७२ च्या दुष्काळात मफतलालच्या सुखडीने अख्ख्या महाराष्ट्राला जगवलं…

सध्या कोरोनाचा काळ सुरु आहे. औषधांपासून हॉस्पिटलमधल्या बेडचा तुटवडा जाणवतोय. ऑक्सिजन अभावी लोक हात पाय आपटून मरत आहेत. सरकारने देखील हात टेकावेत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मदतीचा ओघ सुरु झाला आहे, मात्र नेमकी मदत कशी करायची आणि संकटग्रस्तांना कशी पोहचवायची हा प्रश्न अनेकांपुढे उभा राहिला आहे.

नेमकी हीच परिस्थिती एका दुष्काळावेळी महाराष्ट्रात उभी होती.

साल होतं १९७२. सलग तिसऱ्या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता. पावसाची कोणतीच लक्षणे नव्हती. शेतातील उभं पीक जळून गेलं होतं.अन्न पाण्यावाचून गोठ्यातली जनावरे मरून गेली होती. कोणाच्याच घरात एक वेळच अन्न नव्हतं. बारा बलुतेदारांपासून गावच्या पाटलांपर्यंत खेडोपाडी हीच अवस्था होती.

फक्त विदर्भ मराठवाडा नाही तर संपन्न म्हणवल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातही पाण्याच्या टँकरची वाट बघितली जात होती. भूकबळीची संख्या वाढू लागली. महाराष्ट्रा इतके नसले तरी दुष्काळामुळे संपूर्ण देशातही असेच हाल सुरु होते.

महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक. ते स्वतः कृषिपुत्र होते. महाराष्ट्रात हरित क्रांतीच स्वप्न बघणाऱ्या वसंतराव नाईकांना देखील असाह्य झाल्या सारखं वाटत होतं. ग्रामीण भागात उपासमारीमुळे होणारे हाल बघवत नव्हते.

अन्नधान्याची टंचाई आणि दुष्काळाचा अभूतपूर्व उच्चांक १९७२ साली गाठला होता.

याच काळात वि.स.पागे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली रोजगार हमी योजना लागू करण्यात आली. गावोगावी रस्ते बांधणे वगैरेची कामे काढून लोकांना रोजगार पोहचवण्यात येऊ लागला. पूर्वी फक्त गावातले काम नसणारे शेतमजूर या रोहयोच्या कामावर जायचे.

पण दुष्काळाचा फटका एवढा मोठा होता की मोठमोठे बागायतदार देखील या रोजगाराच्या कामावर येऊ लागले.

मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात झंझावती दौरे काढले. रणरणत्या उन्हात वसंतराव नाईक फिरत होते. अधिकाऱ्यांच्या गाठभेटी घेत होते. दुष्काळी कामे कशी सुरु आहेत याची पाहणी करत होते. ठिकठिकाणी पाझर तलावांच्या बांधणी साठी प्रोत्साहन देत होते. प्रसंगी प्रक्षुब्ध झालेल्या जमावाला तोंड देऊन त्यांना शांत करत होते.

राबणाऱ्या लोकांच्या हाताला काम मिळाले पण त्यांच्या अन्नाचा प्रश्न महत्वाचा होता.

धान्यांची सरकारी गोदाम रिकामी होती. जर लोकांना समजले की, राशनचे धान्य येणार आहे, दोन दिवस अगोदर लोक गोधड्या घेऊन तेथे नंबर लावून झोपत असे. राशनवर येणारे धान्य म्हणजे लाल गहु, लाल ज्वारी व खूप निकृष्ट दर्जाचे असे. दुष्काळी बरबड्याच्या भाकऱ्या खाल्ल्या जात होत्या. पण यातून पोषण मिळत नव्हतं. यावर उपाय काय हे मुख्यमंत्री शोधत होते. त्यात कोणी तरी त्यांना सुखडी बद्दल सांगितलं.

सुखडी हा मुख्यतः गुजरात राजस्थानमधल्या दुष्काळी भागातला पदार्थ. गूळ, दूध व गव्हाचे मिश्रण करून त्यातले पाणी काढून टाकले जाते. याच्या वड्या केल्या जातात. हा पदार्थ महाराष्ट्रात वाटायचा असं ठरलं पण एवढ्या मोठ्या प्रमाणात सुखडी बनवणार कोण आहे पुरवठा कोण करणार हा प्रश्न उभा राहिला.

तेव्हा समोर आले सुप्रसिद्ध उद्योगपती अरविंद मफतलाल.

मफतलाल हे टेक्स्टाईलमधील मोठं नाव. विसाव्या शतकात अहमदाबाद मध्ये सुरु झालेल्या कापड गिरणीपासून मफतलालची सक्सेस स्टोरी सुरु होत होती. अरविंद मफतलाल यांच्याकडे जेव्हा कंपनीची जबाबदारी आली तेव्हा त्यांनी टेक्स्टाईल बरोबरच इतर व्यवसायांमध्ये देखील आपला जम बसवला. देशातील सर्वात मोठ्या उद्योगसमूहामध्ये त्यांचा समावेश केला जाऊ लागला.

एकदा बिहार मध्ये पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी म्हणून अरविंद मफतलाल पाटण्याला गेले होते. तिथे त्यांना संत रणछोडदास यांचं नाव कानावर पडलं. अरविंद मफतलाल यांनी त्यांची भेट घेतली. दुष्काळ, महापूर, वादळ अशा नैसर्गिक संकटात अडकलेल्या लोकांना मदत करण्यासाठी रणछोडदास महाराजांनी सद्गुरू सेवा मंडळाची स्थापना केली होती. अरविंद मफतलाल हे रणछोडदास महाराजांच्या कार्याने इतके प्रभावित झाले कि त्यांनी त्यांचं शिष्यत्व स्वीकारलं.

रणछोडदास महाराजांनी १९६८ साली अरविंद मफतलाल यांना सद्गुरू सेवा मंडळाचे अध्यक्ष बनवलं. देशभरात येणाऱ्या संकटात ही सन्घटना अग्रेसर राहून कार्य करत होती.

७२ च्या दुष्काळात जेव्हा महाराष्ट्र सरकारपुढे सुखडी बनवण्याचा प्रश्न उभा राहिला तेव्हा अरविंद मफतलाल धावून आले. त्यांनी मुंबईत सद्गुरू सेवा सन्घटनेतर्फे मोठ्या प्रमाणात सुखडी बनवण्यास सुरवात केली. याच्या वड्या बनवून त्या राज्यभरात पोहचवल्या.

लहान मुलांना पोषण म्हणून बनवलेला हा पदार्थ रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या प्रत्येकाला दिला जाऊ लागला. दुष्काळात लोकांना जगवणारी सुखडी मिठाई समजून लोक खात होते. यात गरीब श्रीमंत सगळ्यांचा समावेश होता. पुढे राज्यात इतरत्र देखील सुखडी बनू लागली. नगरच्या झुम्बरलाल सारडा यांच्या जिनिंग फॅक्टरी मध्ये बनवली जाणारी सुखडी तर गिनीज बुक मध्ये जाऊन पोहचली असं म्हणतात.

वसंतराव नाईक यांचं नेतृत्व, वि.स.पागे यांची रोजगार हमी योजना आणि मफतलाल यांची सुखडी याच्या जोरावर महाराष्ट्र दुष्काळाच्या महासंकटातून पार पडला. असं म्हणतात की ७२ च्या त्या दुष्काळाने महाराष्ट्रामध्ये अनेक मोठी स्थित्यांतरे घडवून आणली. लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या. सांस्कृतिक, समाजव्यवस्थेमधील बदल घडवून आणले.

आज या दुष्काळाच्या आठवणी धूसर झाल्या आहेत मात्र जुन्या लोकांना ७२ चा दुष्काळ म्हटला की महाराष्ट्राला जगवणारी सुखडी ही नक्की आठवतेच.

हे ही वाचा भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.