नऊ मिनिटांत सलग तीन बॉम्बस्फोटांनी धावत्या मुंबईला हादरवलं होतं..

जेरी पिंटो नामक लेखक मुंबईच वर्णन करताना म्हणतो,

या शहराचा प्रत्येक सुनासुना कोपरा स्वतःमध्येच एक गर्दी आहे. जग जसं चालतं ना त्यात एका मिनिटासाठी जरी का डिसरप्ट झालं तर ती गर्दी बघायला मिळते. आणि जशा प्रकारे ही गर्दी जमते तशाच पद्धतीने ही गर्दी विरळ विरळ होत जाते.

अशीच चोवीस तास पळणारी मुंबई याच दिवशी याच रात्री स्तब्ध झाली होती. १३ वर्षांपूर्वी,

या दिवशी म्हणजेच १३ जुलै २०११ ला सायंकाळी ६ वाजून ५४ मिनिटांपासून ते संध्याकाळच्या ७ वाजून ६ मिनिटांपर्यंत अवघ्या ९ मिनिटांत मुंबई बॉम्बच्या धमाक्यांनी हादरली होती. मुंबईत तीन वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. हे स्फोट ओपेरा हाऊस, झवेरी बाजार आणि दादर पश्चिमच्या भागात घडले. या स्फोटांमध्ये २६ जणांचा मृत्यू तर १३० हुन अधिक लोक गंभीररित्या जखमी झाले होते.

सुरुवात दक्षिण मुंबईच्या झवेरी बाजार मधल्या खाऊ गल्लीपासून झाली होती. हे झवेरी बाजार मारवाडी कचोरीपासून ते दागिन्यांच्या दुकानांसाठी प्रसिद्ध आहे. इथं स्फोट घडवण्यासाठीचं डिव्हाइस मोटरसायकलवर बसवलेलं होत. स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी हा स्फोट झाला.

बॉम्बस्फोट झालेल्या ठिकाणी हजर असलेला व्यक्ती सांगतो,

खूप मोठ्यानं आवाज आला. पहिल्यांदा तर आम्हाला वाटलं कुठंतरी आग लागली असावी. पण आगीच्या हिशोबात धूर खूपच जास्तच होता. नंतर आमच्या लक्षात आलं कि, हा बॉम्बब्लास्ट होता. जवळजवळ २० लोक रस्त्यावर पडले होते. दोन तीन लोकांचे पाय तुटले होते.

त्यानंतर चर्नी रोडवरील ओपेरा हाऊस परिसरातील प्रसाद चेंबर्स आणि पंचरत्न इमारतीच्या बाहेर बरोबर ६ वाजून ५५ मिनिटांनी टिफिन बॉक्समधला बॉम्ब फुटला. डायमंड-ट्रेडिंग उद्योगाशी संबंधित ५००० ते ६००० लोकांच्या गराड्यात असणाऱ्या या भागात स्फोट झाला होता.

इथला प्रत्यक्षदर्शी म्हणतो,

धमाका बाजाराच्या मध्यवर्ती भागात झाला. इथं जगातला सर्वात मोठा हिऱ्यांचा बाजार आहे. या भागातल्या रस्त्यांवर पण बरीच गर्दी असते. ही गर्दी इतकी असते की, बायका या रस्त्यावरून जाणं टाळण्याचा प्रयत्न करतात. मला हे सांगताना पण हैराणी होणार नाही कि, या रस्त्यावर करोडो हिरे पावसाच्या पाण्यासोबत गटारात वाहून गेले असतील.

तिसरा बॉम्बस्फोट दादर परिसरातील कबुतरखान्याजवळ झाला. या स्फोटाचं डिव्हाईस डॉ. अँटोनियो दा सिल्वा हायस्कूल बेस्ट बसस्थानकात विद्युत खांबावर ठेवण्यात आलं होतं. बरोबर ७ वाजून ६ मिनिटांनी हा  स्फोट झाला.

स्फोटानंतर लगेचच फोनच्या लाईन्स जॅम करण्यात आल्या. दिल्ली, चेन्नई, हैदराबाद आणि बंगलोरसह इतर महानगरांमध्ये हायअलर्ट जाहीर करण्यात आला.

गृह मंत्रालयाने बॉम्बस्फोटाचे अतिरेकी कृत्य म्हणून वर्गीकरण केले. आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) पथक बॉम्बस्फोटाच्या ठिकाणी पाठवण्यात आले. स्फोटांमध्ये आयईडी स्फोटके वापरली असल्याचं तपास यंत्रणांच्या लक्षात आले.

१५ जुलै २०११ रोजी एनआयएची एक टीम २००८ च्या अहमदाबाद बॉम्बस्फोटां प्रकरणी गुन्हे शाखेने अटक केलेल्या संशयिताला भेटण्यासाठी अहमदाबादला गेली. १६ जुलै रोजी फॉरेन्सिक रिपोर्ट्सच्या आधारे हा हल्ला करणारा आत्मघातकी हल्लेखोर असण्याची शक्यता नाकारली गेली.

४ ऑगस्ट रोजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी स्फोटांमध्ये देशांतर्गत दहशतवादी संघटना सामील असल्याचे संकेत दिले. ९ ऑगस्ट रोजी झवेरी बाजार स्फोटात वापरलेली दुचाकी चोरल्याचा दावा करणाऱ्या संशयितास अटक करण्यात आली. स्फोट झालेल्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेजमध्ये कोणीतरी स्कूटर ठेऊन पळून जाताना दिसले.

२३ जानेवारी २०१२ रोजी मुंबई पोलिसांनी बॉम्बस्फोटाचा खटला उलगडल्याचा दावा केला.  यात त्यांनी नकी अहमद वसी अहमद शेख (वय २२) आणि नदीम अख्तर अशफाक शेख (वय २३) या दोन संशयितांना अटक केली.

पुढील तपासात भायखळा येथे राहणाऱ्या वकास आणि तबरेज नावाच्या दोन पाकिस्तानी हल्लेखोरांनी १८ सिमकार्ड आणि सहा हँडसेट वापरल्याची माहिती समोर आली आहे. दोघांनाही सह-आरोपी नकी अहमद कडून सिमकार्ड मिळाली होती. त्यानंतर त्यांनी या स्फोटांमध्ये आपण सहभागी असल्याचं कबूल केलं. तसेच इंडियन मुजाहिद्दीनचा संस्थापक सदस्य यासीन भटकळ बरोबर काम केल्याची कबुली पण दिली.

२५ मे २०१२ रोजी महाराष्ट्र एटीएसने अटक केलेल्या नकी अहमद, नदीम शेख, कंवर पथरीजा आणि हारून नाइक यांच्याविरूद्ध आरोपपत्र दाखल केले. याव्यतिरिक्त इंडियन मुजाहिद्दीनचा मुख्य सूत्रधार यासीन भटकळ आणि इतर संशयितांसह अन्य सहा जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आलं.

४ फेब्रुवारी २०१४ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातला मुख्य आरोपी, इंडियन मुजाहिद्दीनचा मुख्य सूत्रधार यासिन भटकळला महाराष्ट्र एटीएसने नेपाळ बॉर्डरवर अटक केली.

हा यासिन भटकळ असा दहशतवादी आहे, ज्याच्या नावावर १० पेक्षा जास्त दहशतवादी हल्ले घडविल्याचे आरोप आहेत. मुंबई हल्ल्यासोबतच पुण्यातला जर्मन बेकरी बॉम्बस्फोट, दिल्ली सिरीयल बॉम्बस्फोट, मुंबई लोकल, बेंगलोर, जयपूर, वाराणसी, सुरत आदी ठिकाणी त्यानं बॉम्बस्फोट घडवून आणले.

आजवर मुंबईत अनेक हल्ले झाले. पण ती कधी ही थांबली नाही. ती चालूच आहे अव्यहातपणे, एखाद्या कष्टाळू महिलेप्रमाणं आपल्या मुलाबाळांसाठी.  

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.