2024 चा सामना “राहूल Vs मोदी” असा न होता “सोनिया Vs मोदी” असा होईल का..?

प्यार या PR काहीसा असाच उल्लेख सोनिया गांधी आणि राहूल गांधींच्या या फोटोचा केला जातोय. सोनिया गांधींनी राहूल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या. त्यांच्या सहभागामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आला…

पण हा उत्साह येतो तरी कसा आणि प्या या PR चं गणित नेमकं कस वर्कआऊट होवू शकतं हे समजून घेण्यासाठी आपणाला इतिहासात जावं लागतं.

गोष्ट आहे 1998 च्या लोकसभा निवडणूकांची. कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावर होते सिताराम केसरी. जेष्ठ आणि मात्तबर नेते. राजीव गांधींच्या मृत्यूनंतर नरसिंह राव आले व त्यानंतर झालेल्या निवडणूकीत अध्यक्षपदावर ठाण मांडून बसले सिताराम केसरी. 1998 च्या लोकसभा निवडणूकांमध्ये कॉंग्रेसचे अध्यक्ष या नात्याने केसरींनी एकूण किती प्रचारसभांमध्ये भाग घेतला होता माहित आहे का? तर शून्य.

अगदी डाव रचून त्यांना प्रचारापासून दूर ठेवण्यात आलं. पण जेव्हा निकाल लागले तेव्हा कॉंग्रेस हरली. या पराभवाचं खापर पुर्णपणे केसरीवर फोडण्यात आलं. आत्ता कॉंग्रेसचा सोनिया गट सुपरॲक्टिव मोडमध्ये गेला. केसरींना पदावर हाकलण्यासाठी डाव मांडण्यात आले. अगदी या जेष्ठ नेत्यांच्या धोतर फेडण्यात आलं. ते ही कॉंग्रेसच्याच कार्यकर्त्यांकडून..असंविधानिक पद्धतीने त्यांची गच्छती झाली. आणि सोनिया गांधी कॉंग्रेसच्या अध्यक्षा झाल्या.

कॉंग्रेसच अध्यक्षपद हाती आल्यानंतर सोनिया गांधींनी पहिलं काम काय केलं माहित आहे का? त्या थेट केसरींच्या घरी गेल्या. आणि त्यांना आशिर्वाद मागितला…

हे असतं PR जे सोनिया गांधींना जमतं आणि जमायचं. सोनिया गांधींनी आपल्या राजकीय कारकिर्दीची पहिली सभा घेतली होती ती श्रीपेरन्बदुर. तिथूनच जिथे राजीव गांधींची हत्या झाली होती.

आत्ता बोलूया आजबद्दल, आज चर्चा चालू आहेत त्या कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या.

खर्गे आणि थरूर मैदानात आहे. पण भारत जोडो यात्रेतून नेतृत्व राहूल गांधींकडेच असेल हे स्पष्ट आहे. 2024 च्या निवडणूका पुन्हा एकदा राहूल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी अशा होतील अशी चर्चा आहेत. पण समजा या निवडणूका मोदी विरुद्ध सोनिया गांधी अशा झाल्या तर..सोनिया गांधी पुन्हा ॲक्टिव झाल्या तर आणि सोनिया गांधी पुन्हा राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता किती आहे…

आत्ता ही शक्यता बाजूला कारण्यासाठी सर्वात पहिला कारण दिलं जातं ते म्हणजे सोनिया गांधींच्या वयाचं आणि आजारांच.

पण सोनिया गांधींच वय आहे 75 वर्ष. नरेंद्र मोदींच वय आहे 72 वर्ष. शरद पवारांच वय आहे 81 वर्ष. ममता बॅनर्जींच वय आहे 67 वर्ष. राजनाथ सिंग यांच वय 71 वर्ष आहे. नितीश कुमारांच वय आहे 71 वर्ष.. म्हणजे वयाच्या गणितावर सोनिया गांधींना बाहेरच पडावं अस काही चित्र दिसत नाही. नरेंद्र मोदींपेक्षा त्या अवघ्या तीन वर्षांनीच मोठ्या आहेत. त्यांच्या सक्रिय नसण्याचं कारण सांगितलं जातं ते त्यांच आजारी असणं.

पण याहून पक्ष आत्ता राहूल गांधीकडे सोपवणं गरजेचं आहे हे गणित सर्वात जवळचं असलेलं खरं कारण सांगितलं जातं. मात्र 2019 च्या निवडणूकांमध्ये राहूल गांधींच्या नेतृत्वाखालील निवडणूकामध्ये झालेला पराभव व आज अध्यक्षपदासाठी नसणारा भारी चेहरा पुन्हा सोनिया गांधींना सक्रिय राजकारण करायला भाग पाडेल अस चित्र आहे.

यासाठी काही प्रमुख कारण सांगितली जातात.

त्यातलं पहिलं कारण आपण सुरवातीलाच पाहिलं. सोनिया गांधींकडे असणारं PR कौशल्य. ज्यामुळे परकिय असण्याचा मुद्दा खोडून त्यांनी कॉंग्रेसमध्ये नेतृत्व मिळवलं व त्यानंतर 2004 व 2009 साली कॉंग्रेसला सत्ता मिळवून दिली.

दूसरं कारण जुन्या नव्यांचा संघर्ष सोनिया गांधीच मिटवू शकतात हे सांगता येईल.

आज अशोक गेहलोत बंडाची झलक दाखवण्यापर्यन्त गेलेत. सुशील कुमार शिंदे म्हणाले होते मी राहूल गांधींना ५ वर्ष भेटलेलो नाही. पृथ्वीराज चव्हाण यांच देखील असच वक्तव्य होतं. इथे उदाहरण घेवून पृथ्वीराज चव्हाण यांच. पृथ्वीराज चव्हाण केंद्रात असताना पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री होते. याच काळात दोन ते तीन वर्षांसाठी त्यांच्याकडे CBI खात्याचा कारभार आला. कायद्यातील खाचा त्यांना चांगल्या माहित आहेत.

त्यांना कागदांची भाषा उत्तम कळते. जेव्हा राजीव गांधींनी पृथ्वीराज चव्हाणांना तिकीट दिलं तेव्हा राजीव गांधी त्यांच्याकडे उत्तम टेक्नॉलॉजी व प्रशासन कळणारा तरूण म्हणून पहात होते. ती गोष्ट सोनिया गांधींनी हेरली. आज देशभर जर ED च्या कारवाया जाणिवपूर्वक होत आहेत असा कॉंग्रेसचा आरोप असेल तर अशा खात्यांचा कारभार कळणारा नेता जवळ असणं ही कॉंग्रेसची गरज आहे.

मात्र पृथ्वीराज चव्हाण यांना अडगळीत टाकून नव्याने नेते तयार करण्यावर राहूल गांधींची भिस्त होती. आज मात्र मोदींना भक्कम विरोध करायचा असेल तर तितकेच अनुभवी लोकं सोबत असणं ही कॉंग्रेसची गरज आहे आणि हा संवाद फक्त सोनिया गांधींच्या सक्रियेतून सुटू शकतो.

तिसरं कारण म्हणजे, सोनिया गांधींचा पक्षावर असणारा प्रभाव.

संवाद नसल्याने आज अनेक नेते पक्ष सोडत आहेत. हा संवाद पुन्हा तयार करता आला तरी जुने जाणते लोक पक्षवाढीवर लक्ष्य केंद्रित करू शकतात. राहूल यांच्याशी वयामुळे होत नसलेला संवाद याला उत्तर सोनिया गांधीसोबत असणारी जुनी ओळख या गोष्टीने देता येवू शकते. आज कॉंग्रेसमध्ये पक्षावर एकताही होल्ड निर्माण करू शकणारी एकमेव व्यक्ती म्हणून सोनिया गांधींचच नाव समोर येतं, हा प्रभाव निश्चितच कॉंग्रेसचं आऊटगोईंग थांबवू शकतो व नव बळ देवू शकतो.

चौथ कारण आहे ते म्हणजे, लोकांना अपील होण्याची क्षमता.

माध्यमांमधून राहूल गांधींची पप्पू म्हणून इमेज सेट झालेली आहे. ही इमेज सेट करण्यात ट्रोलर्स वगैरे लोकांचा हातभार आहे असा दावा कॉंग्रेसकडून केला तरिही झालेली इमेज खोडून काढणं हे खूप अवघड आव्हान कॉंग्रेससमोर आहे. त्या तुलनेत सोनिया गांधींची जुनी इमेज आजही सेट आहे.

लोकांना परकिय मुलखातून ऐवून सत्ता हातात घेणं, लढणं या गोष्टींमुळे सोनिया गांधींशी एक बॉण्ड कनेक्ट करता येतो. इथे आपण लक्षात घ्यायला हवं की आपली चर्चा नरेंद्र मोदी व सोनिया गांधीं यांच्यात सर्वाधिक अपील होणारा चेहरा कोणता ही नसून. आज कॉंग्रेसमोर असणाऱ्या राहूल, प्रियांका, खर्गे आणि थरूर यांच्यात सर्वाधिक अपील होणारा चेहरा कोणता अशी चालू आहे. अन् इथे निर्विवाद सोनिया गांधी पुढे आहेत.

पाचवं आणि शेवटचं कारण ठरू शकतो तो त्यांचा आंतराष्ट्रीय ते राष्ट्रीय राजकारणाचा अनुभव.

आज आतंराराष्ट्रीय पातळ्यांवरील घडामोडींबाबत विरोधक प्रश्न विचारत नाहीत. राजकारणाच्या मैदानात कोणते मुद्दे घेवून जावेत याबद्दल विरोधकांना जाणीव नसल्याचं बोललं जातय. विचार करा बाहेरील देशात एखाद्या आंतराराष्ट्रीय मंचावरून विरोधी पक्षनेता म्हणून कोणता नेता आज उत्तम भूमिका मांडू शकतो.

त्याचसोबतीने गावगाड्यात येवून प्रचाराचे मुद्दे कोणते असावेत याबद्दल बोलू शकतो. इथेही सोनिया गांधींच नावचं सर्वात अग्रक्रमावर येतं. या व अशाचं कारणामुळे फक्त प्यार नाही तर PR म्हणून देखील या फोटोकडे पहावं लागतं.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.