर्मिळच आहेत.. 

एकाच तालुक्यातल्या दोन मायलेकी विधानसभेत गेल्यात असं पहिल्यांदाच मराठवाड्यात घडलं होतं…

सूर्यकांता पाटील यांच्या घराण्याला स्वातंत्र्य लढ्याचा वारसा आहे. सोबतच राजकीय वारसा देखील मिळालेला आहे. त्यांचे वडील हे जयवंतराव पाटील वायपणकर निझामाशी लढताना हुतात्मा झाले. जयवंतराव पाटील यांच्या पत्नी म्हणजेच अंजनाबाई पाटील. दुर्दैवाने त्यांचं लग्न वयाच्या १४ व्या वर्षी झालं. आणि अवघ्या २१ वर्षी त्या विधवा बनल्या.

तर सूर्यकांता पाटील यांचे आजोबा माधवराव पाटील यांनी हदगाव मतदार संघातून १९५१ साली निझाम स्टेटची विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकली. विशेष म्हणजे त्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे शंकरराव चव्हाण यांचा पराभव केला होता.

अंजनाबाईंबाबत माहिती मिळवताना बोल भिडूने थेट त्यांच्या कन्या सूर्यकांता पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्या सांगतात की, 

तो काळ फार वेगळा होता. काँग्रेस पक्षाने अंजनाबाईंना तिकीट देऊ केल्यानंतर त्यांनी ते नाकारलं. त्यांचं म्हणणं होतं की, मी काय शिकलेली नाही. मला तुमचं तिकीट नको.  त्या काळात मराठा जातीतील मुलींना शिक्षण दिलं जात नसत. 

मात्र हुतात्म्याची पत्नी म्हणून काँग्रेस पक्षाने अंजनाबाईंना तिकीट द्यायचं ठरलंच. पक्षाच्या आणि आपले  सासरे माधवराव पाटील यांच्या विनंतीला मान देऊन त्या तयार झाल्या.

१९५७ साली झालेल्या निझाम स्टेटच्या दुसऱ्या निवडणुकीत अंजनाबाई हदगाव मतदार संघातून त्या उभ्या राहिल्या.

तेंव्हा ३ तालुक्यांचा मिळून एक मतदारसंघ होता, किनवट-भोकर आणि किनवट. 

अंजनाबाई काँग्रेसच्या उमेदवार होत्या तर प्रतिस्पर्धी उमेदवार समाजवादी पक्षाचे शामराव बोधनकर हे होते. बोधनकर म्हणजे नांदेड जिल्ह्यातील मोठे प्रस्थ होते. मात्र त्यांचा या निवडणुकीत अंजनाबाईंनी पराभव केला.

अंजनाबाईंना १९ हजार ३१७ मते मिळाली होती. तर शामराव बोधनकर यांना १३ हजार ५११ मते मिळाली होती…आणि शामराव बोधनकर यांचा पराभव करत अंजनाबाई जिंकून आल्या. त्या विधानसभेत पोहचल्या.

अंजनाबाई निरक्षर होत्या, मात्र त्यांच्या मुलीने त्यांना सही करायला शिकवलं. त्यांनी प्रौढ शिक्षण घेतलं. त्या सही करायला तर शिकल्याच तसेच हळूहळू वाचायलाही शिकल्या. आणि दररोज वर्तमानपत्र देखील वाचायला लागल्या आणि त्यानंतर त्यांचं वाचन वाढतच गेलं. 

त्यांच्या सासरेंनी आमदारकीचा अनुभव पाठीशी असल्यामुळं अंजनाबाईंना त्यांनी मार्गदर्शन केलं. या काळात त्या विधानसभेत जात असत अन त्यांच्यासोबत त्यांच्या कन्या सूर्यकांता पाटील देखील जात असायच्या. 

सर्वांनाच अंजनाबाईंचं फार कौतुक वाटत असे, खादीचा नऊवारी काष्टा नेसून, डोक्यावर पदर घेऊन अगदी कमी वयात विधानसभेत त्या जात असत, हजेरी लावत असायच्या. 

मुंबईला जात असायच्या तेंव्हा त्या MLA हॉस्टेलमध्ये राहत मात्र होस्टेलचं जेवण त्या कधीच करत नसायच्या, सामानात भाकरीचं पीठ घेऊन येत असायच्या. होस्टेलच्या रूममध्येच जेवण बनवणे असं त्यांचं नियोजन असे. आमदार असूनही…विधवा असल्यामुळे त्या गादीवर न झोपता खाली जमिनीवर ते झोपत असायच्या. एकंदरीतच त्या फार त्यागी जीवन जगत असायच्या असं सूर्यकांता पाटील सांगतात.

अशा पद्धतीने त्यांनी ५ वर्षांचा विधानसभेचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण केला.

कार्यकाळ संपत आल्या आल्या त्यांनी एका दिवशी आपल्या निर्णयाची कुणालाही कल्पना न देता परस्पर पार्टी ऑफिसमध्ये जाऊन पक्षाला लिखित स्वरूपात दिलं की, 

“मला पुढील निवडणुकीतील तिकीट नको. मी एक धार्मिक बाई आहे. मला राजकारण झेपणारं नाहीये. इतके वर्ष मला तुम्ही विधानसभेच्या सदस्यत्वाची संधी दिली, माझा सन्मान केला त्याबद्दल मी ऋणी आहे”. 

त्यांचा हा निर्णय अर्थातच त्यांच्या कुटुंबाला पटला नाही. त्यांचे सासरे माधवराव पाटील यांनी विचारलं की, तिकीट मिळत असतांनाच असा निर्णय का घेतला ? यावर त्यांचं असं उत्तर होतं, “मला हे राजकारण पेलवत नाही. मला धर्मकार्य करायचं आहे, मला काशी, बद्रीनाथला जायचं आहे”.

वयाच्या चाळीशीनंतर त्यांना गर्भाशयाचा कँसर झाला आणि याच आजारपणात त्यांचं १९७३ मध्ये निधन झालं…पण अंजनाबाईंच्या रूपाने मराठवाड्याला पहिली महिला आमदार मिळाली होती हे मात्र मराठवाड्याचा इतिहास कधीही विसरणार नाही…

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.