लाल किल्यावरुन निशाण साहिब फडकवणाऱ्याला ही संघटना देणार आहे अडीच कोटी रुपये
२६ जानेवारीच्या टॅक्टर परेड दरम्यान दिल्लीच्या लाल किल्यावरून दोन झेंडे फडकवण्यात आले. पैकी पहिला झेंडा होता तो शीख समुदायाचा निशाण साहिब हा. तर दूसरा झेंडा शेतकरी आंदोलनाचा होता.
मात्र काही लोकांनी हा झेंडा खलिस्तानवादी चळवळीचा असल्याची टुम सोडली. व्हिडीओ चित्रणात स्पष्टपणे निशाण साहिब हा शीख समुदायाचा पवित्र झेंडा दिसत असताना देखील हा खलिस्तानवादी झेंडाच असल्याचा दावा अनेकांनी केला.
याच दाव्यामध्ये आत्ता नंबर लावला आहे तो भारतात बंदी असणाऱ्या सिख फॉर जस्टिस या जहाल शीख संघटनेने. पाकपुरस्कृत मदत असणारी ही संघटना भारतात नेहमीच दुही माजवत असल्याची टिका होत असते.
तर याच संघटनेने आता दिल्लीच्या लाल किल्यावरून निशाण साहेब लावणाऱ्या व्यक्तीला जवळपास अडीच कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली आहे.
काय आहे ही सिख फॉर जस्टिस संघटना..?
अमेरिकेमधून या संघटनेचं संपूर्ण कामकाज चालवलं जातं. सतत तेढ निर्माण करण्यासाठी आणि भडकाऊ घोषणा करण्यासाठी ही संघटना जगभरामध्ये ओळखली जाते. त्यांच्या शेतकरी आंदोलनात सहभागी असल्याचा दाव्यावर देखील पहिल्यापासूनच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
सिख फॉर जस्टिस संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू. हा भारतामध्ये दहशतवादी म्हणून घोषित आहे.
झेंडा फडकवणाऱ्यासाठीच्या या बक्षिसाच्या रकमेची घोषणा त्याने एका व्हिडिओच्या माध्यमातून केली आहे.
या व्हिडिओमध्ये तो म्हणतो,
आम्ही प्रजासत्ताक दिनादिवशी लाल किल्ल्यावर झेंडा फडकवणाऱ्याला काही दिवसांपूर्वी २.५ लाख डॉलरची घोषणा केली होती, पण आम्ही आता ही रक्कम वाढवून ३.५ लाख डॉलर केली आहे. ‘राज करेगा खालसा’ मुळे आमची कमिटमेंट वाढली आहे.
लाल किल्ल्यावर निशान साहिब फडकवल्यानंतर पन्नूने आणखी एक व्हिडिओ प्रकाशित केला होता, ज्यामध्ये तो
जर पंजाबला स्वतंत्र खलिस्तान बनवायचं असेल तर संसदेवर देखील ताबा मिळवायला हवा आहे.
असं म्हणत होता.
दिल्ली पोलिसांनी सिख फॉर जस्टिस आणि पन्नूच्या विरोधात ८ जानेवारीलाच UAPA कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी पन्नूने इंडिया गेटवर केसरी झेंडा फडवणाऱ्याला २.५ लाख डॉलर देण्याची घोषणा केली होती. त्यानंतरच्या आठवड्यात त्याने हि घोषणा लाल किल्ल्यासाठी केली होती.
NIA ने याच महिन्याच्या सुरुवातीला सिख फॉर जस्टिसशी संबंधित शेतकरी नेते बलदेव सिंग सिरसा आणि अभिनेता दीप सिद्धू सोबत इतर २७ जणांना समन्स पाठवलं होतं.
यापूर्वी देखील पंजाब-हरियाणा सीमेवर शंभू टोल प्लाजावर खालिस्तानचा झेंडा फडकवणाऱ्याला १० हजार डॉलर देण्याची घोषणा केली होती.
खलिस्तानी चळवळीला चालना देणं हाच या संघटनेचा प्रमुख उद्देश आहे.
अमेरिकेमध्ये बनलेल्या या सिख फॉर जस्टिस संघटनेची स्थापना २००७ मध्ये झाली होती. त्यांचा मुख्य उद्देश हा पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तान बनवणे.
पंजाब विद्यापीठामधून ‘लॉ’ ची पदवी घेतलेल्या आणि सध्या अमेरिकेत वकील म्हणून काम करत असलेला गुरपतवंत सिंग पन्नू हाच या संघटनेचा जगभरातील चळवळीचा प्रमुख चेहरा आहे.
सिख फॉर जस्टिसने खलिस्तानी बनण्याच्या कॅम्पेनिंगला चालना देण्यासाठी मागाच्या वर्षीच रेफरेंडम २०२० चे आयोजन केलं होतं. आणि यात जगभरातील शीख समुदायातील लोकांना सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं.
भारतात या संघटनेवर बंदी आहे..
भारतात देशविरोधी कारवाया चालवण्याचा प्रयत्न करणे या आरोपाखाली २०१९ मध्येच केंद्रीय गृह मंत्रालयाने या संघटनेवर बंदी आणली आहे. UAPA अर्थात बेकायदेशीर कारवाई प्रतिबंधित कायद्याद्वारे ही बंदी आणली आहे.
गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार,
सिख फॉर जस्टिस संघटना पंजाबमधील लोकांची माथी भडकवण्याचा प्रयत्न करत असते. जगभरातून बऱ्याच देशातून खलिस्तानच्या मागणीसाठी वेगवेगळी अभियान चालवली जात आहेत. त्यात भारताची प्रतिमा डागाळण्याचा देखील प्रयत्न केला जात असतो. त्यामुळे या संघटनेवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.
कालच दिल्ली पोलिसांनी या संघटनेवर UAPA कायद्यांतर्गत आणखी एक गुन्हा दाखल केला आहे.
हे हि वाच भिडू.
- लाल किल्यावर फडकलेला झेंडा हा निशाण साहिब की खलिस्तानी..? काय आहे दोन झेंड्यातला फरक वाचा
- शेतकरी आंदोलनाच्या ट्रॅक्टरनां संरक्षण देणारे निळे शीख योद्धे कोण आहेत?
- दिल्लीतल्या आंदोलनात शेतकरी आहेत की खलिस्तानवादी..?