गृहमंत्री म्हणत होते आयपीएल रद्द करा, मोदी म्हणाले संपूर्ण स्पर्धा गुजरातमध्ये घेऊन दाखवतो

भारतात जितक्या उत्साहात सणउत्सव साजरे होतात तितक्याच जल्लोषात राजकारण आणि आयपीएलचे सामने पार पडतात. राजकारण आणि आयपीएल यांचं गारुड भारतीयांच्या मनावर आजही तसंच आहे. आवडते खेळाडू आणि आवडते राजकारणी यांच्यासाठी अक्षरशः जीव घेण्याइतकी मजल आपल्या लोकांची आहे.

सध्याचा कोरोना काळात बाकी सगळं लॉक डाऊन होत आहे पण आयपीएलला खीळ बसलेली नाही. यामागे फक्त क्रिकेटचं प्रेम इतकंच नाही तर बरीच आर्थिक कारणे देखील आहेत. अनेक विचारवंत विरोधक सध्याची आयपीएल रद्द करा अथवा मागच्या वर्षीप्रमाणे अन्यत्र खेळावा म्हणून मागे लागले आहेत.

असाच वाद २००९ साली देखील झाला होता. त्यावेळची आयपीएल स्पर्धा हि भारतात खेळवण्याऐवजी साऊथ आफ्रिकेत खेळवली गेली होती. निवडणूका आणि आयपीएलचे सामने यावरून राजकीय नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली होती. नक्की काय मॅटर झाला होता बघूया…

भारतात २००९ साली आयपीएलचा दुसरा हंगाम आणि भारतातील सार्वत्रिक निवडणूका अशी एकच गाठ पडली होती. २६/११ चा मुंबई वरील महाभयंकर अतिरेकी हल्ला झालेल्याला जास्त दिवस उलटले नव्हते. अशातच  मार्च २००९ च्या दरम्यान लाहोरमध्ये श्रीलंकेच्या खेळाडूंवर झालेला हल्ला हि क्रिकेट क्षेत्रात हाहाकार आणि धडकी भरवणारी बातमी होती.

निवडणूक आणि आयपीएल यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा बघता भारत सरकारच्या निमलष्करी दलाने सुरक्षा देण्यास नकार दिला होता. जवळपास पन्नास हजार जवान या सामन्याच्या आयोजनासाठी गुंतून पडणार होते. सरकारने स्पष्ट शब्दात याला नकार दिला.

अखेर बीसीसीआयने आयपीएलचं दुसरं सत्र हे आफ्रिकेत खेळवण्याचा निर्णय घेतला. परदेशात खेळाडूंनी खेळावं याबाबतीत सगळेच साशंक होते.

भारतातील क्रिकेटची क्रेझ हि सगळ्या जगाला माहिती आहे. आयपीएलचे सामने, लाखोंच्या संख्येने येणारे प्रेक्षक, खेळाडूंना सपोर्ट करण्यासाठीच्या आरोळ्या इतकं प्रचंड वेड भारतातल्या प्रेक्षकांना आहे. या सगळ्यांमधून होणारी आर्थिक उलाढाल, याचा अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम, सट्टाबाजार अशा अनेक गोष्टी आयपीएलवर चालतात.

आयपीएल परदेशात खेळवणार यावरून वादंग निर्माण झाला, आयपीएल संघमालकांनी आणि प्रेक्षकांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली.

Lalit Modi

तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयपीएल खेळवण्यास मंजुरी देण्यास तयार नव्हते. या आणीबाणीच्या प्रसंगात आयपीएल सारख्या स्पर्धेवर होत असलेली उधळण त्यांना पसंत नव्हती.  बीसीसीआयला त्यांनी हि स्पर्धा रद्द करा किंवा पुढे ढकला अशा सूचना केल्या. त्यांनी सांगितले कि

श्रीलंकेतील खेळाडूंवर झालेला लाहोर हल्ला हा ऐन निवडणुकीच्या तोंडावर भारतात घुसू नये याची आम्हाला चिंता वाटत होती त्यामुळे आम्ही स्पर्धा पुढे ढकलण्यास सांगितली. राजकारण आणि क्रिकेट हे दहशतवाद्यांना उत्पन्न देणारं साधन आहे म्हणून आम्ही खेळाडूंच्या सुरक्षेचा विचार करून हा निर्णय घेतला.

चिदंबरम यांचा सुरक्षेच्या कारणास्तव क्रिकेटला तीव्र विरोध होता असंही त्यांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं होतं.

पी. चिदंबरम यांचं हे वाक्य राजकीय वादाला तोंड फोडण्यास कारण ठरलं.

यावर भारतीय जनता पक्षाचे नेते असलेले नरेंद्र मोदी यांनी दिलेली प्रतिक्रिया चांगलीच गाजली, चिदंबरम याना त्यांनी उत्तर दिल कि, गृहमंत्री चिदंबरम यांनी जगभरात लोकांमध्ये अशी भावना निर्माण केली होती कि भारत खेळातील स्पर्धेसाठी सुरक्षित स्थळ नाही. २०१० साली होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेपूर्वी ते जगाला चुकीचा संदेश पाठवत आहे.  भारतातून आयपीएल हटवणं हि गोष्ट नॅशनल शेम आहे असं मोदींनी ठणकावलं. चिदंबरम यात राजकारण घुसवत आहे हेही तितकंच उघड आहे.

प्रश्न जर सुरक्षेचाच असेल तर आयपीएल स्पर्धा हि गुजरातमध्ये भरवा, सगळी सुरक्षा आम्ही पुरवू अशी ऑफर सुद्धा त्यांनी दिलेली.

महाराष्ट्र आणि दिल्ली वगळता इतर राज्यांनी निवडणूक आणि आयपीएल यांचा योग्य ताळमेळ राहील असं नियोजन करा म्हणून पत्रे पाठवली होती. या सामन्यांच्या वेळापत्रकात काही बदल करण्याची तयारी दर्शविली होती. आयपीएलने सरकारला सादर केलेल्या अंतिम वेळापत्रकात सर्व बदल करण्यात आले होते.

आयपीएलचे आयोजक ललित मोदी  तीन वेळा कामाचे वेळापत्रक घेऊन येण्यास तयार झाले पण त्यांना सरकारकडून कोणताही स्पष्ट प्रतिसाद मिळाला नाही. असे दिसते आहे की गृहमंत्री सुरुवातीपासूनच या स्पर्धेसाठी उत्सुक नव्हते. तारखांची घोषणा करण्यापूर्वी आयपीएलने मंत्रालयाशी सल्लामसलत केली नाही, या कारणावरून त्याचे हेळसांड झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांना वाटले की आयोजक सरकारला गृहीत धरत आहेत. असाही आरोप चिदंबरम यांच्यावर करण्यात आला होता.

त्यावेळी निवडणूक आयोगाने सांगितलेल्या सक्तीच्या सुरक्षेसाठी २१ लाख सुरक्षा कर्मचारी लागणार होते. आयपीएल सामन्यांसाठी देशभरातील मैदानांचा आणि सुरक्षेचा विचार करता ५ लाख सुरक्षा कर्मचारी आवश्यक असतात. आयपीएलने जर खाजगी सुरक्षा दलाची नेमणूक मान्य केली तर बरेच प्रश्न मार्गी लागतील पण तितका वेळ नसल्यामुळे आणि राजकारणामुळे ते शक्य नाही असंही मत गृहमंत्रालयाने दिलं.

निवडणुकीशी संबंधित राजकारणामध्ये अडकलेल्या इंडियन प्रीमियर लीगने शेवटी दक्षिण आफ्रिकेत प्रवेश केला. राजकारणामुळे भारताला बराच आर्थिक तोटा झाला, बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेतून भारतात थेट सामना प्रदर्षित करण्यासाठी तब्बल २ अब्ज डॉलर्सच्या करारावर स्वाक्षरी केली.

download 9

दक्षिण आफ्रिकेत मात्र आयपीएलच दणक्यात स्वागत झालं. सगळ्या टीमची तिथे परेड काढण्यात आली. ललित मोदी एखाद्या सम्राटासारखे या परेडमध्ये वावरत होते. भारतातून लोकांनी टायमिंग ऍडजस्ट करत हे सामने बघितले. या पर्वाचे विजेते डेक्कन चार्जर्स ठरले. ललित मोदींनी जिद्दीने भारताबाहेर देखील आयपीएल यशस्वी करून दाखवली.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.