तेव्हा एकवीस नख्यांच्या कासवामुळं आमच्या खात्यात कोटभर रुपये जमा होणार होते.
२५० रुपयांचा मोबाईल जन्म घ्यायचा होता तेव्हाची हि गोष्ट. म्हणजे नक्की कधीची सांगायची झाली तर तेव्हा E बिझ सारखे प्रकार मार्केटमध्ये जोरात होते. पल्स सारखी कंपनी मार्केट मारत होती आणि दिड लाखाच्या जपानी गादीवर झोपून आपला शेतकरी कोट्याधीश होण्याची स्वप्न पहात होता. हि गोष्ट त्याच अफवांच्या अधली मधली होती. अजून काळाच विश्लेषण करायचं तर मोबाईल सेट झालते तिथून या अफवेला बळ मिळत गेलं, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कर्नाटकातसुद्घा या कासवांनी राडे घातले होते.
आत्ता २०१९ आलं. सरत्या वर्षात कुठेतरी एखाद्या बातमीने हि अफवा आजही जिवंत असल्याच बळ मिळत होतं पण हळुहळु गोष्ट संपुष्टात आली. २०१४ नंतर प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवायलाच हवा अस काही नसतं हे शासनदरबारी मान्य झालं आणि लोक मोकळे झाले. लोकांना अफवा नावाचा प्रकार कळू लागलां. आत्ता सर्वात फेमस झालेली अफवा आणि त्यावर कोट्याधीश होण्याची स्वप्न पाहणारे तरुण म्हणून आम्हाला आठवलं ते एकवीस नख्यांच कासव.
एकवीस नख्यांच कासव हि नेमकी काय भानगड होती.
एक कासव असतं. त्याला बरोबर एकवीस नख्या असतात. म्हणजे कासव पकडायचं आणि त्याच्या नख्या मोजायच्या. ते पण कासवाच्या नकळतपणे. कारण एकवीस नख्याचं कासव साक्षात दैवी सिद्धी प्राप्त झालेलं कासव असतं. त्याला कळतं तुम्ही नख्यांसाठी त्याला पकडलय.मग ते आपल्याच नख्या खातं ( गांगुली मैदानात खायचा अगदी तसच) मग त्याचा उपयोग संपला. तस कासव कोण दोनशे रुपयेला पण घेत नाही. पण एकवीस नख्या असल्या तर फक्त CR मध्ये बोलायचं. CR म्हणजे कोटी. एका कासवाची किंमत पंधरा ते वीस कोटी. अजून पाहीजे असतील तर अजून मिळतील. तोंडाला येईल ती किंमत सांगायची तेवढे पैसे तुमच्या घरात पोहच होणार.
बघता बघता हि अफवा बळ धरू लागली. पहिल्यांदा पश्चिम महाराष्ट्रात नद्या, विहीर, ओढे, तलाव असल्याचा पश्चाताप वाटू लागला. तरुणाई कुत्र मागं लागल्यासारखं स्वप्न पाहू लागली. कासव तर हक्काचचं होतं. सहज पडक्या विहीरीमध्ये कासव दिसायचं. शेतकरी पुत्रांना नवा व्यवसाय मिळाला. रात्र झाली की कासव, दिवस उजाडला की कासव. विहरीच्या कडेला डोळे लावून बसणारी नवीन जमात मार्केटमध्ये आली. हि होती बळी गेलेली पहिली फळी.
दूसऱ्या फळीत दलाल होते. इतक्या सोप्या आणि फायदेशीर व्यवसायात देखील आपण दलाल व्हावं वाटणारी माणसं आळशीपणाच अत्युच्च टोक होती. या मुलांच्या वेगळ्या टोळ्या तयार झाल्या. तालुका ते तालुका, जिल्हा टू जिल्हा आणि मराठवाडा टू पश्चिम महाराष्ट्र अशा कनेक्टिव्हिटी या टोळ्यांमुळे निर्माण झाली. हे कार्यकर्ते पोरांना कासव पकडायला सांगायचे आणि पोरांनी कष्ट करावं म्हणून कासवाची महती सांगायचे.
तर हे कासव काय करायचं पैशाचा पाऊस पाडायचं.
कसं, तर म्हणे कासवाला घ्यायचं, सोबत एक देवरुषी घ्यायचा. ते खास कासवाकडून पैशाचा पाऊस पाडणारे स्पेशॅलिस्ट म्हणून ओळखले जायचे.
ते एका माळरानावर एकवीस नख्याचं कासव घेणार आणि कुठल्यातरी आमवस्येच्या रात्री कासवाचा बळी देणार मग पैशाचा पाऊस पडायला सुरवात होणार. आत्ता यातली गंम्मत अशी असायची की सांगणारा दलाल जणू त्याच्यापुढे पैशाचा पाऊस पडल्यासारखं या गोष्टीचं वर्णन करायचां. म्हणजे मी बघितलं, आम्ही माळावं गेलो. तेनं कासवं घेतलं, पोत्यानं पैशे पडलं पण घोळ झाला, कासवाच्या पोटावर काळा डाग होता. सेम डाग नोटांवर आला. सगळ्या नोटांवर काळा शिक्का. च्याआयला आजून नोटा हायत तूला दाखवतो चल.
तो उद्या काही यायचा नाही फक्त हि गोष्ट दूसऱ्या दिवशी तिसऱ्या माणसाला सांगितली जायची आणि चौथ्या दिवशी पाचवा माणूस कासवाच्या मागं लागायचा.
दोन चार वर्ष अफवा धुमाकूळ घालत होती. यातनच टोळ्या तयार झाल्या. आत्ता कासवं संपायला आली. तितकी पोरं सक्रियच झालेली. मग त्याच्या मागून आलं मांडुळ. दोन तोंडाचा दुतोंड्या म्हणून ओळखला जाणारा साप. त्याची शेपटाकडची बाजू देखील तोंडासारखी असयाची, तो सहजासहजी सापडायचा नाही. लोक असही सांगायचे की, औषधासाठी या सापाचा वापर होतो. तस्करी करणारे शो पीस म्हणून घरात साप पाळणाऱ्यासाठी हा दुतोंड्या घेवून जायचे. पोरं थेट दुतोंड्याचा मागे लागले. काळ मांजर, खवल्या मांजर, घुबड जे अशक्य वाटतय ते सगळे प्राणी पेरले.
गोष्ट पोलिसांच्या रडारवर आली आणि एकएक अडकत गेला. पोलिस कासव ऐकलं तरी हाणत्यात हे शेतकऱ्यांच्या पोरांच्या लक्षात आलं आणि वातावरण शांत होतं गेलं.
२०१८ पर्यन्त अफवा पुर्ण बंद पडली. २०१९ ला तर या अफवेच क्ष किरणपण राहणार नाही अस वाटतं पण अजूनपण कुठल्यातरी कोपऱ्यातून कासव तस्करी करणाऱ्यांना पकडण्यात येतं तेव्हा गप्पगुमान रात्रीच ऊसाला पाणी लावून दिवसा MIDC त कामाला जाणारा शेतकरी पुत्र आठवतो. झटपट श्रीमंत होणाऱ्या या जुमल्याने फक्त एकच काम चांगल केलं, ते म्हणजे हजारो पोर पोहायला शिकली.
हे ही वाचा.
- बारमाही अफवांचं पिक.
- कोल्हापूरातल्या या गावात चालतां चालतां सोनं घावतय !
- रात्रीच्या अंधारात तुम्हाला कधी हाकामारीचा अनुभव आला आहे का ?