एकदा तर क्रिकेटच्या मॅचमुळे महाराष्ट्राचा अर्थसंकल्प गुंडाळण्यात आला होता…

गोष्ट आहे २०११ सालची.

२३ मार्च ला महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. आता त्याच्यावर चर्चा आणि प्रश्नोत्तरे सुरु झाली. बुधवारी ३० मार्चला अर्थसंकल्पावरील चर्चेचा दुसरा व अखेरचा दिवस होता. अर्थमंत्री विधानसभेत आणि अर्थराज्यमंत्री विधानपरिषदेत सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणार होते.

पण त्या दिवशी जरा वेगळीच गडबड सुरु होती.

तो दिवस सगळ्या भारतीयासाठी महत्वाचा होता. कारण भारत पाकिस्तान मध्ये होणारा वर्ल्ड कपचा सेमी फायनल त्याच दिवशी होता.  

झाल अस होतं हा क्रिकेट वर्ल्ड कप भारतात होत होता. एकतर भारत पाकिस्तान सामने २६/११ नंतर बंद झाले होते. खूप वर्षांनी या दोन्ही टीम अमोरासमोर येत होत्या आणि तेही वर्ल्डकप सेनीफायनल साठी म्हटल्यावर आधीच तापलेलं वातावरण स्फोटक बनलं होतं.

शाळेत जाणाऱ्या पोरांना पोटात दुखायला डोक्यात दुखायला सुरवात झाली होती. लहान मुलेच काय निम्मा भारत सुट्टीवर गेला होता. पाकिस्तानने तर टेन्शन नको म्हणून सरकारी सुट्टी जाहीर केली होती. दोन्ही देशाची मिडिया तापलेली होती. राष्ट्रभक्तीचा चेव आला होता.

क्रिकेटच्या चर्चेमध्ये निवृत्त सेनाधिकारीसुद्धा तावातावाने भारताने सामना जिंकला पाहिजे असं सांगताना दिसत होते.

असा सगळा देश क्रिकेटच महायुद्ध साजरा होता आणि बिचारे महाराष्ट्राचे आमदार अर्थसंकल्पासारख्या बोरिंग विषयावर चर्चा करणार होते.

विधीमंडळात सगळ्या आमदारांनी आदल्या दिवसापासून फिल्डिंग लावली. नेहमी अर्थसंकल्पीय चर्चा विधानसभेत ११ वाजता सुरु होते आणि विधानपरिषदेत १२ वाजता. सगळ्यांना लवकर घरी जाता यावं म्हणून ती चर्चा १ तास आधीच घ्यायचं ठरलं.

मॅचच्या दिवशी तर विधानभवनातही अगदी क्रिकेटमय वातावरण झाल होतं. कॉंग्रेसचे निलेश पारवेकर आणि भाजपचे आमदार जयकुमार रावल हे दोघे थेट क्रिकेटची जर्सीच घालून आले होते.

काही आमदारांनी थेट सुट्टी मारली होती. यात प्रमुख होते सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ. 

ते त्यांचे पुत्र पंकज भुजबळ आणि विधान परिषदेतील भाजपचे आमदार विनोद तावडे मंगळवारीच मॅच बघण्यासाठी मोहालीला रवाना झाले होते.

जे हजर होते त्यांना देखील अर्थसंकल्पाच्या चर्चेत विशेष रस नव्हता. सगळेजण मॅचचा निकाल काय लागणार याचीच चर्चा करत होते. काही वेळातच विधानसभेतील चर्चा आवरती घेण्यात आली. अर्थमंत्र्यांना उत्तर देण्याचा वेळच मिळाला नाही.

कधी नव्हे ते सगळ्या पक्षाचे आमदार एकत्र आले आणि सर्वानूमते अर्थमंत्र्याच उत्तर दुसऱ्या दिवसावर ढकलण्यात आलं.

बरोबर १ वाजता विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील सभागृहाबाहेर आले. तेव्हा काही तरुण आमदारांनी त्यांच्याभोवती कोंडाळे केले. गुंडाळी केलेल्या कागदांचा माईक करून त्यांच्यासमोर धरून गंमतीदार प्रश्न विचारण्यात आला.

“साहेब मॅच कोण जिंकणार?”

इकडे बाकीचे आमदार मॅच पाहण्याची वेळ चुकेल म्हणून गडबडीत विधान भवनाबाहेर सटकताना दिसत होते. अजून विधानपरिषदेची चर्चा बाकी होती. तिथल्या आमदारांच्यात तर वेगळाच जोश आला होता.

चर्चेवेळी सगळे आमदार क्रिकेटच्या भाषेत बोलत होते.

तेव्हा भाजपचे असलेले आमदार धनंजय मुंडे यांनी तर सुरुवाती पासून क्रिकेटिंग भाषेत टोलेबाजी सुरु केली. त्यांचं आधी भाषण केलेल्या राष्ट्रवादीच्या हेमंत टकले यांच्याबद्दल ते म्हणाले की,

‘‘टकले साहेबांचे वक्तृत्व चांगले होते. मात्र खराब मैदानावर एखाद्या कसलेल्या खेळाडूला आपले कसब दाखवताना जी कसरत करावी लागते, ती टकले यांना करावी लागत होती.’’

धनंजय मुंडे यांच पुढचे टार्गेट होते काँग्रेसचे भाई जगताप. त्यांच्याकडे बघून ते म्हणाले,  

‘‘भाईंचीही तशीच अवस्था झाली होती. अर्थसंकल्पात सांगण्यासारखे काही नसल्यामुळे भाईंना हातवारे करण्यावरच जास्त भर द्यावा लागला होता. शेवटी मात्र त्यांनी चांगले मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे एखाद्या खेळाडूने नो बॉलवर षटकार मारावा, तशी फलंदाजी त्यांनी केले.’’

मुंडे यांच्या बोलण्यात क्रिकेटचेच संदर्भ जास्त येऊ लागले तेव्हा उपसभापती वसंत डावखरे यांनी मिश्किल प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले,

‘‘तुम्ही अर्थसंकल्पावरील भाषण करत आहात की क्रिकेटची कॉमेंट्री?’’

त्यांच्या बोलण्यावर सभागृहात एकच हशा पिकला. एकंदर बुधवारचा दिवस अर्थसंकल्पाच्या चर्चेपेक्षा फक्त क्रिकेट आणि क्रिकेटचाच ठरला.

सुदैवाने भारताने अटीतटीची रंगलेली ती मॅच जिंकली आणि फायनलमध्ये प्रवेश मिळवला.

  • संदर्भ – http://rahibhide.blogspot.com

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.