२०२४ अजेंडा समोर ठेवून मोदींच्या विरोधकांचा आवाज आक्रमक होत चालला आहे…

२० ऑगस्ट रोजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एक ऑनलाइन बैठक आयोजित केली आहे ज्या बैठीकीला काल त्यांनी विरोधी नेत्यांना आमंत्रण दिले आहे. त्यामुळेच मिशन २०२४ ला समोर ठेवून आता खुद्द सोनिया गांधी देखील मैदानात उतरलेल्या दिसत आहेत.

या ऑनलाइन बैठीकीला त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन, सोबतच पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी यांना देखील उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले आहे.

ममता बॅनर्जी यांच्या सहाय्यकांनी याची शक्यता वर्तवली आहे कि,

ममता स्वतः या बैठकीत उपस्थित राहू शकतात. संसदेच्या नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते, न्यायाधीश आणि पत्रकारांचे फोन टॅप केल्याच्या कथित टॅपिंग आणि सध्या सुरू असलेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांनी ही बैठक बोलावली आहे.

या सभेचा विरोधी पक्षांच्या कामिगिरीवर तसेच पुढील नियोजनावर चर्चा होणार असल्याचं आणि विरोधी एकजूट मजबूत करण्याचे मार्ग काढले जातील असं बोललं जात आहेत.  

थोडक्यात या सगळ्या हालचाली पुढील २०२४ च्या निवडणुकीला समोर ठेवून चालू आहेत हे तर स्पष्ट आहे.

त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काही काळापासून सर्व विरोधक एकटवले जात आहेत हे आपण पाहतोय. मात्र आता सोनिया गांधी आणि इतर नेत्यांमुळे हा आवाज आता मोठा होताना दिसत आहे.

पवारांचे पॉवर पोलिटिक्स

शरद पवारांच्या सत्तेच्या राजकारणाची व्याप्ती आता पुन्हा दिल्लीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न चालू आहे. शरद पवार सध्या विरोधी पक्षांमधील एक महत्त्वाचा दुवा मानले जातात. ज्याशिवाय कोणाचेही काम एक पाऊल पुढे जाऊ शकत नाही.

शरद पवारांशी संवाद होत नाही आणि त्यांचे वक्तव्य येईपर्यंत काँग्रेस नेतृत्व अस्वस्थ होते असे म्हणले जाते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दिल्लीत आल्यानंतरही भेटल्या नाहीत तेव्हा त्याची माध्यमांवर बरीच चर्चा झाली, पुढे ती भेट झाली होती. 

लालू यादव यांची शरद पवारांशी भेट झाल्यानंतरच त्यांच्या जातीच्या जनगणनेच्या मोहिमेला गती मिळाली. तसेच कपिल सिब्बल यांच्या डिनर पार्टीला शरद पवारांच्या उपस्थितीमुळे अजून वजन प्राप्त होते.

राहुल गांधींचा आक्रमकपणा

‘हिंदुस्थानचे पंतप्रधान देश विकत आहेत … भारताचा आत्मा दोन -तीन उद्योगपतींना विकत आहेत.’ असं म्हणत राहुल गांधी हे गेल्या बऱ्याच काळापासून मोदी सरकारच्या विरोधात चांगलेच सक्रीय झाले आहेत. त्यांची प्रत्येक भाषणे, मोर्चे, आंदोलनांमध्ये राहुल गांधी ज्या आक्रमक पद्धतीने बोलतात त्यावरून त्यांची सक्रियता सिद्ध करते.

एक गोष्ट स्पष्ट होत आहे. ब्रेकफास्ट मिटिंगमधून मिळालेल्या ऊर्जेमुळे राहुल गांधींनी विरोधकांना एकत्र आणण्यास सुरुवात केली आहे. राहुल गांधींच्या या मोहिमेतील मुख्य घटक असल्याचे दिसत आहे.

काँग्रेस आणि ट्विटर यांच्यात सुरू झालेल्या सोशल मीडिया वादासंदर्भांत एक विशेष अपडेट असे देखील ट्विटरने राहुल गांधींचे आणि इतर काही पक्षाच्या नेत्यांची खाती देखील लॉक केली होती. काँग्रेसच्या वतीने #मैं_भी_राहुल हॅशटॅगने प्रचार करून काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या प्रोफाइलमध्ये नाव बदलून मी पण राहुल गांधी असं नाव बदलायला आणि लिहायला सुरुवात केली होती.

एकूणच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आज-काल राहुल गांधी यांचा रुद्रावतार बघायला मिळत आहे.

पण सध्या काँग्रेस पक्ष ज्या अडचणी आणि आव्हानांमधून जात आहे त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना सध्या आपल्या बोलण्यातील आक्रमकपणा पक्षात आणण्याची गरज आहे असचं म्हणावं लागेल. अधिवेशन आणि महत्वाच्या राज्यांच्या निवडणुका तोंडावर असल्यामुळे आता राहुल गांधी मोदी सरकारच्या विरोधातला आक्रमक राजकारण करू पाहत आहेत हे निश्चितच कॉंग्रेस पक्षासाठी सकारात्मक म्हणावी लागेल.

लालू यादव यांचे पुनरागमन

अलीकडे लालूप्रसाद यादवही जातीच्या जनगणनेवर वाद सुरू करून पडद्यामागून मोदी सरकारच्या विरोधात राजकारण करण्याच्या प्रयत्नात व्यस्त आहेत. असे दिसते की बिहार निवडणुकीच्या वेळी लालू प्रसाद यादव यांनी तेजस्वी यादव यांना कॉंग्रेसच्या महाआघाडीत समाविष्ट करून मुख्यमंत्र्याचा चेहरा म्हणून सादर केले होते.

ममता बॅनर्जी

मोदी सरकारच्या विरोधात जावून ममता दीदींचा अविष्कार आपण त्यांच्या निवडणुकीत पाहिलाच आहे. विरोधकांच्या एकजूटीसाठी ममतादीदी गेली बरेच दिवस पुढाकार घेत आहेत.

गेल्या महिन्यात दिल्ली दौऱ्यावर असताना ममतांनी विरोधकांच्या ऐक्यावरच भर दिला होता. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर केंद्रीय मंत्री तसेच काँग्रेस नेते सोनिया गांधी, राहुल गांधी, कमलनाथ, आनंद शर्मा आणि अभिषेक मनु सिंघवी यांची भेट घेतली. तसेच त्यांच्या दिल्ली दौऱ्यात त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, द्रमुक नेते कनिमोझी यांचीही भेट घेतली होती.

याशिवाय त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्याशी भेट होऊ न शकल्यामुळे त्यांनी फोनवर बोलून घेतलं होतं.

संजय राऊत

केंद्र सरकावर तिखट टीका नेहेमीच करत असलेले शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे सर्व देशाला माहिती आहेत. सीबीआय असो किंवा केंद्राकडून ईडीचा गैरवापर असो इत्यादींवर ते नेहेमीच परखडपणे केंद्र सरकारवर सरकारवर दबाब टाकत आले आहेत.

अशाप्रकारे सर्व विरोधकांची मजबूत एकजूट हि पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधाचे बी पेरत  आहे, आता या सक्रीयतेला नरेंद्र मोदी आणि भाजप पक्ष कसे उत्तर देतात हे आगामी काळात कळलेच…!

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.