१९४२ लव्ह स्टोरीचं सक्सेस बघणं आर.डी.बर्मन यांच्या नशिबात नव्हतं.
राहुल देव बर्मन म्हणजेच ग्रेट संगीतकार आर.डी.बर्मन .असं म्हणतात की लहानपणी तो पाचव्या सुरात रडत होता म्हणून त्याला पंचम हे टोपणनाव पडले.
त्यांचे वडील एस.डी.बर्मन हे भारतिय चित्रपटसंगीताचा सुवर्णकाळ गाजवलेले संगीतकार तर पंचम त्यांच्यापेक्षा एक पाउल पुढे असणारा संगीतकार होता. सत्तरचे दशक हे पंचमचे दशक होते. या काळात आरडी ने संगीतामध्ये केलेले प्रयोग ट्रेंड सेटर होते.
किशोर कुमारचं योर्डलिंग आणि पंचमच संगीत असलं तर पिक्चरचं म्युजिक सुपरहिट असं समीकरण बनलं होत. अमरप्रेम, जवानी दिवाणी,शोले, दिवार , आंधी , गोलमाल एक काळच या दोघांनी गाजवला.
मात्र ऐंशीच्या उत्तरार्धात मात्र पंचमच्या गाण्यांना उतरती कळा लागली. १९८७साली किशोर गेला. त्यापूर्वी त्यांनी सागर सिनेमामध्ये शेवटची जादू पडद्यावर साकारली होती. पण किशोर गेला आणि पंचम एकटा पडला.
त्यांच्या संगीतात ती जुनी जादू दिसत नव्हती. बाप्पी लहरीच्या डिस्को गाण्यांनी धुमाकूळ घातला होता. एकेकाळी पंचमच्या ऑर्केस्ट्रा मध्ये वाद्य वाजवणारे लक्ष्मीकांत प्यारेलाल हे तेव्हा टॉपवर गेले होते.
सुभाष घईने “रामलखन” या सिनेमासाठी आर.डीला साईन केले होते. पण याच दरम्यान त्याच्या सलग चार पाच फ्लॉप मुव्हीमुळे घाबरून रामलखनमधून पंचमची सुट्टी करण्यात आली. त्याच्या जागी लक्ष्मीकांत-प्यारेलाल आले.
सगळे म्हणाले,
“पंचम संपला.”
एकेकाळी त्याच्या संगीताचे दिवाने संपूर्ण जगभर पसरले होते. फक्त त्याच्या नावावर संगीत खपायचं असा आरडीबर्मन स्वतःच्या अपयशान खचला होता.
नव्वदचं दशक आलं. अन्नू मलिक, जतीन-ललित, आनंद-मिलिंद आणि सगळ्यात महत्वाच आशिकी बनवणारे नदीम श्रवण आले. पाश्चात्य संगीतावरून चोरलेल्या ट्युन्सना मेलेडीमध्ये बसवून खपवल जात होत. लोकांना ते आवडतही होत पण अभिजात संगीतकाराचा मुलगा पंचम आपली ओळख शोधत होता. त्याने कधी परदेशी धून वापरल्या नव्हत्या असं नाही . त्याला देखील आपलं अपयशाला तोंड देताना हा मोह टाळता आला नव्हता.
गर्दिश सिनेमाच्यावेळी तर प्रीमियरला पिक्चरमध्ये काम केलेले सगळे कलाकार हजर होते पण सिनेमाच संगीत दिलेल्या पंचमला निमंत्रणसुद्धा देण्यात आलं नव्हत. प्रोड्युसरच म्हणण होत की फ्लॉप आरडी बर्मनची अपशकुनी सावली सुद्धा सिनेमावर नको.
सुपरस्टार पंचम आपल्या सान्ताक्रुजच्या फ्लॅटच्या बाल्कनीत एकटाच उभा राहून बदलेला काळ पाहत राहायचा. लोक हळूहळू आरडीबर्मनना विसरत होते.
एक दिवस त्यांना भेटायला एक तरुण दिग्दर्शक आला. विधू विनोद चोप्रा. त्यांनी या पूर्वी परिंदा या सिनेमामध्ये एकत्र काम केलं होत. यामधल्या “तुमसे मिलके ऐसा लगा” या गाण्यात विधूला कळाल होत की पंचमची जादू संपलेली नाही. त्यान पंचमला आपल्या नवीन सिनेमाला संगीत देण्यासाठी तयार केलं.
नाव होत १९४२लव्ह स्टोरी. १९४२च्या स्वातंत्र्ययुद्धाच्या धामधुमीत फुललेली एका नाजूक हळुवार प्रेमकहाणी.
विधू विनोद चोप्राला आरडीच्या वडिलांच्या जमान्यातल शुद्ध कोणतेही भेसळ नसलेल संगीत हवं होत . त्याला माहित होत हे फक्त आणि फक्त आरडी बर्मन करू शकतो. म्युजिक कंपनी एचएमव्ही कोणत्याही परिस्थितीत आरडीबर्मन ला संगीतकार म्हणून घेण्यासाठी तयार नव्हती. पण विधू विनोद चोप्रा पंचमसाठी ठाम होता.
विधू विनोद चोप्राने पंचमलाच फायनल केले. त्यावेळी विधू विनोद चोप्राला आरडीबर्मनना देण्यासाठी सायनिंग अमाउंट देखील नव्हती पण फिल्मचा हिरो जॅकी श्रॉफने त्याला पैसे दिले.
पंचमदाना जावेद अख्तर यांनी लिहिलेलं पहिलं गाण “कुछ ना कहो” धून बनवण्यासाठी पाठवून दिल. काही दिवसात पंचमचा विधूला फोन आला धून तयार आहे. विधू त्यांच्या फ्लॅटवर भेटायला गेला. तिथल्या हाॅलमध्ये आरडीनी त्याला धून ऐकवली. ट्यून अतिशय खराब झाली होती.
नव्या संगीतकारांच्या स्पर्धेत आरडी स्वतःलाच विसरला होता. तो त्यांच्या प्रमाणे संगीत द्यायचा प्रयत्न करत होता. विधुला ते नको होत. पण तो काही आरडीना काहीच बोलला नाही.
त्यांनी खूप वेळा विचारल्यावर मात्र त्यान सत्य सांगितलं. पूर्ण खोलीत सन्नाटा पसरला. आरडीनी आणखी एक आठवडा मागून घेतला. विधू त्यांना त्यांच्या वडिलांच्या फोटो कडे बोट दाखवून म्हणाला,
“दादा चाहिये तो आप एक साल ले लीजीये मगर मै इन्हे धुंढ रहा हुं . मुझे वही पुराना पंचम चाहिये.”
परत एका आठवड्यांनतर जेव्हा आरडीनी “कुछ ना कहो” ऐकवलं तेव्हा विधू विनोद चोप्राचा स्वतःवर विश्वास बसेना. त्याच्यामते ते भारतीय संगीतातल आतापर्यंतचं सर्वात सुंदर गाण आहे. जुना आरडीबर्मन परत आला होता. त्याचा आत्मविश्वास परत आला होता.
“एक लडकी को देखा तो ऐसा लगा” हे गाण तर त्यांनी अवघ्या पंधरा मिनिटात बनवलं.
जेष्ठ दिग्दर्शक संजयलीला भन्साळी तेव्हा विधू विनोदचोप्राचे असिस्टंट होता. तो म्हणतो अवघ्या पंधरा मिनिटात आरडीनी केलेली जादू बघून स्टुडीओमध्ये हजर असलेले सगळेजणच आश्चर्यचकित झाले होते.
१९४२ लव्ह स्टोरी रिलीज झाला तेव्हा पूर्ण भारतभर या सिनेमाच्या संगीताने धुमाकूळ घातला. सगळी गाणी सुपरहिट होती. आजही आहेत. त्यावर्षीचा बेस्ट संगीतकाराचे सगळे अवार्ड्स आरडीबर्मनच्या नावे होते.
पण हे यश बघायला आर डी बर्मन उरला नव्हता. १९४२लव्ह स्टोरी रिलीज होण्याच्या अगोदर काही महिन्यापूर्वी ४ जानेवारी १९९४ला वयाच्या चोपन्नाव्या वर्षी त्यांच निधन झालं होत.
हे ही वाच भिडू.
- संगीत जर धर्म असेल तर रफी त्याचा देव होता.
- नव्वदच्या कॅसेट युगावर राज्य करणारे ड्यूप्लीकेट सिक्के !
- बॉलीवूडने नुसरत फतेह अली खां साहेबांकडून चोरलेली गाणी !
- करियअरची सुरवात एका अपमानापासूनच होते, किशोरकुमारचं देखील तसंच झालं !