रुपया घसरल्यामुळे पाकिस्तानची वाटचाल आता डबघाईस्तानकडे सुरू आहे
सध्या पाकिस्तान अवघड परिस्थितीतून जातोय. पाकिस्तानी रुपयाची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. २०२१ मध्ये पाकिस्तानी रुपया जगातील सर्वांत वाईट कामगिरी करणाऱ्या चलनांपैकी एक होताच. व आता या पाकिस्तानी रुपयाने वाईट कामगिरीच्या परिसीमाच ओलांडल्या आहेत.
२०२१ च्या सुरुवातीपासून पाकिस्तानी रुपयामध्ये १२ टक्क्यांहून अधिक आणि मे च्या मधात १५२.५० डॉलरच्या निचांकी पातळीवर १७ टक्क्यांहून अधिक घसरण झाली होती. त्यातच आता पाकिस्तानात करन्सी एक्सचेंज क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांवर सरकारकडून विदहोल्डिंग टॅक्स लावण्यात आलाय. त्यामुळे आता एक डॉलरची किंमत २०० रुपयांपर्यंत जाऊ शकते, असा अंदाज एक्सचेंज कंपन्यांनी वर्तवला आहे.
पण सरकारने ही शक्यता फेटाळून लावली आहे. पाकिस्तानी सरकार आजवर अशा बऱ्याच शक्यता फेटाळून लावल्या असल्या तरी ते गंडले आहेत हे वेळोवेळी दिसलय. सध्या एका अमेरिकन डॉलरची किंमत पाकिस्तानात १७५ रुपयांच्या आसपास आहे.
मे २०२१ मध्ये पाकिस्तानी रुपया डॉलरच्या तुलनेत १५२ रुपये इतका होता. पण मागच्या काही दिवसांमध्ये अफगाणिस्तानात डॉलर स्मगलिंगच्या कारणामुळे पाकिस्तानी रुपयाचा भाव घसरायला लागला. डिसेंबर महिन्यात पाकिस्तानी रुपया १७८ च्याही पुढे गेला होता. आता याचा परिणाम पाकिस्तानातल्या वस्तू आणि सेवांवर झाला.
साहजिकच पाकिस्तानचा महागाईस्तान झाला.
आता पाकिस्तानातला महागाईचा दर पण जेव्हा कमाल पातळीपर्यंत जाऊन पोहोचला तेव्हा ही वाटचाल डबघाईस्तानकडे सुरू आहे असं वाटतंय. पाकिस्तानात आयातीमुळे वित्तीय तूट वाढत चालल्याचं दिसून येतंय. तसंच चालू खात्याचा तोटाही वाढत चालला आहे. परिणामी देशाच्या अर्थव्यवस्थेत असंतुलितपणाचं लक्षण दिसून येत आहे.
इम्रान खान सरकारने नुकतच पाकिस्तान आणि IMF दरम्यान एक करार करत त्यांच्याकडून एक अब्ज डॉलरचा निधी मिळवण्यासाठी सभागृहात मिनी बजेट सादर केलं होतं.
त्यानंतर IMF कडून पाकिस्तानला निधी मिळाला. त्यामुळे पाकिस्तानला असं वाटलं की बाकीच्या आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्थां सुध्दा पाकिस्तानला फंडींग करतील. पण तसं काही घडलंच नाही.
त्यामुळे पाकिस्तान सरकारने एक्सचेंज कंपन्यांवर १६ टक्के दराने विदहोल्डिंग टॅक्स लावला. अर्थमंत्र्यांचे प्रवक्ते मुजम्मील अस्लम यांनी यासंदर्भात बोलताना म्हटलं की संबंधित नोटीस ही २०१४ ते २०१६ दरम्यानच्या व्यवहारांवर लागू करण्यात आली आहे.
मागे जेव्हा अशीच परिस्थिती होती तेव्हा आर्थिक विश्वात अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या न्यूज पोर्टल ब्लूमबर्गनं पाकिस्तानी रुपया हे आशिया खंडातील सर्वांत कमकुवत चलन म्हणून घोषित केलं होत.
हे ही वाच भिडू:
- ऑक्सफर्डमधल्या निवडणुकीत इम्रान खाननं अध्यक्षपदासाठी बेनझीर भुट्टोंचा प्रचार केला होता
- तीन बेगम और एक प्लेबॉय उर्फ इम्रान खान
- पाकिस्तान पुढे नवीन प्रॉब्लेम झालाय. देशातलं गव्हाचं पीठच संपलंय..