कोल्हापूरात छत्रपती शिवरायांना वंदन करुन हे दोघं सायकलवरून थेट दिल्लीत पोहचले.
कुठं थांबायचं, काय खायचं, रहायचं कसं याची कसलीच चिंता न करता पाठीला एक बॅग घेऊन ते दोघेही निघाले. आकाश बोकमुरकर आणि अनिकेत वाळवेकर दोघेही कोल्हापूरचे. शिवाजी विद्यापीठातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला नमस्कार करून त्यांनी सायकलची सफर सुरू केली.
थेट मार्ग न निवडता फेसबुकवरून जोडलेल्या मित्रांच्या भेटीगाठी घेत सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक, धुळे या मार्गाने ते महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात गेले. त्यांच्या या सायकल सफरीने जोडलेली माणसं आणि या प्रवासातून त्यांनी जे कमावलं ते यातून थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न.
फक्त एन्जॉय करण्यासाठी किंवा सायकल प्रवास म्हणून नाही तर जगणं म्हणजे काय आणि आय़ुष्याचा खरा आनंद असाही घेता येतो हेच आकाश आणि अनिकेतचा प्रवास पाहिला की समजतं.
वाटेत त्यांना कशानेच थांबवलं नाही. ना त्यांची जात आडवी आली ना धर्म, ना भाषा ना प्रांत. त्यांना पावलोपावली माणसांतली हरवत चाललेली माणसं भेटत गेली. या दोघांनीही पाठिवरचं ओझं आणि पुढचा प्रवास याची फिकीर न करता या माणसांना गोळा केलं आणि आपल्यासोबतच घेतलं म्हणायला हरकत नाही.
याच प्रवासात नित्यनेमाने आणखी एक गोष्ट यांनी केली ती म्हणजे रस्त्यावर ट्राफीक कंट्रोल करणारे असोत किंवा सफाई कर्मचारी करणेर त्यांना गुड मॉर्निंग म्हणायचं. घरातच नाही तर घराबाहेरही पावलोपावली आपल्यावर प्रेम करणारी माणसं भेटतात याची प्रचिती दोघांनाही आली.
दिल्लीत पोहचताच त्यांना देशाच्या सीमा ओलांडून भारतात आलेला ब्राझीलचा सायकलप्रेमी भेटला. त्याला भारत भ्रमण करायचं आहे. अशा सायकल वेड्याची भेट दिल्लीत झाली. एक व्हिडिओ शेअर केला आहे त्यात ब्राझीलचा रॉबेर्टोसुद्धा दोन गडी कोल्हापुरी म्हणतो. आता दोन दिवस दिल्ली फिरून दोघेही प्रजासत्ताक दिनी राजपथवर होणाऱा कार्यक्रम याची देही याची डोळा पाहणार आहेत. याच कार्यक्रमासाठी दोघांनीही कोल्हापूर-दिल्ली सायकल प्रवास केला.
महाराष्ट्रात फिरताना आपल्याच राज्यातले असले तरी कधीच न भेटलेले लोक आपुलकीने विचारपूस करत होते आणि पुढच्या प्रवासात काळजी घ्या असं म्हणत सकाळच्या बोचऱ्या थंडीत टाटा बाय बाय करायचे. चहा, खाणं-पिणं, राहणं यात दिल्लीत पोहोचेपर्यंत भेटलेल्या माणसांनी कसलीच कमी पडू दिली नाही.
आकाश आणि अनिकेत दोघांनीही सायकलला कोल्हापुरात जे पॅडल मारलं ते थेट दिल्लीत जाऊनच थांबवलं.
या प्रवासाने त्यांच्यातले लहान मुल, तरुण आणि जबाबदार नागरिक दिसले. एका ठिकाणी जेव्हा डिजे लागलेला दिसला तेव्हा ते डिजेच्या तालावर आपल्या पाठिवरच्या बॅगेसह थिरकतात तेव्हा खरंच आपणही असं कधी जगणार असा विचार मनात डोकावतो. त्यानंतर मथुरा, वृंदावनात गेल्यावर राधे राधे ऐकून प्रेमाच्या दुनियेत जातात. तेव्हा आकाशने मथुरेत यमुना तिरावर पोहचल्यानंतर एक फोटो शेअऱ केला आहे. त्याला दिलेला कॅप्शनही तितकाच समर्पक वाटतो. तो म्हणतो, स्वत:लाच कृष्ण समजणारी दोन प्रामाणिक पोरं कृष्णाच्या गावात.
मथुरेत जाण्याआधी त्यांनी आग्र्यात शिरोज कॅफेला दिलेली भेट खूप काही सांगून, शिकवून गेली. वयाच्या 15 व्या वर्षी असिड हल्ला झालेल्या शबनमची त्यांनी भेट घेतली. छपाक जिच्या जीवनावर आधारीत आहे त्या लक्ष्मी अग्रवालचा हा कॅफे, इथं असिड हल्ला झालेल्या मुली काम करतात. त्यातल्याच शबनमची भेट घेतल्यानंतरचा अनुभव सांगताना आकाश म्हणतो. जगातल्या सर्वात सुंदर स्त्रीची भेट घेतली. सुंदरता दिसण्यात नसून स्वत:च्या असण्यात आहे. इथं य़ेऊन बघाच तुमचं मन बहरून जाईल.
कोल्हापुरातून सायकल मारत इथंपर्यंत आल्याचं समाधान मिळालं.
कोल्हापूर ते दिल्ली सायकल प्रवासात राहण्याच्या ठिकाणचे मात्र भारी अनुभव आल्यात गड्यासनी. साताऱ्यात मित्राकडे मुक्काम केला. बऱ्याच दिवसांनी की महिने, वर्षांनी भेट झाली होती. कडकडून मारलेल्या मिठीने मैत्री आणि जुन्या आठवणी ताज्या केल्या.
अहमदनगरला येताना वाटेत राळेगणसिद्धीला थांबले. तिथं अण्णा हजारेंना जाऊन भेटले. अण्णांचे मौनव्रत सुरु असल्याने काही बोलणं आलं नाही पण सायकलवरून आलोय हे सांगताच जे काही स्मितहास्य केलं त्यातून उर्जा मिळाली असं दोघे म्हणतात. त्यानंतरचा मुक्काम साईबाबांच्या शिर्डीत होता. शिर्डी संस्थांनच्या बिल्डिंगमध्ये कमी खर्चात त्यांची राहण्याची सोय झाली.
खर्चाचा विषय आला म्हणून तर या प्रवासात त्यांना गाडी भाड्याचा काय खर्च नव्हता. पण जाताना खाणं-पिणं आणि इतर काही खर्च आलाच तर त्यासाठी जाण्याआधी मोजक्या मित्रांकडून पैसे घेतले होते. त्यातही तुम्हाला जितके द्यायचे तितकेच. अनेकांनी हक्काने दिले. आकाशने याबाबत एक अनुभव सांगितला. खरंतर तो सगळा अनुभव जसाच्या तसा सांगणं त्याला आवडणार नाही पण तरीही. एका वयस्क माणसाने त्याला पैसे पाठवले. फेसबुकवर पोस्ट वाचल्यानंतर मेसेज केला होता त्यांनी. पैसे पाठल्यानंतर ते म्हणाले की, जे आम्हाला करता आलं नाही ते तु करतोयस. तुला शुभेच्छा.
मंदीर, गुरुद्वारा इथं तर थांबलेच पण शिवपुरीत एका धाबेवाल्याला विचारलं की, इथं मोठं मंदिर कुठं आहे का राहण्यासाठी. त्यावर त्याने मंदिर कशाला इथंच थांबा असं सांगितलं. देवाच्या मंदिरात नाही पण माणसाच्या या मंदिरात त्यांच्या एका रात्रीच्या निवाऱ्याची सोय झाली.
प्रवासात अनेकवेळा सायकल नादुरुस्त झाली. त्यात एक दुरुस्त केलं की दुसरं बिघडायचं असंही सुरू होतं. आकाश आणि अनिकेत दोघेही कवी मनाचे असल्यानं त्यांचा संवादही थोडा कवितेच्या भाषेतच. भेटले तरी यांची बोलण्याची भाषा कवितेतच यमक जुळवून. सायकलचं पंक्चर काढण्याची प्रोसेस आणि आयुष्यातल्या अडचणी दुर करण्याची धडपड अनिकेतने सांगितली आहे. तो म्हणतो, मला आज कळलं, आयुष्याला कितीही भोकं पडली तरी दु:खाचं पंक्चर काढून आनंदाचं सोल्यूशन लावायचं..मग जिंदगीची सायकल भन्नाट पळते…
साधं सरळ आयुष्य जगताना त्यातल्या अडचणींवर आनंदाने मात करायला शिकलं पाहिजे हे त्यानं पंक्चर काढताना हात काळे झाल्याचा फोटो शेअऱ करताना लिहलंय. खरंतर त्यांनी या प्रवासातून अजुन बरंच काही मिळवलंय. ते एवढ्याशा लेखन प्रपंचात मावणारं नाही.
नाशिकपासून वरती गेल्यानंतर थंडीचा कडाका वाढला. उत्तरेत गेल्यावर दोघेही म्हणतात की, तुमच्याकडं गुलाबी थंडी असेल पण इकडं मरणाची थंडी आहे. थंडीचं थोडक्यात पण यथार्थ वर्णन या एका वाक्यातून त्यांनी केलं.
मध्य प्रदेशात इंदौर-उज्जैन रस्त्यावर एका सायकल प्रेमी माणसाने यांना थांबवलं. उज्जैन शहरात बुलेचं शोरूम असूनही हा माणूस मात्र सायकल चालवतो. जेव्हा कोणी सायकल राईडवर जाणारा भेटतो त्याचा पाहुणचार केल्याशिवाय सोडत नाही. या भेटीनंतर आकाश म्हणाला की, आपण कधी शेजाऱ्यालाही विचारत नाही आणि या माणसाने तर रस्त्यावरच्या माणसाला घरात घेतलं.
माणसांनीच नाही बरं का नेटवर्क कंपनीनेसुद्धा यांचं स्वागत केलं.
जगण्याचा आनंद शोधत, माणसं जोडत दोन गडी कोल्हापुरी आज सायकलने दिल्लीत पोहोचलेत. या प्रवासात त्यांनी भाषा, प्रांत, जात, धर्म या सगळ्या सीमा ओलांडल्या. त्यांना प्रवासात माणसं भेटली आणि त्या माणसांनी शिकवलं. खरा आनंद काय तो या प्रवासात उपभोगला. आपल्या नेहमीच्या लोकांमधून जेव्हा बाहेर पडतो तेव्हा जे जग भेटत ते खरं असतं. आपल्याला बघायला आणि जगायला शिकवतं. नवी उमेद, दिशा देतं. हाच जगण्याचा आनंद मिळवण्यासाठी 3 जानेवारीला कोल्हापुरातून दोन रांगडे गडी दिल्लीकडे निघाले. जाताना सोबतीला एकच बॅग घेतलेल्या या दोघांनी प्रवासात मात्र आयुष्यभर पुरेल इतकं जमा केलंय.
हे ही वाच भिडू.
- हरवलेल्या सायकलीनं त्याला शतकातला महान बॉक्सर बनवलं !
- साखर सम्राटांच्या नगर जिल्ह्यात एक सायकलवरून फिरणारा आमदारदेखील होता !
- गाड्यांच्या गर्दीत सायकल दिसली आणि लयभारी वाटलं.
- हा मराठी पोरगा महात्मा गांधींना सायकलवरून चीनला घेवून गेला होता.
- सायकल चालवून मी घरखर्चातले तब्बल दोन लाख रुपये वाचवलेत : अभिजित कुपटे
खूप छान लिहिलं आहे आपण