नर्गिसची मुलाखत घेता आली नाही म्हणून सुनील दत्त यांची नोकरी गेली असती.
बॉलीवूडमधील प्रख्यात अभिनेते सुनील दत्त आणि नर्गिस यांची लव्ह स्टोरी अनेकांना परिचित आहे. याच जोडीचे काही किस्से –
मुस्लीम कुटुंबाने वाचविले होते प्राण.
१९२९ साली फाळणीपूर्वीच्या पाकिस्तानातील झेलम जिल्ह्यातील खुर्दी गावात सुनील दत्त यांचा जन्म झाला होता. लहान असतानाच त्यांच्या डोक्यावरील पित्याचे छत्र हरवले होते. साधारणतः विशीत असेपर्यंत भारत-पाकिस्तानमध्ये फाळणी झाली होती.
फाळणीच्या वेळी भडकलेल्या धार्मिक दंगलीमधून स्वतःचा जीव वाचविण्यासाठी सुनील दत्त यांना संघर्ष करावा लागला होता. अशा वेळी त्यांच्या वडिलांचे जुने मित्र त्यांच्या असलेले याकुब त्यांच्या मदतीला आले. त्यांनी सुनील दत्त यांना आपल्या घरात लपायला जागा दिल्यामुळेच या दंगलीमधून सुनील दत्त वाचू शकले.
नर्गिसची मुलाखत न घेता आल्याने नोकरी जाता जाता वाचली.
नोकरीच्या शोधात मुंबईला आलेल्या सुनील दत्त यांनी आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीला एका रेडीओ स्टेशनवर निवेदक म्हणून काम केलेलं आहे. ‘रेडीओ सिलोन’ साठी काम करताना एक वेळा त्या काळातील ख्यातकीर्त अभिनेत्री, जी पुढे जाऊन त्यांची पत्नी बनली त्या नर्गिस यांची मुलाखत घेण्याचं काम सोपविण्यात आलं होतं.
नर्गिस त्या वेळी प्रसिद्धीच्या शिखरावर होत्या. ज्यावेळी सुनील दत्त मुलाखतीसाठी पोहोचले त्यावेळी नर्गिस यांना बघून त्यांना काहीच सुचेनासं झालं आणि एकही प्रश्न न विचारता ते तसेच ऑफिसला पोहचले. यामुळे त्यांची नोकरी जाता जाता वाचली.
मदर इंडिया नर्गिस आणि राज कपूर.
१९५७ साली प्रदर्शित झालेल्या ‘मदर इंडिया’ चित्रपटाने सुनील दत्त यांच्या आयुष्याला कलाटणी दिली. ‘मदर इंडिया’ प्रदर्शित झाला आणि तो तुफान हिट झाला. ‘मदर इंडिया’च्या सेटवरच नर्गिस आणि सुनील दत्त खऱ्या अर्थाने जवळ आले. सेटवर लागलेल्या आगीतून सुनील दत्त यांनी स्वतःच्या जीवाची परवा न करता नर्गिस यांचे प्राण वाचवले आणि यांच्यातील ‘लव्ह स्टोरी’ बहरायला लागली. त्यानंतर वर्षभरातच त्या दोघांनी लग्न केलं.
‘मदर इंडिया’च्या सेटवर भेटण्यापूर्वीच सुनील दत्त नर्गिस यांच्या प्रेमात पडले होते. परंतु तो सुनील दत्त यांचा बॉलीवूडमधील संघर्षाचा काळ होता आणि त्याचवेळी ‘नर्गिस-राज कपूर’ स्टार जोडीतील प्रेमप्रकरणाच्या चर्चा देखील मोठ्या प्रमाणात होत्या. त्यामुळे सुनील दत्त नर्गिस यांना बोलायला घाबरत असत.
पुढे ‘नर्गिस-राज कपूर’ यांच्यात यांच्यात दुरावा निर्माण झाला आणि ‘नर्गिस-सुनील दत्त’ यांचं लग्न झालं. असंही सांगितलं जातं की, या दोघांच्या लग्नामुळे राज कपूर इतके अस्वस्थ झाले होते की दारूच्या आहारी गेले होते आणि रात्र-रात्र बाथ टब मध्ये पडून राहात आणि रडत असत.
सुनील दत्त आणि नर्गिस यांचं सहजीवन व्यवस्थित सुरु असतानाचा सुनील दत्त यांना तेव्हा धक्का बसला ज्यावेळी नर्गिस यांना कॅन्सर असल्याचं निदान झालं. किमोथेरपी नंतरच्या काळात तर नर्गिस यांना प्रचंड यातना सहन कराव्या लागत होत्या आणि त्यांचे हे हाल सुनील दत्त यांना बघवत नसत. त्यानंतर तर त्यांची तब्येत अजून बिघडली आणि त्या कोमा मध्ये गेल्या आणि त्यांना लाइफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवावं लागलं.
एक वेळी तर अशी आली की डॉक्टरांनी त्यांचा लाइफ सपोर्ट काढून घेउन त्यांना सुखाने मरू देण्याचा सल्ला सुनील दत्त यांना दिला होता. पण सुनील दत्त मात्र त्यासाठी तयार झाले नाहीत, त्यांनी डॉक्टरांना नकार कळवला. आपण कुठल्याही परिस्थितीत नर्गिसला मरू देणार नाही, असं ते म्हणत.
त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न सोडले नाहीत. विशेष म्हणजे काही दिवसांनी नर्गिस बऱ्या झाल्या पण त्यानंतर त्या फार काळ जगू शकल्या नाहीत. थोड्याच दिवसात त्यांचं निधन झालं, मुलगा संजय दत्तच्या ‘रॉकी’ सिनेमाच्या प्रीमियरला देखील त्या जाऊ शकल्या नाहीत.
हे ही वाच भिडू.
- संजू पिक्चरमध्ये न दाखवलेला संजय दत्त आणि अमरसिंग यांचा एक किस्सा.
- अर्धे हिंदू आणि अर्धे मुसलमान असणारे हुसैनी ब्राम्हण.
- जाता-जाता मीना कुमारी पाकिजाला नवसंजीवनी देऊन गेली !