अघळपघळ अहमदनगरची २१ वैशिष्टै माहित आहेत का..?

तुम्हाला सांगून पटेल काय एकेकाळी अहमदनगरची तुलना कैरो आणि बगदाद सारख्या शहरांसोबत व्हायची. पण हे खरं आहे सर्वात समृद्ध शहर म्हणजे अहमदनगर होतं.

इथल्या मातीत काहीही टाकलं तरी उगवून येण्याची ताकद आहे. लोकांनी इथे सहकार टाकला उगवून आला, इथे डावे टाकले उगवून आले, इथे संघ टाकला उगवून आला. अघळपघळ असणारं अस हे अहमदरनगर.

महाराष्ट्रातला सर्वात मोठ्ठा जिल्हा म्हणून अहमदनगरचा उल्लेख करण्यात येतो. याच जिल्ह्यात दुष्काळ देखील आणि आणि सुकाळ देखील. दुष्काळामुळे विस्थापित होणारा समुदाय एकीकडे आहे आणि बागायदार लोक देखील आहेत. सर्वाधिंक वेगवेगळी फळ घेणारा हा जिल्हा ओळखला जातो.

अशा या अहमदनगरची तितकीच अघळपघळ वैशिष्टै.

१) महाराष्ट्रातली पहिली मानवी वसाहत या जिल्ह्यात होती. प्रवरा नदीच्या काठी दायमाबाद आणि नेवासे येथील उत्खननातून या जोर्वे या संस्कृतीचा शोध लागला. महाराष्ट्रातल्या संस्कृतीचा हा सर्वात प्राचीन ठेवा समजला जातो. या संस्कृतीबद्दल तुम्हाला अजून जाणून घ्यायचं असेल तर खालील लिंकवर नक्की क्लिक करा.

२) इस पूर्व ९०० ते ३०० या दरम्यान इथे आंधभृत्य, इस ४०० पर्यन्त राष्ट्रकुट चालुक्य, ११७० ते १३१० देवगिरीचे यादव,  पंधराशेव्या शतकात बहामनी, बहामनीतून बाहेर पडलेल्या मलिक अहमदशॉ बहिरी यांची सत्ता या भागात होती.

निझामशाही नंतर मराठेशाही व त्यानंतर मुगलशाहीची सत्ता या परिसरात होती . त्यानंतरच्या काळात म्हणजे १७५९ मध्ये इथे पेशव्यांचा अंमल सुरू झाला. १८०३ मध्ये नगर इंग्रजांच्या ताब्यात गेलं.

याच मलिक अहमदशॉ बहिरी सीना नदीकाठी नगर शहराची स्थापना केल्याची सांगण्यात येत. त्याच्याच नावावरून या शहराचं नाव अहमदनगर अस करण्यात आलं.

१८२२ साली इंग्रजांनी अहमदनगर जिल्हा जन्माला घातला.

३) इथे मलिक अहमदशॉ बहिरी यांच्यासोबत आध्रांतून आलेला पद्मशाली समाज आहे, राजस्थानातून आलेला तांब्याची भांडी बनवणारा समाज आहे, ब्रिटीशांसोबत व्यापार करण्यासाठी आलेला पारशी आणि मारवाडी समाज देखील आहे.

पण नगर शहरावर व आसपासच्या परिसरावर प्रामुख्याने मराठा, धनगर, माळी व वंजारी या जातींच प्रभुत्व राहिलेलं आहे. याच जातींचं राजकारण होत असल्याचे आरोप अनेकदा केले जातात. जातीय हत्यांकांड झाल्याचं शाप देखील याच नगर जिल्ह्याकडे जातो.

४) आम्ही सुरवातीलाच नगर जिल्हात दोन्ही टोकाच्या गोष्टी असल्याचं सांगितंल, त्यातलच वैशिष्टे म्हणजे या जिल्ह्यात ज्ञानेश्वरी लिहण्यात आली आणि याच जिल्ह्यात शिव्यांच युद्ध देखील रंगत.

ज्ञानेश्वरांनी नेवासे येथील मुक्कामात ज्ञानेश्वरी रचली, चक्रधरस्वामींनी इथेच लीळाचरित्र लिहला तर, याच जिल्ह्यात नगरजवळ असणाऱ्या शेंडी पोखर्डीला शिव्यांच युद्ध होतं. समोरासमोर येवून एकमेकांना शिव्या दिल्या जातात.

५) नगरचा उल्लेख करायचा आणि सुरवातीलाच सहकाराबद्दल सांगायच नाही अस होणार नाही. सहकार इथल्या मातीत घट्ट रुजला. पद्मश्री विखे पाटील व धनंजयराव गाडगीळांनी इथे आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना उभारला.

लोकांना एकत्रितपणे घेवून काम करण्याची परंपरा राळेगणसिद्धी आण्णा हजारे, हिवरेबजारला पोपटाराव पवार यांच्या रुपाने तर स्नेहालयच्या माध्यमातून शरिरविक्री करणाऱ्या महिलांच्या मुलांना शिक्षण देण्याच काम गिरीष कुलकर्णी व सुवालाल गांधी यांच्यामार्फत केले जाते.

जामखेड तालुक्यात डॉ. रजनिकांत व मेबल आरोळे यांनी विद्यकिय क्षेत्रात आदर्शवत काम केले. मॅगसेसे पुरस्कार मिळालेली ही माणसं. संगमनेरचे संतोष पवार, सिस्टर डॅफनी सिक्केरा, भाऊकाका एड्सग्रस्तांसाठी काम करतात तर फादर बाखर जलसंवर्धनाचे काम करतात.

६) नगर जिल्ह्यातील राजकारण्यांची नावं घ्यायची तर कुणाचं नाव घेतलं आणि कुणाचं नाही हे “बोलभिडू” चं दूखणं होवून बसेल पण टाळता येणार नाहीत अशी ही मंडळी. नगरचं दुखणं म्हणजे मुख्यमंत्रीपदाने या जिल्ह्याला कायमची हुलकावणी दिली.

मात्र इथले सगळे नेते मुख्यमंत्रीपदाच्या रेसमधले.अच्युतराव पटवर्धन, रावसाहेब पटवर्धन, बाळासाहेब भारदे हे सुरवातीच्या काळातले नेते. विठ्ठलराव विखे पाटील, शंकरराव काळे, शंकरराव कोल्हे, भाऊसाहेब थोरात, गोविंदराव आदिक, बाळासाहेब विखे, बाबुराव तनपुरे, मारूतराव घुले, आबासाहेब निंबाळकर, अण्णासाहेब शिंदे, यशवंतराव गडाख अशा नेत्यांची भलीमोठ्ठी यादी.

इथलं राजकारण अस आहे की चुकून एखादा नेत्याचा मान चुकला तर नगरकर चालत पुण्याला मोर्चा घेवून येवू शकतात. त्यामुळे आपल्या नेत्यांची नावे कमेंटमध्ये सुचवा आणि त्यांना स्थान देत राहू.

७) नगरचं खाणं ही गोष्ट सर्वात भारी. काळा मसाला ही खासियत. नगरमध्ये शिरताच संदिप, परखला काहीतरी ढकलून पुढे जाण्याचा शिरस्ता. पण इतक्यावर इथली खाद्यसंस्कृती संपत नाही. स्वत: खाण आणि दूसऱ्याला खावू घालणं इथल्या लोकांची खासियत. प्रत्येक गावात भंडारा ठेवला जातो. पूर्वी गुळाची लापशी, हरभऱ्याच्या घुगऱ्या आणि आत्ता बुंदी, डाळभात, मसाले भात, पुरीभाजी, बालुशाही, जिलेबी असा थाट अशतो.

गंगागिरी महाराजांचा हरिनाम सप्ताह हा त्याच्या भव्यपणामुळे प्रसिद्ध आहे. त्यामुळे फुकट खायला कोणी आला की त्याला इथं काय गंगागिरी महाराजांचा सप्ताह आहे काय म्हणण्याची पद्धत आहे.

कुठलीही भाजी काळ्या मसाल्यात घालून खळगुट केलं जातं. रस्यात चुरून खाण्याच्या पद्धतीनेच इथे नवरदेवाच्या ताटाखाली वटकन लावायची प्रथा आहे. बाजरीची भाकरी काळ्या मसाल्यातलं मटण झालं की इथं बास होतं.

सोबत कर्जतची शिपी आमटी प्रसिद्ध आहे. उत्तर भागात पेंडवडी, संगमनेरला बिबडी, पाथर्डीच्या रेवड्या आणि गोडी शेव, लाह्याचे धपाटे इत्यादी गोष्टी प्रसिद्ध आहेत.

८) मनोजकुमारच्या पिक्चरमधले शिर्डीचे साईबाबा आणि गुलशनकुमारच्या गाण्यातले शनीशिंगणापुर हे नगर जिल्ह्यातली सर्वाधिंक गर्दी असणारी ठिकाणं. याचशिवाय भगवानगड,देवगड, सराला, साकुरीचे आश्रम, अवतार मेहरबाबा, महानुभव पंथीयाचं डोमेग्राम, नेवासे अशी धार्मिक, अध्यात्मिक ठिकाणे आहेत.

९) महाराष्ट्रातल एकमेव असावी अशी मढीची जत्रा इथे भरते. या जत्रेचं वैशिष्ट म्हणजे ही जत्रा म्हणजे इथे गाढवांचा बजार भरतो. भटक्या समाजातील कोल्हाटी, वैदू, पारधी याची जात पंचायत यावेळी भरते. गाढवांच्या जत्रेबाबत अधिक माहीती आपण खालील लेखाद्वारे मिळवू शकता.

१०) तमाशा, बारी, जत्रा, यात्रेत रमणारा हा जिल्हा. इथले इंदुरीकर महाराज जसे फेमस आहेत तशीच तमाशा मंडळी पण फेमस आहेत. संवत्सराचे गोफनगुंड्याचे युद्ध, निघोजला मळगंगा देवीच्या यात्रेत पाण्यातून वर निघणारी घागर, बारागाव नांदुरला जावयाची गाढवावरून निघणारी धिंड, नगर शहरात पद्मशाली समाजाचा बांगलू पंडग उत्सव, कर्जतची रडाटयात्रा, श्रीरामपूरची रामनवमी, सयद्दबाबा ऊरुस, नागपंचमीला जामखेडमधील नृत्यपंचमी व पंचमी मंडळ. रात्रभर जामखेडमध्ये चालणारा कला केंद्र व संगीतबारी हे नगरच वैशिष्टे.

११) नगर जिल्हा कलाकारांचा जिल्हा आहे. साहित्य व कला क्षेत्रात दिग्गज माणसं देण्याचं काम या जिल्ह्यानं केलं.

कवी ना.वा टिळक, बालकवी ठोंबरे, कवी दत्त, वि.द. घाटे. मनोरमा रानडे, रामदास फुटाणे, डॉ. गंगाधर मोरजे, विलास गिते, खल्लीज मुज्जफ्फर, लक्ष्मण हर्दवाणी, डॉ. अरुण मांडे, रावसाहेब कसबे, रंगनाथ पठारे, शंकरराव दिघे, प्रकाशिका सुमती लांडे, समीक्षक र.बा. मंचरकर, सु.प्र. कुलकर्णी,  शाहू मोडक, राम नगरकर, सदाशिव आमरापुरकर, मधुकर तोरडमल,  मिलिंद शिंदे, र.बा. केळकर. द.गो कांबळे, अंबादास मुदिगंटी, प्रमोद कांबळे, प्रकाश कांबळे, श्रीधर अंभोरे अशी दिग्गज माणसे इथे होवून गेली, आहेत.

१२) स्वतंत्र उल्लेख करावा लागतो तो दोन क्रिकेटरचा एक झहीर खान. ज्याचा स्वॅग अस्सल नगरी म्हणून ओळखला जातो. तसाच मुंबईचा अजिंक्य रहाणे. नगर जिल्ह्यातील त्याच्या मामांच्या गावामुळे तो देखील चर्चेत असतो.

१३) इथल्या मातीत तयार झालेली ग्रॅंथसंपदा पाहिलीत तरी नगरच्या मातीत काहीही उगवून येवू शकतो यावरचा विश्वास दृढ होत जातो.

ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी, चक्रधरांनी लिळाचरित्र, पंडित नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया, सी.पी. घोष यांनी हिस्ट्री ऑफ एन्शन्ट इंडियन सिव्हिलायझेशन, डॉ. बाबासाहेबांनी थॉटस् ऑन पाकिस्तान, मौलाना आझादांनी गुबार-ए-खातिर असे ग्रॅंथ याच जिल्ह्यात लिहण्यात आलेत.

१४) नगरचं रणगाडा संग्रहालय आशियातलं एकमेव संग्रहालय असून इंग्लड, अमेरिका,  रशिया, जर्मनी, फ्रान्स, इ देशांनी युद्धात वापरलेले ४० हून अधिक रणगाडे सर्वात जूना १९१७ चा रोल्सराईस रणगाडा या संग्रहालयात आहे.

१५) पंजाब पोलीसांना अतिरेक्यांपासून लढण्यासाठी जे वाहन तयार केलं जात ते नगरमध्ये तयार होतं याची माहीती तुम्हाला आश्चर्यात टाकेल. व्हेइकल रिसर्च  ॲंण्ड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट येथे लष्करी वाहनांबद्दल संशोधन केले जाते. या केंद्रातून बुलेटफ्रुप कार तयार करण्यात आली.

१६) आज जगभर च्या रिक्षा दिसतात त्याचा शोध लावण्याच काम देखील नगरचं. फिरोदिया यांनी तिनचाकी ऑटोरिक्षाची निर्मीती केली. हा निर्मीतीचा इतिहास आपण खालील लेखाद्वारे वाचू शकता.

१७) फिरोदिया यांच्याप्रमाणेच व्हिडीओकॉन ही कंपनी देखील नगरची मुळ असणारी. याचशिवाय पारस उद्योग, L&T, इंडियन सीमलेल, कमिन्स, दिपक आर्टस असे महत्वाचे उद्योग नगरची शान आहेत.

१८) स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ही ऐतिहासिक घोषणा टिळकांनी दिली ती देखील नगरमध्येच मुंबईबाह्य मुंबई राज्यातील पहिली सहकारी गृहरचना नगर शहरात २ फेब्रुवारी १८९१ साली स्थापन करण्यात आली. कंपनी लिमिटेड या संस्थेच्या आवारात ही ऐतिहासिक घोषणा सर्वात प्रथम ३१ मे १९१६ रोजी देण्यात आली.

१९) सेनापती बापट, डॉ. पा.दा. गुणे, शं.द. क्षीरसागर याचा नगरच्या योगदानात वाटा राहिला आहे. अहमदनगर एज्युकेशन सोसायटी न्या. महादेव रानडे यांनी स्थापन केली. इथले शाळा-कॉलेज एतिहासिक म्हणून परिचित आहेत.

२०) थोर स्वातंत्र्य सेनानी रावसाहेब पटवर्धन आणि अच्युतराव पटवर्धन हे बंधू तसेच  भारताचे माजी अर्थमंत्री व रेल्वेमंत्री मधु दंडवते ही राजकारणातील आदर्श अशी त्रिमूर्ती मूळची नगरची आहे.

२१) देशातील पहिली महिला शासक रजिया सुलतान दिल्लीची तर चांद बिबी ही अहमदनगरच्या निजामाची कन्या. देशातील दुसरी महिला शासक (सन १५५० ते सन १५९९) तिने मुघल शासक अकबराविरुद्ध निकराचा लढा दिला, तिची कबर नगर पाथर्डी रस्त्यावर मदडगाव-टाकळीकाझी नजीक आहे.

संदर्भ :

अशोक तुपे : महाराष्ट्र दर्शन, देवेंद्र राक्षे : मैत्री २०१२

याशिवाय देखील नगरची खुपसारी वैशिष्टै आहेत. आपणाला माहित असणारी वैशिष्टे कमेंटमध्ये सांगा, राहिलेल्या लोकांची नावे कमेंटमध्ये सुचवा. आपल्या कमेंटमुळे नगर जिल्ह्याची माहिती परिपुर्ण होवू शकेल.

हे ही वाच भिडू. 

7 Comments
  1. bhal patankar says

    To the best of my knowledge, memory & belief, it was Late J.N.MARSHALL who initially supported BG AND even the first assignment was by JNM. He was inducted on the Board of Directors of Simmonds Marshall Ltd

  2. Girish Deshmukh says

    Akole baddal kahi tari lihil asat tar anadach zala asata
    Maharashtra madhil saravat highest pick ‘kalasubai’ akolyat ahe harishchandra gadh ahe
    Asia madhali 2nd largest valley ‘sandan valley’ ahe akolyala
    Pemgiri cha vadach tree ahe je Asia madhe 2nd largest tree ahe
    Akolyat pichad sahebansarakhe nete ahet
    Kahi tari lihil asat bolbhidu cha niyamit vachan karanara mi akolyacha ahe mala Barr vatal asat

  3. Ajinkya says

    पारनेर तालुक्या मध्ये तीर्थ क्षेत्र कोरठन चा खंडोबा, निघोज मध्ये प्रसिद्ध असलेले रान्जण खळगे(pot holes) आणि जगातीक आश्चर्यपैकीं लवन स्थंभ दर्या बाई पाडली येथें आहे.

  4. SHANTANU RAKTATE says

    लेख खरं तर सुंदर आहे पण परिपूर्ण नाही….वरील अभिप्राय खरंच लेखात अंतर्भूत केले पाहिजे…बोल भिडू ला विनंती आहे की वरील लेख पुन्हा एकदा सर्व अभिप्राय वाचून पुनर्लेखन केला जावा.

    काही दुर्लक्षित व्यक्तिमत्व –

    नारायण वामन टिळक (रेव्हरंड टिळक) – रत्नागिरी जिल्ह्यात जन्म, मराठी साहित्यातले आद्य कवी, बालकवी यांचे गुरू, सुरवातीला नगर जिल्ह्यात ख्रिश्चन धर्माची दीक्षा व जीवन कार्य, नगर जिल्ह्यात मृत्यू, त्यांची पत्नी लक्ष्मीबाई टिळक यांचे “स्मृतिचित्रे” ह्या ग्रंथात त्यांच्या बद्दल इत्यंभूत माहिती.

    बॅरिस्टर रामराव आदिक – मूळ गाव ता. श्रीरामपूर, जिल्हा. अहमदनगर, स्वतंत्र भारतातील बॅरिस्टर, मुंबई उच्च न्यायालय येथे वकीलीस सुरवात. वकिली क्षेत्र गाजवून सोडणारे व्यक्तिमत्व. अतिशय गरीब घरातून राजकारणा पर्यंतचा थक्क करणारा प्रवास, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न बनून देखील त्यांच्या मृत्यू नंतर मुंबई उच्च न्यायालयाने ‘ कोर्ट रेफरन्स’ देऊन त्यांचा सन्मान केला. ( बोल भिडू ला विनंती ह्या असामी वर स्वतंत्र लेख लिहावा…त्यांचे वकिली तले किस्से खूप जबरदस्त आहेत)

    सर्जेराव निमसे.- गाव – मांडवे, ता. नगर. नगर येथील न्यू आर्टस , सायन्स अँड कॉमर्स कॉलेज येथून अध्यापन करण्यास सुरुवात पुणे विद्यापीठ विज्ञान विभाग प्रमुख पद, रामानंद तीर्थ नांदेड विद्यापीठ कुलगुरू, लखनौ विद्यापीठ कुलगुरू पद भूषविणारे पहिले मराठी व्यक्तिमत्व.

    काही धार्मिक स्थळ
    शहांशरिफ दर्गा- नगर शहरातील मुकुंद नगर स्थित ऐतिहासिक दर्गा. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी ह्या दर्ग्यात मूल होण्यासाठी नवस बोलला होता. त्या नवसा मुळे मालोजी राजेंना अपत्य प्राप्ती….मुलांची नावे शहाजी व शरीफजी ह्याच दर्ग्याच्या अवलियावरून ठेवण्यात आल्या चा इतिहास.

    ह्यूम मेमोरियल चर्च. – इंडियन नॅशनल काँग्रेस चे आद्य संस्थापक Allen Hume ह्यांची नगर ला १८७४ ल भेट. १९०२ चर्च बांधकाम पूर्ण. पाश्चिमात्य स्थापन शैली.

    वृद्धेश्वर महादेव मंदिर( म्हातारदेव) पाथर्डी – पुराण काळातील महादेवाचे मंदिर. पिंड वैशिष्ट्य पूर्ण आकारात.

    छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मृति स्थळ. – अहमदनगर येथील न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज समोर समाधी, करवीर संस्थान (कोल्हापूर) चे वारस छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांचा ब्रिटिशांनी नगर च्या भुईकोट किल्ल्यात अनन्वित छळ करून खून केला. महाराजांचे पार्थिव आता असलेल्या समाधी स्थळी बेवारस पणे टाकून दिले. त्यांच्या मृत्यू नंतर शाहू महाराज यांना दत्तक विधान करून करवीर संस्थान प्रमुख करण्यात आले.

  5. Ronald Weasley says

    No offense to anyone but Ahmadnagar is also very famous for one of the best qaulity weed ( Ganja ). And it’s a very good thing.. Very knowledgeable article…..

  6. Shailendra Suresh Gaikwad says

    पाथर्डी तालुक्यातिल जार्गत देवस्थान मोहटादेवि भव्यदिव्य मंदीर सुद्धा अहमदनगर जिल्हातच आहे.

  7. Yuvraj kakade says

    शेवगाव तालुक्यातील आव्हाणे या गावी एकमेव असे निद्रिस्त अवस्थेत असलेल्या गणपतीचे मंदीर आहे.
    झोपलेल्या स्थितीत असणारी गणपतीची मुर्ती दुर्मिळ आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.