२००४ मध्ये चालून आलेलं मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीने का सोडलं होतं?
राष्ट्रवादी काँग्रेचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकतंच एक विधान केलं आहे, ज्याने २०२४ मध्ये कुठल्या पक्षाला मुख्यमंत्री पदाचा मान मिळणार? याच्या चर्चा रंगल्या आहेत.
२०२४ च्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला राज्यात सर्वात मोठा पक्ष बनवायचं ध्येय असून त्यासाठी जास्तीत जास्त आमदारांना निवडून आणून ती भेट म्हणून शरद पवार यांना द्यायची आहे, असं आवाहन जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. मात्र याला त्यांनी २००४ च्या निवडणुकांची पार्श्वभूमी दिली आहे.
२००४ हे असं साल होतं जेव्हा विधानसभेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या ७२ वर पोहोचली होती. तेव्हा मुख्यमंत्री करण्याची संधी पक्षाकडे चालून आली होती मात्र आघाडीत एकत्रित काम करूयात, सर्वांना बरोबर घेऊयात म्हणून ती संधी राष्ट्रवादीने सोडून दिली होती. आता मात्र असं होता कामा नये, असं जयंत पाटील म्हणालेत.
त्यांच्या या वक्तव्यावरून असा प्रश्न पडतोय – २००४ साली नेमकं असं काय झालं की, आमदारांच्या बाबतीत झुकतं माप असतानाही राष्ट्रवादीने मुख्यमंत्री पदासाठी माघार घेतली?
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे राजकीय डावपेच यामागचं मुख्य कारण असल्याचं सांगण्यात येतं. राष्ट्रवादीने कमी जागा लढवून देखील काँग्रेसपेक्षा २ जागा जास्त निवडून आल्या होत्या. चित्र स्पष्ट होतं की, पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा होणार. मात्र शरद पवार यांनी निवडणुकीच्या पूर्वीच घोषित केले होते की, कुणाचेही आमदार जास्त निवडून येवोत, मुख्यमंत्री काँग्रेसचाच होणार.
नेमकं तेव्हा काय राजकीय खेळी झाली हेच जाणून घेण्यासाठी बोल भिडूने ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले की, १९९५ च्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या युतीने बाजी मारली होती. त्यावेळी भाजपने शिवसेनेला मुख्यमत्री पद दिलं आणि इतर अनेक महत्त्वाची मंत्रीपदे स्वतःच्या ताब्यात घेतली. ज्यामुळे पक्षाच्या गावपातळीवरील संबंध सुदृढ झाले आणि पक्षाचा विस्तार झाला. हाच हेतू डोळ्यांसमोर ठेवून शरद पवारांनी २००४ साली मुख्यमंत्री पद सोडलं आणि इतर अधिकची मंत्रीपदं पारड्यात पाडून घेतली.
चांगली महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडे आली होती आणि जर मुख्यमंत्री पद स्वीकारलं असतं तर पक्षाला सगळी काँग्रेसकडील दुय्यम खाती घ्यावी लागली असती. जनतेशी थेट संबंध असणारी मंत्रिपदं कायम उपयोगाची असते म्हणून त्यांनी मंत्रिपदं निवडली. इतकंच काय तर २००९ साली देखील त्यांनी ती पदं सोडली नाही.
आता इतकंच कारण नसून अजून एक कारण म्हणजे पक्षात मतभेद होणं टाळणं.
२००४ साली राष्ट्रवादीत भरपूर तरुण नेते होते. छगन भुजबळ, आर. आर. पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, सुनील तटकरे, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, अजित पवार, राजेश टोपे असे अनेक. त्यातही बरेच मुख्यमंत्री पदासाठी पात्र होते. तरुण नेते असले तर संधी मिळावी म्हणून त्यांच्यात पदासाठी लढत होणार ज्याने पक्षात फूट पडू शकते, हेच शरद पवारांनी हेरलं होतं. त्यातही अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाची शक्यता जास्त होती. म्हणून त्यातून त्यांनी ही वाट काढली होती.
अशाप्रकारे जास्त खाती आणि जास्त मंत्रिपदं निवडत शरद पवारांनी पक्षाची एकी मजबूत ठेवली आणि पक्षाचा विस्तार केला. एका वाराने दोन निशाण उक्तीचा वापर करत शरद पवारांनी २००४ साली केला होता.
याच घटनेची आठवण सध्या मंत्री जयंत पाटील यांनी करून दिली आहे. २०१९ ला महाविकास आघाडीचं सरकार आलं मात्र तेव्हाही अजित पवारांची संधी गेली. आता परत २०२४ साल येत असताना निवडणुकांचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे, याची प्रचिती जयंत पाटील यांनी दिली आहे. ५ वर्ष आघाडी सरकार चालवल्यानंतर २०२४ ची खेळी काय असणार? हे तर येणारा काळ सांगेल मात्र राष्ट्रवादीने तयारी सुरु केलेली दिसतेय.
जयंत पाटील यांनी २०२४ ला महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी उदयास यावी, असं आवाहन कार्यकर्त्यांना केलं आहे. म्हणूनच त्यांनी काही तरी प्लॅन केलेलं आहे, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
हे ही वाच भिडू :
- दरवेळी विरोधक कंबर कसतात आणि दरवेळी जयंत पाटील हिशोब चुकता करतात..
- गोव्यात ममता दीदींनी जे करुन दाखवलं ते एवढ्या वर्षात राष्ट्रवादी आणि सेनेला का जमलं नाही ?
- शरद पवार आणि भाजप नेत्यांच्या भेटीचं टायमिंग हा योगायोग असतो की दबावतंत्र?